Wednesday, March 31, 2021

नांदेड गुरूद्वारा हिंसाचारप्रकरणी 16 अटकेत. 400 जणांविरोधात गुन्हा दाखल.


नांदेड (प्रतिनीधी) देशासह राज्यात करोना स्थिती अधिक चिंताजनक आहे. यामुळे राज्यात विविध ठिकाणी करोनाच्या नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. अशातच होळीचा सणाच्या निमित्ताने नांदेडमधील गुरुद्वारा परिसरात पोलिसांवर हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे गुरुद्वारा बोर्ड पदाधिका-यासह 400 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाजीराबाद पोलीस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी आता व्हिडीओच्या साह्याने हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या पोलीस आरोपींची चौकशी करत आहेत.

नांदेड येथील गुरुद्वारातून दरवर्षी होळीच्या निमित्ताने मिरवणूक काढली जाते. पण यावर्षी कोविडमुळे नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळ आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. असं असताना देखील काल गुरद्वारा परिसरात मोठ्या संख्येने शीख बांधवांचा जमाव जमला होता. तसेच त्यांनी हल्ला महला मिरवणूक काढण्याचा हट्ट धरला होता.

त्यामुळे पोलिसांनी त्यांना रोखल्यानंतर गुरुद्वारा परिसरातील जमावाने पोलिसांवरच हल्ला केला. यामध्ये हल्लेखोरांनी पोलिसांच्या वाहनांची तोडफोडही केली. होळी सणाला गालबोट लावणाऱ्या या दुर्घटनेत चार पोलीस कर्मचारी जखमी आहेत. सध्या या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच आरोपीना अटक करण्याची कारवाई सुरू केली आहे. त्यासाठी व्हिडीओ पाहून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत 16 जणांना अटक केली आहे.

No comments:

Post a Comment