पंढरपूर (प्रतिनीधी) :- चैत्री शुद्ध एकादशी 12 एप्रिल 2022 रोजी होणार असून, चैत्री यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यातील इतर जिल्ह्यातून भाविक मोठ्या प्रमाणात येतात. यात्रा कालावधीत भाविकांच्या सुरक्षितता, आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच तसेच भाविकांना दर्शन सुलभपणे व्हावे यासाठी मंदीर समिती व प्रशासन सज्ज असल्याची माहिती प्रांताधिकारी तथा मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
चैत्री यात्रेच्या अनुषंगाने मंदीर समिती व प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा बाबत नवीन भक्त निवास, पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली बैठकीस, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत कांळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाज पुदलवाढ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अरविंद गिराम, उप कार्यकारी अभियंता श्री.मुखडे, पोलीस निरिक्षक अरुण पवार, मिलिंद पाटील, धनंजय जाधव यांच्यासह विविध विभागाचे विभागप्रमख उपस्थित होते.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी सार्वजनिक आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने भाविकांनी दर्शन रांगेत व दर्शन मंडपात मास्क, सुरक्षित अंतर, सॅनिटायझर या त्रिसुत्रीचे पालन करावे अशा सूचना प्रांताधिकारी गुरव यावेळी दिल्या.
दर्शनरांगेत व दर्शन मंडपात, स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालये, विश्रांती कक्ष, लाईव्ह दर्शन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कायमस्वरूपी व तात्पुरत्या स्वरूपात 100 सीसीटीव्ही कॅमेरे,दर्शनरांग दर्शनमंडप, मंदीर व मंदीर परिसर या ठिकाणची वेळोवेळी स्वच्छता करण्यात येणार आहे. दर्शनासाठी येणा-या भाविकांसाठी मंदिर समितीच्या वतीने विमा काढण्यात आला आहे. दर्शनरांगेत भाविकांना दि.11 ते 13 एप्रिल 2022 या कालावधीत मोफत खिचडी, सरबत, ताक वाटप करण्यात येणार आहे. चंद्रभागा वाळवंट व पत्राशेड येथे महिला भाविकांच्या सोईसाठी चेंजिंग रूम व दर्शनरांगेत हिरकणी कक्ष उभारण्यात आला असल्याचे प्रांताधिकारी तथा मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री.गुरव यांनी सांगितले.
चैत्री यात्रा कालावधीत भाविकांना स्वच्छ पिण्याचा पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी शहरातील सार्वजनिक बोरवेल, हातपंप आदी ठिकाणच्या पाण्याची तपासणी करण्यात आली आहे. आवश्यक ठिकाणी बॅरेकटींग, वाळवंट, 65 एकर, पत्राशेड येथे तात्पुरती शौचालय व्यवस्था व त्या ठिकाणची वेळोवेळी स्वच्छता करण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापन 41 घंटा गाड्याच्या माध्यमातून कचरा गोळा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वारकरी भाविकांनी उघड्यावर शौच विधी करू नये यासाठी प्रतिबंधक पथकांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी माळी यांनी दिली. पोलीस प्रशासनाने वारी कालावधीत सुरक्षततेच्या दृष्टीने योग्य नियोजन करण्यात आले असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी सांगितले.
श्री विठ्ठल-रक्मिणी मंदीर येथे तज्ञ डॉक्टरांसह वैद्यकीय पथकाची नेमणूक तसेच फिरते वैद्यकीय पथक व मुबलक औषधसाठा उपलब्ध राहील याबाबत नियोजन करण्यात आले असल्याचे डॉ. बोधले यांनी सांगितले. महावितरणने यात्रा कालावधीत सुरक्षित व अखंडीत वीज पुरवठा राहील यांची दक्षता घ्यावी. अन्न व औषध विभागाने प्रसाद विक्री केंद्र, हॉटेल्स यांची वेळावेळी तपासणी करावी. अशा सूचनाही प्रांताधिकारी गुरव यांनी दिल्या.
No comments:
Post a Comment