Sunday, November 30, 2025

प्रभाग १५ अ च्या सुजान मतदारांचा एक मुखी निर्णय.अपक्ष उमेदवार अजय भैय्या चौधरी यांचीच वाजणार विजयाची शिट्टी!

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) प्रभाग क्रमांक १५ अ आज अक्षरशः “शिट्टीच्या गजराने” दुमदुमला होता. मागास प्रवर्गातील अपक्ष उमेदवार अजयभैय्या चौधरी यांच्या भव्य प्रचार फेरीने संपूर्ण प्रभागात अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण निर्माण केले. गोरगरीबांच्या मदतीला नेहमी धावून जाणारा, प्रामाणिक आणि लोकसंग्रही कार्यकर्ता म्हणून अजयभैय्या चौधरी यांची प्रतिमा मतदारांच्या मनात खोलवर रुजली असल्याचे चित्र या फेरीत प्रकर्षाने दिसले. “हा माणूस आमचा आहे आणि त्यालाच आम्ही जिंकवणार!” — असा एकमुखी निर्धार नागरिकांनी व्यक्त केला.
अपक्ष उमेदवार अजय चौधरी यांनी प्रभागातील प्रत्येक घरपोच जाऊन मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. हजारोंच्या संख्येने निघालेल्या रॅलीत नागरिकांच्या अडचणी, अपेक्षा आणि विकासाच्या गरजांवर सविस्तर चर्चा करत चौधरी यांनी मतदानरूपी आशीर्वादाची विनंती केली.
प्रभागातील माता-भगिनींनी पारंपरिक औक्षण करून अजयभैय्या चौधरी यांचे मंगल स्वागत केले, तर युवकांनी शिट्ट्या, घोषणाबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण वातावरणात उत्साहाची उधळण केली. “पंधरा अ मध्ये अजयभैय्या चौधरी” हे घोषवाक्य रस्तोरस्त्यावर गुंजत होते.
अनेक मतदारांनी अजय चौधरी यांच्या स्वच्छ प्रतिमा, मेहनती स्वभाव, सर्वसामान्यांची कळकळ आणि विकासाभिमुख दृष्टीकोनावर भर देत, “प्रभागाचे खरे नेतृत्व अजयभैय्याच!” असा ठाम विश्वास व्यक्त केला. “त्यांना प्रचंड मतांनी विजयी करू” असा जनतेचा निर्धार आज स्पष्टपणे उमटला.
फेरीत प्रचारप्रमुख पापसिंह ठाकूर, संभाजी देशमुख, मुन्ना भैय्या सावजी, शुभम परदेशी, महिपाल ठाकूर, भगतसिंह ठाकूर, अविनाश शुक्ला यांच्यासह हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले.  आजच्या भव्य प्रतिसादामुळे “शिट्टीचा गजर” हा प्रभाग १५ अ मधील बदलाचा संदेश ठरला असून, अजयभैय्या चौधरी यांची उमेदवारी अभूतपूर्व पद्धतीने बळकट झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

बारामतीच्या नगरपरिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट.राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक पुढे ढकलली.

बारामती (प्रतिनिधी) अवघ्या दोन दिवसांवर मतदान येऊन ठेपले असतानाच राज्य निवडणूक आयोगाने बारामती नगरपरिषद निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली आहे. त्यामुळे आता २ डिसेंबरऐवजी २० डिसेंबर रोजी नगराध्यक्षपदासह इतर सर्व ४१ नगरसेवकांच्या निवडणुकीचे मतदान होणार आहे. ज्या-ज्या नगरपरिषदेमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विरोधात संबंधित उमेदवारांनी दाद मागितली होती, मात्र २२ नोव्हेंबरपर्यंत निकाल जाहीर न झालेल्या ठिकाणी निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. यामध्ये बारामती नगरपरिषद निवडणुकीचाही समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी हा सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार यामध्ये नव्याने कोणालाही उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही.
नगराध्यक्षांसह प्रभाग ८-ब, ११-ब, १३-ब, १५-ब, १७- अ, १९-ब या प्रभागामध्ये प्रथम छाननी होणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी नव्याने मुदत मिळेल. उर्वरित प्रभागात काहीही बदल होणार नाही. नगराध्यक्षांसह वरील सहा प्रभागातील उमेदवारांना खर्चाची मुदत वाढवून मिळणार आहे. उर्वरित सदस्यांना ही मुदतवाढ मिळणार नाही. या सर्व सदस्यांना बिनाखर्च प्रचार संपण्याच्या कालावधीपर्यंत प्रचार करावा लागणार आहे. मात्र आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले असल्याने त्यांच्यावर कसलाही परिणाम होणार नाही; ते बिनविरोधच नगरसेवक राहणार आहेत. त्यांच्या प्रभागातील मतदार फक्त नगराध्यक्षांनाच मतदान करणार आहेत.

