बीड (प्रतिनिधी) लालपरी म्हणजेच एसटी ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र, बीडच्या ग्रामीण भागात जाणाऱ्या अनेक बस मोडकळीस आल्या असून त्यांची दुरावस्था झाली आहे.
मागील साठ वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून लालपरी अर्थात एसटी बस ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. वाट पाहीन, पण एसटीनेच जाईन! अशी म्हणच गाव खेड्यात प्रचलित असून प्रवाशांचा एसटीवर विश्वास आहे.
सध्याच्या काळात दुचाकीसह आणि खासगी वाहतुकीची साधने उपलब्ध झाली आहेत. तरीही सुरक्षित प्रवासासाठी एसटीवर विश्वास कायम आहे. त्यातच महिलांसाठी अर्ध तिकीट सारख्या योजनांमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत वाढच होताना दिसतेय.
सध्याच्या काळात वाहतुकीची साधने अत्याधुनिक होत आहेत. तसेच बसचा प्रवास अधिक आरामदायी व्हावा म्हणून विविध सुविधा उपलब्ध होत आहेत. एसटीच्या ताफ्यातही काही नवीन गाड्या दाखल झाल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागातील बसमध्ये फार बदल झालेले दिसत नाहीत.
गेल्या काही महिन्यांपूर्वी एसटी बसची स्थिती आणि जाहिरात याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले होते. तशीच काहीशी अवस्था बीड आगारातील बसची झालेली दिसत आहे. ग्रामीण भागात जाणाऱ्या बस काचा फुटलेल्या, सीट फाटलेल्या, पत्रा गंजलेल्या अवस्थेत दिसत आहेत.
काही बसच्या खिडक्या लागत नाहीत तर काही बसची आसन व्यवस्थाच खराब झाली आहे. मोडकळीस आलेल्या बसचा आवाजही प्रवाशांना हैराण करून सोडतो. तर बस वाटेतच बंद पडण्याची भीती प्रवाशांना सतावते. त्यामुळे अनेकदा जीव मुठीत घेऊनच प्रवाशांना प्रवास करावा लागतोय.
ग्रामीण भागात जाणाऱ्या बसची दुरावस्था झाल्याने प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत आहे. सुरक्षित असणारा एसटी बसचा प्रवास सध्या तिच्या दुरावस्थेमुळे धोकादाय वाटतोय, अशा प्रतिक्रिया प्रवाशांतून उमटत आहेत. त्यामुळे तात्काळ या बसची डागडुजी करण्याची गरज व्यक्त केली जातेय. तसेच सुस्थितीतील बसची मागणी होतेय.
बीड जिल्हा आगारामध्ये 2×2 आणि अधिक आरामदायी असणाऱ्या नवीन बसेस दाखल झाल्या आहेत. यातच काही जुन्या बस देखील आहेत. या बसच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत, असे विभागीय नियंत्रक अजय कुमार मोरे यांनी सांगतिले.
No comments:
Post a Comment