Friday, October 2, 2020

आता महसूल विभागातही मोठे फेरबदल.उपजिल्हाधिकार्‍यांपाठोपाठ तहसीलदारांच्याही बदल्या.



बीड (प्रतिनीधी ) - काल राज्य शासनाने पोलिस प्रशासनात मोठे फेरबदल केल्यानंतर रात्री उशिरा महसूल प्रशासनातही मोठे फेरबदल झाले आहेत. औरंगाबाद विभागातील अनेक उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या बदल्या झालेल्या आहेत. यामध्ये बीड येथील शोभादेवी जाधव, नम्रता चाटे, श्रीकांत गायकवाड या उपजिल्हाधिकार्‍यांच्या बदल्यांपाठोपां तहसीलदार निळे, तहसीलदार किरण आंबेकर, तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांच्या बदल्या होऊन तब्बल एक वर्षभर रिक्त असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी या पदावर बीडच्याच संतोष राऊत यांची अपेक्षेप्रमाणे नियुक्ती झाली आहे.
अंबाजोगाई येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम करणार्‍या शोभाताई जाधव यांची बदली लातूर येथे पुनर्वसन उपजिल्हाधिकारी या पदावर निणयुक्ती करण्यात आली आहे. श्रीमती जाधव ह्या मध्यंतरीच्या काळामध्ये एका बैठकीत तलाठ्याने पैसे कसे लोकांकडून घेतले पाहिजेत याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. तेव्हापासून त्यांची बदली होणार हे निश्‍चित झाले होते. पाटोदा या ठिकाणी उपविभागीय अधिकारी या पदावर कार्यरत असणारे बीड येथीलच मूळ रहिवासी श्रीमती नम्रता चाटे यांची बदली परळी याठिकाणी उपविभागीय अधिकारी या पदावर करण्यात आलेली आहे. परळी येथील उपविभागीय अधिकारी गणेश महाडीक यांची बदली करण्यात आलेली आहे. माजलगावच्या उपविभागीय अधिकारी शोभा ठाकूर यांचीही बदली करण्यात आली असून त्यांच्या रिक्त जागी उपजिल्हाधिकारी (रोजगार हमी योजना) श्रीकांत गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अंबाजोगाईच्या उपविभागीय अधिकारी पदी शरद झाडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तब्बल वर्षभरापासून बीड येथील निवासी उपजिल्हाधिकारी हे पद रिक्त होते. या पदावर नियुक्त होण्यासाठी महसूल विभागातील अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांनी लॉबींग केली होती मात्र मूळ बीड येथील रहिवासी असलेले आणि बीड येथील जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून यशस्वी काम केलेले संतोष राऊत यांची निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. सध्या राऊत हे उपजिल्हाधिकारी निवडणूक लातूर या पदावर कार्यरत आहेत. उपजिल्हाधिकार्‍यांच्या या बदल्यांपाठोपाठ तहसीलदारांच्याही बदल्या करण्यात आलेल्या आहेत. गेवराईचे तहसीलदार धोंडीराम गायकवाड हे अनेक दिवसांपासून सक्तीच्या रजेवर होते. त्यांची बदली हिमायतनगर येथे तहसीलदार या पदावर करण्यात येऊन या ठिकाणी सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सचिन खाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीड येथील अतिशय चांगले काम करणारे आणि सध्या रजेवर असणारे तहसीलदार किरण आंबेकर यांची वर्षभरातच नांदेड येथे तहसीलदार या पदावर बदली करण्यात आली आहे. करोनाच्या काळामध्ये अनेक रोजगार गमवलेल्या लोकांना जे की आपली उपजिविका भाविण्यास समर्थ आहेत अशा लोकांसाठी विशेष मोहीम राबवून अन्नधान्याचे किट पोहचविण्याचे काम तहसीलदार आंबेकर यांनी केले होते. आष्टी येथील तहसीलदार वैभव महेंद्रकर यांची बदली जालना येथे करण्यात आली असून त्यांच्या जागी राजाभाऊ कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागातील तहसीलदार श्रीकांत निळे यांची बदली पाथरी येथे करण्यात आलेली आहे. माजलगावच्या तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांची बदली परभणी जिल्ह्यातील पालम या ठिकाणी करण्यात येऊन त्यांच्या रिक्त जागी नांदेड येथील वैशाली पाटील यांची नियुक्ती केली आहे. परळीचे तहसीलदार विपीन पाटील यांची बदली करण्यात येऊन त्यांना अंबाजोगाईचे तहसीलदार म्हणून नियुक्ती देण्यात आलेली आहे.

No comments:

Post a Comment