बारामती (प्रतिनिधी) अवघ्या दोन दिवसांवर मतदान येऊन ठेपले असतानाच राज्य निवडणूक आयोगाने बारामती नगरपरिषद निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली आहे. त्यामुळे आता २ डिसेंबरऐवजी २० डिसेंबर रोजी नगराध्यक्षपदासह इतर सर्व ४१ नगरसेवकांच्या निवडणुकीचे मतदान होणार आहे. ज्या-ज्या नगरपरिषदेमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विरोधात संबंधित उमेदवारांनी दाद मागितली होती, मात्र २२ नोव्हेंबरपर्यंत निकाल जाहीर न झालेल्या ठिकाणी निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. यामध्ये बारामती नगरपरिषद निवडणुकीचाही समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी हा सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार यामध्ये नव्याने कोणालाही उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही.
नगराध्यक्षांसह प्रभाग ८-ब, ११-ब, १३-ब, १५-ब, १७- अ, १९-ब या प्रभागामध्ये प्रथम छाननी होणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी नव्याने मुदत मिळेल. उर्वरित प्रभागात काहीही बदल होणार नाही. नगराध्यक्षांसह वरील सहा प्रभागातील उमेदवारांना खर्चाची मुदत वाढवून मिळणार आहे. उर्वरित सदस्यांना ही मुदतवाढ मिळणार नाही. या सर्व सदस्यांना बिनाखर्च प्रचार संपण्याच्या कालावधीपर्यंत प्रचार करावा लागणार आहे. मात्र आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले असल्याने त्यांच्यावर कसलाही परिणाम होणार नाही; ते बिनविरोधच नगरसेवक राहणार आहेत. त्यांच्या प्रभागातील मतदार फक्त नगराध्यक्षांनाच मतदान करणार आहेत.
नगराध्यक्षांसह इतर सहा ठिकाणी नवीन निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल : निवडणूक कार्यक्रम ४ डिसेंबरला जारी होईल. १० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे. तसेच अंतिम यादी ११ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. २० डिसेंबर रोजी मतदान होणार असून २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
नव्याने जाहीर झालेल्या निवडणूक प्रक्रियेमुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवार आणि राजकीय नेत्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. दरम्यान, रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती शहरातील आयोजित सांगता सभा रद्द करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment