Wednesday, September 25, 2024

त्या’ झोपडपट्टी धारकांचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - खा. संजय जाधव

गंगाखेड (प्रतिनिधी) : शहरातील गौतम नगरातील झोपडपट्टी धारकांनी पिटीआरच्या मागणीसाठी बुधवार २५ सप्टेंबर रोजी नगर परिषद कार्यालयात ठिय्या मांडून घेराव घालत आंदोलन केले. झोपडपट्टी धारकांचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही, याप्रसंगी उपस्थित खा. संजय उर्फ बंडू जाधव यांनी दिल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली.

गंगाखेड शहरातील शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या झोपडपट्टी धारकांचे अतिक्रमण शासन नियमाप्रमाणे नियमानुकुल करून पिटीआर देण्याच्या मागणीसाठी जनशक्ती कृती समितीच्या वतीने अध्यक्ष प्रमोद मस्के यांनी वेळोवेळी आंदोलन छेडल्याने गौतम नगर परिसरातील ५२ अतिक्रमण धारकांना नगर परिषद प्रशासनाच्या वतीने पिटीआर देण्यात आले. मात्र उर्वरित लाभार्थ्यांना पिटीआर मिळाले नसल्यामुळे गौतम नगरातील झोपडपट्टी धारकांनी बुधवार रोजी दुपारी १२ वाजेदरम्यान नगर परिषद कार्यालयावर मोर्चा नेऊ नगर परिषदेच्या सभागृहात व पायऱ्या तसेच प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून कर्मचाऱ्यांना घेराव घालत आंदोलन केले.

Municipal Council

या आंदोलनामुळे  नगर परिषद कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर पडणे व बाहेरील व्यक्तींना आत प्रवेश करता आले नसल्याने दिवसभर सर्वच कामे ठप्प पडली होती. आंदोलनाची माहिती समजताच खा. संजय जाधव यांनी आंदोलनस्थळी भेट देत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याशी संपर्क साधत गौतम नगर परिसरातील झोपडपट्टी धारकांच्या प्रश्नासाठी लवकरच बैठक लावावी असे सांगत झोपडपट्टी धारकांच्या पिटीआरचा प्रश्न निकाली निघाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही आंदोलनकर्त्यांशी बोलताना दिली.

नगर परिषदेचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांनी दिलेले लेखी आश्वासन कार्यालयीन अधिक्षक शेख मो. अफजलोद्दिन, शिवाजी हजारे यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर सायंकाळी ५:३० वाजता आंदोलनाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी भाई गोपीनाथ भोसले, कॉ. ओमकार पवार, कॉ. योगेश फड, भास्कर काळे, श्रीकांत भोसले, गोविंद आय्या, जितेश गोरे, रजत गायकवाड, जानकीराम पवार, सुभाष भालेराव, शेख रहिमोद्दीन, प्रकाश पोवळे, शेख अल्लाबक्श, नूर खान आदींसह बहुसंख्य आंदोलनकर्ते महिला, पुरुष मंडळी उपस्थित होते. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला होता

No comments:

Post a Comment