जे लोकात असतात त्यांनाच लोकांचे प्रश्न कळतात, याआधीच्या सरकारमधील मंत्र्यांसह पदाधिकारी सत्तेत होते परंतु लोकांचे प्रश्न माहित नसल्यामुळे ते जिल्हा नियोजनचे पैसेही खर्च करू शकले नाहीत. आता आपले सर्व आमदार हे लोकातले आहेत. पालकमंत्री हे लोकांच्या प्रश्नांना न्याय देणारे आहेत. त्यामुळे बीडचा विकास आता गतीने होणार आहे. बीड जिल्ह्यातील जनता खा. शरदचंद्र पवार यांना मानणारी आहे. जेव्हा जेव्हा साहेब अडचणीत आले तेव्हा तेव्हा बीडच्या जनतेने साहेबांना साथ दिली. म्हणूनच साहेबांचं प्रेमही बीडवर प्रकर्षाने आहे. विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर सत्ता स्थापनेदरम्यान महिनाभर माझ्या सोबत होते. त्यांना मतदारसंघाच्या विकासाचा प्रचंड ध्यास असून विकास हेच ध्येय ठेवून संदीप क्षीरसागर मतदारसंघात काम करणार आहेत. बजरंग सोनवणे हे लोकांच्या मनातले खासदार असल्याचे आ. रोहीत पवार यांनी म्हटले.
ते बीड येथील राष्ट्रवादी भवनात आयोजीत पदाधिकारी, कार्यकर्ता संवाद कार्यक्रमामध्ये बोलत होते. या वेळी व्यासपीठावर आ. संदीप क्षीरसागर, माजी आ. अमरसिंह पंडित, माजी आ. सय्यद सलीम, माजी आ. सुनिल धांडे, ऍड. डी.बी. बागल, फारुक पटेल यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना आ. पवार म्हणाले की, हा जिल्हा पवार साहेबांच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहत आला आहे. या वेळीही सहा पैकी चार आमदार निवडून आले आहेत. बजरंग बप्पा हे निवडून आले नसले
तरी लोकांच्या मनातले खासदार आहेत, असं म्हणत आ. संदीप क्षीरसागर हे विकासाचा दृष्टीकोन समोर ठेवून काम करणारे तरुण नेतृत्व आहेे. सत्ता स्थापनेवेळी आम्ही एक महिना सोबत होतो. त्या वेळीही मतदारसंघाच्या विकासावर ते चर्चा करायचे. मतदारसंघातून कोणाचा फोनही आला तरी ते रात्री-अपरात्री उचलून संबंधितांच्या अडीअडचणी जाणून घ्यायचे. तेवढ्याच रात्री ते सोडवण्याचा प्रयत्नही करायचे. आम्ही शरद पवार साहेबांच्या विचाराचे पाईक आहोत. जेव्हा साहेबांचं नाव ईडीमध्ये गोवण्यात आलं तेव्हा साहेबांनी ईडीलाच अंगावर घेतले आणि पुढे त्याचे काय झाले हे उभ्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला माहित आहे. आपला उद्देश हा विकासाचा असून हे सरकार पुढील पाच वर्षे यथोचीत काम करील. कोणी काहीही म्हणत असेल, पुढच्या महिन्यात सरकार पडेल, अशाही अफवा सोडत असतील, परंतु हे सरकार पाच वर्षे टिकणार आणि वाडी-वस्ती-तांड्यासह गावागावाचा आणि महाराष्ट्राचा विकास करणार. कार्यकर्त्यांनी सरकार आणण्यासाठी प्रामाणिकपणे काम केले. त्या कार्यकर्त्यांना न्याय देणार असल्याचे या वेळी आ. रोहीत पवार यांनी सांगितले. बीड जिल्ह्याच्या पाणी प्रश्नासह शेतकर्यांचे आणि सिंचनाचे प्रश्न तेवढ्याच पोटतिडकीने सोडवून घेत बीड विधानसभा मतदारसंघात मोठ्या ताकतीने विकास करणारे नेतृत्व तुमच्याकडे असल्याचे आ. रोहीत पवार यांनी या वेळी म्हटले.
No comments:
Post a Comment