मालेगाव (प्रतिनीधी); नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आक्रमक असलेले आणि वेशांतर करुन बाजार समितीत स्टिंग केल्यामुळे चर्चेत आलेले कृषीमंत्री दादा भुसे आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
अनधिकृत जुगार अड्ड्या वर भुसेंनी थेट कारवाई करत हा अड्डा उद्धवस्त केला. हे घडलंय मालेगाव तालुक्यातील झोडगे येथे. कृषिमंत्री दादा भुसे हे मतदान संघातील झोडगे येथे एका कार्यक्रमानिमित्त गेले होते. त्यावेळी गावात अनधिकृत जुगार अड्डा सुरू झाल्याने युवा पीढी जुगाराच्या आहारी जाऊन आपले आयुष्य उध्वस्त करीत असल्याची व्यथा तेथील काही जाणकार ग्रामस्थांनी मांडली. यावर क्षणाचा देखील वेळ न घालवता दस्तुरखुद्द भुसे यांनी पोलिसांच्या मदतीने हा अनधिकृत जुगार अड्डा उध्वस्त केला.
गेल्या काही महिन्यांपूर्वी तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्वतः भुसे यांनी अशीच एक कारवाई केली होती. या घटनेला काही महिन्याचा काळ लोटला नाही तितक्यात पुन्हा अशीच धडाकेबाज कारवाई भुसे यांनी केली आहे. मग जे भुसे ना दिसते ते मालेगाव तालुका पोलिसांना दिसत नसेल का? असा प्रश्न सर्वसामान्य मालेगावकरांना पडल्या वाचून राहत नाही.
पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
सोमवारी दुपारच्या सुमारास ही धडक कारवाई झाली. याबाबत तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कारवाईची प्रक्रिया सुरु असून, त्यानंतर अधिकृत माहिती देण्यात येईल, असे सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, कृषिमंत्री भुसे हे सोमवारी झोडगे परिसरात कार्यक्रमानिमित्त गेले होते. तेव्हा त्यांना झोडगे-अस्ताणे रस्त्यावरील मटका जुगार अड्ड्याबद्दल माहिती मिळाली. काही महिन्यांपूर्वीपासून हा क्लब सुरु झाला होता. अल्पावधीत जास्त पैसे कमविण्याच्या आमिषाने अनेक युवक या गैरमार्गाला लागलेत. परिणामी, कौटुंबिक कलहही वाढलेत. या अवैध धंद्याने संसार उद्ध्वस्त होत असताना पोलिस अनभिज्ञ कसे ? असा सवाल उपस्थित झाला.
No comments:
Post a Comment