Thursday, August 8, 2024

शिवपूजनात जलाभिषेक, रुद्राभिषेका लाही विशेष महत्त्व - कीर्तनकार शि.भ.प.भूषण स्वामी वाखारीकर

*परळी येथे श्रावणमास तपोनुष्ठान व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; महिला भाविकांची लक्षणीय उपस्थिती. 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  भगवान शंकराला श्रावण अतिशय प्रिय असून श्रावण सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनात जलाभिषेक, रुद्राभिषेकालाही विशेष महत्त्व असून भगवान शिव शंकराच्या नामस्मरणात अपार शक्ती आहे, भगवान शिवशंकराचे नामस्मरण करून सर्वांनी श्रावण मासात पुण्य प्राप्त करून घ्यावे, अखंड शिवनाम व संत संगतीने मनुष्य जीवन सुखमय होते असे मत प्रसिद्ध कीर्तनकार शि.भ.प.भूषण स्वामी वाखारीकर यांनी व्यक्त केले.
वसूंधरारत्न डाँ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने वीरशैव लिंगायत समाज व श्रावणमास तपोनुष्ठान समिती परळीच्या  वतीने श्रावणमासाचे औचित्य साधून परळी वैजनाथ येथील पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेले श्री शनि मंदिर  येथे  दिनांक 5 ऑगस्ट पासून  ष.ब्र.108 श्री गुरूपादेश्वर शिवाचार्य महाराज यांंच्या श्रावणमास तपोनुष्ठानास  उत्साहात प्रारंभ झाला आहे. तसेच परमरहस्य पारायण व किर्तन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात कीर्तनकार शि.भ.प.भूषण स्वामी वाखारीकर महाराज बोलत होते.
बुधवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी उपस्थित भाविक भक्तांशी संवाद साधताना  शि.भ.प.भूषण स्वामी वाखारीकर यांनी पुढे बोलताना सांगितले की, ...श्रावण महिना महादेवाला समर्पित आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी भगवान शंकराची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते, असे म्हटले जाते. भगवान शंकराला श्रावण अतिशय प्रिय असून श्रावण सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनात जलाभिषेक, रुद्राभिषेकालाही विशेष महत्त्व आहे. शिवपूजन करणे शक्य नसल्यास भक्तिभावाने केवळ एक बेलाचे पान शिवाला वाहिल्यास पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते असे याप्रसंगी बोलताना सांगितले. 
13 दिवस चालणा-या तपोनुष्ठान सोहळ्यात श्रावणमास तपोनुष्ठान कालावधीत दररोज अन्नप्रसाद, अखंड शिवनाम सप्ताह,परमरहस्य पारायण सोहळा, कीर्तन, प्रवचन, वृक्षदान सोहळा, वृक्षारोपण, जलपुनर्भरण, आरोग्य तपासणी शिबीर, सांस्कृतिक व विविध समाज उपयोगी उपक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.यासोबतच श्रावणमास तपोनुष्ठान सोहळ्या दरम्यान दररोज प्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास भाविक भक्तांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे तरी जनकल्याणासाठी आयोजित करण्यात आलेल्या या तपोनुष्ठान, परमरहस्य पारायण  सोहळ्याचा शहर व परिसरातील सर्व शिव भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन द्वादश पंचम् ज्योतीर्लिंग प्रभू वैद्यनाथाच्या परळी-वैजनाथ नगरीतील ष.ब्र.108 श्री गुरूपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या द्वादश श्रावणमास तपोनुष्ठानाचे वीरशैव लिंगायत समाज व श्रावणमास तपोनुष्ठान समितीच्या पदाधिकार्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment