Friday, June 30, 2023

अचानक बिबट्याने डरकाळी फोडत विहिरीतून बाहेर झेप घेतली; बचाव पथक, ग्रामस्थांत गोंधळ.आष्टी तालुक्यातील पांगरा गावातील घटना.


आष्टी (प्रतिनिधी) : श्वानाच्या पाठीमागे धावताना बिबट्या विहीरीत पडला. वनविभाग, पोलिस प्रशासन, प्राणीमित्र यांचे बचावाचे प्रयत्न सुरू असताना अचानक बिबट्याने विहिरीतून बाहेर झेप घेत शेतात धाव घेतली. यामुळे बचाव कर्मचारी, प्राणीमित्र आणि ग्रामस्थांत गोंधळ उडाला. 

आष्टी तालुक्यातील पांगरा येथील रामनाथ माणिक मिसाळ यांच्या शेतातील विहिरीत गुरूवारी रात्री श्वानाच्या मागे धावताना बिबट्या पडला. आज सकाळी शेतात गेल्यावर मिसाळ यांना विहीरीत बिबट्या आढळून आला. माहिती मिळताच वन विभागाचे पथक, अंमळनेर ठाण्याचे पोलीस हवालदार पोपट मंजुळे, कडा येथील प्राणीमित्र नितीन आळकुटे आणि ग्रामस्थ बचाव कार्यासाठी शेतात दाखल झाले. आत जाळी टाकून बिबट्यास बाहेर काढण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार मोठी जाळी आणि एक पिंजरा विहिरीवर लावण्यात आला. मात्र, अचानक बिबट्याने आतील खडक आणि पाईपच्या सहाय्याने डरकाळी फोडत विहिरीतून बाहेर झेप घेतली. यामुळे बचाव पथक, प्राणीमित्र आणि ग्रामस्थांमध्ये एकच गोंधळ उडाला. बिबट्याने लागलीच शेतात गायब झाला.

बचावकार्यासाठी घटनास्थळी विभागीय वनअधिकारी कैलास गिते वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम शिरसाठ, वनपाल बाबासाहेब मोहळकर, वनरक्षक अशोक काळे, बाबासाहेब शिंदे, सारिका पाखरे, पोलिस हवालदार पोपट मंजुळे, प्राणीमित्र नितीन आळकुटे आदी शेतात उपस्थित होते.

गुरूवारी पाडला तीन शेळ्यांचा फडशा.

पांगरा परिसरात बिबट्याने गुरूवारी रात्री तीन शेळ्याचा फडशा पाडला. नंतर श्वानाच्या मागे धावत असताना अचानक विहीरीत पडला. बिबट्या नियमित शिकार करत असल्याने या परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत.

श्री गुरु पौर्णिमा विशेष:-गुरुपौर्णिमेमागील आध्यात्मिक आणि वैज्ञानिक तथ्य.


*गुरुदेव श्री आशुतोष महाराजजी (संस्थापक एवं संचालक, दिव्य ज्योति जाग्रति संस्थान)

शतको वर्षापूर्वी महर्षी वेद व्यास जी आषाढ शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी प्रकट झाले होते. त्यांनी वैदिक स्तोत्रे संकलित केली आणि त्यांचे चार वेदांच्या रूपात वर्गीकरण केले. १८ पुराणे, १८ उपपुराणे, उपनिषदे, ब्रह्मसूत्र, महाभारत इत्यादी अतुलनीय ग्रंथांच्या लेखनाचे श्रेयही त्यांना जाते.
व्यास जी यासाठी प्रसिद्ध आहेत - व्यासोच्छिष्ठम् जगत् सर्वम् म्हणजे असा कोणताही विषय नाही, जो महर्षी वेद व्यासजींचा माहिती नाही. अशा महान गुरुदेवांच्या ज्ञानाच्या सूर्यकिरणांनी न्हाऊन निघालेल्या शिष्यांना त्यांच्या गुरुदेवांची पूजा करता आली नाही. आता कोणत्या शुभ दिवशी पूजा करावी हा प्रश्न होता. असाच एक दिवस ज्यावर सर्व शिष्यांनी सहमती दर्शवली तो म्हणजे गुरुच्या आवताराचा शुभ दिवस होता. म्हणूनच त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या गुरूंची पूजा करण्यासाठी हा शुभ दिवस निवडला. यामुळेच गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक शिष्य आपल्या गुरुदेवांची या शुभदिनी पूजा करतो.
साधकाचा आत्मप्रगतीचा दिवस!
आषाढ पौर्णिमेचे महत्त्व आता शास्त्रज्ञांनाही कळले आहे हे जाणून घ्यायचे आहे का? 'विजडम ऑफ ईस्ट' या पुस्तकाचे लेखक आर्थर चार्ल्स स्टोक लिहितात- ज्याप्रमाणे आता संपूर्ण जग भारताने शोधलेल्या शून्य, श्लोक, व्याकरण इत्यादींचा महिमा गात आहे, त्याचप्रमाणे भारताने उलगडलेला सद्गुरूंचा महिमाही गाईला जाईल.  आपल्या महान गुरूंच्या पूजेसाठी त्यांनी आषाढ पौर्णिमेचा दिवस का निवडला हे देखील संपूर्ण जगाला कळेल.
या दिवसात विशेष काय आहे? स्टोक यांनी आषाढ पौर्णिमेसंदर्भात अनेक अभ्यास आणि संशोधन केले. या सर्व प्रयोगांच्या आधारे ते म्हणाले- 'वर्षभर अनेक पौर्णिमा येतात - शरद पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमा, वैशाख पौर्णिमा... इ. पण भक्ती आणि ज्ञानाच्या मार्गावर चालणाऱ्या साधकांसाठी आषाढ पौर्णिमेचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी आकाशात अतिनील किरणे पसरतात. यामुळे व्यक्तीचे शरीर आणि मन एका विशेष स्थितीत येते. त्याची भूक, झोप आणि मनाचा विचलितपणा कमी होतो.म्हणून ही स्थिती साधकासाठी खूप फायदेशीर आहे. तो याचा फायदा घेऊन जास्तीत जास्त ध्यान करू शकतो. गुरुपौर्णिमा हा दिवस वैज्ञानिक दृष्टीकोनातून आत्मोन्नती आणि कल्याणासाठीही खूप चांगला आहे.
 दिव्य ज्योति जाग्रति संस्थेतर्फे सर्व वाचकांना श्रीगुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!.

श्री.क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थान येथे आषाढी एकादशी निमित्त भाविकांची गर्दी.


केज (प्रतिनिधी) तालुक्यातील श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थान येथे आषाढी एकादशी निमित्त तुकोबा, विठोबा च्या दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थान येथे आषाढी एकादशीनिमित्त पंचक्रोशीतील अनेक गावच्या दिंड्या रामकृष्णहरि, विठोबा-तुकोबाच्या नावाचा गजर करत पावनधाम येथे दाखल झाल्या. दिंडीत पुरूष, स्त्रियां, लहान-थोर मंडळी मोठ्या  उत्साहाने दाखल झाले होते. सर्व दिंड्याच्या आगमनानंतर ह.भ.प.जनार्धन महाराज चलवाड यांची किर्तन सेवा तुकोबा-विठोबाच्या गाभार्यात संपन्न झाली.
किर्तन ऐकताना उपस्थितांना जनू आपण पंढरीतच आहोत असा भास  होत होता.किर्तन सेवेनंतर फराळाची सोय करण्यात आली होती. 
संत तुकोबाराय पावनधाम संस्थानचे संस्थापक अध्यक्ष महंत ह.भ.प.महादेव महाराज बोराडे शास्त्री हे शेकडो वारकर्यांसह पंढरीच्या वारीत आहेत. ज्या भाविकांकाना पंढरीच्या वारीला जाता आले नाही त्यांच्यासाठी संत तुकोबाराय पावनधाम संस्थान हे प्रति  पंढरीच आहे. महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या मार्गदर्शनानुसार ह.भ.प.जनार्धन महाराज चलवाड आणि स्वयंसेवकांनी येणार्या भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली.

Thursday, June 29, 2023

राज्यात पुढील तीन दिवस अतिमुसळधार! सहा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी.

भारतीय हवामान खात्याने गुरुवारी राज्यातील सहा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हा अलर्ट मुंबईला लागून असलेल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यासह रायगड, रत्नागिरी, नाशिक आणि पुण्याला देण्यात आला आहे. यासोबतच मुंबईसह सात जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सक्रिय मान्सूनच्या स्थितीमुळे पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणातील काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्राच्या लगतच्या घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोकणातील बहुतांश भाग आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. काल उत्तर कोकणच्या काही भागांत निर्जन ठिकाणीही अतिवृष्टी झाली.  

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, रायगड, पालघर आणि पुणे येथे ३० जून रोजी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई, ठाणे, रत्नागिरी, नाशिक आणि सातारा येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना वाहतूक कोंडी, पाणी तुंबणे आणि लोकल ट्रेनला उशीराचा सामना करावा लागला आहे. कारण पावसाने शहर आणि लगतच्या भागात मोठ्या प्रमाणात झोडपले आहे. झाड पडण्याच्या घटनांमुळे दोन दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर इतर जखमी झाले आहेत.

आषाढी एकादशी निमित्त परळीत भाविकां ची गर्दी वैद्यनाथ, विठ्ठल अन् संत जगमित्र मंदिर गर्दीने फुलले.

संत जगमित्र नागा मंदिरात पहाटे पाच वाजता मंदिर पुजारी उदय औटी, कल्याणी औटी यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा झाली. विठ्ठल रुक्माईस अलंकृत केले व मंदिराची सजावट करण्यात आली. तसेच शहरातील आंबेवेस, जाजुवाडी, शिवाजीनगर, गणेशपार येथील तसेच ग्रामीण भागातील अनेक ठिकाणच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी ज्या भाविकांना दर्शनासाठी पंढरपूरला जाणे शक्य होत नाही असे भाविक येथील श्री संत जगमित्र नागा महाराज समाधी स्थळ आणि विठ्ठल रुक्माईच्या दर्शनास गर्दी करतात, असे पुजारी उदय औटी गुरुजी यांनी सांगीतले. 

देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरातही आज भाविकांची गर्दी होती. विशेष म्हणजे, विदर्भातून आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या दिंड्या श्री प्रभू वैद्यनाथांच्या व श्री संत जगमीत्र नागा मंदिराच्या दर्शनासाठी येतात व पुढे प्रस्थान करतात. परळी तालुक्यातील नंदागौळ येथील श्री क्षेत्र विठ्ठल टेकडी देवस्थान आहे. येथे ही दर्शनासाठी परिसरातील भाविकांची गर्दी झाली आहे. नंदागौळ येथील टेकडीवर विठोबाने वाघ्ररूपात संत जगमित्राला दर्शन दिल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे परळीस वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. 

बसस्थानकातील कॅन्टीन जबरदस्तीने बंद केली; खंडपीठाची पोलिस निरीक्षकाला २५ हजारांची कॉस्ट.


बीड (प्रतिनिधी)  : महाराष्ट्र शॉप ॲक्ट मधीलतरतुदीनुसार बीडच्या मध्यवर्ती बसस्थानकातील कॅन्टीन रात्री ११ ते सकाळी ४ पर्यंत चालू ठेवण्याची सूट खंडपीठाने २ मे २०१४ रोजी दिली आहे. असे असताना मागील महिनाभरापासून सदर कॅन्टीन जबरदस्तीने ११ वाजेपूर्वी बंद करायला लावून खंडपीठाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल बीडचे सहायक पोलिस निरीक्षक ए.जी. गुरुले यांनी २५ हजार रुपये ‘कॉस्ट’ म्हणून जमा करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालया च्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय.जी. खोब्रागडे यांनी दिला.

