Tuesday, January 10, 2023

डॉ.दि.ज.दंडे यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी दीपस्तंभ-डॉ.सौ.वृषाली किन्हाळकर


*’कृष्णार्पणमस्तू’ गौरव ग्रंथाचे मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात प्रकाशन; परळी शहरातील नागरिकांची मोठी उपस्थिती. 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) एक क्षणभर थांबून आपण विचार करायला हवा की, आपल्याला कसे जगायचे आहे. आपल्याला हवे असलेल्या अनेक गोष्टी सोडून देता आल्या पाहिजेत. जेंव्हा तुम्ही त्या सोडाल त्या गोष्टी तुमच्याकडे स्वतःहून येतील. तसे पाहता आयुष्यात पाहिजे असलेल्या सर्व सुख पदरात पडले तरीही आबांनी जगण्यासाठी स्वतःची वेगळी वाट तयार केली. भयमुक्त आणि चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी आबांनी अनेक प्रकारच्या भौतिक गोष्टींचा त्याग केला असून आबांचे जीवन हा केवळ ग्रंथापर्यंतचा मर्यादित विषय नाही तर त्यांनी जगलेले दिवस आपण अनुभवावे आणि आयुष्याची वाट सुखकर करून घ्यावी असे मत जेष्ठ साहित्यीक डॉ.सौ.वृषाली किन्हाळकर यांनी व्यक्त केले.
परळी येथील जेष्ठ डॉ.दि.ज.दंडे यांच्या स्मृती प्रित्यर्थ तयार करण्यात आलेल्या ’कृष्णार्पणमस्तू’ या गौरव ग्रंथाच्या प्रकाशन कार्यक्रमात डॉ.सौ.वृषाली किन्हाळकर बोलत होत्या. दीनदयाळ बँकेचे माजी अध्यक्ष स्व.डॉ.दि.ज.दंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंंग मंदिर येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून  माजी गृहराज्यमंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर नांदेड, गुरू गोविंदसिंग मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख, दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड.मकरंद पत्की, गौरव ग्रंथाचे संपादक सदानंद महाजन, डॉ.हरिश्चंद्र वंगे, इंडियन मेडिकल असो.चे अध्यक्ष डॉ.अजित केंद्रे, दीनदयाळ बँकेचे उपाध्यक्ष राजेश्वर देशमुख, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, गौरव ग्रंथाच्या लेखिका सौ.संगिता पुराणिक उपस्थित होते.
आपल्या भाषणात पुढे बोलतांना डॉ.सौ.वृषाली किन्हाळकर म्हणाल्या की, आबा म्हणजेच डॉ.दि.ज.दंडे आणि माझे नाते वडिल व मुलीसारखे होते. आबांना मुलगी नाही असे वाटत असल्याने ते माझ्यावर मुलीसारखे प्रेम करीत होते. आबा माझ्या जीवनात खूप उशिरा आल्याने त्यांना मुली आहेत किंवा नाही हे माहित नव्हते. रक्ताचे नाते नसतांनाही माझ्यावर त्यांनी मुलीसारखे प्रेम केले असून त्यांनी त्यांच्या मुला मुलींना किती माया आणि प्रेम दिले असेल हे सांगता येणार नाही. वृषाली तु खूप छान लिहितेस असे नेहमीच ते मला सांगत होते. आज व्यासपिठावर मला त्यांची आठवण येते असे नाही तर आपल्या आसपासच आहेत याची जाणिव होते असेही त्या म्हणाल्या. डॉ.सौ.वृषालीताई किन्हाकर दि.ज.दंडे यांची आठवण काढताना अनेकदा भावूक झाल्या होत्या.
 माजी गृहराज्यमंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर यांनीही डॉ.दि.ज.दंडे यांच्या सोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. मी वैद्यकिय शिक्षण अंबाजोगाईत घेतांना माझे गुरू म्हणून डॉ.हरिश्चंद्र वंगे यांच्याकडे येत जात होतो. त्याच दरम्यान दंडे डॉक्टरांची ओळख झाली आणि हा माणूस माझ्या आयुष्यातील चांगल्या व्यक्तीमत्वाच्या यादीत वरच्या स्थानावर पोहचला. गप्पाा मारताना सहजपणे आयुष्य कसे जगावे याचा संदेशही ते देत होते असे ते म्हणाले. 
माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी आबा ऋषीतुल्य आणि पितृतुल्य असल्याचे सांगत ते राष्ट्रभक्त होते असे सांगितले. यावेळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेचा संदर्भ देत त्यांनी सावरकर जिथे काळया पाण्याची शिक्षा भोगत होते त्या अंदमान निकोबारलाही डॉ.दंडे यांनी भेट दिल्याचे सांगितले. 
या कार्यक्रमात डॉ.हरिश्चंद्र वंगे, डॉ.सुधीर देशमुख, अ‍ॅड.मकरंद पत्की, सदानंद महाजन, अ‍ॅड.राजेश्वर देशमुख, सौ.संगिता पुराणिक आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष डॉ.अ.ल.कुकडे उपस्थित नव्हते परंतू त्यांचा व्हिडीओ संदेश यावेळी प्रक्षेपित करण्यात आला. आबांच्या जीवनावर आधारित फोटो फिल्म यावेळी प्रदर्शित करण्यात आली. सर्व पाहुण्यांचे स्वागत डॉ.विवेक दंडे, अ‍ॅड.तेजस दंडे, सौ.प्राजक्ता दंडे, सौ.सायली दंडे व परिवारातील इतर सदस्यांनी केले. प्रास्तविक अ‍ॅड.तेजेश दंडे तर आभार प्रदर्शन डॉ.विवेक दंडे यांनी केले.कार्यक्रमाचे  संचलन प्रशांत प्र.जोशी व धनंजय आरबुने यांनी केले.

No comments:

Post a Comment