नगराध्यक्षांसह इतर सहा ठिकाणी नवीन निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल  : निवडणूक कार्यक्रम ४ डिसेंबरला जारी होईल. १० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. तसेच अंतिम यादी ११ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. २० डिसेंबर रोजी मतदान होणार असून २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

नव्याने जाहीर झालेल्या निवडणूक प्रक्रियेमुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवार आणि राजकीय नेत्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. दरम्यान, रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती शहरातील आयोजित सांगता सभा रद्द करण्यात आली आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या एक वर्ष पूर्ण! मी डॉक्टर होईन पण ते पाहायला वडील नसतील वैभवी पित्याच्या आठवणी ने भावुक.


केज (प्रतिनिधी) वडिलांच्या हत्येला एक वर्ष झाले तरी आजही आम्ही न्यायाची वाट पाहत आहोत. समाजाने आजपर्यंत दिलेली साथ यामुळेच हा लढा आम्ही लढतो आहोत. मी त्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न नक्की पूर्ण करेन; मात्र ते माझ्यासोबत नसतील, याचं वाईट वाटतं, असे मस्साजोगचे माजी सरपंच स्व. संतोष देशमुख यांची वैभवी देशमुख हिने भावना अनावर कन्या होत सांगितले.

ज्या लोकांनी निष्पाप भावाला संपवले त्यांना फाशीची शिक्षा भेटल्यावरच आमचा समाधानाचा दिवस असेल. या प्रकरणाचे आरोपपत्र येत्या १२ डिसेंबरला होईल, असे धनंजय देशमुख यांनीसांगितले. 

दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला शनिवारी तिथीप्रमाणे एक वर्ष पूर्ण झाले.

तुमच्या मागण्या कृतीतून पूर्ण करेन : अजित पवा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यांच्याशी संवाद साधला.

तुमच्या मागण्या कृतीतून पूर्ण करून दाखवत आहे, असे पवार यांनी सांगितले असून, देशमुख कुटुंबाला विशेष मदतीचे आश्वासन दिले आहे. 

Saturday, November 29, 2025

डिग्रस परिसरात बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा. किशोर पवार, तालुका अध्यक्ष यांचे वनविभागाला निवेदन.

राहुरी (प्रतिनिधी)  राहुरी तालुक्यातील मौजे डिग्रस आणि परिसरातील वस्ती भागांमध्ये बिबट्यांचा वाढता वावर ग्रामस्थांसाठी मोठी चिंता बनला आहे. गेल्या काही दिवसांत कॅनॉल रोड, गावडे वस्ती, वाघमारे वस्ती, दळे वस्ती, बेलेकर वस्ती व बेल्हेकर वस्ती या ठिकाणी बिबट्याचे अनेक वेळा दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
बिबट्यांमुळे गायी, शेळ्या, कुत्रे यांसारख्या पाळीव प्राण्यांवर हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या असून, या भागांमध्ये दाट मानवी वस्ती असल्याने मानवी जीवितहानीचा धोका वाढला आहे, अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
या परिस्थितीची गंभीर दखल घेत गौसे आजम सेवाभावी संस्थाचे संस्थापक अली सय्यद अध्यक्ष सुल्तान शेख याच्या मार्गदर्शन खाली महाराष्ट्र राज्य, राहुरी तालुका यांच्या वतीने तालुका अध्यक्ष किशोर (उमेश) पवार यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाकडे निवेदन सादर करण्यात आले.
हे निवेदन मा. वनरक्षक अधिकारी आणि वन परीक्षेत्र अधिकारी, राहुरी यांच्या कडे देण्यात आले. निवेदन देताना अधिकारी लांबे साहेब, पाळंदे साहेब, तसेच स्थानिक नागरिक रविराज गावडे, उमेश पवार, प्रविण वाघमारे उपस्थित होते.

संस्थेने वनविभागास तातडीने सर्व आवश्यक उपाययोजना करून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची, तसेच ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी योग्य पावले उचलण्याची मागणी केली आहे.

ऊस दराचा वाद अवास्तव भाव देणे अशक्य ऊस शिल्लक राहिल्यास आंदोलक जबाबदार : आ. प्रकाश सोळंके

आमदार सोळंके यांनी सांगितले की, ‘‘मतदारसंघात ऊस शिल्लक राहिल्यास याची जबाबदारी आंदोलकांवर राहील.’’ तसेच, आंदोलकांच्या मागण्या ‘अवास्तव’ असून एवढा भाव देणे कारखान्यांना अशक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमदार सोळंके यांनी खासगी कारखान्यांनी दिलेल्या ३ हजार रुपयांच्या भावाबाबत बोलताना सांगितले की, त्यांना कोणीही भांडवल पुरवू शकते, याचा अर्थ आम्हीही तेवढाच भाव द्यावा असे नाही. आम्ही ३२ वर्षांपासून एफआरपीपेक्षा जास्त भाव देण्याचा प्रयत्न करत असतो. सध्या चालू असलेले आंदोलन राजकीय असल्याचे सांगत आंदोलनाला वेगळे वळण दिले. कारखाने बंद करण्याचे काम आंदोलकांनी केले आहे, त्यामुळे ऊस शिल्लक राहिल्यास तेच जबाबदार राहतील, असे म्हणत आ. सोळंके यांनी आंदोलकांच्या मागणीला अप्रत्यक्ष विरोधच केल्याचे स्पष्ट झाले आहे.

आ. सोळंकेनी झटकले अंग, शेतकरी नाराज.

या वादातून अंग झटकण्याचा प्रयत्न आमदार सोळंके यांनी केला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, ‘‘मी सध्या कारखान्याचा केवळ संचालक आहे. कारखान्याचे चेअरमन माझा मुलगा आणि व्हाइस चेअरमन पुतण्या असून, ते हा प्रश्न हाताळत आहेत व मी निवडणूक हाताळत आहे. ‘‘ऊस भावाबाबत सोळंके यांनी अशा प्रकारे हात झटकल्याने शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शेतकरी नेत्यांकडून सोळंकेंवर टीका.

सोळंके यांच्या वक्तव्यावर शेतकरी नेते व शेतकरी संघर्ष समिती सदस्य भाई गंगाभीषण थावरे यांनी सडकून टीका केली आहे. उसावर पाच वेळा आमदार होणारे प्रकाश सोळंके यांनी ऊस उत्पादकांच्या हिताची जाणीव ठेवून वक्तव्य करावे. असे बेताल वक्तव्य केल्यास ऊस उत्पादक शेतकरी त्यांना त्यांची जागा दाखवणार आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना वाढीव भाव न दिल्यास आम्ही त्यांच्या कारखान्यावर आंदोलन करणार आहोत, असे सांगितले

डिव्हायडरवर चढल्याने एस.पी.नवनीत काँवत यांच्या गाडीचा केज जवळ अपघात


केज (प्रतिनिधी) बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या गाडीचा शनिवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास केज येथे अपघात झाला. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. शुक्रवारी रात्री परळी येथील विद्यानगर भागात गोळीबाराची घटना घडल्यामुळे पोलिस अधीक्षक काँवत हे तातडीने परळी येथे गेले होते. परळीहून केज मार्गे बीडकडे परतत असताना केज येथील केजडी नदी ओलांडल्यानंतर हा अपघात झाला.

केजडी नदी ओलांडल्यानंतर लगेच रस्त्यावर डिव्हायडर सुरू झाला होता. चालकाच्या वेळेत लक्षात न आल्यामुळे त्यांची गाडी उजव्या बाजूने डिव्हायडरवर चढली आणि अपघात झाला. त्यांच्या गाडीच्या अगदी पाठीमागे बॉडीगार्डची गाडी होती, त्यामुळे डिव्हायडरवर चढलेली गाडी तत्काळ खाली घेण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पोलिस अधीक्षकांशी चर्चा केली. त्यानंतर केज पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आणि पोलिस अधीक्षक बीडकडे रवाना झाले.

मी सुखरूप - एसपी.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ‘काळजी करण्याचे कारण नाही, मी सुखरूप आहे.’ तसेच, त्यांच्यासोबत असलेली त्यांची टीमही सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले. अपघाताची तीव्रता जास्त असूनही जीवितहानी न होण्याचे कारण सांगताना ते म्हणाले, ‘गाडीत बसलेल्या सर्वांनी सीट बेल्ट लावले होते. त्यामुळे गाडी डिव्हायडरवर आदळूनही कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.’