ही रक्कम जमा झाल्यानंतर याचिकाकर्त्यास ती काढून घेण्याची परवानगी खंडपीठाने दिली आहे, तसेच याचिकाकर्त्यास रात्री ११ ते सकाळी ४ पर्यंत बसस्थानकातील कॅन्टीन चालू ठेवण्याची मुभा दिली आहे. बीड येथील मध्यवर्ती बस स्थानकातील कॅन्टीन राम बापूराव हराळ चालवितात. त्यांच्याकडे ‘महाराष्ट्र शॉपस् ॲन्ड एस्टॅब्लीशमेंट ॲक्ट’चा वैध परवाना आहे. तसेच एस.टी. महामंडळाने सुद्धा मध्यवर्ती बस स्थानकातील कॅन्टीन चालविण्याचा परवाना दिला आहे.

वरील कायद्याच्या कलम ४ नुसार शेड्युल-२ मधील रेल्वे स्थानक, बंदरे, विमानतळ आणि एस.टी. स्थानकावरील स्टॉल्स, रिफ्रेशमेंट रूम आणि कॅन्टीन यांना वेळेत सूट देण्यात आली आहे. या तरतुदींचा विचार करून खंडपीठाने २ मे २०१४ रोजी याचिकाकर्त्याला रात्री ११ ते सकाळी ४ पर्यंत कॅन्टीन चालविण्याची मुभा दिली होती. असे असताना सहायक पोलिस निरीक्षक गुरुले यांनी कॅन्टीन बंद करण्यासाठी सक्ती केली होती. याचिकाकर्त्याच्या वतीने ॲड. जनार्दन. एम. मुरकुटे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. अल्केश जाधव, ॲड. जमीरखान पठाण, ॲड. पूजा देशमुख व ॲड. गोरख केंद्रे यांनी सहकार्य केले.

घरासमोरील पोलमध्ये वीजप्रवाह उतरला स्पर्श होताच शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू.



 

आष्टी (प्रतिनिधी) - घरासमोर असलेल्या खांबात विद्युतप्रवाह उतरल्याने जनावरांना चारापाणी करणाऱ्या शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने चिटकून जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी अडीज वाजेच्या सुमारास आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथे घडली. युवराज उत्तम पडोळे ( ४२) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील युवराज पडोळे हे आज दुपारी घरासमोर बांधलेल्या जनावरांना चारापाणी करत होते. समोरच असलेल्या पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरला होता. अनावधानाने हात लागताच विजेचा धक्का बसून पडोळे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

गावातील व वस्तीवरील विद्युत खांब मोडलेले आहेत, तारा जिर्ण झाल्या असून पावसाळ्याच्या तोंडावर त्याची दुरूस्ती करून नवीन रोहित्र बसवावेत अशी केली होती, मात्र महावितरणने दुर्लक्ष केल्याची माहिती सरपंच अजित घुले यांनी दिली.

Wednesday, June 28, 2023

शहीद जवान उमेश मिसाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.


*फुलांनी सजविलेल्या ट्रकमध्ये तिरंग्यात आच्छादलेल्या उमेश मिसाळ यांच्या पार्थिवाची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली.

केज (प्रतिनिधी) : तालुक्यातील चे सुपुत्र शहीद जवान उमेश नरसू मिसाळ यांच्यावर आज सकाळी कोल्हेवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करून अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी शहीद जवान, अमर रहेच्या जयाघोष करण्यात आला. भारतीय सैन्य दलात कार्यरत जवान उमेश हे सोमवारी सकाळी राजस्थानमधील सुरतगड येथे सेवा बजावताना शहीद झाले होते. भूमिगत विज वाहिनीचा धक्का  लागून त्यांचा मृत्यू झाला होता. 

भारतीय सैन्य दलात 25 मराठा लाईट इन्फन्ट्री बटालियनमध्ये सुरतगढ येथे कोल्हेवाडी गावचे सुपुत्र उमेश नरसु मिसाळ (23 वर्षे ) हे देशसेवेत कार्यरत होते. सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान ते परेडसाठी जाण्याच्या तयारीत असताना भूमिगत विजवाहिनीचा शॉक लागून त्यांचे अपघाती निधन झाले होते. दरम्यान, सुभेदार सुधाकर कुटाळ व त्यांचे सहकारी शहीद उमेश मिसाळचे पार्थिव घेऊन मंगळवारी रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान दिल्ली येथून विमानाने पुणे येथे पोहोचले. त्यानंतर आज सकाळी साडे आठ वाजेच्या दरम्यान पार्थिव कोल्हेवाडी येथे पोहोचले.फुलांनी सजविलेल्या ट्रकमध्ये तिरंग्यात आच्छादलेल्या उमेश मिसाळ यांच्या पार्थिवाची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी 'उमेश मिसाळ अमर रहे, भारत माता की जय' च्या घोषणा देण्यात आल्या. अंत्ययात्रेच्या मार्गावर रांगोळी काढून फुलांचा सडा टाकलेला होता. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी उभे राहून फुलांची उधळण करत अंतिम दर्शन घेतले.

यावेळी खासदार प्रीतम मुंडे, अक्षय मुंदडा, तहसीलदार एम. जी. खंडागळे, गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, जिल्हा सैनिक बोर्डाचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सुशीला मोराळे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर शिंदे,  25 मराठा इन्फन्ट्रीचे सुभेदार सुधाकर कुटाळ, भाजपचे केज तालुकाध्यक्ष भगवानराव केदार, माजी संघर्ष सैनिक संघटनेचे सचिव प्रा. हनुमंत भोसले, मेजर अजिमोद्दीन इनामदार पत्रकार, महसूल कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी आदरांजली वाहिली.

हवेत फैरी झाडून मानवंदना...

 बीड पोलीस दलाच्यावतीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर वडील नरसू मिसाळ यांनी चितेला भंडाग्नी दिला. यावेळी उपस्थितांनी अश्रूंना वाट मोकळी केली .

सुटी झाली होती मंजूर.

उमेश मिसाळ आणि प्रतीक्षा केकाण यांचा विवाह 29 ऑगस्ट 2022 रोजी झाला होता. उमेश यांनी पत्नी प्रतिक्षाला भ्रमणध्वनीवरून गावाकडे येण्यासाठी रजा मंजूर झाल्याची माहिती दुर्घटनेपूर्वीच कळविली होती. त्यामुळे पत्नीसह सर्व कुटुंबीय आनंदात होते. दरम्यान, उमेश यांचे निधन झाल्याची वार्ता धडकल्याने आनंद दुःखात बदलून गेला. अवघ्या दहा महिन्यातच पतीच्या निधनामुळे पत्नी प्रतीक्षावर आकाश कोसळले आहे. आई व पत्नीने फोडलेला हंबरडा उपस्थित्यांची मन हेलावून गेले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील व दोन भाऊ असा परिवार आहे.

मा. वाल्मिक निकाळजे यांना राज्यस्तरीय राजर्षी छ.शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार प्रदान!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष, राज्याचे जेष्ठ मानव अधिकार विशेषज्ञ व कार्यकर्ते, दलित, आदिवासी, भटके विमुक्तांचे लाडके,अभ्यासू व झुंजार लढाऊ नेते, राजर्षी शाहू ग्रामीण विकास प्रकल्प या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍड.वाल्मिक (तात्या) निकाळजे यांच्या 42 वर्षांच्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील सक्रिय योगदाना बद्दल, लढाईबद्दल व समाज परिवर्तना बद्दल राजर्षी छ.शाहू महाराज जयंती निमित्त आणि सामाजिक न्याय दिना निमित्त राज्यातील 100 सामाजिक संस्था संघटनांची शिखर संघटना विवेक विचारमंच महाराष्ट्र, शिवाजी विद्यापीठ आणि राज्यातील सहयोगी संस्था संघटना यांच्या वतीने दिला जाणारा राज्यातील मानाचा व प्रतिषठेचा राज्यस्तरीय राजर्षी छत्रपती शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे आयोजित सामाजिक न्याय परिषदेत नुकताच कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला.
    केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार, राज्याचे कामगार मंत्री डॉ.सुरेश भाऊ खाडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास संस्था (बार्टी) चे महासंचालक सुनिल वारे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.डी.टी.शिर्के, प्र. कुलगुरू प्रा. डॉ.पी.एस.पाटील, विवेक विचार मंच चे प्रदेशाध्यक्ष संविधान तज्ञ प्रदीप दादा रावत या मान्यवरांच्या शुभहस्ते व माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, समरसता गतिविधीचे राष्ट्रीय कार्यकारी मंडळ सदस्य प्रा.डॉ.रमेशजी पांडव, समरसता गतिविधीचे क्षेत्रीय संयोजक निलेशजी गद्रे, बहुजन रयत परिषद महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा ऍड. कोमल साळुंखे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा चे प्रदेश उपाध्यक्ष सर्जेराव जाधव (जालना) व नितीन मोरे (मुंबई), धुळे जिल्हाध्यक्ष प्रदीप पानपाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष विकास औसरमल, विवेक विचार मंच चे राज्य समन्वयक सागर शिंदे, मराठवाडा समन्वयक ऋषिकेश सकनूर, अरुण कराड, मुंबई विभाग समन्वयक अशोक तिडके, फुले आंबेडकरी चळवळीचे नेते विजय गव्हाळे, प्रसिद्ध लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी तोफखाने, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सिद्धार्थ शिंदे, विद्यापीठ सिनेट सदस्य रतन शिंदे अनेक प्राध्यापकांसह राज्याच्या सर्व जिल्ह्यातून आलेल्या चळवळीच्या अग्रेसर व सक्रिय शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विद्यापीठाच्या सभागृहात प्रचंड टाळयांच्या कडकडाटात कोल्हापूर येथे हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. यावेळी वाल्मिक तात्या निकाळजे यांचा मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन व हृद्य सत्कार करून त्यांना कुटुंबासह पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपाचे दिग्विजयी नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी व्हिडीओ संदेश पाठवून परिषदेस व पुरस्कार्थीस हार्दिक शुभेच्छा दिल्या! 
      यादरम्यान वाल्मिक तात्या निकाळजे यांच्या 42 वर्षांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याचा व चळवळीतील अथक कारकिर्दीचा संक्षिप्त आढावा घेणारी चित्रफित दाखवण्यात आली. पुरस्कार प्रदान केल्या नंतर सर्व प्रमुख मान्यवरांनी वाल्मिक तात्या निकाळजे यांच्या कार्याचा गौरव केला.
    यावेळी लोकशाही जागर मंच पूणे, संत चोखामेळा अध्यासन केंद्र पूणे, एक वारी समतेची महाराष्ट्र, सुराज्य सर्वांगीण विकास संघ, जन संघर्ष समिती नागपूर, लोक विकास संस्था, जनसेवा फाउंडेशन, भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र, भीमशक्ती मुंबई, जयभीम आर्मी महाराष्ट्र, दिशा ज्योत फौंडेशन, बिरसा मुंडा विचार मंच, जिव्हाळा संघटना, पीपल्स डेमोक्राटीक मूव्हमेन्ट, समता अधिकार आंदोलन इत्यादी सहयोगी संस्था व संघटनांचे शेकडो प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. वाल्मिक तात्या निकाळजे यांच्या कार्याचे मान्यवरांसह सर्वांनी खूप कौतुक केले.
हा राज्यस्तरीय प्रतिषठेचा व मानाचा पुरस्कार मिळाल्या बद्दल वाल्मिक तात्या निकाळजे यांच्यावर राज्यभरातून शुभेच्छांचा प्रचंड वर्षाव होत आहे.

धक्कादायक घटना! शेताच्या बांधावर गेला म्हणून तरुण शेतकऱ्याची हत्या.


पाटोदा (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बीडमध्ये खुनाचे सत्र सुरूचं आहे. गेल्या 4 दिवसांपूर्वी परळी शहरात भर रस्त्यावर एकाचा मारहाण करत खून करण्यात आला होता.

ही घटना ताजी असतानाच शेताच्या बांधावरून का गेला म्हणत बीडच्या कुसळंब गावात 36 वर्षीय शेतकऱ्याचा डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. गोरख अजिनाथ पवार रा. कुसळंब ता. पाटोदा जि. बीड असं खून करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. 

पाटोदा तालुक्यातील कुसळंब येथील शेतकरी  आरोपी संतोष पवार वय 45 व गोरख आजिनाथ पवार वय 36 यांच्यामध्ये शेतात  जाणाऱ्या रस्त्यावरून वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या दरम्यान संतोष पवार यांनी गोरख पवार यांच्या डोक्यात दगड मारल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी जामखेड येथे नेत असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. 

.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी अभिजित धाराशिवकर, एपीआय प्रताप नवघरे, पीएसआय राहुल पतंगे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी  आरोपी संतोष पवारला ताब्यात घेतले असून, मृत गोरख यांच्या पत्नी शोभा पवार यांच्या फिर्यादीवरून पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Tuesday, June 27, 2023

निकृष्ठ दर्जाचे काम करणार्‍या ठेकेदारांवर कारवाई करा अभिजित कुडे यांची मागणी आंदोलनाचा इशारा.


वरोरा (प्रतिनिधी)- उखर्डा गावातील रस्त्याची पावसाळ्यापूर्वीच करण्यात आलेल्या रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे.  अवघ्या दोन ते तीन महिन्यातच हे रस्ते पूर्ण उकळले आहेत.  त्यामुळे या रस्त्यांची व्हिजेटीआय आथवा आयआयटी यांच्यामार्फत तपासणी करुन संबधीत ठेकेदार दोषी आढळल्यास त्याला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी अभिजित कुडे यांनी केली आहे.
उखर्डा रोड  मध्ये  भ्रष्टाचार प्रकार उघडकीस आले आहेत. या संदर्भात अभिजित कुडे यांनी  गट विकास अधिकारी यांना निवेदन दिले असून कारवाईची मागणी केली आहे.
 अभिजीत यांनी दिलेल्या निवेदनानुसार, उखर्डा गावातील  रस्त्यावर जवळपास 100 मीटर लांब रस्त्याचेकाम5 महिने आधी झाले आहे. सदरचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे आहे. पावसाळ्याआधीच केलेला हा रस्ता पूर्ण उखडला आहेत गिट्टी बाहेर निघाली आहे. ठेकेदाराने हा रस्ता किती निकृष्ठ पद्धतीने केला आहे, याचा पुरावा पहिल्याच पावसात मिळाला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या बांधकामाची गुणवत्ता व्हिजेटीआय आथवा आयआयटी यांच्यामार्फत तपासून दोषी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केली आहे. 
त्यामुळे, ठेकेदाराने केल्या जाणार्‍या निकृष्ठ कामांबाबत चौकशी करुन त्याची माहिती लेखी स्वरुपात जाहीर करावी; अन्यथा,  प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्यात येईल, असा इशाराही अभिजित कुडे यांनी दिला आहे.

पावनधामच्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी रोज होतेय निवाऱ्याची सोय.महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

केज(प्रतिनिधी) तालुक्यातील श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थानची   दिंडी देहू ते पंढरपूर या आषाढी वारीसाठी मागच्या अनेक वर्षांपासून निघते. संत तुकोबाराय पावनधाम संस्थानचे संस्थापक अध्यक्ष महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री  यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील दिंडी शेकडो वारकऱ्यांना बरोबर घेऊन तुकोबा-ज्ञानोबा, विठोबाच्या नावाचा गजर करत  उत्साहाने देहूकडे प्रस्थान करते.प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी पावनधाम दिंडी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये दाखल झाली. मागच्या तीन ते चार वर्षांपासून वेळेवर पडणारा पाऊस  वेळेवर न पडल्याने उन्हाची तीव्रता अधिक राहिली. उन्हाची तीव्रता लक्षात घेता आपण बरोबर आणलेल्या वारकर्यांना उन्हाचा त्रास होवूनये त्याचबरोबर विश्रांती आणि भोजन आनंदाने करता यावे या हेतूने अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे विभागीय अध्यक्ष तथा संत तुकोबाराय पावनधाम संस्थानचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.महादेव महाराज बोराडे यांनी 

 देहू ते पंढरपूर पर्यंत  शामिना मंडपाची व्यवस्था केली. संपूर्ण सोहळ्यात संत तुकाराम महाराज पावनधामची  एकमेव  दिंडी अशी आहे की ज्यांनी वारकऱ्यांना सावलीची व्यवस्था केली आहे. महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांनी निवार्याच्या व्यवस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बीड जिल्हा कृषी अधिकाऱ्यांचा दणका! बोगस खत विकणाऱ्या दुकानदाराचा परवाना रद्द.



माजलगाव (प्रतिनिधी) : बीडच्या माजलगावमध्ये बोगस खत विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कृषी विभागाच्या गुण नियंत्रक पथकाच्या तपासणीत, माजलगावमधील नवा भारत फर्टिलायझर्स लिमिटेड या खत विक्री केंद्र असणाऱ्या दुकानात, हा प्रकार समोर आला आहे. यामुळे या दुकानदाराला जिल्हा कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी दणका देत कृषी दुकानाचा परवाना रद्द केला आहे. 

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, सद्या सुरू असलेल्या खरीप हंगामात बोगस खते व बियाणांची विक्री होऊ शकते. त्या अनुषंगाने जिल्हा गुण नियंत्रक पथकाच्यावतीने कृषी दुकानांच्या नियमित तपासण्या केल्या जात आहेत. यादरम्यान माजलगाव शहरातील नवा भारत फर्टिलायझर्स लिमिटेड या खत विक्री केंद्राची तपासणी जिल्हा गुण नियंत्रक पथकाकडून करण्यात आली.

या तपासणी दरम्यान केंद्रामध्ये नोंदणी प्रमाणपत्र ठळक व साफ दिसेल, अशा ठिकाणी प्रदर्शित केलेले नव्हते. रासायनिक खतसाठा रजिस्टर तसेच शेतकऱ्यास दिलेले खरेदी बिल सादर केले नव्हते. विक्रीकरिता असलेल्या खतांची बिले ठेवलेली नव्हती.

दुकानातील साठा रजिस्टर एन फॉर्ममध्ये ठेवलेले नव्हते. त्यामुळे प्रत्यक्ष खतसाठ्याची पडताळणी करता आली नाही. शेतकऱ्यांना पक्की बिले दिल्याचे पथकाला आढळून आले नाही. विशेष म्हणजे विक्री केंद्रामध्ये खत नियंत्रण आदेश 1985 च्या शेड्युलमध्ये समाविष्ट नसलेल्या खताचा ग्रेड विक्रीस ठेवून खत नियंत्रण आदेशाचे उल्लंघन केल्याचं समोर आलं. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबसाहेब जेजुरकर यांनी या दुकानाचा परवाना रद्द केला आहे.

Monday, June 26, 2023

बीडमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी मदती साठी पोतराज आंदोलन.पंधरा दिवसांच्या आत मदत देण्याची मागणी.



बीड (प्रतिनिधी) : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या वाढत आहे. शेतकरी आर्थिक संकटामुळे आत्महत्या करतात परंतु त्यांच्या पश्चात असलेल्या व्यक्तींना शासनाकडून आर्थिक मदत दिली जात नसल्याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साेमवारी पोतराजाची वेषभुषा करुन स्वत:च्या अंगावर चाबकाचे फटके मारुन आंदोलन केले.

बीड जिल्ह्यात मागील ६ महिन्यात ११४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची शासन दरबारी नोंद असून प्रशासनाकडून आतापर्यंत केवळ एका मयत शेतकऱ्याच्या कुटुंबियाला आर्थिक मदत देण्यात आली आहे. मदत देण्यासाठी शासन निधी नसल्याचे कारण सांगितले जात आहे. राज्य सरकारला जाहिरात बाजीवर आणि मंत्र्यांच्या दौऱ्यावर अमाप उधळपट्टी करण्यासाठी शासनाकडे निधी आहे मात्र आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना देण्यासाठी निधी नाही. या वरुन शेतकऱ्यांप्रती सरकाची असंवेदनशीलता स्पष्ट दिसून येत आहे.

याकडे लक्ष सरकारचे वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साेमवारी पोतराजाचा वेशभुषा करुन स्वतःच्या अंगावर चाबकाचे फटके मारुन घेत इडा पिडा टळु दे, बळीचे राज्य येऊ दे असे साकडे घालत लक्ष्यवेधी आंदोलन केले. आंदोलनात रामनाथ खोड, शेख युनुस, बलभीम उबाळे, मिलिंद सरपते, शेख मुबीन, राहुल कवठेकर, विजय झोडगे, संजय सुकाळे, धनंजय सानप, सुरज थोरात आदी सहभागी होते.

परळीत तृतीयपंथीयांमध्ये हद्दीच्या वादा वरून राडा, दोन गट भर रस्त्यात भिडले आठवडी बाजारावरून झाला वाद,एकजण गंभीर जखमी.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : तुम्ही येथे का आलात? असे म्हणून टोकवाडीच्या तीन तृतीयपंथी व अन्य चौघांनी अंबाजोगाईच्या पाच तृतीयपंथीना मारहाण केली. यात एका तृतीयपंथीय जखमी झालाअसून शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. ही घटना सोमवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास राणी लक्ष्मीबाई टावर रोडवर घडली. 

शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर ते मोंढा मार्केट रस्त्यावर दर सोमवारी आठवडी बाजर भरतो. आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास बाजारात लोकांना पैस्यांची मदत मागण्यावरून टोकवाडी व अंबाजोगाई येथील तृतीयपंथीयांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. यात पूर्वा दिव्या बक्स ( 23 ,रा अंबाजोगाई) या जखमी झाल्या. त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या प्रकरणी दिव्या बक्स यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात टोकवाडीच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भार्गव सपकाळ हे करीत आहेत

पिढीजात काम आहे.

परळी शहर हे पूर्वजांपासून आमच्याकडे आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून अन्य तृतीयपंथी आम्ही परळीचे रहिवासी आहोत. आम्हीच बाजार मागणार, असे म्हणत इतर तृतीयपंथीयांना मज्जाव करत आहेत. सात पिढ्यांपासून आम्ही बाजारात मदत गोळा करतो. येथे आमचे घर आहे. परळीतील तृतीयपंथीयांनी इतर लोकांना सोबत घेत केलेल्या हल्ल्याचा निषेध करते. पोलीस प्रशासनाकडून आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा हीच अपेक्षा.- अंजली पटेल, तृतीयपंथीयांचे गुरु, उदगीर 

गाडीस कट मारल्यावरून वाद, मध्यस्थावर चाकू हल्ला करणाऱ्या दोघांना सश्रम कारावास. दोघांची निर्दोष मुक्तता.


अंबाजोगाई (प्रतिनिधी) : युवकावर हल्ला करणाऱ्या दोन आरोपीस दोषी ठरवत पाच वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजार रूपये दंड अशी शिक्षा येथील अप्पर सत्र न्यायाधीश संजश्री घरत यांनी ठोठावली. विनोद शिंदे व अविनाश कु-हाडे असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.

या घटनेची थोडक्यात माहिती अशी की, दि. २५/०१/२०१२ सांयकाळी अंदाजे सव्वासात वाजेच्या सुमारास किशोर लोमटे याचे मेडीकल वरीलमुलगा नामे प्रदीप महालंगे यास तु आमच्या गाडीला कट का मारलास म्हणून आरोपी विनोद शिंदे व अविनाश कु-हाडे हे त्यास मारहाण करू लागले. त्यावेळी मध्यस्थी करण्याकरीता गेलेल्या किशोर लोमटेस विनोद शिंदेने चाकुने भोसकून गंभीर जखमी केले. यावरून अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन मध्ये गु. रं.नं. १२/२०१२ गुन्हा दाखल झाला. सदर गुन्हयाच्या तपास होवून आरोपी विरुद्ध मा. न्यायालयात कलम ३०७, ३२३, ५०४,३४ भा. द. वी. प्रमाणे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले.

सदर प्रकरणात सरकारी वकील अॅड. लक्ष्मण फड यांनी सात साक्षीदार तपासले. तसेच लातुर येथील डॉक्टर ढगे यांची साक्ष महत्वाची ठरली. अॅड. फड यांचा युक्तीवाद ग्राहय धरून आरोपींना पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी दहा हजार रूपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने शिक्षा अशा प्रकारचा निकाल अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश संजश्री घरत यांनी दिला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. लक्ष्मण फड यांनी काम पाहीले व त्यांना अॅड. अजित लोमटे यांनी सहकार्य केले. दरम्यान युवराज माने व इतर एकाची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

एक हजार रुपयांची लाच घेताना भूमि अभिलेखचा कर्मचारी रंगेहाथ पकडल्याने खळबळ.


अंबाजोगाई (प्रतिनिधी) : मोजनीची हद्द कायम करणे. नकाशे व इतर संबधीत कागदपत्रे भुमी अभिलेख कार्यालय येथून प्राप्त करण्यासाठी तक्रारदार यांनी अर्ज केला होता. यामध्ये फीस भरूनही एक हजार रुपयाची लाच घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यकास बीड एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी दुपारच्या सुमारास करण्यात आली.

मुबारक बशिर शेख (वय-५७ ) रा. प्रकाशनगर, लातूर) असे लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते अंबाजोगाई येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्य सहायक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांनी त्यांची बर्दापुर येथील शेतजमीन गट क्र. ५३२,५३३ ची कायदेशीर फिस भरुन मोजणीकरुन घेतली होती. सदर मोजणीचे हद्द कायम नकाशे व इतर संबधीत कागदपत्रे भुमी अभिलेख कार्यालय येथून प्राप्त करण्यासाठी तक्रारदार यांनी अर्ज केला होता. शेख यांनी शासकीय फिस वगळता एक हजार रुपयाची तक्रारदार यांचेकडे मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी बीड एसीबी येथे तक्रार दिली. त्यावरुन एसीबीने सापळा लावला. 

आज दुपारी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील शेख याने तक्रारदार यांचेकडे एक हजार रुपयाची मागणी केली. पंचासमक्ष त्याच्या कक्षात तक्रारदार यांचेकडून लाच स्विकारताच त्यास रंगेहात पकडण्यात आले आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर शिंदे, पोलीस अंमलदार सुरेश सांगळे,भरत गारदे, संतोष राठोड, नामदेव ऊगले यांनी केली.

दोन लाखांसाठी तरुणाचे अपहरण पाच दिवस शेतात बांधून केली अमानुष मारहाण.


दिंद्रुड (प्रतिनिधी): ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी घेतलेले २ लाख रुपये परत दिले नाहीत या कारणाने तरूणाचे अपहरण करत मारहाण केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. जालना जिल्ह्यातील आष्टी येथे एका शेतात जवळपास पाच दिवस अपहृत तरुणाला अमानुष मारहाण करून सोडण्यात आले. दिंद्रुड पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर वृत्त असे की, धारूर तालुक्यातील कचारवाडी येथील अशोक अंतराम मंत्री याने कांदेवाडी येथील भरत ज्ञानोबा कांदे यांच्याकडून दोन लाख रुपये ट्रॅक्टर खरेदीसाठी घेतले होते. ते परत दिले नसल्याचा राग मनात धरून २० जून रोजी दिंद्रुड नजदीक असलेल्या चाटगाव फाट्यावरून अशोकचे अपहरण भरत कांदे, सतीश कांदे, सुरेश ज्ञानोबा कांदे या भावंडांनी केले. अशोकचे वडील अंतराम मंत्री यांच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलिसात २१ जून रोजी गुन्हा दाखल झाला करण्यात आला.

जालना जिल्ह्यातील परतुर तालुक्यात आष्टी शिवारातील एका केळीच्या बागेत लिंबाच्या झाडाला अपहृत अशोक मंत्री यास पाच दिवस बांधून ठेवले होते. उपाशीपोटी ठेवत अमानुष मारहाण करून २४ जून रोजी मध्यरात्री अशोकला दिंद्रुड नजदीक सोडण्यात आले. अशोकच्या शरीरावर गंभीर जखमा आहेत. बीड येथील शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालू आहेत.

सामाजिक न्याय दिवस - पुरोगामी राजा : छत्रपती राजर्षी शाहू महाराज.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि सामाजिक समता हे समीकरण फार महत्त्वाचे आहे. राजर्षी शाहू महाराज आयुष्यभर सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी आणि अस्पृश्‍य- बहुजन समाजाचा उद्धार करण्यासाठी प्राणपणाने लढले. ते एक कृतिशील आणि प्रयोगशील राजे, समाजसुधारक, विचारवंत होते. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची 26 जूनला जयंती. त्यानिमित्त सामाजिक न्याय दिवस विशेष लेख 
                 छत्रपती शिवाजी महाराज सोडले तर अनेक राजांचा इतिहास अन्याय- अत्याचार व जुलमी राजवटीचा आहे. एकाधिकारशाहीचा, हुकूमशाहीचा आहे; परंतु छत्रपती राजर्षी शाहू महाराज मात्र याला अपवाद आहेत. हा राजा लोकशाहीचा, सामाजिक समतेचा पुरस्कार करणारा आहे, हे "एकवेळ गादी सोडीन; पण बहुजन समाजाचा उद्धार करण्याचे कार्य सोडणार नाही' या त्यांच्या वक्तव्यावरून लक्षात येते. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या हाती वयाच्या 20 व्या वर्षी 1894 मध्ये सत्ता हाती आली. त्यांच्या हातात सत्तेची सूत्रे येताच त्यांनी पहिल्यांदा कोल्हापूर संस्थानातील प्रजेच्या हलाखीची पाहणी केली. संस्थानात साक्षरतेचे प्रमाण अत्यल्प, मागासलेला समाज, अप्रवाही, जातीपातींनी दुभंगलेला व जातीयवादाने फार पोखरलेला होता. शेकडो वर्षे अस्पृश्‍य समाज, बहुजन समाज ज्ञान, सत्ता, संपत्ती, शिक्षण अशा अनेक गोष्टींपासून वंचित राहिला होता. चातुवर्णव्यवस्थेमुळे सामाजिक, धार्मिक, आर्थिक क्षेत्रात मागे होता. अस्पृश्‍य, गरीब, शेतकरी, मजूर यांचे मोठ्या प्रमाणावर शोषण होत होते. सामान्य जनता भयानक दारिद्य्र, अज्ञानाच्या, अंधश्रद्धा, रूढींच्या खाईत बुडाली होती. शिक्षण क्षेत्रात बहुजन समाज बोटावर मोजता येईल इतकाच होता. पाणी, रस्ते, शेती, व्यापार, कला अविकसित होत्या, म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या सत्तेचा उपयोग या रंजल्या- गांजलेल्या लोकांसाठी केला, हे आजच्या स्वार्थी राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवे. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत राजर्षी शाहू महाराजांच्या काळात बहुजन समाज शिक्षणापासून वंचित होता. शिक्षणाशिवाय सुधारणा होणार नाही म्हणून त्यांनी शिक्षणाला महत्त्व देऊन 1907 मध्ये "मिस क्‍लार्क बोर्डिंग' नावाचे वसतिगृह उघडले. शिक्षणाचा प्रचार- प्रसार व्हावा म्हणून 1916 मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करून शाळा, महाविद्यालये, बोर्डिंग, शिष्यवृत्त्या सुरू केल्या. तसे आदेश त्यांनी जारी केले. आजच्या परिस्थितीत आजचे राज्यकर्ते शाळा, महाविद्यालये, शिष्यवृत्त्या बंद करीत आहेत. हे समाजहित, देशहिताच्या दृष्टीने घातक आहे.आरक्षणातून प्रगती चातुर्वर्णव्यवस्था प्रचंड मोठ्या प्रमाणावर बोकाळलेली असल्यामुळे आणि प्रत्येकाला जातीनुसार काम वाटून दिले असल्यामुळे अस्पृश्‍य समाजात प्रगती होत नव्हती. शिक्षण नव्हते. खालच्या वर्गातील माणूस वरच्या वर्गात जाऊ शकत नव्हता. अस्पृश्‍य लोकांची प्रगती व्हावी, त्यांचे दारिद्य्र दूर होऊन त्यांना प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, त्यांचे जीवनमान उंचवावे म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्‍यांसाठी नोकऱ्यांमध्ये पन्नास टक्के जागा राखून ठेवण्याची क्रांतिकारी घोषणा करून 26 जुलै 1902 ला लंडनहून आदेश काढून क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ते आरक्षण आज पूर्णपणे भरले जात नाही. उलट त्याविषयी गैरसमज पसरविले जाताना दिसतात. अस्पृश्‍योद्धाराचे कार्य वेदोक्त प्रकरणावरून त्यांना जातीयतेचा अनुभव आला. माझ्यासारख्या राजाबरोबर हे असे वागत असतील, तर सामान्य माणसांचे काय खरे आहे? म्हणून त्यांनी जातिव्यवस्थेविरुद्ध संघर्ष करण्याचे ठरविले. छत्रपती शाहू महाराजांचे कार्य संस्थांनापुरते मर्यादित नव्हते, तर संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची पकड होती. त्यामुळे अस्पृश्‍य समाजाचे फार हाल होत होते. माणूस म्हणून त्यांच्याकडे कुणी पाहत नव्हते. विषमतेमुळे त्यांचे जीवन पोखरून निघाले होते. भयभीत झाले होते. राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्‍य जातीच्या लोकांना उपाहारगृहे, हॉटेल (गंगाराम कांबळे), दुकाने चालविण्यासाठी आर्थिक मदत केली. पारध्यांच्या लोकांना तिजोरीच्या चाव्या दिल्या. सत्यशोधक समाजाची स्थापना करून फुले नंतर ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व शाहू महाराजांनी केले. अस्पृश्‍य समाजातील व इतर गरीब समाजातील लोकांना सरकारी नोकऱ्या दिल्या. वकिलीच्या सनदा दिल्या. जातीयता कमी करण्याचा प्रयत्न करून त्यांना मान सन्मानाचे जीवन दिले. आज देशात वाढत असलेली जातीयता, हतबलता ही आजच्या राज्यकर्त्यांनी लक्षात घेऊन शाहू महाराजांचे कार्य लक्षात घेण्यासारखे आहे. राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर छत्रपती शाहू महाराजांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी खूप आदर आणि अभिमान होता. म्हणून ते स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भेटण्यासाठी मुंबई येथे त्यांच्या घरी गेले. त्यांचा सत्कार केला. त्यांना वृत्तपत्र काढण्यासाठी व इतर शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करून माणगाव परिषदेत अस्पृश्‍य व इतर बांधवांना त्यांचा परिचय करून देऊन सांगितले की, माझ्यानंतर अस्पृश्‍योउद्धारक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच असतील. असा मोठ्या मनाचा राजा होता. जे आपल्याला आज विविध क्षेत्रात शोधूनही असा माणूस सापडणार नाही. म्हणूनच त्यांना यशवंतराव चव्हाण यांनी "मोठ्या दिलाचा राजा' असे म्हटले आहे. आंतरजातीय विवाहाला मान्यता स्त्रियांच्या प्रगतीसाठी आणि जातीयता नष्ट करण्यासाठी शाहू महाराजांनी कार्य केले. 1918 साली त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. स्वतःच्या घरात धनगर घराण्याची नाते जुळून कृतीत उतरवून आणला. जातीयता कमी व्हावी म्हणून त्यांनी स्वतः काही विवाह घडवून आणले. विधवा विवाहास मान्यता दिली. 1920 मध्ये घटस्फोटाचा कायदा केला. स्त्रियांचा सच्चा पाठीराखा होता. हेही आज देशात होत असलेल्या स्त्रियावरील अन्याय अत्याचार अत्याचारावरून आजच्या राज्यकर्त्याचे डोळे उघडणे गरजेचे आहे. व्यापार, कला, क्रीडा, साहित्य व इतर कलांना मदत छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना व्यापार, कला, नाट्य, संगीत या विषयीही आवड व आदर होता. व्यापारी क्षेत्रात गरुड झेप घेऊन सूतगिरण्या कापडगिरण्या वाढविल्या. राधानगरी धरण अस्तित्वात आणले. शेतीसाठी, शेतकऱ्यांसाठी बंधारे बांधले. अल्लादिया खान यांच्यासारख्या गायकाला बाबूराव पेंटरला आश्रय दिला. नाटक कंपन्या सुरू केल्या. अशाप्रकारे राजर्षी शाहू महाराज हे सामान्य माणसात मिळणारे, सामान्यांसाठी झटणारे राजा होते. सामाजिक लोकशाही निर्मितीसाठी शाहू महाराजांनी अतोनात कष्ट उपसले. सर्वांना न्याय मिळावा, माणुसकीचे हक्क मिळावेत, अस्पृश्‍यांना समानतेची व माणुसकीची वागणूक मिळावी, वैज्ञानिकता त्यांच्या अंगी यावी म्हणून त्यांनी आपल्या सत्तेचा उपयोग केला. यावरून शाहू महाराजांचे मोठेपण हे लक्षात यायला लागते. आज मात्र आम्ही व आमच्या राज्यकर्त्यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श बाजूला ठेवला आहे. त्यांचे नाव घेऊन आम्हीही त्यांचेच आहोत म्हणणारेही त्यांच्या विचाराने वागत नाहीत उलट आपल्या सत्तेचा गैरवापर करताना दिसतात. मानवी मूल्य पायदळी तुडवताना दिसतात. ज्या शाहू महाराजांनी लोकशाही निर्मितीसाठी कष्ट उपसले, त्याच लोकशाही धिंडवडे काढताना आजचे राज्यकर्ते आम्हाला दिसत आहेत. आम्ही समाजाचे काही देणे आहोत, समाजाच्या प्रगतीसाठी आपलेही काही योगदान असावे, असे मात्र आताच्या कुठल्याच राज्यकर्त्यांना वाटत नाही एवढे भयावह चित्र डोळ्यासमोर उभे राहते. स्वार्थासाठी, मतलबासाठी, जातीसाठी, धर्मासाठी राजकारण करणे चालू आहे परंतु मानवतेसाठी, मानवी कल्याणासाठी राजकारण करावे लागते हे मात्र त्यांनी राजर्षी शाहू महाराजांकडूनच शिकायला हवे, त्या पद्धतीनेच आपली सत्ता पुढे घेऊन जायला हवी व सामान्याचे हित जोपासायला हवे. त्यांच्या विचारांची, आचारांची व कृतीची आज देशाला गरज आहे. प्रत्येक मानवाने त्यांच्या विचाराने कार्य केले तर देशाची प्रगती व्हायला वेळ लागणार नाही.

          
         ओमराजे कांबिलकर गेवराई 
              मो.8888522282

Sunday, June 25, 2023

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०११ मध्ये राज्य सरकारने केली सुधारणा आता आठवीपर्यंतची ढकलगाडी बंद, पाचवी, आठवीला होणार वार्षिक परीक्षा.


*नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता इयत्ता पाचवी, आठवी वर्गासाठी वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी पाचवी आणि आठवी वर्गाची वार्षिक परीक्षा विद्यार्थ्याला उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आलं आहे.

 पुणे (प्रतिनिधी) : मुलांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत अणुत्तीर्ण  करता येत नव्हते. पण आता नवीन शिक्षण धोरणानुसार आठवीपर्यंतची ढकलगाडी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरसकट 8वीपर्यंत उत्तीर्ण करण्याचा निर्णय बदलण्यात आलाय. पाचवी आणि आठावी इयत्तेत आता वार्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. इयत्ता पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षेत विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास पुनर्परीक्षेचा विद्यार्थ्याला पर्याय असणार आहे. पुनर्परीक्षेतही विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण झाल्यास इयत्ता पाचवी आणि आठवी वर्गातच त्या विद्यार्थ्याला ठेवले जाणार आहे.
 राज्यात शालेय शिक्षणासाठी शिक्षण विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायदा 2011 मध्ये सुधारणा केली असून, पाचवी आणि आठवीसाठी वार्षिक परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच पाचवी किंवा आठवीला विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यानंतर पुन्हा संधी देऊनही अनुत्तीर्ण झाल्यास त्याला त्याच वर्गात ठेवले जाणार आहे. शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गात प्रवेश दिला जाईल. सहावी ते आठवीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश देताना पाचवीच्या वर्गासाठी निश्चित केलेली वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल.

विद्यार्थी पाचवीची परीक्षा उत्तीर्ण नसल्यास त्याला पाचवीच्याच वर्गात प्रवेश दिला जाईल. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) पाचवी आणि आठवीसाठीच्या वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा आणि मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल. विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही, तर त्याला अतिरिक्त पूरक मार्गदर्शन करण्यात येईल. वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांत त्याची पुनर्परीक्षा घेतली जाईल. 

संबंधित विद्यार्थी पुनर्परीक्षेतही अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुन्हा पाचवी किंवा आठवीच्याच वर्गात ठेवले जाईल. प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकले जाणार नाही, असंही नमूद करण्यात आलं आहे.

थेट नववीत उत्तीर्ण 
शिक्षणाचा हक्का कायद्यानुसार विद्यार्थ्यांना आठवी पर्यंत उत्तीर्ण करणं बंधनकारक होतं. पण यामुळे विद्यार्थी बहुतांष विषयात कच्चा राहु लागला. परिणामी विद्यार्थ्याची गुणवत्ता थेट नववी इयत्तेत दिसत असल्याने वार्षित परीक्षेत अनेक विद्यार्थी अपयशी ठरत होते. पण आता नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य देण्यात आलं आहे.  त्यामुळेच शालेय शिक्षणावेळीच विद्यार्थ्याची दोन टप्प्यात गुणवत्ता जोखण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम २०११ मध्ये राज्य सरकारने सुधारणा केली आहे


बीडमध्ये पावसानं दडी मारली अजूनही 21 प्रकल्प कोरडे पाणीबाणीचं संकट!


"राज्यात मान्सूनचं आगमन झालं असलं तरी बीडमध्ये पावसानं दडी मारलीय. जिल्ह्यातील 21 प्रकल्प कोरडे असून पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

बीड (प्रतिनिधी) : यंदा जून महिना संपत आला तरी राज्यात मान्सूनने दडी मारली होती. आता राज्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली असली तरी बीड जिल्हा मात्र पावसाच्या प्रतिक्षेतच आहे. पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या असून शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेत. दुसरीकडे जिल्ह्यातील 143 प्रकल्पपैकी 21 प्रकल्प कोरडे आहेत. तर 58 प्रकल्प जोत्याखाली गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

90 विहिरींचे अधिग्रहण. 

बीड जिल्ह्यातील पाणी पातळी झपाट्याने कमी होत चालली आहे. जिल्ह्यातील 143 प्रकल्पांकपैकी 21 प्रकल्प कोरडे तर 58 जोत्याखाली आहेत. सर्व प्रकल्पात केवळ 18.21 टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यातील 130.385 दलघमी पाणी उपयुक्त आहे. अद्याप ग्रामीण भागात पाण्याची फारशी गंभीर परिस्थिती उद्भवली नसली तरी 90 गावातील 90 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. चालू महिन्यात पाऊस झाला नाही तर पाणी टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

भीषण पाणी टंचाईची शक्यता

बीड जिल्ह्यातील कोल्हापुरी पद्धतीच्या 13 बंधाऱ्यात पाणीसाठा उपलब्ध नाही. त्यामुळे बंधाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. यासह बीड जिल्ह्यातील आष्टी, शिरूर, कासार यासह धारूर तालुक्यात देखील पाण्याची टंचाई जाणवत आहे. तर अनेक खेडेगावात पाण्यासाठी पायपीट करावी लागते. त्यामुळे या महिन्यात पाऊस पडणे गरजेचे आहे. नाहीतर बीड जिल्हा वासियांना पुन्हा एकदा भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

बीड जिल्ह्यातील कोल्हापुरी पद्धतीच्या 13 बंधाऱ्यांवर शेती क्षेत्र अवलंबून आहे. आता खडकत 1, खडकत -2, सांगवी संगमेश्वर, सांगवी नागापूर, टाकळसिंग, पिंपरी घुमरी, हिंगणी, धिडर्डी, कडा, पिंपळसुट्टी नाथापूर व कुक्कडगाव या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांतील पाणीसाठा 19,792 दलघमी असून 4272 हेक्टरवर सिंचन क्षेत्र आहे. आता बंधाऱ्यांत पाणीच नसल्याने अडचणीत भर पडली आहे. शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे.


बीड-परळी-नांदेड मार्गाचं चौपदरीकरण व पाडळसिंगी - वडवणी-धारुर-आडस-लोखंडीसावरगाव हा रस्ताही नॅशनल हायवे करून चौपदरी करा- एस.एम.देशमुख यांची गडकरी यांना मागणी.


मुंबई (प्रतिनिधी) : बीड – परळी – नांदेड या महामार्गाचे चौपदरीकरण करावे तसेच पाडळसिंगी – वडवणी – धारूर – आडस – लोखंडी सावरगाव हा मार्ग त्वरित राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरीत करून त्याचे चौपदरीकरण करावे अशी मागणी जेष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे..

मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडला.. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख होते..यावेळी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशीं उपस्थित होते..

आपल्या अध्यक्षीय भाषणात एस.एम.देशमुख यांनी पत्रकारांनी सतत सहा वर्षे केलेल्या आंदोलनानंतर तयार होत असलेल्या मुंबई – गोवा महामार्गाचं काम गेली बारा वर्षे रखडलयाबददल खंत व्यक्त करून हे काम लवकर मार्गी लागावे तसेच मुंबई गोवा महामार्गाला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचं नाव द्यावं अशी मागणी केली..
बीड जिल्हयातील रस्त्यांकडे देखील एस.एम.देशमुख यांनी नितीन गडकरी यांचं लक्ष वेधलं.. बीड – परळी – नांदेड हा रस्ता 2017 मध्येच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाला आहे..एनएच 361 एफ असा क्रमांकही या रस्त्याला मिळालेला आहे.. आता हा रस्ता सिमेंट कॉंक्रीटचा होत असला तरी रस्त्यावरील वाढती वाहतूक लक्षात घेता हा रस्ता चौपदरी करावा अशी मागणी एस.एम देशमुख यांनी केली.. तसेच पाडळसिंगी – वडवणी – धारूर – आडस – लोखंडी सावरगाव हा मार्ग तातडीने नॅशनल हाय वे अँथॉरिटीकडे सुपूर्द करून तो रस्ता चौपदरी केला तर लातूरला संभाजीनगरशी जोडणारा सर्वात जवळचा मार्ग ठरेल.. शिवाय या महामार्गामुळे बीडच्या विकासाला देखील गती मिळेल ही बाब देशमुख यांनी आपल्या भाषणातून गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली..
एस.एम.देशमुख, डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, मराठी पत्रकार परिषद बीड जिल्हा अध्यक्ष विशाल साळुंके, उपाध्यक्ष रवी उबाळे, यांनी वरील मागणीचे निवेदनही गडकरी यांना दिले आहे..
आपल्या भाषणात नितीन गडकरी यांनी मुंबई – गोवा महामार्गाचं काम येत्या डिसेंबर पर्यत पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं.. तसेच बीड – परळी आणि पाडळसिंगी – लोखंडी सावरगाव या रसतयांबाबतची माहिती घेऊन सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन गडकरी यांनी दिले आहे.. या विषयाचा पाठपुरावा करण्यासाठी मराठी पत्रकार परिषद बीडचे पदाधिकारी एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत.. ..

केज तालुक्यातील काही भागात मुसळधार पाऊस.वीज पडून एक गाय दगावली तर पुराच्या पाण्यात म्हैस गेली वाहून.

केज (प्रतिनिधी) गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने, बीडच्या केज तालुक्यातील काही भागात हजेरी लावलीय. केज तालुक्यातील माळेगाव, सुर्डी, सोनेसांगवी, मांगवडगाव,सुकळी, गोटेगाव परिसरात जवळपास 2 तास मुसळधार पाऊस झालाय. पहिल्याच पावसात या भागातील नदीनाले वाहू लागले आहेत. तर यावेळी वीज कोसळून एक गाय दगावली असून नदीच्या पुरात एक म्हैस देखील वाहून गेलीय.
या दुर्घटनेत केजच्या माळेगाव येथील अरुण चंद्रसेन गव्हाणे यांची घराजवळ चिंचाच्या झाडाखाली बांधलेली गाय वीज पडून दगावलीय. सदरील गाभण असलेली गाय दगावल्याने शेतकऱ्याचे 80 हजार रुपयांचे नुकसान झाले. तर मांगवडगाव येथील कल्याण गायके हे बैलगाडीतून कुटूंबीयासह घरीं परतत होते. यादरम्यान बैलगाडीच्या मागे म्हैस होती. ती ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेली. 
दरम्यान बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये रिमझिम, मध्यम व जोरदार पाऊस झाला आहे.गेल्या 2 दिवसांपासून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. मात्र काल सायंकाळी आणि रात्री पाऊस  झाल्याने वातावरणात काहीसा गारवा निर्माण झालाय. यामुळं मागील काही दिवसांपासून उष्णतेचा सामना करत असलेल्या जनतेला दिलासा मिळाला आहे.

गुरुलिंग स्वामी संस्थान बेलवाडी च्या अध्यक्षपदी मा.दत्ताप्पा इटके यांची फेरनिवड.सचिवपदी ॶॅड. गिरीश चौधरी तर कोषाध्यक्षपदी शिवकुमार व्यवहारे.

 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील श्री गुरुलिंग स्वामी संस्थान बेलवाडी च्या अध्यक्षपदी दत्ताप्पा इटके गुरुजी यांची आज रविवार दिनांक 25 जून रोजी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. 
आज 25 जून रोजी श्री गुरुलिंग स्वामी संस्थान बेलवाडी येथे विश्वस्त मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकी करिता एक व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्वानुमते पुढील तीन वर्षासाठी अध्यक्षपदी दत्ताप्पा इटके गुरुजी, सचिव पदी एडवोकेट गिरीशअप्पा चौधरी तर कोषाध्यक्षपदी शिवकुमार गोविंदआप्पा व्यवहारे यांची निवड करण्यात आली आहे.
या बैठकीस श्री गुरुलिंग स्वामी संस्थान बेलवाडी चे विश्वस्त सर्वश्री शंकरआप्पा उदगीरकर , प्रा.रामलिंगआप्पा काटकर सोमनाथआप्पा हालगे विजयकुमार मेनकुदळे शिवशंकरआप्पा निर्मळे, अक्षय मेनकुदळे, एडवोकेट मंदार नरवणे बैठकीस उपस्थित होते. दरम्यान सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टीईटी परीक्षा घोटाळा. बीड जिल्ह्यातील ७६ उमेदवारांचे टीईट प्रमाणपत्र रद्द.

बीड (प्रतिनिधी) : राज्यभरात गाजलेल्या शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) घोटाळ्यात महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने कारवाई सुरू केली आहे. बीड  जिल्ह्यातील २०१८–१९ मध्ये टीईटी उत्तीर्ण झालेल्या ७६ उमेदवारांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे. तसेच टीईटी प्रमाणपत्र अवैध ठरवल्याचे आदेश राज्य परिक्षा परिषदेने दिले आहेत. या संदर्भात राज्य परिक्षा परिषदेने बीडच्या प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांना पत्र पाठवुन कारवाईचे आदेश दिले आहेत. यामुळे बीडच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 
बीड जिल्ह्यातील २०१८ मध्ये उत्तीर्ण झालेले १ तर २०१९ मधील ७५ उमेदवार गैरप्रकार करून शिक्षक पात्र परिक्षा उत्तीर्ण झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्या अनुषंगाने गैरप्रकारात समाविष्ट उमेदवारांविरूध्द शास्ती निश्चित करण्यात येवुन त्यांची संपादणूक रद्द करण्यात आले. त्यांचे टीईटी प्रमाणपत्र अवैध ठरवल्याचे आदेश राज्य परिक्षा परिषदेने दिले आहेत.

याचे प्रमाणपत्र अवैध

टीईटी प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या उमेदवारांमध्ये द्रौपदी वैजिनाथ सानप, सविता त्रिंबक घाडगे, सुनिता श्रीराम देवकते, वर्षारानी संभाजी निरडे, मुजाहीद खलील अब्दुल मोमीन, युसूफ शेख युनूस शेख, शाजीया बेगम मो.अब्दुल सत्तार, यास्मीन बेगम सय्यद अब्दुल खादर, उम्मे सायमा वाहजोद्दीन अन्सारी, गणेश जाधव वाकाळे, ज्योती निवृत्तीराव काळे, जीशान हामेद शेख, यास्मीन बेगम जीया अहेमद सिद्दीकी, मोहम्मद खान चाँद खान पठाण,प्रतिक्षा प्रल्हाद वाघ, रमाबाई बालासाहेब जाधव, कौस्तुभ विजयानंद शिंदे, शिल्पा ज्ञानोबा गिते, उजमा फातेमा रफीक बेग मिर्झा, अर्शद रशिद सय्यद, हुमेरा बानु अजहर हुसेन शेख, हुस्ना यास्मीन शेख हमीद शेख, पुजा भास्कर म्हस्के, संतोष किसन आडे, पुजा धोंडिराम कांबळे, परमेश्वर बाबुराव राठोड, सिमा रंगाराव रूद्रे, अजय शामराव जाधव, फरहा यास्मीन जहीरूद्दीन सय्यद, फौजीया नुरूलहसन लाहोरी, आतीया बेगम शेख मुस्तफा शेख, आस्मा सय्यद मो.सिद्दीक सय्यदा, सोबीया फरहा कादरी सय्यद जहीरूद्दीन कादरी, बीबी हाजेरा शेख साजेद, अस्फीया परवीन मो.अब्दुल बासीत, निशाद अर्जुमंद इजहार मजहरोद्दीन सय्यदा, शमीका बन्सीधर राजवान, मीना भिमराव टिके, उर्मिला अवधुराव वाडे, मुक्ताबाई नरहरी सोगे,खान कौसर बेगम शकील खान, सलाम मुक्तार अब्दुल, ईरफान जमील दाईनी सय्यद, मोईनोद्दीन चिस्ती सय्यद समीयोद्दीन सय्यद, अजहर अहमद शकील अहमद शेख, मोहम्मद मुजाहेदोद्दीन मो.मोईजोद्दीन सिद्दीकी, जीया अबरार जफर शेख, नुजहत ताहेरा सय्यद जैकी सय्यद, आकेब अली अमानत अली सय्यद, आदील अय्युब सय्यद, शैलेश कलाबा कसबे, कावेरी दिलीप सानप, आयशा तजीन रफीक शेख, घोबाळे सुहासिनी बालाजी, लोंडल विकास अर्जुन, काळे विश्वास बालासाहेब, उज्मा समीतान खीजर अली कादरी, नराळे सुजप्रिया अरूण, प्रशांत दत्तात्रय कुलकर्णी, अमोल शिवाजी पाटोळे, शहेनाज बेगम नजीर शाह, कौसर नवाजखान पठाण, सविता सुंदरराव पवार, प्रणिता प्रकाशराव कुलकर्णी, निलोफर नाजेमोद्दीन काझी, अदनान अहेमद अनीसखान पठाण, फैजानोद्दीन रीजवानोद्दीन शेख, आलिया बेगम शेख सलीम, फौजीया बेगम शरीफखान पठाण, हिना कौसर जमील शेख, शाहीन बेगम बशिरोद्दीन काझी, मुदस्सीर मेहराज शेख, अन्वरी बेगम मुक्तार अहमद सय्यद, शाजीया तसकीम मो.मुनीसोद्दीन सिद्दीकी, सय्यद फरहीन बेगम रहीमोद्दीन, यांचा समावेश आहे.


राज्यातील सरकारी शाळेचा ऱ्हास तर, इंग्लिश शाळांकडून पालकांची लूट...!


पुणे (कांतीकारी साथी न्युज): सध्या सगळीकडे उन्हाळ्याची सुट्टी संपवून शाळा सुरू झाल्या आहेत. पण पालकांचा जास्त ओढा सरकारी शाळापेक्षा इंग्लिश शाळाकडे असल्याचे दिसून येत आहे. पण याच गोष्टीचा फायदा घेऊन इंग्लिश माध्यमाच्या शाळा पालकांची मोठी आर्थिक लुट करत असल्याचे अनेक प्रकरणे समोर आले आहेत.

सरकारी शाळामध्ये सरकारकडून सर्व सुख सुविधा पुरविल्या जात असतांनाही पालक वर्ग शिक्षणाच्या दर्जा सरकारी शाळेत खालावलेला आहे असे कारण पुढे करून सरकारी शाळेकडे साफ दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आहे. यामुळे सरकारी मराठी शाळा यांचा ऱ्हास होण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील बर्‍याच मराठी सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी शाळामध्ये विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तके, वह्या,पोषण आहार हा मोफत पुरविण्याची व्यवस्था केली जात आहे. त्याच बरोबर सरकारी शाळेत विविध शिष्यवृत्ती परीक्षा, स्पर्धा परीक्षा, विविध गुणदर्शन कार्यक्रम मोफत राबविले जातात. पण आत्ताच्या लाईफ लाईनच्या जीवनात फक्त आपली मुले इंग्लिश माध्यमातील शाळेत शिकली पाहिजेत या अपेक्षेपोटी पालक पोटाला चिमटा घेऊन स्वत:च्या पाल्याला इंग्लिश माध्यमात शिकवण्याचा निर्णय घेत आहेत.

सध्याच्या सर्व राज्यातील काही निवडक इंग्लिश माध्यमाच्या शाळा सोडल्या तर, बहुतेक इंग्लिश माध्यमांच्या शाळांमध्ये अध्यापणाला आवश्यक असणारे शिक्षणचं शिक्षकांचे नसल्याचे दिसून आले आहे. एवढेच नाही तर, काही इंग्लिश माध्यमाच्या एका शाळेला शासनाकडून परवानगी घेतली जाते आणि त्याच परवानगीवर बोगस पद्धतीने बेकायदेशीर शाखा काढून पालकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केली जात आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील खेड, मावळ, दौंड, पुणे शहरात व पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर अशा बोगस इंग्लिश माध्यमाच्या शाळांचे पेव फुटल्याचे प्रकर्षाने दिसून आले आहे. त्यात चाकण परिसरात तर सर्वाधिक इंग्लिश माध्यमाच्या शाळा या बोगस असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यावर तालुक्यातील शिक्षक विभाग हात ओले करून गप्प बसण्याची भूमिका घेत आहे. भारत सरकारने २००९ साली शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ ची निर्मिती करून Right to Education या संकल्पनेतून सर्वांना शिक्षकांचा अधिकार हा अजेंडा राबविला आहे. या Right to Education कायद्यात १० मूल्यांकणे सरकारने ठरवून दिले आहेत. त्या मूल्यांकनाचे जी शाळा उल्लाघंन करेल त्या शाळेवर कडक कारवाई किवा त्या शाळेची मान्यता रद्द करण्याची तरतूद या कायद्यात देण्यात आली आहे. पण त्या नियमांना तिळांजली देत तालुक्यातील शिक्षक विभाग आपले खिसे भरून शाळांच्या फाईलींवर डोळे झाकून सह्या करत असल्याचे दिसून आले आहेत. त्या तुलनेत सरकारी मराठी शाळा उत्तम प्रतीचे शिक्षक व सुविधा देवूनही त्याकडे पालक पाठ फिरवत आहेत. जर पालकांनी फक्त डोळ्या समोर इंग्लिश माध्यमाच्या शाळा ठेवून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा निर्णय घेतला असे तर, ज्या शाळेत आपला पाल्या आपण टाकतो त्या शाळेला शासनाची मान्यता आहे का? त्या शाळेत आवश्यक पात्रता असलेले शिक्षक आहेत का? त्या शाळेने कायद्यानुसार सरकारने जी नियावली घालून दिली आहे तीचे तंतोतंत पालन केले आहे का? त्या इंग्लिश शाळेने सरकारने स्थापन केलेल्या समितीच्या नियमांनुसार फी आराखडा तयार करून तशीच फी आपणाकडून घेतली जाते का? की बेकायदेशीर पणे इंग्लिश माध्यमाच्या शाळा फी आकारात आहेत. तसेच कोणत्याही इंग्लिश किवा तस्सम शाळेला मान्यता मिळवायची असेल तर, त्या शाळेच्या मालकीची किंवा भाडे कराराने कमीत कमी ३० गुंठे जागा असणे बंधनकारक आहे. तर आपला पाल्या ज्या इंग्लिश माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेत आहे त्या शाळेच्या बद्दल वरील बाबी पडताळणे महत्वाचे ठरेल.

यातून नक्कीच पालकांची आर्थिक लुट थांबण्यास मदत होणार आहे. काही इंग्लिश माध्यमांचे मालक करोडो रुपये असे बेकायदेशीरपणे कमवून बसले आहेत त्यातून हेच भुजंग शाळा मालक पालकांची पिळवणूक करताना दिसत आहेत. जा तुम्हाला कुणाकडे जायचे तिकडे जा आमचे कुणी वाकडे करत नाही अशा आविर्भावात हे इंग्लिश माध्यमांचे मालक वागताना दिसत आहेत. त्यात पालकांना आर्थिक किंवा इतर त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे विद्यार्थ्यांना दुसर्‍या शाळेत घालायचे म्हंटले तर फीच बकजी आहे, तुम्ही का त्या शाळेत घालता आमच्या शाळेची काही अडचण आहे का? ज्या शाळेत तुम्हाला तुमचा पाल्या घालायचा आहे त्या शाळेचे मागणी पत्र घेऊन या तरच तुम्हाला आम्ही दाखला देऊत अशा पद्धतीने हे इंग्लिश माध्यमाचे मालक पालकांना दमदाटी करत असल्याचे समोर आले आहे.

या इंग्लिश माध्यमाच्या बेबुंदशाही व आडमुठ्या भूमिकेमुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळा सोडून घरी बसावे लागत आहेतशी उदाहरणेही परिसरात पहावयास मिळत आहेत. यावर मात्र स्थानिक शिक्षक विभाग फक्त स्वत:चे खिसे भरून बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे. शिक्षक विभागातील अधिकारी हे किती मलिदा घेऊन Right to Education(RTE) च्या फाइलवर सह्या करतात याचीही माहिती News15 मराठी वाहिनीच्या हाती लागली आहे. या शाळांना आणि या मलिदा खाणार्‍या अधिकारी यांना विद्यार्थ्यांच्या जीविताचे काहीच देणे घेणे नसून फक्त आपल्याला आपला शेर मिळायला हवा बाकीचे इकडचे जग तिकडे होऊदेत त्यांना काही एक देणे घेणे नसल्याचे समोर आले आहे. फक्त पैसा हेच समीकरण डोळ्या समोर ठेवून अशा बोगस शाळांना हे अधिकारी पाठीशी घालत असतील तर, उद्याची निर्माण होणारी पिढी तुम्हाला कदापि माफ करणार हेही अधिकारी यांनी लक्षात असुदया कारण त्या पिढीत यदाकदाचित तुमचेही मुलं असू शकतात त्यामुळे कुणाच्या जीवाशी खेळण्यापेक्षा आदर्श पिढी घडविण्यासाठी अधिकारी यांनी प्रयत्न करायला हवे त्यात पालकांनीही आता डोळे उघडे ठेऊन वरील बाबी पडताळूनच पाल्यांना शाळेत घालायला हवे. नाहीतर कधीही सरकारी माध्यमाच्या शाळा चांगल्याच ठरतात. उज्ज्वल पिढ्या व संस्कार घडविण्याचे मोठे योगदान सरकारी मराठी शाळेंत होते. तुम्ही पालकांनी जर दुर्लक्ष केले तर याच आपण शिकलेल्या मराठी शाळांचा ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही. मग फक्त पालकांना इंग्लिश माध्यमांच्या शाळेच्या मालकांचे गुलाम बणण्या शिवाय पर्याय नसेल हे लक्षात ठेवावे. वाचूबोलू आनंदेगाऊ मराठीचे गोडवे...           

Saturday, June 24, 2023

तुटलेले सीट आणि गंजलेला पत्रा,बीड जिल्ह्यातील (एस.टी.)लालपरी आहे की भंगारगाडी!






बीड (प्रतिनिधी) लालपरी म्हणजेच एसटी ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी मानली जाते. मात्र, बीडच्या ग्रामीण भागात जाणाऱ्या अनेक बस मोडकळीस आल्या असून त्यांची दुरावस्था झाली आहे.

मागील साठ वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून लालपरी अर्थात एसटी बस ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. वाट पाहीन, पण एसटीनेच जाईन! अशी म्हणच गाव खेड्यात प्रचलित असून प्रवाशांचा एसटीवर विश्वास आहे.

सध्याच्या काळात दुचाकीसह आणि खासगी वाहतुकीची साधने उपलब्ध झाली आहेत. तरीही सुरक्षित प्रवासासाठी एसटीवर विश्वास कायम आहे. त्यातच महिलांसाठी अर्ध तिकीट सारख्या योजनांमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत वाढच होताना दिसतेय.

सध्याच्या काळात वाहतुकीची साधने अत्याधुनिक होत आहेत. तसेच बसचा प्रवास अधिक आरामदायी व्हावा म्हणून विविध सुविधा उपलब्ध होत आहेत. एसटीच्या ताफ्यातही काही नवीन गाड्या दाखल झाल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागातील बसमध्ये फार बदल झालेले दिसत नाहीत.

गेल्या काही महिन्यांपूर्वी एसटी बसची स्थिती आणि जाहिरात याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले होते. तशीच काहीशी अवस्था बीड आगारातील बसची झालेली दिसत आहे. ग्रामीण भागात जाणाऱ्या बस काचा फुटलेल्या, सीट फाटलेल्या, पत्रा गंजलेल्या अवस्थेत दिसत आहेत.

काही बसच्या खिडक्या लागत नाहीत तर काही बसची आसन व्यवस्थाच खराब झाली आहे. मोडकळीस आलेल्या बसचा आवाजही प्रवाशांना हैराण करून सोडतो. तर बस वाटेतच बंद पडण्याची भीती प्रवाशांना सतावते. त्यामुळे अनेकदा जीव मुठीत घेऊनच प्रवाशांना प्रवास करावा लागतोय.
ग्रामीण भागात जाणाऱ्या बसची दुरावस्था झाल्याने प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत आहे. सुरक्षित असणारा एसटी बसचा प्रवास सध्या तिच्या दुरावस्थेमुळे धोकादाय वाटतोय, अशा प्रतिक्रिया प्रवाशांतून उमटत आहेत. त्यामुळे तात्काळ या बसची डागडुजी करण्याची गरज व्यक्त केली जातेय. तसेच सुस्थितीतील बसची मागणी होतेय.
बीड जिल्हा आगारामध्ये 2×2 आणि अधिक आरामदायी असणाऱ्या नवीन बसेस दाखल झाल्या आहेत. यातच काही जुन्या बस देखील आहेत. या बसच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत, असे विभागीय नियंत्रक अजय कुमार मोरे यांनी सांगतिले.

सावधान! तुमच्या किचनमध्ये शौचालयात ठेवलेला भाजीपाला तर नाही ना?

बीड (प्रतिनिधी) : बीडकरांनो तुमच्या किचनमध्ये शौचालयात ठेवलेला भाजीपाला तर नाही ना ? असं म्हणण्याची संतापजनक आणि धक्कादायक बातमी बीडमधून समोर आली आहे. बीड शहरातील भाजी मंडईत असणाऱ्या महिला शौचालयात, भाजीमंडईत दिवसा विक्री केला जात असणारा भाजीपाला ठेवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

या शौचालयाच्या बाजूला भाजीपाला व्यापारी आपली दुकान थाटून बसतात. दिवसभर भाजीपाला विकला जातो आणि रात्री दहा साडेदहा नंतर उरलेला भाजीपाला बाजूलाच असणाऱ्या नगरपालिकेच्या महिला शौचालयामध्ये ठेवण्यात येतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी तोच भाजीपाला आपल्या भाजीपाल्याच्या दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात येतो. 

नगरपालिकेने हे शौचालय महिलांसाठी बांधलं आहे. मात्र या शौचालयाचा रात्रीच्या वेळी हा भाजीपाला विक्रेता जणूकाही कोल्ड स्टोरेज म्हणून या वापर करतोय की काय ? असं वाटू लागलं आहे.

विशेष म्हणजे स्वच्छ बीड सुंदर बीड असा नारा बीड नगरपालिका देत आहे. मात्र याच नगरपालिकेने महिलांसाठी बांधलेल्या शौचालयात भाजीपाला विक्रेता आपला भाजीपाला ठेवतोय. आणि तोच भाजीपाला बीडकरांना विकून नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

दरम्यान, या घटनेने बीड शहरात एकच खळबळ उडाली असून बीडकरांमधून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता नगरपालिका आणि अन्न औषध प्रशासन यावर काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


दारूच्या नशेत चालकाने घेतला बळी भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू.


बीड (प्रतिनिधी) - भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी ६ वाजता बीड-नगर महामार्गावर धामणगावजवळ झाली. अनिल पिंपळे असे मृताचे नाव असून अपघातात त्याची पत्नी आणि मुलगा जखमी झाला आहे. दरम्यान, चारचाकी चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, अनिल पिंपळे ( ३२ ) हा देवळाली रहिवासी आहे. त्याचा मासे विक्रीचा व्यवसाय आहे. आज सायंकाळी तो पत्नी आणि मुलासह धामणगाव येथे मासे विक्रीसाठी बीड- नगर महामार्गावर दुचाकीवरून (एच ०४ डी.एन.१७१०) प्रवास करत होता. दरम्यान, धामणगावजवळ  झिंजुर्कॅ वस्तीच्या वळणावर भरधाव वेगातील अनियंत्रित कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात अनिलचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी पपीता ( ३० ) आणि मुलगा मंगेश ( १६) गंभीर जखमी झाला. त्यांना उपचारासाठी अहमदनगर येथे दाखल करण्यात आले आहे.

चारचाकी चालक होता नशेत.

