Tuesday, April 13, 2021

* डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मामुळे *

प्रा. डॉ. गजानन सवने,
वसुंधरा महाविद्यालय,घाटनांदूर ता .अंबाजोगाई जि. बीड 
मो .नं. 9421992335 
ई-मेल : drgajanansawane@gmail.com

*भिमा तुझ्या जन्मामुळे*
*उद्धारली कोटी कुळे...

वरील काव्यपंक्ती प्रसिद्ध दलित कवी व गायक वामनदादा कर्डकच्या आहेत.यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल लिहिलेले हे गीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पददलित, शोषित, पीडित लोकांचे उध्दारक आहेत. अशा शोषित, पीडित, गावकुसाबाहेरील लोकांच्या जीवनात मानवरूप प्रदान करण्याचे काम डॉ. आंबेडकरांनी केले आहे.त्याच बरोबर डॉ. बी. आर. आंबेडकर यांचा जन्मामुळे आणि त्यांच्या कर्तृत्वामुळे सामाजिक, आर्थिक, राजकीय व साहित्यिक परिस्थितीमध्ये बदल झालेले आहेत.'महामानव' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 ला मध्यप्रदेशात 'महू' गावी झाला.त्यांच्यावर महात्मा गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव राहिला आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे उच्च विद्याविभूषित व  कायदेपंडित होते. यामुळे त्यांनी अनेक जटिल समस्या आपल्या तर्कबुद्धीच्या बळावर सोडवून दाखवल्या .त्यामुळे कवी वामनदादा कर्डक म्हणतात की, 'जगातली देखणी बाई मी भिमाची लेखणी ' आणि याच लेखणीव्दारे ज्ञानाच्या बळावर प्रस्थापित व्यवस्थेला बदलायचे काम डॉ.बी. आर. आंबेडकर यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मापासून भारतीय समाजाने नवीन वळण घेतले होते.समाजातील प्रचलित रूढी, परंपरा, अंधश्रद्धा याला विरोध करून नवीन समाजव्यवस्था निर्माण होत होती. डॉ. बाबासाहेबांचा जन्म झाला त्यावेळी महात्मा फुले यांचा मृत्यू झाला होता.पण महात्मा फुले यांचे विचार समाजात प्रस्थापित होत होते. मनु स्थापित  व्यवस्थेच्या विरोधात 'सत्यशोधक' समाज उभा राहिला होता. याच वेळी छत्रपती शाहू महाराज आपल्या संस्थानात दलित ,शोषित ,पीडित बहुजनांना हक्क व अधिकार प्रदान करीत होते.महात्मा फुले, शाहू महाराज यांनी समाज सुधारण्याची सुरुवात केली होती, पण खऱ्या अर्थाने समाज सुधारण्याचे काम आंबेडकरांनी केले.आंबेडकरानी  प्रथम समाजाला शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. स्वतः उच्चशिक्षित झाले आणि समाजाला उच्चशिक्षित होण्याचे सांगत होते. शिक्षणासाठी आंबेडकरांनी मुंबई ,औरंगाबाद येथे शाळा-महाविद्यालये उघडण्याचे काम केले. या शाळा-महाविद्यालयांतून अनेक विद्यार्थी घडवले जात आहेत. डॉ.आंबेडकरांनी प्रत्येक व्यक्तीला आपली ओळख जात धर्म पंथ न सांगता आपल्या कर्तृत्वाने सांगावे असे सांगितले. या विचाराचा प्रभाव संत कबीराचा आहे. संत कबीर आपल्या दोह्यात  म्हणतात की,
*जाति पाति पूछे नहिं कोई*,
 *हरि को भजे सो हरि का होई*
समाजातील सर्वात शोषित, पीडित नारीला सन्मान, हक्क, अधिकार प्रदान करण्याचे काम संसदेत 'हिंदू कोड बिल' ठेवून आंबेडकरांनी क्रांतीच केली.स्त्रीला पितृसत्ताक व्यवस्थेतून मुक्त करून त्यांना स्वातंत्र्य करण्याचे काम केले.यामुळे आंबेडकरांना भारतीय समाजशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाते.त्यानी भारतीय समाजातील परंपरेने येणाऱ्या गुलामगिरी पद्धतीला बंद केले. याबद्दल डॉ. आंबेडकर  म्हणतात की, "तिरस्कारणीय गुलामगिरी अन्  अमानुष अन्यायाच्या गर्तेत पिचत पडलेल्या ज्या समाजात मी जन्मास आलो त्या समाजाची गुलामगिरी नष्ट करण्यास मी अपयशी ठरलो तर स्वतःला गोळी घालीन."आणि या गुलामगिरी पद्धतीला नष्ट करण्याचे काम आंबेडकर यांनी केले. याबद्दल छत्रपती शाहू महाराज यांनी माणगांव येथील परिषदेत म्हटले होते की, "आंबेडकरांमध्ये तुम्हाला तुमचा उद्धारकर्ता लाभला आहे ते तुमच्या बेड्या तोडून टाकतील याची मला खात्री आहे."