English
हिंदी सारांश
Web Title : Beed SP's car accident near Kej after Parli shooting visit.

Web Summary : SP Navneet Kanwat's car met with an accident near Kej after visiting Parli due to a shooting incident. Fortunately, no one was injured. The accident occurred when the car hit a divider. SP Kanwat confirmed everyone was safe due to wearing seatbelts.

Thursday, November 27, 2025

बिग ब्रेकिंग! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील “या” ठिकाणच्या निवडणूकांना स्थगिती.


मुंबई (कांतीकारी साथी) राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या 2 डिसेंबर रोजी राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

दरम्यान त्यानंतर लगेचच राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका देखील होण्याची शक्यता आहे, आणि त्यानंतर महापालिकांच्या निवडणुका होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान आता नगर परिषद निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे, निवडणूक आयोगानं या निवडणुकीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे, काही जागांवरच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे.

नेमकं काय आहे कारण?

निवडणूक आयोगाकडून मनमाड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दहा, तसेच धुळ्याच्या पिंपळनेरमधील नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दोन आणि बीड जिल्ह्यातल्या गेवराई नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 11 येथील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. मनमाड नगपरिषदेच्या प्रभाग क्रमांक दहाची निवडणूक निवडणूक आयोगाकडून स्थगित करण्यात आली आहे, प्रभाग क्रमांक दहा मधून निवडणूक लढवणारे ठाकरे गटाचे उमेदवार नितीन वाघमारे यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानं ही निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे धुळ्याच्या पिंपळनेर नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक दोन ची देखील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बीड येथील गेवराई नगरपरिषद येथील प्रभाग 11 चे उमेदवार श्रीमती दुरदाना बेगम सलीम फारुकी यांचही निधन झाल्यानं या प्रभागातील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.

Wednesday, November 26, 2025

स्वार्थी राजकारणासाठी स्व.केशरबाई क्षीरसागर यांच्या धर्मनिरपेक्ष विचारधारेला तिलांजली देत.जातीवादी पक्षात प्रवेश डॉ. योगेश क्षीरसागरांना बीडची जनता स्वीकारेल का?


बीड (प्रतिनिधी) स्व. केशरबाई क्षीरसागर यांच्या धर्मनिरपेक्ष विचारधारेला डाॅ. योगेश क्षीरसागर यांनी मूठ माती देत भाजपची कास धरली. क्षीरसागर कुटुंबाच्या इतिहासाचा विचार केला तर राजकीय तडजोड म्हणून देखील काकूंच्या विचारांशी फारकत आज पर्यंत कोणीच घेण्याचं धाडस केलं नव्हतं. त्यामुळेच बीड करांनी या घराण्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं. पण त्याच विचारांना तिलांजली देणाऱ्या डॉ.योगेश क्षीरसागरांच्या मतलबी राजकारणाला जनता थारा देत नसल्याचं चित्र सध्यातरी न प निवडणुकीत दिसत आहे.
स्व. केशरबाई क्षीरसागर यांनी कधीच जातीपातीचं धर्माचं राजकारण केलं नाही. विरोधकांनाही आपलंसं करत बीडच्या विकासाला चालना दिली. अगदी त्याच धर्मनिरपेक्ष जात विरहित राजकारणाचा वसा पुढच्या पिढीने देखील घेतला. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत डॉ.भारतभूषण क्षीरसागर असोत की जयदत्त क्षीरसागर असोत. पुढच्या पिढीत संदीप क्षीरसागर असोत यांनी कधीच मतलबी राजकारणासाठी स्व. काकूंच्या विचारधारेशी तडजोड अत्यंत बिकट परिस्थितीत देखील कधीच केली नाही. त्याच विचारधारेवर चालत असताना जयदत्त क्षीरसागर यांनी देखील कधीच विशिष्ट धर्माची विचारधारा बाळगणाऱ्या पक्षाचा हात स्वतःच्या सोयीसाठी धरला नाही. त्यामुळेच जयदत्त क्षीरसागर यांनी जातीयवादी पक्षात प्रवेश करण्याची भूमिका घेतली नाही. त्यामुळेच आजही बीडच्या राजकारणामध्ये त्यांची ताकद पूर्वी इतकीच टिकून आहे.डाॅ. भारतभूषण क्षीरसागर आणि नगरपालिका निवडणूक इतकं समीकरण पक्क होतं की “अध्यक्ष” म्हणून कायम त्यांचा गौरव बीडच्या जनतेने केला. त्यांच्याही विचारधारेपासून योगेश क्षीरसागर दूर गेले.संदीप क्षीरसागर देखील तोच राजकीय वसा घेऊन पुढे चालत आहेत. काकूंच्या विचार धारेवरच चालायचं कुठल्याही परिस्थितीत तडजोड करायची नाही हाच विचार स्वीकारत संदीप क्षीरसागरांनी कुटुंबातील वादाने तोंड काढल्यानंतर देखील मागच्या न‌.प. निवडणुकीत काकू – नाना विकास आघाडी स्थापन करून चांगलं यश मिळवलं. त्याचाच फायदा पुढे त्यांना कायम होत आला. त्यामुळेच प्रत्येक समस्येचे समाधान “बंगला”हेच आहे. असं सांगितलं जायचं. प्रत्येक जाती धर्मातील लोक हक्काने बंगल्यावर जाऊन आपली कैफियत मांडत काम करावंच लागेल म्हणून भांडायला देखील मागेपुढे पाहत नसल्याचं आज पर्यंतच चित्र कायम राहिलं गेलं.

