मृत्यू झालेल्या या बोकडाची किंमत 1 कोटी 12 लाख 786 रुपये इतकी होती. पांढऱ्या रंगाच्या या बोकडाच्या अंगावर काळ्या रंगामध्ये नैसर्गिकरित्या उर्दूमध्ये अल्लाह आणि मोहम्मद असे शब्द होते. शेरु असं या बोकडाचे नाव होते. शेरुचा आजारपणामुळे मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे.
सव्वा कोटींच्या या बोकडाची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु होती. अंबरनाथच्या जुना भेंडी पाड्यात राहणाऱ्या शकील शेख यांच्या मालकीचा हा बोकड होता. शकील यांनीच या बोकडाची किंमत सव्वा कोटी लावली होती. बोकडाच्या किमतीमुळे आणि त्याच्या अंगावर असलेल्या नावामुळे तो अंबरनाथसह आसपासच्या परिसरात आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला होता.
सव्वा कोटींच्या या बोकडाचे वजन 100 किलो इतके होते. या बोकडाला फक्त दोनच दात होते. शकील हे शेरुचा खूप लाड करायचे. आपल्या घरातील सदस्याप्रमाणे ते त्यांची काळजी घ्यायचे आणि पालन पोषण करायचे. हा बोकड रोज सकाळ संध्याकाळ द्राक्षे, बाजरी, सफरचंद, हरभरा, मका असे पदार्थ खायचा. या बोकडाला विकून आलेल्या पैशातून मदरसा बांधण्याचं शकील यांचं स्वप्न होतं. पण शेरुच्या मृत्यूमुळे त्यांचं हे स्वप्न अपूर्ण राहिलं.
गेल्या काही दिवसांपासून शेरु सतत आजारी पडत होता. त्याच्यावर उपचार देखील सुरु होते. एका दिवसाच्या उपचासाठी शकील दिवसाला दोन हजार रुपये खर्च करत होते. पण इतके करुन देखील त्याला वाचवण्यात यश आले नाही. शेरुचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शेरुच्या अचानक मृत्यूमुळे शकील यांना मोठा धक्का बसला. तसंच आसपासच्या परिसरात राहणारे नागरिकही शेरुच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त करत आहेत.
No comments:
Post a Comment