डॉ. आंबेडकरांनी भारतीय समाजात प्रेम, बंधुत्व, समता, न्याय प्रस्थापित केला. डॉ. आंबेडकरांनी भारतीय समाजाचा अत्यंत अभ्यास केला होता. त्यानंतर त्यांनी भारतीय समाज व्यवस्थेवर 'भारतीय जातीसंस्था, तिची यंत्रणा ,उत्पत्ती व विकास(1916), कास्ट इन इंडिया (1924), हॉट काँग्रेस अँड गांधी हँच इन टू द अनटचेबल्स(1945), हू वेअर द शुद्राज(1946), गांधी व अस्पृश्यजनांचे   बंधविमोचन, अँनिहिलेशन ऑफ कास्ट(1937) या ग्रंथांचे लेखन केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील प्रचलित धर्माचा अभ्यास केला होता. त्यामध्ये  बौद्ध धर्मांने आंबेडकरांना अत्यंत प्रभावित केले होते .कारण बौद्ध धर्मात जातीभेद ,उच नीच, अस्पृश्यतेची भावना नव्हती. याधर्मात सर्व मानव समान आहेत. डॉ.आंबेडकरांनी  सन 1935 मध्ये अशी घोषणा केली होती की, "मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही "आणि त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 मध्ये नागपूरला आपल्या अनुयायांना सोबत घेऊन  बौद्ध धर्माचा स्वीकार केला. डॉ. बाबासाहेबांनी आपले धर्माबद्दलचे विचार 'बुद्ध अँड हिज धम्म'( 1957 ),रिडल्स इन हिंदूइझम(1957) याग्रंथांमध्ये मांडले आहेत.
भारतीय अर्थशास्त्रज्ञ म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले जाते.त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा सखोल अभ्यास केला होता भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी  अनेक सूचना आणि मार्गदर्शन केले आहे.डॉ. आंबेडकरांनी  'एजंट इंडियन कॉमर्स( 1956),द  इव्होल्यूशन ऑफ प्राँव्हिन्शिअल  फायनान्स इन ब्रिटीश इंडिया (1924) द प्राँब्लेम आँफ द रुपी (1946) या ग्रंथाचे लेखन केले.
भारतातील राजकीय व्यवस्थेला बदलायचे काम डॉ. आंबेडकर यांनी केले. अनुसूचित जाती व जमातीला राजनीतीमध्ये आणून सत्तेत सहभागी केले. ही जात व जमात वर्षानुवर्षे शिक्षण, राजकारणापासून दूर होती. त्यांना आपल्या हक्क व अधिकाराची जाणीव करून दिली.त्याचबरोबर राज्यघटनेमध्ये सर्व नागरिकांना समान मतदान हक्क प्राप्त करून दिला.त्यामुळे भारतीय लोकशाहीला खरं महत्त्व प्राप्त झाले. डॉ. आंबेडकरांनी सन 1936 मध्ये 'स्वतंत्र मजूर पक्षाची ' स्थापना केली.डॉ. आंबेडकर यावरच न थांबता त्यांनी सन 1942 मध्ये 'ऑल इंडिया शेड्युल्ड कास्टस फेडरेशन' नावाच्या पक्षाची स्थापना केली. या राजकीय बदलामुळे आज आपण पाहत आहोत की, भारतीय राजकारणात अनुसूचित जाती व  जमाती व्यक्तीचे नेतृत्व उदयास आलेले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मामुळे  भारतीय समाज, राजकीय, अर्थ, धर्म व्यवस्थेत बदल झाला नाही तर त्याच्या बरोबर साहित्यामध्ये एक साहित्यिक प्रवाह  निर्माण झाला. त्याला दलित साहित्य या  आंबेडकरवाद नावाने ओळखला जातो. या साहित्य प्रवाहाने भारतीय साहित्याबरोबर  जागतिक साहित्यामध्ये सुद्धा वेगळे महत्त्व निर्माण केले आहे .यामध्ये वर्षानुवर्षे शोषित, पीडित ,अन्यायी मानवाची संवेदना आणि भारतीय समाज व्यवस्थेला आरसा दाखविण्याचे  काम केले आहे. दलित साहित्यिकांचे प्रेरणास्त्रोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. साहित्यकारानी परंपरेने येणाऱ्या साहित्यिक मापदंडाचा विरोध  करून नवीन साहित्यिक मापदंड निर्माण केले. कवी केरबा इंगळे डॉ. आंबेडकराबदल लिहितात की, 
*गव्हर्नर, व्हाइसराँय गोरा अधिकारी,*
 *त्याच्या संग गाँडमँट् बोलतंया भारी,*
 *विंग्लिश साहयबावानी घालून *इजार महाराचं पोर,*
*बिट्टयालय हुशार"*
वरील विवेचनात स्पष्ट होते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरच्या जन्मामुळे आणि कर्तृत्वामुळे भारतीय  समाज, अर्थ, धर्म, राजकीय आणि साहित्यिक व्यवस्थेत बदल झाला आहे पण खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पददलित ,शोषित, पीडित मानवाचे उध्दारक आहेत.  त्याचबरोबर भारतीय समाज. अर्थ, धर्म, राजकीय, साहित्यिक व्यवस्थेचे ही उध्दारक आहेत. अशा थोर महामानवास  जयंती निमित्त कोटी -  कोटी प्रणाम..!

2 comments:

  1. प्रथमतः महामानव विश्वरत्न, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त खूप खूप सदिच्छा! आपले अभ्यासू विचार आपण मांडले त्याबद्धल आपले खुप खुप कौतुक!

    ReplyDelete