Saturday, April 18, 2026

आष्टीत मंदिरामागे हॉटेल कामगाराचा संशयास्पद मृतदेह.नैसर्गिक मृत्यू की घातपात? पोलिसांचा तपास सुरू .


आष्टी (प्रतिनिधी): आष्टी येथील बाबाजी कुस्ती संकुलासमोरील शिवमंदिराच्या पाठीमागे शनिवारी सायंकाळी एका ४७ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. गजानन लोडबाजी साबळे (४७) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दर्शनासाठी गेलेल्या एका भाविकाला हा मृतदेह दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

पोलीस पथकाची घटनास्थळी धाव.

घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर, सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे, विजय नरवाडे, उपनिरीक्षक कृष्णा शिंदे आणि पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृताच्या खिशातील ओळखपत्रावरून त्याची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले. गजानन साबळे हे आष्टी तालुक्यातील एका हॉटेलवर कामगार म्हणून रुजू झाले होते, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

मृत्यूचे कारण अस्पष्ट.

मृताचा देह शवविच्छेदनासाठी आष्टी येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. हा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला आहे की त्यामागे काही घातपात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस सध्या ते कोणत्या हॉटेलवर कामाला होते आणि शनिवारी सायंकाळी ते मंदिराच्या पाठीमागे कसे पोहोचले, याचा शोध घेत आहेत.

No comments:

Post a Comment