Saturday, February 28, 2026
होळी धूलिवंदन अवघ्या दोन दिवसांवर. परळीतील बाजारपेठेत उत्साहा. विविध रंग, पिचकार्या, वॉटर बलून व पूजेच्या साहित्याने बाजारपेठ फुलली.
परळी नगर परिषदेच्या नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल ॶॅड प्रणव मराठे यांचा मा.खा.तुकाराम रेंगे यांच्या हस्ते सत्कार.
एस.टी प्रवासात स्मार्टकार्डची अद्याप सक्ती करण्यात आलेली नाही.एस.टीच्या तिकीटा बाबत शासनाचा युटर्न!
मुंबई (प्रतिनिधी) एसटी बसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विविध प्रकारच्या तिकिटांमध्ये सवलती राज्य परिवहन महामंडळाकडून दिल्या जातात. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना हाफ तिकीट प्रवास तर विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास अशा योजना आहेत. पण या योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्वांना आता नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) बंधनकारक करण्यात आल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतंच जाहीर केलं होतं. त्यानंतर याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. पण आता शासनानं यावरुन युटर्न घेतला असून मोठा खुलासा केला आहे.
कार्ड सध्या अनिवार्य नाही
राज्य परिवहन महामंडळानं ट्विटद्वारे माहिती दिली की, NCMC स्मार्टकार्डची नोंदणी प्रत्येक आगारात सुरु झाली आहे. तथापि, एसटी प्रवासात या स्मार्टकार्डची अद्याप सक्ती करण्यात आलेली नाही. कृपया सर्व प्रवाशांनी याची नोंद घ्यावी. एसटीचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी रोहन देसाई यांनी ही माहिती दिली आहे.
प्रसिद्धी विभागाचं अजब स्पष्टीकरण
दरम्यान, राज्याच्या प्रसिद्धी विभागानं अर्थात महिती व जनसंपर्क संचालनालयानं हीच माहिती शेअर करताना सवलतीच्या एसटी तिकिटांसाठी NCMC कार्ड सध्या अनिवार्य नाही. ते अनिवार्य असल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा आणि जनतेची दिशाभूल करणारा आहे, असं म्हटलं आहे. यावरुन एकीकडं राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी स्वतःच हे कार्ड अनिवार्य करण्यात आल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं आणि दुसरीकडं याच्या बातम्या या दिशाभूल करणाऱ्या बातम्या असल्याचं आता राज्याच्या प्रसिद्धी विभागानं म्हटलं आहे. यावरुन राज्य शासनानाच यावरुन गोंधळ सुरु असल्याचं स्पष्ट झालं आहे.
नागरिकांच्या विरोधानंतर युटर्न का?
कदाचित, NCMC कार्ड अनिवार्य केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या अनेक तक्रारी येऊ लागल्यानं तसंच आधीच आधार कार्डसह विविध प्रकारची कार्ड शासनानं नागरिकांसाठी बंधनकारक केलेली असताना यात आणखी एका कार्डची भर कशासाठी असा थेट सवालही नागरिक विचारायला लागले आहेत. तसंच हे कार्ड १९९ रुपयांना विकत घेऊन त्यात कमीत कमी १०० रुपये बॅलन्स आणि ते रिचार्जही ५० रुपयांच्या पटीत होणार असल्यानं या गोष्टी देखील सर्वसामान्य खेड्यापाड्यातील प्रवाशांसाठी जाचक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच शासनानं आपल्या निर्णयातून युटर्न घेतल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.
Friday, February 27, 2026
नागापूरमध्ये ग्रामदैवत श्री नागनाथ मंदिरात 30 वा श्रीमद् भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन.
जिल्हा न्यायालय परिसरात वकिलास मारहाण प्रकरणी आरोपीला तीन दिवसाची पोलीस कोठडी.
मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास राधाकिसन करपे याने काही महिलांना सोबत घेऊन येत एड. राम डोंगरे यांना मारहाण केली. या प्रकरणाची तक्रार वकील संघाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली. मात्र आरोपीचे पोलिसांशी असलेले हितसंबंधाच्या कारणावरून गुन्हा नोंद करण्यास पोलिसांकडून टाळाटाळ केली जात होती. या प्रकरणात वकील संघाने एकजूट दाखवत न्यायालयीन कामकाजात सहभाग घेणार नसल्याचे जाहीर करून न्यायालयाच्या पायऱ्यावर बसून बुधवारी आंदोलन केले. त्यानंत मोर्चा शिवाजीनगर पोलीस ठाण्यावर नेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील तक्रार करण्यात आली. सगळीकडून दबाव वाढल्यानंतर पोलीस यंत्रणा तळ्यावर आली 27 तासानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी राधाकिसन करपे याला अटक करून आज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीस तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे आजही वकील संघाने न्यायालयीन कामकाजात सहभाग घेतला नव्हता दरम्यान पाच वाजता हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी वकिलांना तक्रार द्यायला गेले असताना तुमच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची धमकी दिली होती. या अनुषंगाने पोलिसांनी एड. राम डोंगरे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केलाच तर पुन्हा अनिश्चित काळासाठी वकील संघ काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा वकील संघाने दिला आहे.
आता जिल्हा परिषद आणि पंचायतसमिती मध्येही होणार स्वीकृत सदस्यांची निवड राज्य मंत्रिमंडळात निर्णय.
मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील जि.प प.स निवडणुका होताच महापालिका आणि नगरपालिकांमध्ये स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली. याप्रमाणेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्य निवडण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला आहे.राज्य मंत्रिमंडळात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेत सदस्य संख्येच्या 10 टक्के तर पंचायत समितीत सदस्य संख्येमागे 20 टक्के सदस्य निवडता येतील. मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार किमान 5 सदस्य निवडणे बंधनकारक असणार आहे. यासंदर्भात लवकरच विधिमंडळात कायदा पारीत केला जाणार आहे.
