गंगाखेड (प्रतिनिधी) : शनिवार ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शौचासाठी गेलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह विहिरीत आढळल्याची घटना तालुक्यातील खळी गावात घडली. मृत्यूचे कारण समजले नसल्याने याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड तालुक्यातील खळी येथील वैष्णवी सोपान सोन्नर वय १६ वर्ष ही इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणारी अल्पवयीन मुलगी शनिवार ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शौचासाठी घराबाहेर गेली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ती घरी परत आली नसल्यामुळे शेतातून घरी आलेल्या तिच्या आई, वडिलांनी व चुलत्यांनी गावातील शंकर तुकाराम होरे, महादेव जनार्दन जवारे, भगवान सोन्नर आदी ग्रामस्थांनी गावात सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही.
रात्री दहा वाजेच्या सुमारास तिची एक चप्पल गावात पाणी पुरवठा करणाऱ्या ग्राम पंचायतच्या विहिरीतील पाण्यात तरंगत असताना दिसली व शौचासाठी आणलेला डबा विहिरीच्या काठावर दिसल्याने विहिरीतील पाण्यात गळ (हुक) टाकून शोध घेतला असता वैष्णवी पाण्यात असल्याचे समजल्याने मध्यरात्रीच्या वेळी तिला विहिरीतील पाण्यातून बाहेर काढून गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता येथील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नागेश शाहू यांनी तिला तपासून मयत घोषीत केले.
मृत्यूचे कारण स्पष्ट न झाल्याने महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा टाके, वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. आर. चट्टे यांच्या उपस्थितीत रविवार ६ ऑक्टोबर रोजी इनकॅमेरा शवविच्छेदन करून तिचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. याप्रकरणी वैष्णवी सोपान सोन्नर हिचे चुलते अर्जुन अंबादास सोन्नर यांनी दिलेल्या खबरीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे, बिट जमादार दिपक कुमार व्हावळे हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment