'बीड (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीच वातावरण चांगलंच तापलेल असताना नव्या परिवर्तनाची लाट दिसू लागली आहे. एकाच पंगतीत बसलेले बीडचे अनेक दिग्गजांची या परिवर्तनाच्या लाटेत वाट लागण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे. परिवर्तनाची “तुतारी” फुंकून जनताच मतदानाच्या रूपाने “बजरंगी” लेप बनवून आपल्या दुःखावर लावणार असल्याच सध्या पाहायला मिळत आहे.
बीड जिल्हा नेहमीच राजकीय दृष्ट्या संवेदनशीलतेने परिवर्तन करत आलेला आहे. विकास कामासह जनमानसापासून दुरावलेल्या अनेकांना निवडणुकांच्या माध्यमातून घरी बसवण्याचं काम येथील जनतेने केलं.यातूनच जिल्हा बाहेरील अनेकांना बीड ने आपलं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. तीच स्थिती या निवडणुकीत सुद्धा पाहायला मिळू लागली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा असो की शेतकऱ्यांच्या शेतमालाचा बाजारभावाचा, रेल्वेचा प्रश्न असो की विकासाचा या प्रश्नांकडे डोळे झाक करणाऱ्या दिग्गजांना धडा शिकवण्याचा मूड जनतेने बनवला आहे.जिल्ह्याच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचं पाप केलं गेलं. परिणामी जिल्हा विकासापासून अजूनही कोसो दूर आहे. ऊसतोड कामगारांचा जिल्हा आता शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. इतकी पीछेहाट होत असलेली जनतेला लक्षात येऊ लागली आहे. त्यामुळे कोणाचा वारसा सांगत हिंडत नुसतं भावनिक राजकारण करणारांना त्यांची जागा दाखवली जाणार असल्याचं चित्र सध्या तरी जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. यावेळी जिल्ह्यात लाटेवर स्वार होऊन निवडून आलेल्यांना घरची वाट दाखवली जाणार आहे. त्यातच ओबीसी म्हणून निवडणुकीत फायदा घ्यायचा मात्र सत्ता आल्यानंतर विशिष्ट समाजाला जवळ करत सत्तेचा लाभ मिळवून द्यायचा ही बाब जनतेच्या लक्षात आल्यामुळे नवी वाट ओबीसी समाज देखील चोखाळू लागला आहे.मुस्लिम समाज तर कितीही गोंजारला तरी हे पुतना मावशीचे प्रेम आहे. याला किती भूलायचं हे न कळण्या इतका तो दूध खुळा नाही.तीच स्थिती दीनदलितांची आहे. सत्तेच्या धुंदीत राहिलेल्यांना कधी हा समाज दिसलाच नाही. त्यांच्या प्रश्नांवर कधी काम केलं गेलंच नाही. अशीच परिस्थिती शेतकऱ्यांची देखील आहे.वारसाने आलेला साखर कारखाना चालवता आला नाही. तो मोडकळीस आणून शेतकऱ्यांचा पैसा बुडवला गेला.ही बाब प्रभू वैद्यनाथाला देखील आवडलेली नाही. याबरोबरच शेतमालाचे पडलेले बाजार भाव, विमा,अनुदान, नैसर्गिक आपत्ती याकडे लोकप्रतिनिधींनी केलेली डोळे झाक शेतकऱ्यांच्या मुळावर उठली.प्रशासनातही तीच स्थिती पाहायला मिळाली.विशिष्ट लोकांच्या बोलबाल्यात सर्वसामान्य जनतेचा आवाज अधिकाऱ्यांच्या कानावर कधी गेलाच नाही. त्यामुळे न्याय मिळायचा प्रश्नच कधी आला नाही.यासारख्या अनेक गोष्टीमुळे बीडचा मतदार जनता लोकप्रतिनिधींवर प्रचंड नाराज आहे. त्यातच भरीस भर म्हणून मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रचंड गरम झाला आहे. याचा फटका निवडणुकीत प्रस्थापित नेत्यांना बसू लागला आहे.
एकंदरच बीड जिल्ह्याच्या राजकारणात परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे. जिल्ह्यातील जनतेला न्याय मिळावा,विकासाचे नवे पर्व सुरू व्हावे, प्रस्थापितांच्या अहंपणाला मूठ माती मिळून दु:ख लवकर नाहीसे व्हावे यासाठी मतदानाच्या रूपातून “बजरंगी” लेप बनवण्याचं काम येथील जनता करू लागली आहे. या जनतेच्या नाराजी मुळे प्रस्थापित नेत्याला घरी बसायची वेळ आली तर बीडच्या राजकारणात नवे वारे वहायला सुरुवात होणार आहे.हे वारे आतापर्यंतच्या राजकीय उष्म्यामुळे होरपळून निघालेल्या जनतेला दिलासा देणारे ठरणार आहे. राजकीय परिवर्तनात लोकसभेच्या दिग्गज उमेदवाराच्या पंगतीत बसलेल्या अनेक नेत्यांना देखील मोठा फटका जनतेच्या रोषाचा बसणार आहे.पंक्तीत बसलेल्या ज्या ज्या नेत्यांनी ही बाब ओळखून वेळीच “आळी मिळी गुपचिळी”ही भूमिका घेतली तर काही प्रमाणात विधानसभेत त्यांना यशाची वाट सापडणार आहे. अन्यथा त्यांना देखील घरची वाट दाखवली जाणार असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
No comments:
Post a Comment