जि.प आणि पंचायत समिती निवडणुकांतर्गत जिल्हा परिषदेत 5 आणि पंचायत समितीमध्ये 2 सदस्यांची स्वीकृत सदस्य म्हणून नेमणूक करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती.मुख्यमंत्र्यांनी या विषयावर सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामविकास विभागाला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. ग्रामीण भागात समाजाभिमुख कार्य करणाऱ्या, परंतु निवडणूक लढविण्याची क्षमता नसलेल्या पात्र कार्यकर्त्यांना विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध होईल,या उद्देशाने महायुती सरकारने हा निर्णय घेतला आहे.
वाळू माफियांना पोलिसांचा दणका! चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त.
आष्टी (प्रतिनिधी): आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी वाळू माफियांविरोधात मोठी कारवाई केली आहे. ठोंबळसांगवी नदीपात्रातून विनापरवानगी वाळूची चोरटी वाहतूक करणारे दोन हायवा पोलिसांनी पकडले असून, सुमारे ३८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी कारवाई काय?
अंभोरा पोलीस ठाणे हद्दीतील ठोंबळसांगवी नदीपात्रातून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वाळूचा अवैध उपसा करून ती वाळू अहिल्यानगर शहरात विक्रीसाठी नेली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांच्या पथकाने बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास नदीपात्रात धाड टाकली. यावेळी वाळूने भरलेले दोन हायवा पोलिसांना आढळून आले.
३८ लाखांचा मुद्देमाल जप्त.
पोलिसांनी या कारवाईत दोन हायवा आणि त्यातील वाळू असा एकूण ३८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. पोलीस अंमलदार सतीश पैठणे यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणी दोन व्यक्तींविरुद्ध अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पथकाने केली कारवाई.
ही धडाकेबाज कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे, पोलीस हवालदार भगवान देवकर, पोलीस अंमलदार सतीश पैठणे, हनुमंत खांडेकर आणि होमगार्ड तुषार वामन यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
Tuesday, February 24, 2026
सिंदी येथे ग्रामीण रुग्णालयच्या मागणी साठी रक्ताने लिहिले मुख्यमंत्री यांना पत्र संग्राम कळणे सहपरिवार आंदोलनात सहभागी.
Friday, February 20, 2026
आष्टीत दोन इंग्लिश बनावटीच्या पिस्तुलां सह दोघांना अटक, घातपाताचा संशय?
आष्टी (प्रतिनिधी) : इंग्लिश बनावट पिस्तूल घेऊन चारचाकी वाहनाने ब्रम्हगांव हाजीपूर रस्त्याने येत असल्याची गोपनीय माहिती आष्टी पोलिसांना मिळताच त्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार सापळा रचून चारचाकीसह दोघांना ताब्यात घेतले असून दोन पिस्तूल जप्त करण्यात आल्याची कारवाई गुरूवारी रात्री ९ च्या दरम्यान केली.
आष्टी पोलिस ठाणे हद्दीतील ब्रम्हगांव हाजीपूर रस्त्यावरून एका चारचाकी वाहनातून काही व्यक्तीजवळ पिस्तूल असल्याची गोपनीय माहिती मिळताच ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांनी कर्मचाऱ्यांना ही माहिती देताच या रस्त्यावर सापळा लावून गुरूवारी रात्री ९ च्या दरम्यान राहूल खोटे रा.मूगगाव,अमृत भोसले रा.पारगांव घुमरा ता.पाटोदा जि.बीड या दोघेजणांना ताब्यात घेऊन दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तुल जप्त करत अटक करण्यात आली आहे.यात इतर आरोपीचा देखील समावेश असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
लाचेची मागणी झाली असल्याचा पुरावा मिळाल्यानंतर, एसीबी पथकाची सापळा रचून कारवाई.परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे ताब्यात!
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी जिल्ह्यात मोठी कारवाई करत परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना ताब्यात घेतले आहे. तक्रारदाराकडे 'ऐपतीचे प्रमाणपत्र' देण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, महसूल विभागात या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
एका तक्रारदाराला आपल्या कामासाठी ऐपतीचे प्रमाणपत्र हवे होते. हे प्रमाणपत्र देण्यासाठी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी सुरुवातीला ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ही रक्कम २० हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. मात्र, व्यवहार ठरल्यानंतर तहसीलदार मुंडे यांना तक्रारदाराच्या हालचाली आणि वर्तनावर संशय आला. संशयामुळे त्यांनी प्रत्यक्ष पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केली.
Tuesday, February 17, 2026
कांद्याच्या पिकात अफूची शेती साडेपाच लाख रुपये किमतीची साडेतेरा किलो अफूची झाड जप्त.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई.
अधिक माहिती अशी की, दि.17 फेब्रुवारी रोजी बन्सी घाडगे यांच्या सातेफळ येथील घाडगे वस्ती जवळील शेतात कांद्याच्या पिकामध्ये अफूची लागवड केल्याची गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाल्या वरून दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास छापा मारला. त्यावेळी बन्सी महादेव घाडगे याने त्याच्या शेतातील कांद्याच्या पिकात लावलेले अफूची झाडे आढळून आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने, केज तहसीलचे नायब तहसीलदार अशोक भंडारे, महसूल मंडळ अधिकारी दयानंद मस्के, सहाय्यक कृषी अधिकारी गणेश पारखे, सहाय्यक कृषी अधिकारी सुदर्शन शेळके यांच्या समक्ष अफूची झाडे उपटून त्यांचे वजन केले असता त्याचे वजन साडेतेरा किलो ग्रॅम असल्याचे आढळून. त्याची बाजार किंमत साडेपाच लाख रु. एवढी आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकट राम यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलिस नाईक दिलीप गित्ते, पोलिस नाईक भागवत शेलार महेश जोगदंड, दीपक खांडेकर, गणेश मरांडे यांच्यासह युसुफवडगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे, पोलिस उपनिरीक्षक भिमराव मांजरे यांनी कारवाई केली.या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने अफूची लागवड करणारा शेतकरी बन्सी महादेव घाडगे याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे
डीपीतील फ्युज काढून गावात अंधार केला नऊ लाखासह लाखोंच सोन घेऊन चोरटे पसार.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी गावात अंधार करून पोपट मच्छिंद्र कोठुळे यांच्या घरात मध्यरात्री कडी-कोंडा आणि कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील कपाट फोडून तब्बल ९ लाख रुपये रोख रक्कम आणि अडीच तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. सकाळी उठल्यानंतर घरातील कपाट उघडे तर सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसल्याने चोरी झाल्याचे कुटुंबाच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली.धक्कादायक बाब म्हणजे चोरट्यांनी गावातील विद्युत डीपीमधील फ्यूज काढून अंधाराचा फायदा घेत घरफोडी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही चोरी पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आजच्या घडीला सोन्याचे दर उच्चांक गाठत असताना, कष्टाने कमावलेली रक्कम आणि भविष्यासाठी साठवलेले दागिने चोरीला गेल्याने कोठुळे कुटुंबीयांवर मोठा आर्थिक आघात झाला आहे. “माझ्या मुलाने ऊसतोडणी करून मोठ्या कष्टाने कमावलेले पैसे चोरांनी नेले. आमचे पैसे परत मिळावेत, अशी भावनिक मागणी कुटुंबातील महिलांनी केली आहे.या प्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
सोशल मीडिया स्टेटसवरून दोन गटात भीषण हाणामारी.धारदार शस्त्राने तिघांवर हल्ला.एकाचा मृत्यू, दोघे गंभीर.
