उस्मानाबाद : (कांतीकारी साथी न्युज) औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. एक डिसेंबरला मतदान होणार असून तीन डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, कोरोना महामारीमुळे कोणत्याच इच्छुक उमेदवारांना मतदारांशी संपर्क साधता आलेला नाही. निवडणूक आयोगाने पदवीधर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने इच्छुक उमेदवारांची धावपळ होताना दिसत आहे. मराठवाडा विभागातील प्रत्येक तालुक्यात जाऊन धावत्या बैठकांचा सपाटा सुरू केला आहे.
विरोधापक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे शिरिष बोराळकर यांची भाजपकडूनही उमेदवारी निश्चित मानली जात आहे. याशिवाय माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे जवळचे मानले जाणारे प्रवीण घुगे यांनाही पक्षाने कामाला लागण्याचे आदेश यापुर्वीच दिलेले होते. त्यांना या मतदारसंघाचे मतदार नोंदणी प्रमुख ही जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे घुगे यांनीही निवडणुकीची जय्यत तयारी केलेली असून ते उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील अणदूर गावचे मुळ रहिवासी आहेत. राज्यात भाजपची सत्ता असताना मागच्यावेळी राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले बालहक्क आयोगाचे अध्यक्ष करण्यात आले होते. घुगे हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रमुख कार्यकर्ते आहेत. त्यांनी परिषदेवर विविध जबाबदा-या सांभाळलेल्या आहेत. त्यांचा मराठवाड्यात दांडगा जनसंपर्क आहे.
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाची मतदार यादी न्यायालयाच्या आदेशानुसार नव्याने तयार करण्यात आली आहे. यापुर्वीची मतदार यादी रद्द करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेऊन मतदारांची नोंदणी केलेली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात जवळपास ३२ हजार मतदारांची नोंद आहे. यामध्ये नव्याने पदवीधर झालेल्या मतदारांची संख्या मोठी आहे. मराठा आरक्षणाला सुप्रिम कोर्टाने स्थगिती दिली असून सध्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. मराठा समाजातील विद्याथ्र्यांवर अन्याय झाल्याची भावना असून या पाश्र्वभूमीवर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत असल्याने सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
No comments:
Post a Comment