Tuesday, February 18, 2020

परळी सराफा व्यापा-याला बेदम मारहाण प्रकरणी . गुंडगिरीविरूध्द भाजप आक्रमक.


*अशी प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही – राजेश देशमुख*

*पालकमंत्र्यांच्या वरदहस्तामुळे गुंडगिरीला बळ, आता गुन्हा दाखल झाल्याचे श्रेय घेऊ नये – सतीश मुंडे*

*गुंडगिरी प्रवृत्तीनी सर्व सामान्य नागरिकांना नाकी नऊ आणले – लोहिया*

परळी दि. १८( प्रतिनीधी ) मागील पाच वर्षात शांत असलेल्या परळी शहरात गुंडगिरीने पुन्हा डोके वर काढले आहे, एका ड्रायव्हरचे अपहरण करून मारहाण केल्याच्या घटनेनंतर सोमवारी पालकमंत्र्यांच्या निकटवर्तीयांकडून सराफा व्यापारी व त्याच्या सहका-याला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली. वारंवार होणा-या अशा घटनांमुळे शहरातील शांतता भंग पावली असून सर्व सामान्य नागरिक दहशतीखाली वावरत आहे, पोलिसांनी गांभिर्याने लक्ष देऊन गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी अशी मागणी भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख, तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केली आहे.
शहरातील गणराया ज्वेलर्सचे मालक अमर देशमुख व त्यांच्या एका सहका-याला सोमवारी सकाळी बेदम मारहाण करण्यात आली, मारहाणीत ते गंभीर जखमी झाले असून त्यांचेवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाण करणारे लोक राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असून पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत.
*शांततेला गालबोट*
मागील पांच वर्षात पंकजाताई मुंडे यांच्या कार्यकाळात परळी शहर शांततेत गुण्या गोविंदाने नांदत होते, व्यापारी सुरक्षित होते, त्यांनी कुणालाही पाठिशी घातले नव्हते त्यामुळे असे प्रकार घडत नव्हते परंतु आता परिस्थिती एकदम उलटी झाली आहे. गेल्या दोन तीन महिन्यात व्यापारी व सर्व सामान्य नागरिकांना कुठल्या ना कुठल्या कारणावरून टार्गेट केले जात आहे. मागील आठवड्यात एका ड्रायव्हरचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण झाली, त्यानंतर मतदारसंघातील बर्दापूर येथे एका शेतक-यांला मारहाण झाली आणि आता शहरातील व्यापा-याला लक्ष्य केले गेले. शांततेला गालबोट लावण्याचे प्रकार सत्ताधारी मंडळीकडूनच होत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
*भाजप आक्रमक*
परळीत गुंडगिरी वाढली आहे, अशा प्रवृत्ती खपवून घेतल्या जाणार नाहीत असे भाजपचे प्रदेश चिटणीस राजेश देशमुख यांनी म्हटले आहे. पालकमंत्र्यांच्या वरदहस्तामुळे गुंडगिरीला बळ मिळत आहे मारहाण करणा-या गुंड त्यांच्या पक्षाचे आहेत त्यामुळेच वारंवार असे प्रकार घडत आहेत. याप्रकरणात पोलिसांनी मदत करून गुन्हे दाखल केले आहेत पण आता पालकमंत्र्यांनी याचे श्रेय घेऊ नये असे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे यांनी म्हटले आहे तर अशा प्रवृत्तींमुळे सर्व सामान्य नागरिक व व्यापारी त्रस्त झाले असून नाकी नऊ आले असल्याचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी म्हटले आहे. दरम्यान, शहरातील वाढत्या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला त्यांनी दिला आहे

No comments:

Post a Comment