बीड (प्रतिनिधी) बीड मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने जनतेचा जाहीरनामा तयार करून आमदारांसह प्रशासनापुढे मांडण्याचा निर्धार आमदार संवाद मंचच्या सदस्यांनी केला. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा दर्जेदार मिळाव्या, शाळांना भौतिक सुविधा, पुरेसे कर्मचारी मिळावेत, जिल्हा रुग्णालयात एमआरआय मशीन उपलब्ध करून द्यावे, ऊसतोड कामगारांसाठी आरोग्य, त्यांच्या पाल्यांसाठी शिक्षण सुविधा उपलब्ध कराव्यात, अशा विविध मागण्यांचा या जाहीरनाम्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी निश्चित केल्या. मुंबई स्थित संपर्क संस्थेच्या साथीने बीड येथे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य चळवळीतील कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून आमदार संवाद मंचाची स्थापना करण्यात आलेली आहे. या मंचाची मंगळवारी बैठक पार पडली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे, तत्वशील कांबळे, राहुल वाईकर, विनोद चव्हाण, मनिषा पवार, सतिष जाधव, शेख युनूस, अंकुर तांगडे, वैजनाथ खोडवे, मिथुन जोगदंड, संपर्कच्या मेधा कुळकर्णी, हेमंत कर्णिक, मृणालिनी जोग यांची उपस्थिती होती. महिला व बालकांच्या प्रश्नांसह नागरी समस्या प्रभावीपणे मार्गी लागाव्यात, यासाठी हा आमदार संवाद मंच स्थापित करण्यात आला आहे. दरम्यान, या बैठकीत डॉ.गणेश ढवळे यांनी जिल्हा रुग्णालयाच्या एमआरआय मशीन उपलब्ध करून देण्यासह शैक्षणिक असुविधांचा मुद्दा मांडला. शाळांची डागडुजी, दर्जेदार शिक्षण, विद्यार्थ्यांच्या पायाभूत सुविधा याविषयी मुद्दे सुचवले. जिल्ह्यात अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे वापस जाणाऱ्या निधीबाबतही नागरिकांनी सजग राहिले पाहिजे, अशी भूमिका डॉ.ढवळे यांनी मांडली. राहुल वाईकर यांनी शासकीय कर्मचारी नोकरीच्या ठिकाणी मुक्कामी राहत नसल्याने होणाऱ्या गैरसोयीचा मुद्दा मांडला. तत्त्वशील कांबळे यांनी ऊसतोड कामगार पाल्यांच्या स्थलांतरानंतरच्या शिक्षणाचा मुद्दा मांडला. यासह बालविवाह निर्मुलनासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही सांगितले. मनिषा चौधरी यांनी वृध्द तसेच निराश्रितांच्या भवितव्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी केली. तसेच महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहही शहरात असावे, असे मत मांडले. मिथुन जोगदंड, अंकुर तांगडे, वैजनाथ खोडवे, विनोद चव्हाण, सतीश जाधव यांनीही मतदारसंघाच्या हिताचे मुद्दे मांडले. या मागण्यांचा जाहीरनामा लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकाऱ्यांना सादर करून पाठपुरावा करण्याचा निर्धार याप्रसंगी करण्यात आला.
नागरिकांसह पाठपुरावा करणार शहरातील विविध प्रश्न, समस्यांबाबत व्यक्तीगत स्तरावर आंदोलन, लढा अनेक जण करतात. यासोबतच आमदार संवाद मंचच्या माध्यमातून बीड मतदारसंघातील विकासप्रश्नांबाबत जनतेचा जाहीरनामा निश्चित करत आहोत. व्यापक जनहिताचे प्रश्न या माध्यमातून सोडवण्याचा आमचा निर्धार आहे. या विषयांवर येत्या काळात विविध क्षेत्रात कार्यरत समाजसेवकांच्या आणि जनतेच्या साथीने लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडे पाठपुरावा करू. लोकप्रतिनिधीही मतदारांनी दिलेल्या जाहीरनाम्यावर निश्चित काम करतील, अशी आशा आहे, असे सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment