Thursday, August 12, 2021

डि.सी.सी.च्या शंभर रुपयात एटीएम देण्याच्या निर्णयाने शेतकरी दलालमुक्त होणार - अँड. अजित देशमुख


बीड ( प्रतिनिधी ) शेतकऱ्यांना डिसीसी बँक आता फक्त शंभर रुपयात एटीएम कार्ड देत आहे. अनुदान, विमा, पीक कर्ज, ठेवी उचलण्यासाठी आता शेतकऱ्यांना बँकेत जाण्याची गरज पडणार नाही. शिवाय या रकमा पूर्वी शे-पाचशे रुपये दलाली देऊन दिल्या जात असल्याची ओरड व्हायची. आता शेतकऱ्यांना बँकेत न जाता पैसे कोणत्याही एटीएम मधून मिळतील. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आता बँकेतून एटीएम घ्यावे, असे आवाहन जेष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.

           बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सहा लाख खातेदार आहेत. या खातेदारांची वारंवार पिळवणुक होत होती. अनुदानाची रक्कम असेल की, विम्याची प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या घटना घडत होत्या. दलाली होत असल्याचा आरोप देखील वारंवार केले जात होते. आता या सर्व आरोपांना बगल मिळणार आहे. हजारो दलाल हे उघड्यावर पडणार आहेत. त्याच बरोबर बँकेचे कर्मचारी या बरोबर भरडले जात होते. ते देखील या आरोपातून मुक्त होतील.

         खातेदाराला ज्या बँकेत आपले खाते आहे, त्या बँकेत जाऊन एटीएम साठी फॉर्म भरून द्यायचा आहे. हा फॉर्म दिल्यानंतर दोन दिवसात एटीएम मिळेल. आणि त्यानंतर कॅशलेस व्यवहार करण्यासाठी बँक देखील सज्ज राहील. बँकेत शेतकऱ्यांची गर्दी होणार नाही. शेतकऱ्यांची पिळवणूक देखील होणार नाही. कोणत्याही एटीएम मधून शेतकऱ्यांना हवी तेवढी रक्कम हवी त्यावेळेला काढून घेता येईल.

             केवळ शंभर रुपयांमध्ये एटीएम देणारी ही एकमेव बँक असू शकते. एकदा ते घेतल्यानंतर पुन्हा घेण्याची शेतकऱ्यांना आवश्यकता नसते. म्हणून शेतकऱ्यांनी आता तक्रार तक्रार न करता बँकेत जाऊन फॉर्म भरून एटीएम घ्यावे. म्हणजे कधीही पिक विमा, पिक कर्ज उचलायचे असेल कसलेही अनुदान आले असेल अथवा पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी किंवा अन्य कोणतीही रक्कम आपल्या खात्यात जमा झाली असेल तर ती बँकेत न जाता कधीही शेतकऱ्याला बाहेरच्या बाहेर उचलता येईल.

           यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचणार असून दलालांकडून घेतली जाणारी रक्कम देखील इथून पुढे द्यावी लागणार नाही. याबाबतचे परिपत्रक बँकेने जारी केले असून या धोरणामुळे बँकेचे व्यवहार त्याच पद्धतीने होतील. ग्राहकांना गरजेनुसार, पाहिजे तेव्हा, पाहिजे ती रक्कम, कुठूनही काढता येईल. बँकेची आणि शेतकऱ्यांची दोघांचीही दलालीच्या आरोपातून सुटका होणार आहे.दलाल प्रत्येक गावात आहेत, अशाही तक्रारी होत्या. त्यामुळे या निर्णयाचे शेतकऱ्यांनी स्वागत करणे आवश्यक आहे.

           सध्या बँकेत पी.एम. किसान योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असून यानिमित्ताने शेतकऱ्यांनी एटीएम कार्ड घेऊन कायमस्वरूपी वापर करावा. याच बरोबर साठ वर्षावरील खातेदारांना रोखीने रक्कम देण्याचा आदेश देखील दिला आहे. मात्र शेतकऱ्यांनी एटीएमनेच रक्कम उचलून कायमस्वरूपी फायद्यात रहावे. बँकेच्या या निर्णयाबद्दल मंडळाची आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे जन आंदोलनातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.

           या निर्णयामुळे दलालीचा धंदा करणारी मोठी यंत्रणा बाधित होणार आहे. त्यामुळे या यंत्रणेकडून वेगळ्या पद्धतीने एटीएम चा निर्णय थांबवण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ एटीएम घ्यावे, असे आवाहन देखील अँड. अजित देशमुख यांनी केले आहे.

----------
चौकट
----------
★ शेतकऱ्यांना दलाल मुक्त होण्याची संधी
★ बँकेचा कॅशलेस व्यवहार फायद्याचा ठरेल
★ शेतकऱ्यांचे बँकेतील हेलपाटे होणार बंद
★ केवळ शंभर रुपयात एटीएम मिळणार
★ सहा लाखावर खातेदारांना फायदा
★ दलाल याविरोधात आवाज उठवतील ?
-------------

No comments:

Post a Comment