मात्र जनतेत निवडणुकीपुरतचं मिसळायचं काकूंच्या नावावर मत मागायची त्यानंतर जनतेला विसरून जायचं. हा फंडा कायम ठेवत डॉ. योगेश क्षीरसागर यांनी जनतेच्या तोंडाला आजपर्यंत फक्त पानच पुसली. योगेश क्षीरसागर कडून आश्वासनांची खैरातच जनतेच्या वाट्याला आली. आता तर जातीयवादी चेहऱ्याच्या पक्षाशी हात मिळवणी करत बीडच्या जनतेला स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपाच्या दावणीला बांधण्याच काम डॉ. योगेश क्षीरसागर यांनी सुरू केलं आहे. त्यांनाही राष्ट्रवादी अजित पवार गटाशी जमेनासं झाल्यानंतर या निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांच्यासारखीच आघाडी करता आली असती.जनतेला काकूंच्या विचारधारेवर मत मागता आली असती. त्यात मोठ्या प्रमाणावर देखील यश निश्चित मिळालं असतं. मात्र स्वार्थाची पट्टी डोळ्यावर बांधली की कुटुंबाच्या वारसाने चालत आलेल्या विचारांची राख रांगोळी होते आणि तिथेच अध:पतनाला सुरुवात होते हा आजपर्यंतचा इतिहास आहे. मुस्लिम,दलित, मराठा इतर छोट्या छोट्या जाती धर्माच्या लोकांनी भाजपचा झेंडा हातात घेतलेल्या योगेश क्षीरसागर यांना का साथ द्यावी? जे स्वतःच्या कुटुंबाने जपलेल्या संस्कार, विचारधारेला मूठ माती स्वार्थासाठी देऊ शकतात ते प्रसंगी जनतेला मुठ माती द्यायला का मागे पुढे पाहणार नाहीत? असा प्रश्न बीडच्या जनतेतून विचारला जात आहे. जे काकूंचे ,डाॅ. भारत भूषण क्षीरसागर यांच्या विचारांचे झाले नाहीत ते बीडकरांचे कसे होणार? उद्या योगेश क्षीरसागर ज्या पक्षात गेले आहेत त्या पक्षाच्या विचारधारेनूरुप गरळ ओकणार नाहीत याची शाश्वती काय? असे एक ना अनेक प्रश्न योगेश क्षीरसागरांबाबत बीडच्या जनतेच्या डोक्यात घोंगावत आहेत.बीडकर स्वार्थी राजकारणाला नक्कीच बळी पडणार नाहीत असं सध्याचं तरी चित्र बीड नगरपालिकेत पाहायला मिळत आहे.

बर्दापूरहून अंबाजोगाई कडे येणाऱ्या इनोव्हा क्रिस्टा कार मधून गुटखा तस्करी 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त.