दरम्यान, चारचाकीचा चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. कारमध्ये देखील दारूच्या बॉटल आढळून आल्या आहेत. अपघातानंतर चालक तेथून पसार झाला आहे. चालकाने दारूच्या नशेत कार चालवल्याने मात्र एका कुटुंबाने कर्ता पुरुष गमावला आहे. 

Friday, June 23, 2023

लिंगायत संघर्ष समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी विरशैव समाजाचे युवा नेते आत्मलिंग शेटे यांची निवड.

 
परळी वै.(प्रतिनिधी):- परळी येथील विरशैव समाजाचे युवा नेते तथा परळी समाचारचे संपादक आत्मलिंग शेटे यांची लिंगायत संघर्ष समितीचे महाराष्ट्राचे समन्वयक लोकनेते मा.काकासाहेब कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली व लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनीलशेठ रुकारी यांच्या आदेशावरुन प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र (आबा) मुंडे यांनी लेखी नियुक्ती पत्र देऊन लिंगायत संघर्ष समितीच्या बीड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे जाहीर केले आहे.
आत्मलिंग शेटे हे पुर्वीपासूनच लिंगायत संघर्ष समितीचे जिल्हा समन्वयक होते. त्यांची सामाजिक कार्याची आवड व कार्य असल्यामुळे त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड केली असल्याचे मा.काकासाहेब कोयटे यांनी दुरध्वनी वरुन बोलतांना सांगितले व आत्मलिंग शेटे यांचे अभिनंदन केले.
आत्मलिंग शेटे यांची विरशैव लिंगायत समाजामध्ये गेली 20 वर्षापासून ते कार्यरत आहेत. लिंगायत संघर्ष समितीच्या वतीने परळी येथे दि.15/7/2014 ला ओबीसी आरक्षण मिळावे यासाठी भव्य मोर्चा काढला होता. या मध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता तसेच 2014 मध्ये कराड येथे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी धरणे आंदोलन व मोर्चा मा.काकासाहेब कोयटे, सुनीलशेठ रुकारी यांच्या नेतृत्वात झालेल्या मोर्चात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. तसेच 2005 मध्ये सोनपेठ येथे झालेल्या पंच जगदगुरु सोहळ्यातही सचिव म्हणून चांगली कामगिरी बजावली होती. त्यांना 2014 मध्ये लातूर येथे झालेल्या राज्य बसव मेळाव्यामध्ये प्रा.सुदर्शन बिरादार व इतर मान्यवरांच्या हस्ते ‘समाजभुषण पुरस्काराने’ गौरविण्यात आले होते. नांदेड येथील बसवेश्वर समता परिषदेच्या वतीने ‘बहुजनरत्न पुरस्कार’ देण्यात आला होता. आत्मलिंग शेटे यांनी लिंगायत संघर्ष समितीच्या माध्यमातून आणखीन जोमाने कार्य करावे, संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये शहर व तालुका अध्यक्षाची नेमणुक करावी त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात आम्ही उपस्थित राहुत असे आवाहन महाराष्ट्र लिंगायत समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र (आबा) मुंडे यांनी केले आहे.
आत्मलिंग शेटे यांच्या निवडीबद्दल त्यांचे विरशैव समाजातील सर्व स्तरातून स्वागत होत असून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. आत्मलिंग शेटे यांना नियुक्तीपत्र देत असताना सर्वश्री साई पतसंस्था कळंबचे चेअरमन सागर मुंडे, निलेश होनराव, वैजनाथ गुळवे, रामलिंग ढेले इत्यादी समाज बांधव उपस्थित होते.

आषाढी एकादशी निमित्त अनोखे हिंदु मुस्लिम ऐक्य, बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा गावाचा निर्णय.


अहमदनगर (प्रतिनिधी) : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुर येथे नुकतीच शांतता कमीटीची बैठक पार पडली आहे. श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. मुस्लीम बांधवाचा सण बकरीईद तसेच हिंदू बांधवांचा पवित्र आषाढी एकादशी हे दोन्ही सण एकाच दिवशी येत आहे. त्या दिवशी काही अनुचित घटना घडू नये, म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता कमीटीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

हिंदु बांधवांच्या भावनांचा आदर : दरम्यान, पोलीस प्रशासनाच्या वतीने काही सुचना करण्याच्या अगोदरच मुस्लीम बांधवांनी जाहीरपणे सांगितले की, आम्ही सर्व जण कायमच एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होत आहोत. आषाढी एकादशी हा हिंदु बांधवांचा मोठा व पवित्र सण आहे. या दिवशी सर्व हिंदु बांधव पुजाअर्चा करुन उपवास करतात. याच दिवशी मुस्लीम बांधवांचा कुर्बानी देण्याचा सण बकरी ईद येत आहे. त्यामुळे हिंदु बांधवांच्या भावनांचा आदर करुन दोन दिवस कुर्बानी न देण्याचा निर्णय आम्ही सर्व मुस्लीम बांधवांनी सर्वानुमते घेतला आहे, असे हाजी ईस्माईल शेख, मोहसीन सय्यद, बाबुलाल शेख, अयाजअली सय्यद, जाकीर शेख, अजीज शेख यांनी सांगितले. मुस्लीम बांधवांनी हा ऐतिहासीक निर्णय घेतला आहे. या निर्णयांचे हिंदु बांधवाच्या तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले.

गावातच नाविण्यपूर्ण उपक्रम :बेलापुर गावाने नेहमीच समाजापुढे आदर्श ठेवण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे. सर्वात प्रथम विनापोलीस बंदोबस्ताशिवाय गणेश विसर्जन मिरवणूक पार पाडण्याचा यशस्वी निर्णय घेतला. त्यानंतर गाव सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्याचा धाडसी निर्णय गावाने घेतला होता. गावाने दिपावलीनिमित्त आपली खरेदी आपल्या गावातच हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविला. तसेच राम मंदिराचे कोषाध्यक्ष बेलापूर गावचे वैभव आचार्य गोविंददेवगीरीजी महाराज यांच्याकडे राम मंदिर उभारणीसाठी 75 हजार रुपये देण्याचा देशातील पहीला मान बेलापुरच्या मुस्लीम बांधवांनी मिळवीला. तसेच संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे मुस्लीम बांधवांनी जागोजागी स्वागत केले. आता आषाढी एकादशी व द्वादशी या दोन दिवस कुर्बानी न देण्याचा धाडसी निर्णय बेलापुरच्या मुस्लीम बांधवांनी घेतला आहे. राज्यात नव्हे देशात असा निर्णय घेणारे बेलापुर हे पहीले गाव ठरले आहे.

एक आदर्श : यावेळी जि.प. सदस्य शरद नवले, उपसरपंच अभिषेक खंडागळे, मोहसीन सय्यद, प्रफुल्ल डावरे, हाजी ईस्माईल शेख, देविदास देसाई, आदिंनी मनोगत व्यक्त केले. समाजापुढे आदर्श ठेवण्याचे काम नेहमीच या गावाने केले आहे. सण, उत्सव शांततेत पार पाडा, याकरीता घेण्यात आलेल्या शांतता समीतीच्या बैठकीत मुस्लीम बांधवांनी एक वेगळाच आदर्श घालुन दिला असल्याचे मत पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी व्यक्त केले.

वैद्यकीय बिल मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात १३ हजार रुपयांची लाच घेताना शिक्षण उपसंचालक वरिष्ठ लिपिकावर एसीबीची कारवाई.


अमरावती (प्रतिनिधी) : वैद्यकीय प्रतिपुर्तीचे बिल मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात १३ हजार रुपयांची लाच घेताना शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाला ट्रॅप करण्यात आले. २१ जून रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयस्थित माध्यमिक विभागातील कक्ष क्रमांक चारमध्ये त्याने लाच स्विकारली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. रुपेश प्रताप सिंग ठाकूर (३३) असे लाचखोरचे नाव आहे.

यातील तक्रारदार हे वाशिम जिल्हयातील एका कनिष्ट महाविद्यालयात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या वडिलांवर मुंबई येथे उपचार झाला. त्यांनी वडिलांच्या ३.३७ लाख रुपयांचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे बिल मंजुरीसाठी येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयात टाकले. ते मंजूर करण्यासाठी वरिष्ठ लिपिक रुपेश ठाकूर हा १५ हजार रुपये लाच मागत असल्याची तक्रार त्या लिपिकांनी अमरावती एसीबीकडे नोंदविली. तक्रारीची २१ जून रोजी पडताळणी केली. पडताळणीदरम्यान ठाकूरने लाचेची मागणी करून १३ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. व लगेचच त्याला त्याच्याच कार्यालयात लाचेची ती रक्कण स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरूध्द शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कार्यवाही

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक मारूती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षकद्वय योगेशकुमार दंदे व अमोल कडू यांच्या नेतृत्वातील अंमलदार नंदकिशोर गुल्हाने, आशिष जांभोळे, शैलेश कडू, चालक पीएसआय सतीश किटुकले, चंद्रकांत जनबंधू आदींनी केली.

रत्नागिरी पाेलिस भरतीत बीडच्या उमेदवारा ने दिले बनावट प्रमाणपत्र, गुन्हा दाखल.

रत्नागिरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यात २०२१ साली झालेल्या पोलिस शिपाई भरतीमध्ये बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. बीड जिल्ह्यातील उमेदवाराने हा प्रताप केला असून, त्याला भरती प्रक्रियेतून बाद करण्यात आले आहे. बनावट दस्ताऐवज सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.धर्मराज राम दुधाळ (२६, रा. पाथर्डीनगर, हिवरसिंगा ता. शिरूर, जि. बीड) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध तत्कालीन रत्नागिरी जिल्हा पोलिस उपअधीक्षक (गृह) यांनी तक्रार दाखल केली आहे. राज्य शासनाकडून पोलिस शिपाई भरती २०२१ घेण्याच्या सूचना सर्व जिल्हा पोलिसांना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार मे महिन्यात रत्नागिरी जिल्हा पोलिसांकडून पोलिस शिपाई भरती घेण्यात आली.धर्मराज दुपाल यांची इतर मागास प्रवर्ग प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणामध्ये निवड करण्यात आली होती. त्यासंबंधी दुधाळ याने आपण प्रकल्पग्रस्त असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. प्रमाणपत्राची सत्यता तपासण्यासाठी बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविले. बीड जिल्हाधिकारी यांनी संबंधित प्रमाणपत्र हे बनावट  असल्याचे सांगितले.प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड होताच दुधाळ याची प्राथमिक चौकशी पोलिसांकडून करण्यात आली. यावेळी आपण बनावट प्रमाणपत्र तयार केल्याची कबुली त्याने दिली. याप्रकरणी दुधाळ विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पाेलिस करत आहेत.

खळबळजनक घटना! ५ हजारांची लाच घेताना पोलिस कर्मचारी रंगेहाथ पकडला.

बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या लाचखोरीत विशेषत:पोलिस दल आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. काल-परवाच वडवणी येथील एका पोलिस कर्मचाऱ्यास लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली होती. आता गुरूवारी शिरूर  पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहेत.
अदखलपात्र गुन्हात मदत करण्यासाठी 5 हजार स्वीकारताना शिरूर पोलीस   ठाण्यातील कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले आहे. शिवाजी श्रीराम सानप (वय 41) असं लाचखोर कर्मचाऱ्याचं नाव आहे. शिवाजी सानप यांनी तक्रारदाराकडून अदखपाञ गुन्ह्यात मदत करण्यासाठी 10 हजाराची मागणी केली होती. 
तडजोडी अंती 5 हजारात तडजोड झाली. दरम्यान तक्रारदाराची मुळीच लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने ही माहिती लाचलुचपत पथकाला दिली. माहिती मिळताच पथकाने सापळा रचून सानप यांना रंगेहाथ लाच घेताना पकडले. सानप यांच्यावर लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.