परळी वैजनाथ-(प्रतिनिधी) मागील महिन्याभरापासून कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. कोरोना रूग्णांच्या संख्येचा आकडाही मोठा आहे. अशा परिस्थितीत मात्र शिक्षण विभागाकडून दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. परिणामी, विद्यार्थी आणि पालकांत मोठी भीती व्यक्त होत असून ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात यावी, अशी मागणी शनिवार दि.10 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शिक्षण विभागाकडे करण्यात आली असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे परळीचे शहराध्यक्ष संजय गवळी यांनी दिली.
बीड जिल्ह्यासह राज्यभर कोरोनाचा कहर सुरू आहे. आरोग्य विभाग कोरोना रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत असला तरी वाढत्या रूग्ण संख्येमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात मागील वर्षभरात हजारो जणांना जीव गमवावा लागला होता. त्यातच शिक्षण विभागाकडून दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्याचे ठरविण्यात आले असून, तसे जाहीर केले आहे. ही परीक्षा ऑफलाईन झाली तर विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असून मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागेल. त्याकरीता दहावी व बारावीची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात यावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनामार्फत शिक्षण विभागाकडे करण्यात आली. निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष संजय गवळी यांच्यासह असंख्य विद्यार्थ्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
No comments:
Post a Comment