आष्टी (प्रतिनिधी): सोशल मीडियावर एकमेकांच्या विरोधात स्टेटस आणि स्टोरी टाकण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हाणा मारीत झाले.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथे सोमवारी रात्री तरुणांच्या दोन गटात धारदार शस्त्राने एकमेकांवर वार करण्यात आले. या हल्ल्यात एका २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अन्य दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत.
नेमकी घटना काय?
आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथील जिल्हा परिषद शाळेसमोर सोमवारी रात्री तरुणांचे दोन गट आमनेसामने आले. इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर एकमेकांच्या विरोधात टाकलेल्या 'स्टोरी'वरून त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कुरापत काढली जात होती. याच वादाचे पर्यावसान सोमवारी रात्री हाणामारीत झाले. एका गटातील तरुणांनी रागाच्या भरात धारदार शस्त्राने दुसऱ्या गटातील तिघांवर सपासप वार केले.
एकाचा मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक
या भीषण हल्ल्यात दीपक शिवाजी नालकोल (वय २०, रा. रुईनालकोल) हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेत असतानाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तर, त्याच्यासोबत असलेले अन्य दोन तरुणही या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर (अहमदनगर) येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोघांचीही प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
पोलीस प्रशासनाची धाव
घटनेची माहिती मिळताच आष्टीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे, विक्रांत हिंगे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा नरवाडे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गावात सध्या तणावाचे वातावरण असून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. याप्रकरणी पुढील तपास आष्टी पोलीस करत असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
दहावीच्या परीक्षेवरून घरात वाद; मुलीचे सावत्र भावासोबत पलायन, पोलिसांमुळे अनर्थ टळला.२ तासांत भावासह परळीत ताब्यात.
केज (प्रतिनिधी): शाळेतून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तक्रार प्राप्त होताच केज पोलिसांनी अवघ्या दोन तासांत तपास लावत पीडित मुलीला सुरक्षित ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, ज्या तरुणावर पळवून नेल्याचा आरोप होता, तो पीडितेचा सावत्र भाऊ असल्याचे निष्पन्न झाले आहे.
नेमकी घटना काय?
केज येथील एका भागात राहणारी १० वीच्या वर्गातील मुलगी शाळेत गेलेली असताना तिथून गायब झाली होती. तिच्या आईने याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सोमवारी रात्री ११ वाजता गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी तपासाची चक्रे फिरवली.
परळी रेल्वे स्टेशनवर सापडले.
पोलीस पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला असता, संशयित आरोपी आणि पीडित मुलगी परळी रेल्वे स्टेशनवर असल्याची माहिती मिळाली. परळीतील संभाजीनगर पोलिसांच्या मदतीने केज पोलिसांनी मध्यरात्री १ वाजता दोघांनाही ताब्यात घेतले.
परीक्षेचा राग ठरला कारण.
पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. १० वीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसण्यावरून घरात काहीसा वाद झाला होता. त्याच रागाच्या भरात ही मुलगी तिच्या सावत्र भावासोबत लातूरला जाण्यासाठी निघाली होती. दोघेही नात्याने बहीण-भाऊ निघाल्याने आणि मुलीने स्वतःहून गेल्याचे कबूल केल्याने पोलिसांनी दोघांनाही समज दिली. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय लक्ष्मण कीर्तने, पीएसआय अमिरोद्दीन इनामदार आणि जमादार शिवाजी कागदे यांच्या पथकाने केली.
Friday, February 13, 2026
बीडमध्ये वेठबिगारी उघड! बाहेरच्या राज्यातील मजुरांना डांबून, मारहाण करत करून घेतलं काम. जिल्हाधिकाऱ्यांच्या तत्परतेने झाली सुटका.
धारूर तालुक्यातील आमला येथील ओम चंद्रकांत सोळंके याने नोव्हेंबर २०२५ मध्ये उत्तर प्रदेशातील ललितपूर आणि मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील ११ मजुरांना ऊसतोडणीसाठी आणले होते. मात्र, कामाचा मोबदला मागितला असता सोळंकेने त्यांना अमानुष मारहाण केली. त्यांना घराबाहेर पडू न देता, जिवे मारण्याची धमकी देऊन सतत राबवून घेतले. मजुरांच्या ठेकेदाराने पैसे मागितले असता त्यालाही बदडून काढण्यात आले.
अशी झाली सुटका.
हताश झालेल्या मजुरांच्या कुटुंबीयांनी उत्तर प्रदेशातील ललितपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. ललितपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्य ओळखून बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना फोनवरून माहिती दिली आणि विशेष पत्र पाठवले. जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी तात्काळ माजलगावचे उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले आणि नायब तहसीलदार सुरेश पाळवदे यांना कारवाईचे आदेश दिले. बुधवारी सायंकाळी हिंगणी शिवारात धाड टाकून या सर्व अकरा जणांची सुटका करण्यात आली.
या प्रकरणी मजुरांपैकी हरिसिंग सहरिया याच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलीस ठाण्यात ओम चंद्रकांत सोळंके विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांसह 'वेठबिगारी पद्धत (उच्चाटन) अधिनियम १९७६' नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Thursday, February 12, 2026
बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी महिला ग्रंथपालावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश. शालेय शिक्षण विभागाची गंभीर दखल दिव्यांग अधिनियम अंतर्गत कारवाई.
परभणी (प्रतिनिधी) येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) येथे ग्रंथपाल पदावर कार्यरत आणि नांदेड येथील रहिवासी महिला कर्मचाऱ्याने बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित महिला कर्मचारी वनिता भालेराव हिच्यावर दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या कलम 91 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत.
वनिता भालेराव (रा. स्वप्नजा गार्डन, तक्षशिला बुद्धविहाराजवळ, नांदेड) यांनी 2009 मध्ये कर्णबधिर असल्याचे दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त केले होते. त्याच वर्षी या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी दिव्यांग आरक्षणातून जळगाव येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत ग्रंथपाल पदावर नियुक्ती मिळविली. नंतर बदलीने त्या परभणी येथील डाएट कार्यालयात कार्यरत होत्या.
दरम्यान, संबंधित महिला कर्मचारी सार्वजनिक जीवनात स्पष्टपणे ऐकू व बोलू शकत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर काही सामाजिक व कर्मचारी संघटनांनी त्यांच्या दिव्यांगत्वाबाबत शंका उपस्थित केली. दिव्यांग कल्याण विभागाच्या 27 जून 2024 रोजीच्या पत्राचा संदर्भ देत संघटनांनी दिव्यांगत्वाची फेरतपासणी करण्याची मागणी शासनाकडे केली होती.
त्याअनुषंगाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, परभणी यांनी भालेराव यांना नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले. प्राथमिक तपासणीत निश्चित निष्कर्ष न निघाल्याने, महाविद्यालयाने त्यांच्या दोन्ही कानांची सखोल तपासणी करण्यासाठी मुंबई येथील केंद्र शासनाच्या आलिया यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज येथे तपासणी करण्याची शिफारस केली.
त्यानुसार दि.12 व 13 सप्टेंबर 2025 रोजी संबंधित महिलेच्या दोन्ही कानांची ए.एस.एस.आर. तपासणी करण्यात आली. त्याचा सविस्तर अहवाल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, परभणी यांना सादर करण्यात आला. सदर अहवाल शिक्षण उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर यांनी अभिप्रायासाठी पुन्हा डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड येथे पाठविला. या अहवालाच्या आधारे वैद्यकीय महाविद्यालयाने भालेराव या केवळ 18 टक्के इतक्याच दिव्यांग असल्याचा स्पष्ट अभिप्राय दिला.
दिव्यांग आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी किमान निर्धारित टक्केवारी पूर्ण न होत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शिक्षण उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर यांनी संबंधित महिला कर्मचाऱ्यास तात्काळ निलंबित केले. मात्र, एवढा गंभीर प्रकार उघड होऊनही अद्याप त्यांच्यावर दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या कलम 91 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. या कलमानुसार बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून लाभ घेतल्यास १ लाख रुपये दंड व दोन वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत शालेय शिक्षण विभाग यांनी अखेर वनिता भालेराव यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले, यामुळे बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे शासकीय नोकऱ्या मिळविणाऱ्या प्रकरणांवर कठोर कारवाईचा इशारा मिळाल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात सुरू आहे.
सिद्धेश्वर मंदिर परिसरात दिव्य ज्योति जागृती संस्थानतर्फे स्वच्छता अभियान उत्साहात.
माजलगावमध्ये धक्कादायक घटना.हिवरा बुद्रुक गावात ट्रॅक्टर पलटी होऊन. शेतमजुराचा जागीच मृत्यू.
मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण गुरवारी पहाटे 2 वाजता शेतातील कामासाठी ट्रॅक्टर चालवत जात होता. यावेळी शेत वळण रस्त्यावर ट्रॅक्टरला टर्न मारत असताना ट्रॅक्टर पलटी झाला. या झालेल्या अपघातात ट्रॅक्टर अंगावर पडल्याने गणेश गाडे यात गंभीर जखमी झाला. दरम्यान स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत तरुण शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याची माहिती आहे. दरम्यान या घटनेमुळे तरुणाच्या गावात शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
महापशुधन एक्स्पो-2026 व महाशिवरात्री च्या पार्श्वभूमीवर मांस व दारू विक्रीवर कडक बंदीची मागणी.जिल्हाधिकारी पालकमंत्री,मंत्री व उत्पादन शुल्क विभागा कडे शिवकुमार केदारी यांचे ईमेलद्वारे निवेदन.
Wednesday, February 11, 2026
देशभारतील कामगार संघटना,बँक कर्मचारी आणि शेतकरी संघटनांच्या वतीने भारत बंद.
नवी दिल्ली - देशभारतील कामगार संघटना, बँक कर्मचारी आणि शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. उद्या 12 फेब्रुवारी रोजी बंद पाळण्यात येणार आहे.
उद्याच्या संपात ३० कोटींहून अधिक कामगार सहभागी होऊ शकतात असा कामगार संघटना नेत्यांचा दावा आहे. परिणामी, उद्या अनेक राज्यांमध्ये बँकिंग सेवा, सार्वजनिक वाहतूक, सरकारी कार्यालये आणि औद्योगिक कामकाजावर मोठा परिणाम होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर उद्या कोणकोणत्या सेवा या बंद राहतील आणि कोणत्या सुविधांना मुभा देण्यात आली आहे ते आपण जाणून घेऊया.
उद्याची भारत बंदची हाक हि नवीन लेबर कोड आणि भारत-अमेरिकेतली व्यापारी कराराविरोधात आहे. या नवीन बदलांमुळे देशाच्या कामगार वर्ग, अर्थव्यवस्था आणि सामान्य नागरिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारच्या नवीन धोरणांचा या संघटनांनी विरोध केला आहे. भारत बंदमध्ये 10 केंद्रीय ट्रेड युनियनचा समावेश आहे. यामध्ये INTUC, AITUC, HMS, CITU, AIUTUC, TUCC, SEWA, AICCTU, LPF आणि UTUC यांचा समावेश आहे. कामगार संघटनांचे म्हणणे आहे की हे कायदे कंपन्यांना अधिक फायदे देत असून कामगार संरक्षण कमी करतील. शेतकरी संघटनांनीही या चळवळीला पाठिंबा दर्शविला आहेउद्या १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सार्वजनिक क्षेत्रातील बँका काही भागात बंद राहू शकतात किंवा मर्यादित कर्मचाऱ्यांसह काम करू शकतात.
सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक उपक्रमांमध्ये उपस्थिती कमी असू शकते.
बस, टॅक्सी आणि इतर सार्वजनिक वाहतूक सेवा कमी वेगाने चालू शकतात किंवा काही भागात बंद राहतील.
कारखाने आणि औद्योगिक युनिट्स एका दिवसासाठी कामकाज थांबवू शकतात.
ज्या भागात संप सर्वात प्रभावी आहे तेथे शाळा आणि महाविद्यालये बंद राहू शकतात.
अनेक शहरांमध्ये बाजारपेठा आणि स्थानिक दुकाने देखील बंद राहू शकतात.
उद्या, १२ फेब्रुवारी रोजी भारत बंद असला तरी काही जीवनावश्यक सेवा सुरूच राहतील. रुग्णालये आणि आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका सेवा, वैद्यकीय मेडिकल, एटीएम, अग्निशमन दल आणि मदत सेवा, दूध पुरवठा, वर्तमानपत्र वितरण, विमानसेवा सुरूच राहणार आहेत .
कोयत्याचा धाक दाखवत ऊसतोड मजुराच्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ट्रॅक्टर चालकाचा अत्याचार.
केज (प्रतिनिधी): पोटाची खळगी भरण्यासाठी शेकडो किलोमीटरवरून ऊसतोडणीसाठी आलेल्या एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परभणी जिल्ह्यातून केज तालुक्यात कामासाठी आलेल्या एका ऊसतोड मजुराच्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर त्याच टोळीतील नराधम ट्रॅक्टर चालकाने कोयत्याचा धाक दाखवून दोनदा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी युसूफवडगाव पोलीस ठाण्यात 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सूरज अशोक खरात (रा. जामरून, ता. जिंतूर, जि. परभणी) हा त्याच टोळीत ट्रॅक्टर चालक म्हणून काम करतो. १४ जानेवारी रोजी दुपारी १२ च्या सुमारास सुर्डी शिवारातील एका कोपीत मुलीला एकटे गाठून त्याने कोयत्याचा धाक दाखवून अत्याचार केला. इतक्यावरच न थांबता, ८ फेब्रुवारी रोजी सकाळी पुन्हा हादगाव शिवारात त्याने पीडितेवर बळजबरी केली. जिवे मारण्याची धमकी दिल्याने घाबरलेल्या चिमुकलीने अखेर आपल्या आईला हा थरार सांगितला.
आरोपी ट्रॅक्टर सोडून पसार
पीडितेच्या आईने हिंमत दाखवत मंगळवारी रात्री उशिरा युसूफवडगाव पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच नराधम सूरज खरात आपला ट्रॅक्टर हादगाव शिवारात सोडून फरार झाला आहे. सध्या 'पिंक पथका'चे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके या प्रकरणाचा तपास करत असून फरार आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी चक्रे फिरवली आहेत.
बीडमध्ये पोलीस भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू. पोलीस होण्याचे स्वप्न राहिले अधुरे.
बीड (प्रतिनिधी) खाकी वर्दीचं स्वप्न उराशी बाळगून आलेल्या एका तरुणाचा पोलीस भरतीदरम्यान मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना बीडमध्ये घडली आहे. मैदानी चाचणीत धावताना अचानक चक्कर येऊन कोसळलेल्या या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून भरतीला आलेले तरुण हळहळ व्यक्त करत आहेत.
बीड येथे सध्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. आज मैदानी शारीरिक चाचणी सुरू असताना, १६०० मीटर धावण्याच्या फेरीत दीपक भास्कर वावळ हा तरुण सहभागी झाला होता. धावत असताना अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले, यावेळी तो अचानक चक्कर येऊन थेट मैदानावरच कोसळला.
प्रशासनाकडून तातडीने हालचाली
मैदानावर उपस्थित असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आणि वैद्यकीय पथकाने क्षणाचाही विलंब न लावता दीपकला बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्रकृती खालावली होती. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मृत दीपक वावळ हा परळी तालुक्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आपल्या घरातील तरुण पोलीस होऊन येईल, अशी आशा असलेल्या त्याच्या कुटुंबावर या घटनेमुळे आभाळ कोसळले आहे.
परळीतील वार्ड क्र. 10 अंधारात आणि तहानलेला! स्ट्रीट लाईट अपुऱ्या मूलभूत सुविधांचा अभाव नगर परिषद प्रशासना वर नागरिकांचा संताप.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - परळी वैजनाथ नगर परिषद हद्दीतील वार्ड क्रमांक 10 मधील संपूर्ण परिसर सध्या मूलभूत सुविधांअभावी नागरिकांच्या संतापाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या वार्डात स्ट्रीट लाईटची सुविधा अत्यंत अपुरी असल्याने संपूर्ण परिसर रात्रीच्या वेळी अंधारात बुडालेला असतो. परिणामी नागरिकांना रात्री ये-जा करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून अपघात, चोरी, महिलांची असुरक्षितता यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत.
परळी औष्णिकवीज केंद्रला केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस.संच क्रमांक ६ व ८ तात्काळ बंद ठेवण्याचे आदेश कायद्याचे उल्लंघन,आणि अनियमितता तपासणीत उघड.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने कायमच वादग्रस्त ठरलेल्या परळी वैजनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्रात सध्या सुरू असलेल्या संच क्रमांक सहा, सात व आठ या संचापैकी संच क्रमांक सहा व आठ तात्काळ बंद करा अशा पद्धतीची आदेशाची नोटीस केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने काढली आहे. या नोटिसीतून परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रदूषण विषयक हलगर्जी, पर्यावरणीय कायद्याचे उल्लंघन, नियमांची सातत्याने पायमल्ली आणि अनियमितता अशा अनेक बाबी उघड झाल्या आहेत.
या अनुषंगाने महानिर्मितीच्या अखत्यारीतील औष्णिक विद्युत केंद्र परळी वैजनाथ यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. त्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या रडारवर परळीचे औष्णिक विद्युत केंद्र आल्याचे दिसून येत आहे.
परळी वैजनाथ येथील महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या (महानिर्मिती) परळी औष्णिक वीज केंद्रावर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) मोठी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यानेसार संच क्रमांक 6 आणि 8 तात्काळ बंद करण्याचे आदेश आहेत. पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ च्या कलम ५ अंतर्गत ही कारवाई करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तपासणीत परळी औष्णिक वीज केंद्राकडून हवा, पाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाबाबत सातत्याने गंभीर उल्लंघने होत असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, संच क्रमांक ६,७ आणि८ हे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पूर्वीच्या बंद आदेशानंतरही कार्यरत असल्याचे आढळून आले आहे.
धोकादायक काळ्या पाण्याचा थेट नाल्यात विसर्ग...
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तपासणीदरम्यान काळ्या रंगाचे प्रक्रिया न केलेले सांडपाणी केंद्राच्या हद्दीबाहेर नैसर्गिक नाल्यात सोडले जात असल्याचे, तसेच राख तलावाचे ओव्हरफ्लो पाणी थेट बाहेर वाहत असल्याचे निदर्शनास आले आहे. कच्च्या सांडपाणी पंप हाऊसमधून सतत गळती होत असून परिसरातील शेती व पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.
ऑनलाईन सातत्यपूर्ण उत्सर्जन व सांडपाणी निरीक्षण प्रणाली बंद, प्रदूषण नियंत्रण यंत्रणा अपयशी
डिसेंबर २०२४ पासून सांडपाण्याचा, तर सप्टेंबर २०२४ पासून वायुप्रदूषणाचा ऑनलाईन सातत्यपूर्ण उत्सर्जन व सांडपाणी निरीक्षण प्रणाली डेटा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्व्हरवर पाठवण्यात आलेला नाही.वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद – राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ( CSIR-NEERI) च्या अहवालानुसार केंद्रातील विद्युतस्थैतिक धूळ संकलक यंत्रणा (ESP) प्रणाली धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी अपुरी ठरली आहे. तपासणीत धूळ उत्सर्जन ८७ ते ९१ mg/Nm³ आढळले, जे निर्धारित ५० mg/Nm³ मर्यादेपेक्षा जास्त आहे.
राख वापरात मोठी तफावत, दंड आकारला जाणार
राख वापराबाबत केंद्राने दिलेल्या आकडेवारीत मोठी तफावत आढळून आली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रत्यक्ष राख वापर फक्त ५५.६१% असल्याचे ऑडिट अहवालातून स्पष्ट झाले असून किमान ८०% लक्ष्य पूर्ण न केल्यामुळे प्रति टन १००० रुपये पर्यावरणीय नुकसानभरपाई आकारली जाण्याची शक्यता आहे.
धोकादायक कचऱ्याचे गैरव्यवस्थापन
सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पा मधील गाळ राख स्लरीमध्ये मिसळून राख तलावात टाकण्यात येत असल्याचे, तसेच वापरलेले तेल शेकडो ड्रममध्ये जमिनीवर उघड्यावर साठवले असल्याचे आढळले. अनेक ठिकाणी तेल गळती होऊन माती प्रदूषित झाली आहे. राख बंधाऱ्यांचे २०१९ नंतर वार्षिक सुरक्षा ऑडिटही झालेले नाही.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळला तातडीच्या कारवाईचे आदेश
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला युनिट ६ व ८ तात्काळ बंद ठेवणे, सर्व कोणतीही परवानग्या रद्द करणे, सर्व प्रकरच्या उल्लंघनांवर कठोर कारवाई करणे याबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. या आदेशांवर केलेल्या कारवाईचा अहवाल ३० दिवसांत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा कडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अद्याप आम्हाला अशा प्रकारचे आदेश किंवा नोटीस प्राप्त झाली नाही.... दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन परळी औष्णिक विद्युत केंद्राने केलेले आहे. अनेक वेळा तपासण्यांमध्ये देण्यात आलेले निर्देशही पाळण्याचा काटेकोर प्रयत्न करण्यात आलेला आहे. मात्र केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संच क्रमांक सहा व आठ तातडीने बंद करण्याबाबत ची कोणतीही नोटीस अद्याप तरी आम्हाला प्राप्त झालेली नाही त्यामुळे याबाबत अधिक प्रतिक्रिया आम्ही व्यक्त करू शकणार नाहीत.- सुनील इंगळे, मुख्य महाव्यवस्थापक, औष्णिक विद्युत केंद्र, परळी वैजनाथ
परळीतील यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात शासनाच्या निर्देशानुसार कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात पोलिस बंदोबस्तात बारावीच्या परीक्षा सुरळीत सुरू.
Monday, February 9, 2026
महाराष्ट्रातील कनिष्ठ वकिलांसाठी मानधन योजना राबवा.खा.बजरंग सोनवणे यांची संसदेत मागणी.
लघुशंकेसाठी कार थांबवताच व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून ४ लाखांना लुटलं. केज तालुक्यातील धक्कादायक घटन.ा
केज (प्रतिनिधी): रात्रीच्या वेळी महामार्गावर प्रवास करणे किती धोकादायक ठरू शकते, याचा प्रत्यय अंबाजोगाईच्या एका व्यापाऱ्याला आला आहे. लघुशंकेसाठी कार थांबवताच दबा धरून बसलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून तब्बल ४ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना अंकुर फाट्याजवळ घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
एसटीच्या ताफ्यात नव्या बसेस या नव्या बसेसना ' हिंदवी स्वराज्याची जननी राज माता जिजाऊ' यांचे नाव.
मुंबई (प्रतिनिधी) राज्याच्या कानाको पऱ्यात कुठेही जायचं असेल तर एसटी हा सुरक्षित आणि कमी खर्चाचा पर्याय मानला जातो. गाव तिथे एसटी या धोरणामुळे सामान्यांसाठी एसटी प्रिय ठरली आहे. दरम्यान दिवसागणिक एसटी अधिकाधिक अपग्रेड होताना दिसतेय. महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिकतेची जोड देत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांना गुड न्यूज दिलीय. एसटीच्या ताफ्यात लवकरच नव्या दमाच्या बसेस दाखल होत आहेत. काय आहे यात खास? सविस्तर जाणून घेऊया.