अंबाजोगाई (प्रतिनिधी) बर्दापूरहून अंबाजोगाई कडे येणाऱ्या इनोव्हा क्रिस्टा कार मधून प्रतिबंधित गुटखा तस्करी होत असताना स्थानिक गुन्हे शाखेने पकडला. गुटख्यासह 25 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी यावेळी जप्त केला. ही कारवाई बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास केली.
अंबाजोगाई भागात पेट्रोलिंग करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अंबाजोगाई कडे गुटखा आणण्यात येत असल्याची माहिती मिळाली. दरम्यान मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने अंबाजोगाई जवळील शेलू आंबा टोल नाक्यावर पोलिसांनी सापळा लावला. दरम्यान बर्दापूरहून अंबाजोगाई कडे येत असलेल्या इनोव्हा क्रिस्टा क्र.MH.14 GU.0699 ची थांबवून तपासणी करण्यात आली. यावेळी गाडीत पाच लाख 26 हजार दोनशे रुपयाचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी बुधवारी पहाटे पाच वाजता केलेल्या या कारवाईत फारोख हामीद सय्यद वय 45 वर्षे रा. सय्यद गल्ली माजलगाव ता. माजलगाव या चालकाला पकडण्यात आले.गुटखा व इनिव्हा क्रिस्टा कार क्रमांक MH.14GU.0699 असा एकुण 25 लाख 26 हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त केला.याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हि कामगिरी पोलीस अधीक्षक,अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि शिवाजी बंटेवाड यांच्या आदेशाने केकान, गिते, भताने ,आंधळे या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

आपला माणूस कामाचा माणूस ! नगर सेवकपदाचे उमेदवार वैजनाथ कळसकर यांनी 500 रुपयेच्या बाँड दिली विकासाची हमी.

"त्याच पद्धतीने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ .संध्या दीपक देशमुख यांची सात आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी हा पॅटर्न राबवण्याचा संकल्प केला आहे. "

परळी (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रभाग क्रमांक १४ चे नगरसेवक पदाचे उमेदवार वैजनाथ कळसकर यांनी मतदारांना ५०० च्या बाँडवर विकास करण्याचे कायदेशीररित्या बांधील असल्याचे लिहून दिले आहे. हा अनोखा विकासाचा परळी शहरात पहिलाच आणि एकमेव उमेदवार ठरला आहे .जो कायदेशीर रित्या शहराच्या व वार्डाच्या विकासासाठी बांधील आहे. बाँडवर विकास करणार असल्याचे लिहून दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नगरसेवक पदाचे उमेदवार वैजनाथ कळसकर चर्चेचा विषय ठरले आहेत. मतदारांना विश्वासाचे हमी कायदेशीररित्या बॉंडवर देण्याचा प्रयोग किंवा विश्वास महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिल्यांदाच नगर परिषद निवडणुकीत दिसत असल्याने त्यांच्या नावाची चर्चा होत आहे. 
   या बॉण्डवर प्रभाग क्रमांक 14 चा 14 कलमी संकल्पित जाहीरनाम्यात त्यांनी प्रभागामध्ये कशा पद्धतीने विकास केला जाईल याबाबत विस्तृत दिले आहे. पावरलूम सोसायटीमध्ये सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याचे यंत्रणा उभारणार , प्रभागातील पाणी पातळी वाढावी यासाठी कूपनलिका इंधन विहीर यांचे जलभरण करणार, घरोघरी रेन वॉटर हार्वेस्टिंग द्वारे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी प्रयत्न करणार आहेत ज्यामुळे प्रभागात पाणी पातळी वाढेल. प्रभागातील सर्व पथदिवे रात्रीच्या वेळी अखंडित सुरू राहतील यासाठी प्रयत्न करणार , शिवाजीनगर, हनुमान मंदिर परिसरात नारीशक्ती सशक्तीकरण , सक्षमीकरण केंद्र उभारणार, यापूर्वी नगरपरिषद अंतर्गत झालेल्या भ्रष्ट कामांची चौकशी करणार,खा. बजरंग सोनवणे यांच्या खासदार निधीतून विकास कामांसाठी फंड उभा करणार अशा प्रकारचे अनेक विकास कामे पूर्ण करण्याचे आश्वासन बाँडवर लिहून दिले आहे. तसेच या नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार संध्या दीपक देशमुख व प्रभाग १४ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार वैजनाथ कळसकर व पल्लवी समीर कोरे यांना निवडून देण्याचे आवाहनही प्रभाग क्रमांक १४ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार वैजनाथ कळसकर यांनी मतदारांना केले आहे.
त्याच पद्धतीने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ .संध्या दीपक देशमुख यांची सात आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी हा पॅटर्न राबवण्याचा संकल्प केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.)गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.संध्या देशमुख यांनी माणिक नगर प्रभागातून उत्स्फूर्त प्रतिसाद

परळी (प्रतिनिधी)-शहरातील माणिक नगर प्रभागातील  मतदारांच्या गाठीभेटी तसेच प्रचार केला. या प्रभागामध्ये विकासकामे करण्यासाठी आपण उभे असल्याचे मतदारांना सांगितले. दरम्यान, या प्रभागात मोठ्या प्रमाणात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. महिलांनी प्रतिसाद देत सौ.संध्या देशमुख यांच्याशी संवाद साधला. माणिक नगर प्रभाग मध्ये अनेक नागरी सुविधा देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. यावेळी मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. 
अनुभवी आणि सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिलेलं व्यक्तिमत्व म्हणून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.संध्या देशमुख यांचे पती दिपक रंगनाथ देशमुख आहेत. अशा भावना मतदारांनी यावेळी संध्याताई यांच्याशी संवाद साधताना व्यक्त केल्या. मतदारांचा हा पाठिंबा बघता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार  पक्षाच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचे मानले जाते.यावेळी, त्यांच्या समावेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बीडमध्ये तिरंगी लढतीत जयदत्त क्षीरसागरांच्या एंट्रीने काका-पुतण्यात पुन्हा संघर्ष!


बीड (प्रतिनिधी): बीड नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पुन्हा एकदा एका पुतण्याला पाठिंबा देत दुसऱ्याला विरोध केला आहे. यामुळे क्षीरसागर काका-पुतण्यात पुन्हा एकदा संघर्ष पेटला आहे. राजकारणाचा अनुभव असलेले जयदत्त क्षीरसागर यांनी पहिल्यांदाच बीड पालिका निवडणुकीसाठी बैठक घेत भाजप उमेदवाराच्या प्रचाराला सुरुवात केली आहे, ज्यामुळे त्यांचे राजकीय स्थान स्पष्ट झाले आहे.

विधानसभेत जयदत्त क्षीरसागर यांनी पुतण्या आ. संदीप क्षीरसागर यांना विरोध करत डॉ. योगेश क्षीरसागर यांना साथ दिली होती. आताही त्यांनी त्यांनाच पाठिंबा देत भाजपसोबत भूमिका घेतली आहे. डॉ. योगेश यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या ऐनवेळी पक्षाकडून वारंवार डावलले जात असल्याचे कारण देत राष्ट्रवादी (अजित पवार गट) सोडत भाजपात प्रवेश केला. यामुळे बीड पालिकेतील राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेतृत्व पहिल्यांदाच पंडित बंधूंकडे (माजी आ. अमरसिंह आणि आ. विजयसिंह पंडित) आले आहे. आता जयदत्त क्षीरसागर यांच्या एन्ट्रीने आणखीन रंगत येणार आहे.

तिरंगी लढत अन् अण्णांची गुगली.

बीड पालिकेवर आतापर्यंत क्षीरसागर कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, अंतर्गत मतभेदांमुळे आमदार संदीप क्षीरसागर (शरद पवार गट) हे आपल्या उमेदवारांसाठी मैदानात पूर्ण ताकदीनिशी उतरले आहेत. दुसऱ्या बाजूला डॉ. योगेश क्षीरसागर, डॉ. सारिका क्षीरसागर यादेखील भाजपकडून उमेदवारांसाठी धावपळ करत आहेत. या पार्श्वभूमीवर, जयदत्त क्षीरसागर यांनी नुकतीच गेवराईतील भाजपच्या उमेदवार गीता पवार यांचे पती बाळराजे पवार आणि माजी मंत्री बदामराव पंडित यांची भेट घेत राजकीय गुगली टाकली. आता भाजप (योगेश क्षीरसागर / जयदत्त समर्थक), राष्ट्रवादी (अजित पवार गट / पंडित बंधू) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट / संदीप क्षीरसागर) अशी तिरंगी लढत बीडमध्ये अधिक तीव्र झाली आहे.

संदीप क्षीरसागरांना पुन्हा विरोध.

संदीप क्षीरसागर हे जयदत्त क्षीरसागर यांच्यापासून राजकीय मतभेदामुळे वेगळे झाले. त्यांनीच विधानसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव केला. मागील निवडणुकीत त्यांनी भाऊ डॉ. योगेश यांच्यावर निसटता विजय मिळवला. तेव्हा जयदत्त क्षीरसागर यांनी डाॅ. योगेश यांना पाठिंबा दिला होता. परंतु, विजय मिळवता आला नाही. आतादेखील त्यांनी डॉ. योगेश यांच्याच पाठीमागे उभे राहात भाजपचा प्रचार सुरू केला आहे. संदीप क्षीरसागर हे त्यांचे राजकीय विरोधक कायम असल्याचे दिसते.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. राज्यातील ६०० शाळा बंद!

मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्रातील शालेय शिक्षण क्षेत्रासाठी एक गंभीर आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. राज्यातील शिक्षण विभागाने सुरू केलेल्या ‘शिक्षक समायोजन प्रक्रिया’मुळे तब्बल 600 मराठी शाळा बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम थेट 25 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांवर होऊ शकतो, अशी शिक्षक, पालक आणि विविध संघटनांची तीव्र चिंता आहे.

गेल्या काही वर्षांपासून शिक्षण विभागाने घेतलेल्या काही निर्णयांवर मोठे वादंग झाले आहेत. त्यामुळे ते निर्णय माघारी घ्यावे लागले. आता नवीन समायोजन निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येईल, असा आरोप शिक्षक संघटनांकडून होत आहे.

शिक्षक समायोजनामुळे 600 शाळा संकटात? पालक–शिक्षकांमध्ये नाराजी. 

राज्य शासनाने शिक्षक समायोजन प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेनंतर अनेक शाळांमधील शिक्षक कमी होणार असून काही शाळांमध्ये तर एकही शिक्षक मंजूर नसेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे 600 मराठी शाळा बंद पडू शकतात, असा दावा करण्यात आला आहे.

शिक्षक नसल्यास शाळा चालवणे अशक्य बनते, त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक लहान शाळांना थेट बंदचा धोका निर्माण झाला आहे. अंदाजे 25 हजार विद्यार्थी एकाच रात्रीत शाळाबाह्य ठरू शकतात, अशी भीतीही संघटनांकडूनव्यक्त होत आहे. त्यामुळे शिक्षकांसह पालकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

 2024-25 च्या सेवक संचानंतर प्रकरण बिघडले 

मार्च 2024 मध्ये शिक्षण विभागाने जारी केलेल्या जीआरनुसार 2024–25 चा सेवक संच मंजूर करण्यात आला. याच सेवक संचानुसार राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांची संख्या निश्चित होते. परंतु या संचानुसार शेकडो मराठी शाळांना एकही शिक्षक मंजूर झाला नाही, तर अनेक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या निम्म्यापेक्षा कमी झाली. 

पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर यांसह जवळपास प्रत्येक जिल्ह्यात 15–20 शाळांमध्ये शिक्षक मंजूर नाहीत. अनेक शाळांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने सर्व याचिका फेटाळल्याने शिक्षण संचालकांनी 5 डिसेंबर 2025 पर्यंत शिक्षक समायोजन पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

नव्या नियमांमुळे शाळांना मोठा फटका :

2024 पूर्वी नववी–दहावीच्या वर्गात किमान 3 ते 40 विद्यार्थी असतील तर 3 शिक्षक मंजूर केले जात होते. पण मार्च 2024 च्या नवीन जीआरमध्ये नववी–दहावीमध्ये किमान 20 विद्यार्थी असणे अनिवार्य करण्यात आले आहे. वीसपेक्षा कमी विद्यार्थ्यांमुळे शिक्षक मंजूर होत नाहीत आणि अशा शाळांची संख्या राज्यात मोठी आहे

याच कारणामुळे शिक्षक समायोजन प्रक्रियेला शिक्षक, विद्यार्थी आणि पालक जोरदार विरोध करत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने हा निर्णय रद्द करण्यासाठी शिक्षणमंत्री दादा भुसे आणि शिक्षक संचालकांकडे निवेदन दिले आहे.

राज्यातील शैक्षणिक व्यवस्थेवर मोठा परिणाम करणाऱ्या या निर्णयावर शासनाने तातडीने ठोस पावले उचलली नाहीत तर 6 डिसेंबरनंतर मोठ्या संख्येने मराठी शाळा बंद पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या संपूर्ण राज्यात शैक्षणिक क्षेत्रातून आंदोलन आणि निषेधाची चिन्हे दिसू लागली आहेत.