परळी वैजनाथ (प्रतिनिधी) अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर, मोंढा मार्केट व हैदराबाद बँक रोड परिसरात होळीचा बाजार सजला आहे. विविध रंग, पिचकार्या, वॉटर बलून व पूजेच्या साहित्याने बाजारपेठ फुलून गेली असून ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे रंग विक्रेते श्री राहुल पाचनकर यांनी सांगितले.
यंदा होळीच्या वस्तू खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने बाजारात दाखल होत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. रविवारी व सोमवारी ग्राहकांच्या गर्दीत आणखी वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
भारतीय परंपरेत विशेष महत्त्व असलेला होळीचा सण परळी तालुक्यात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शहर व परिसरात होळी प्रज्वलित करून तिच्याभोवती प्रदक्षिणा घालत श्रद्धाभावाने प्रार्थना केली जाते. या पार्श्वभूमीवर होळी पूजनासाठी लागणाऱ्या साहित्यालाही मागणी वाढली आहे.
नैसर्गिक रंगांना अधिक पसंती होळीनंतर येणाऱ्या धूलिवंदन (दि. ३ मार्च) निमित्त रंगांची उधळण करण्यासाठी बाजारात रंगांची खरेदी जोमात सुरू आहे. ग्राहक विशेषतः कोरड्या व नैसर्गिक रंगांना प्राधान्य देताना दिसत आहेत. केमिकल रंगांच्या तुलनेत नैसर्गिक रंगांच्या किमती थोड्या जास्त असल्या तरी आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित असल्याने त्यांची मागणी वाढली आहे. रंग उडवण्यासाठी विविध प्रकारच्या पिचकार्या बाजारात उपलब्ध असून त्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच वॉटर बलूनची विक्रीही सुरू असून त्यांचे दर सामान्य ग्राहकांच्या आवाक्यात आहेत.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा वस्तूंच्या किमतीत विशेष वाढ झालेली नसल्याची माहिती विक्रेते राहुल पाचणकर यांनी दिली. धूलिवंदन व काही भागांत रंगपंचमीपर्यंत रंग खेळले जात असल्याने आठवडाभर बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.होळी सणाच्या निमित्ताने परळी शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून बाजारपेठ रंगांनी आणि आनंदाने नटली आहे.
No comments:
Post a Comment