राजमाता जिजाऊंचे नाव
गर्दीच्या मार्गांवर प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागू नये, यासाठी 3 बाय 2 आसन रचनेच्या तब्बल 55 आसनी अत्याधुनिक बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. या नव्या बसेसना ' हिंदवी स्वराज्याची जननी असलेल्या राजमाता जिजाऊ' यांचे नाव देण्यात आले असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
मार्चपासून सेवेत दाखल
या बसेस मार्च महिन्यापासून टप्प्याटप्प्याने राज्यभर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून, भगव्या आणि शुभ्र पांढऱ्या रंगसंगतीत सजलेल्या या बसेस महाराष्ट्राच्या परंपरेचे आणि अभिमानाचे जणू चालते-बोलते प्रतीक ठरणार आहेत.
इतिहासाचा सन्मान, प्रवासात आराम
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांच्या स्वराज्य संकल्पनेमागे उभी राहिलेली प्रेरणाशक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ साहेब! त्या अर्थाने त्या हिंदवी स्वराज्याच्या जननी ठरतात. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ एसटी च्या नवीन बसेसचे राजमाता जिजाऊ असे नामकरण केल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली. अर्थात एसटीने यापूर्वी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती, हिरकणी अशा नावांनी बसेसना यापूर्वी गौरवले आहे. आता त्या परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय, असेही ते म्हणाले.
प्रवाशांना मोठा दिलासा
सध्याच्या बसेसची आसन क्षमता साधारण 40 प्रवासी इतकी असताना, नव्या बसेसमध्ये 55 प्रवासी आरामात बसू शकतील. म्हणजेच गर्दीच्या मार्गांवर उभे राहणाऱ्या तब्बल 15 प्रवाशांना आता बसण्याची सोय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ही सेवा विशेषतः दोन शहरांदरम्यानच्या अतिगर्दीच्या मार्गांवर सुरू करण्याचा एसटीचा मानस आहे. असे मंत्री सरनाईक म्हणाले.
परंपरा आणि प्रगतीचा सुंदर संगम
“राजमाता जिजाऊ” हे नाव केवळ नामकरण नाही, तर स्वराज्याच्या संस्कारांचा, मातृशक्तीच्या प्रेरणेचा आणि प्रवाशांच्या सोयीसाठीच्या बांधिलकीचे एक सन्मानचिन्ह आहे. लवकरच इतिहासाच्या साक्षीने सजलेल्या या बसेस आधुनिक सुविधांसह महाराष्ट्राच्या रस्त्यांवर धावतील असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले
एसटी बस प्रवाशांसाठी मोठी बातमी! सेवा विस्कळीत होण्याची शक्यता? कर्मचाऱ्यां कडून सरकारला 3 दिवसांचा 'अल्टिमेटम'
येत्या १० तारखेपर्यंत वाढीव वेतनाचा फरक न दिल्यास रितसर नोटीस देऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही श्रीरंग बरगे यांनी दिला आहे.
एकीकडे महामंडळावर सुमारे ४२०० कोटी रुपयांची वैधानिक देणी थकीत असताना, दुसरीकडे कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनाचा हप्ता न देणे ही सरळ अवहेलना असल्याचे बरगे यांनी स्पष्ट केले. येत्या तीन दिवसांत वाढीव वेतनफरकाची रक्कम न मिळाल्यास रीतसर नोटीस देऊन एसटी कर्मचारी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडतील, असा ठाम इशाराही त्यांनी दिला आहे.
Sunday, February 8, 2026
“रक्तदान हे श्रेष्ठ दान, स्व.अमोल गलधर यांच्या जयंतीनिमित्त लिंबागणेश येथे रक्तदान शिबिर संपन्न.
Saturday, February 7, 2026
भारत विद्यालय धाराशिवचे मुख्याध्यापक श्री.दत्तात्रेय(दत्तु)घुमरे सर सेवानिवृत्त झाल्याबद्दल कांतीकारी साथी व मगर परिवाराच्या वतीने सत्कार.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) आमचे स्नेही भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. दत्तात्रेय (दत्तु)घुमरे सर प्रदिर्घ सेवे नंतर सेवा निवृत्त झाल्या बद्दल कांतीकारी साथी व मगर परिवाराच्या सत्कार करण्यात आला.
Friday, February 6, 2026
शांतीवन स्मशानभूमीची दयनीय अवस्था नगरपालिकेच्या निष्क्रियतेमुळे अंत्यविधी ही हालअपेष्टांत.बोअर बंद पाण्याविना अंत्यसंस्कार. रस्ता अरुंद काटेरी झुडपांचा विळखा न. प. प्रशासन ढिम्म.
Thursday, February 5, 2026
परळी वैजनाथला अत्याधुनिक, उच्च दर्जा चे 'अमृत रेल्वे स्थानक' उभारणार दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यव्यवस्थापक आर गोपाल कृष्णन यांची माहिती.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाचा अमृत रेल्वे स्थानक या योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्या अंतर्गत 43 कोटी रुपयांच्या निधीतून रेल्वे स्थानक उभारणी होणार आहे. पहिल्या टप्प्यात 17 कोटी रुपयांच्या खर्चातून रेल्वे स्थानकातील बांधकामे सुरू आहेत. परळी वैजनाथ येथील अमृत रेल्वे स्थानक उच्च दर्जाचे व अत्याधुनिक पद्धतीने उभारले जाईल. यासाठी एक ते दीड वर्षाचा कालावधी लागणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे व्यवस्थापक आर गोपालकृष्णन यांनी आज दिली.
परळी वैजनाथ रेल्वे स्थानक येथे सुरू असलेल्या रेल्वे स्थानकाच्या उभारणीचे, रेल्वे मार्गाचे, परळी– परभणी–नांदेड या दुहेरी मार्गाच्या कामाचे तसेच अन्य तांत्रिक व बांधकाम विषयक कामांचा आढावा घेण्यासाठी आर गोपालकृष्णन हे परळी वैजनाथ रेल्वे स्थानकावर आले होते. रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता व रेल्वे स्थानकांची सुरक्षितता या दृष्टिकोनातून आपण पाहणी केल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण मध्य रेल्वे आणि मध्य रेल्वे यांच्या मुख्य प्रवाहात आता परळी वैजनाथ रेल्वे स्थानक येणार आहे.
