Thursday, April 14, 2022

ह.भ.प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या गाडीला अपघात… सुदैवाने महाराज बचावले.



*आपल्या विनोदी शैलीने महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांना अक्षरशः वेड लावणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कारचा अपघात झाला असल्याचे समजते.

महाराष्ट्रात आपल्या कीर्तनांनी प्रसिद्ध झालेले इंदुरीकर महाराज यांच्या गाडीला अपघात झालाय. या अपघातातून ते थोडक्यात बचावले असल्याची माहीती आहे. इंदोरीकर महाराज हे स्कॉर्पिओ गाडीतून परतूर शहरात रात्री जात असताना हा अपघात झाला. लाकडं वाहून नेणारी ट्रॉली जोडलेला ट्रॅक्टर आणि इंदुरीकर महाराज यांच्या कारची धडक झाली.

या अपघातात इंदुरीकर महाराज हे सुदैवाने सुखरुप बचावले असून त्यांना कोणतीही दुखापत नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

हाती आलेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील परतूर येथे बुधवारी (13 एप्रिल) रात्री 10 वाजेच्या जवळपास ही घटना घडली असल्याचे कळते. किर्तनासाठी निघाले असता परतूर शहरातील साईनाथ कॉर्नर जवळ रस्ता क्रॉस करताना हा अपघात झाला. स्थानिकांच्या माहीतीनुसार, इंदुरीकर महाराजांच्या गाडीवर असणाऱ्या चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.
ट्रॅक्टरचालक आणि इंदुरीकरांचा वाहन चालक अशा दोघांनीही एकाच वेळी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या अपघातात
 गाडीचे चालक संजय गायकवाड (वय 40) हे जखमी झाले असून, जखमी झालेले चालक गायकवाड यांस परतूर येथील डॉ. सत्यानंद कराड यांच्या सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. महाराजांसह इतर सहकार्‍यांना कोणतीही इजा झाली नाही.
वाहनाचे मात्र बऱ्यापैकी नुकसान झाले आहे.आपल्या हसऱ्या स्वभावामुळे, विनोदी आणि मार्मिक शब्दफेकीमुळे इंदुरीकर महाराज राज्यात, देशात आणि देशाच्या बाहेर देखील प्रसिद्ध आहेत.या अपघाताची माहिती वार्यासारखी सर्वत्र पसरली आहे तसेच यामुळे त्यांच्या भक्तमंडळीमधुन काळजी व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment