केज (प्रतिनिधी): तालुक्यातील टाकळी फाटा येथे आयोजित संगीत रामकथा ऐकण्यासाठी गेलेल्या एका महिला तलाठ्याच्या गळ्यातील २ लाख ३७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात चोरट्याने लंपास केले आहे. गर्दीचा फायदा घेत गुरुवारी दुपारी ही चोरी करण्यात आली असून, याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टाकळी फाटा येथे हभप रामायणाचार्य रामराव महाराज ढोक (नागपूरकर) यांची संगीत रामकथा आयोजित करण्यात आली आहे. या कथेसाठी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) आशा विजयसिंह काकडे (रा. साबला) या आपल्या कुटुंबासह गेल्या होत्या. दुपारी २:३० ते ५:३० या वेळेत कथा ऐकत असताना, चोरट्याने त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण अत्यंत शिताफीने चोरून नेले. कथा संपल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली.
पोलीस तपास सुरू.
आशा काकडे यांच्या फिर्यादीवरून केज पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक प्रल्हाद चव्हाण या प्रकरणाचा तपास करत आहेत. मोठ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये चोरांचे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, महिला भाविकांनी आपल्या दागिन्यांची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
No comments:
Post a Comment