अमृत रेल्वे स्थानक म्हणून परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आलेला असून 43 कोटी रुपये खर्चातून एक अत्याधुनिक व उच्च दर्जाचे रेल्वे स्थानक उभारण्यात येत आहे. येत्या एक ते दीड वर्षात हे काम पूर्ण होणार आहे. तसेच परळी–बीड–नगर रेल्वे मार्गाचे कामही जलद गतीने सुरू आहे. वंदे भारत रेल्वे परळीतून सुरू करण्याच्या मागणीबाबत वरिष्ठ स्तरावर आपण नागरिकांच्या भावना कळवू अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक आर गोपाल कृष्णन यांनी दिली. यावेळी परळी रेल्वे विकास समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदनही त्यांना देण्यात आले.
नागपूर ची कन्या प्रियंका खांडेकर राष्ट्रपती पुरस्कार ने सन्मानित.
हळदीच्या दिवशीच नवरदेवाच्या दुकानाला भीषण आग; ३० लाखांचे नुकसान घात पाताचा संशय.
केज (प्रतिनिधी): एका बाजूला लग्नाची लगबग आणि आनंदाचे वातावरण असताना, दुसरीकडे नियतीने मात्र अत्यंत क्रूर डाव मांडला. केज येथील शिक्षक कॉलनी परिसरात असलेल्या एका प्लम्बिंगच्या दुकानाला बुधवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत नवरदेव असलेल्या दुकानदाराचे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. धक्कादायक म्हणजे, ज्या दिवशी दुकानदाराची हळद आणि लग्न होते, त्याच दिवशी ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
३० लाखांचे साहित्य जळून खाक
या आगीत दुकानदार उद्धव अंगद लांब यांचे फर्निचर, पाईप, पाण्याच्या टाक्या, सॅनिटरी वेअर आणि प्लम्बिंगचे सर्व महागडे साहित्य जळून खाक झाले आहे. उद्धव यांचा विवाह गुरुवारी सायंकाळी धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथे होता. विवाहासाठी ते गावी गेले असताना ही घटना घडली. ही बातमी मिळताच ते हळदीच्या अंगानेच केजला धावून आले.
घातपाताचा संशय.
आगीच्या स्वरूपामुळे नवरदेव उद्धव लांब यांनी संशय व्यक्त केला आहे की, ही आग लागली नसून कुणीतरी लावली असावी. याप्रकरणी त्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून शुक्रवारी ते पोलीस ठाण्यात सविस्तर फिर्याद देणार आहेत. गुरुवारी सायंकाळी त्यांचा विवाह पार पडला, तरी या घटनेमुळे आनंदाच्या वातावरणावर विरजण पडले आहे.
नियमानुसार पावती मागितल्याचा राग माजलगावात कर्मचाऱ्याला लाथा बुक्क्यां नी मारहाण.
माजलगाव (प्रतिनिधी): माजलगाव नगरपालिकेत सत्तेची सूत्रे हाती येऊन महिनाही उलटला नाही, तोच नगराध्यक्षांच्या पतीची 'दादागिरी' समोर आली आहे. पीटीआर विभागातील कामावरून झालेल्या वादातून नगराध्यक्षांचे पती बिलाल सहाल चाऊस यांनी पालिका कर्मचारी अक्षय धारक यांना नगरपालिकेतच बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी घडली.
दोन महिन्यापूर्वी येथील नगरपालिकेच्या निवडणुका होऊन शिफा बिलाल चाऊस या निवडून आल्या होत्या. त्यांनी पदभार घेऊन एक महिनाच उलटला नाही तोच नगराध्यक्षांचे पती बिलाल सहाल चाऊस यांनी नगरपालिकेतील आस्थापना विभागातील कर्मचारी अक्षय धारक यांना पीटीआर द्यायला पैसे का मागितलेस म्हणून नगरपालिकेत येत अक्षय धारक यांनाखाली बोलावून त्यांच्या श्रीमुखात भडाकावली त्यानंतर त्यांच्या साथीदाराने त्यास लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली.
पदाधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर वचक नाही.
नगरपालिकेतील कर्मचारी बिन बोभाट पणे पैसे मागत आहेत यावर नगराध्यक्ष , उपाध्यक्ष व निवडून आलेल्या नगरसेवकांचा वचक राहिला नाही का ? नगराध्यक्ष पतीने कर्मचाऱ्यास मारहाण केली हा प्रकार योग्य नाही व पदाधिकाऱ्यांनी अशा कर्मचाऱ्यांना नोटीस बजावणी आवश्यक होते.-ज्ञानेश्वर मेंडके , भाजपा नेते
नियमानुसार काम करत होतो.
माझ्याकडे आस्थापना विभाग असून पीटीआर विभागातील माणूस सुट्टीवर असल्यामुळे मला त्या ठिकाणी बसवण्यात आले होते. मी संबंधितांना पीटीआर दिली व नियमानुसार शंभर रुपयाची पावती फाडण्यास सांगितले. म्हणून बिलाल चाऊस व त्याच्या साथीदारांनी मला नगरपालिकेत येऊन मला पाच-सहा चापटा मारल्या.- अक्षय धारक , कर्मचारी न.प. माजलगाव
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी कथित ऑडिओ क्लिप हायरल.
बीड (प्रतिनिधी) मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी देणारी एक कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये एक व्यक्ती दुसऱ्याला उघडपणे आव्हान देत म्हणते की, ‘मी स्वतः जरांगे पाटील यांना गोळ्या घालून ठार मारतो. कधी घालायच्या ते तू सांग, माझी बातमी कुठे द्यायची तेही तू ठरव; पण मी त्यांना जीवेच मारतो. एवढेच नाही तर तुलाही गोळ्या घालतो. आता हे खरं होतंय की नाही, तेच तू बघ.’ ही कथित ऑडिओ क्लिप नेमकी कधीची आहे आणि त्यातील बोलणाऱ्या व्यक्ती कोण आहेत, याची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
