Sunday, March 30, 2025

ईदच्या पूर्वसंध्येला गेवराईतील अर्धमसला गावातील मस्जिदमध्ये स्फोट! दोन आरोपी ताब्यात.


गेवराई (प्रतिनिधी)  उरूस मिरवणुकीत झालेल्या वादानंतर गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावातील मस्जिद मध्ये जिलेटिन च्या सहाय्याने स्फोट घडवण्यात आला. या प्रकरणी दोन आरोपीना ताब्यात घेण्यात आले असून नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केले आहे.

हा स्फोट नेमका का घडवला, याचं कारणही पोलिसांनी शोधून काढलं आहे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मशिदीत जाऊन जिलेटिनच्या कांड्या वापरून हा स्फोट घडवला आहे. हा स्फोट घडल्यानंतर अर्धमसला गावच्या सरपंचांनी तातडीने घटनेची माहिती पोलिसांना देत अवघ्या २० मिनिटांत त्यांनी घटनास्थळ गाठलं. सरपंचाच्या सहकार्यामुळे आम्ही दोन्ही आरोपींना सकाळी सहा वाजता अटक केली. सर्वांनी शांततेत राहावे असे आवाहन बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केलं आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी सांगितलं की, मशीद स्फोट प्रकरणी तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहेत. गावामध्ये शांतता आहे. बीड जिल्ह्यातील सर्व लोकांना आव्हान आहे की शांतता राखावी. झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे. पोलीस तत्पर आहे. लगेच पोलिसांनी येऊन दोन-तीन तासांमध्ये आरोपींना पकडले आहे. आम्ही आमच्या शंभर टक्के काम केले आहे. लोकांनी शांततेत राहावे. दोन्ही सण शांततेत सादरी करावेत, असं आवाहन कांवत यांनी केलं आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उरूस मिरवणुकीत झालेल्या किरकोळ वादातून हा स्फोट घडवल्याची माहिती समोर येत आहे. ज्यावेळी स्फोट घडवला, तेव्हा आरोपी दारूच्या नशेत होते, अशी प्राथमिक माहिती आहे. गाव शांत आहे. घटनेनंतर मशीद स्वच्छ केली आहे. गावातील सगळे लोक एकत्रित राहत आहोत. कुठलाही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन गावातील मुस्लिम बांधवांनी केलं आहे

Saturday, March 29, 2025

28 वर्षाची परंपरा कनकालेश्वर महोत्सव नववर्षाच्या स्वागताला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जीवनपट उलगडणार संस्कार भारती!


बीड (प्रतिनिधी) तब्बल 28 वर्षाची परंपरा लाभलेल्या कनकालेश्वर महोस्तवात यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावरील नाटिका सादर केली जाणार आहे. नृत्य, नाटक,गवळण गायन आणि पखवाज वादनाने यावर्षी मराठी नववर्षाचे स्वागत केले जाणार आहे अशी माहिती संस्कार भारती बीडच्या संयोजकांनी दिली आहे.

संस्कार भारती बीड शाखेच्या वतीने गेल्या 28 वर्षांपासून कनकालेश्वर महोत्सव साजरा केला जातो चैत्रशुद्ध प्रतिपदा अर्थात पाडव्याच्या दिवशी मराठी नववर्षाचे स्वागत आगळ्यावेगळ्या पद्धतीने कंकालेश्वर मंदिराच्या जलाशयामध्ये केले जाते. या जलाशयामध्ये पाण्यावर तरंगणारा रंगमंच तयार करून त्यावर वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात पुष्पवृष्टी करून हजारो नागरिकांच्या उपस्थितीत नववर्षाचे स्वागत केले जाते

राज योगिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे यंदाचे त्रिशताब्दी जन्मवर्ष आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनपटावर आधारित एक नाटिका सादर केली जाणार आहे तसेच कृष्णा साळुंखे यांचे पखवाज वादन आणि साई नृत्यलय बीडच्या वतीने तरंगत्या रंगमंचावर नृत्यविष्कार सादर केला जाणार आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन युवा नेते योगेश क्षीरसागर यांच्या हस्ते आणि पश्चिम क्षेत्र प्रमुख चंद्रकांत घरोटे, भरत लोळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि स्नेहल पाठक यांच्या अध्यक्षेतेखाली होईल. या कार्यक्रमात संस्कार भारतीचे माजी महामंत्री कुलदीप धुमाळे यांचा अमृत महोत्सवी सत्कार करण्यात येणार आहे.
30 मार्च 2025 रोजी कंकालेश्वर मंदिर परिसरात होणाऱ्या या दिमागदार सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी हजारो बिडकर रसिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्कार भारती बीडच्या आयोजकांनी केले आहे.

गुढीपाडव्याच्या पावन दिवशी श्री शंभू महादेव वाघाच्या काठी व कावडीची परळीत मिरवणूक सोहळा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पंचम स्वयंभू ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैद्यनाथांच्या  पुण्यभूमी असलेल्या परळी नगरीत गुढीपाडव्याच्या पावन दिवशी परंपरेनुसार 118 वर्षांची परंपरा असलेल्या श्री शंभू महादेवाच्या वाघाच्या काठी व कावडीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती  परळी चे मठपती    दयानंद त्रिंबक स्वामी  यांनी  दिली आहे.
यंदाचा श्री शंभू महादेवाची काठी व  कावड हा पवित्र उत्सव दयानंद स्वामी मठपती, जंगम गल्ली यांच्या निवासस्थानी साजरा होणार आहे.
विधीवत स्थापना - दिनांक 30 मार्च रोजी सकाळी 10 वाजता, वाघाच्या काठीची व कावडीची स्थापना होईल. महाआरती - सायंकाळी 5 वाजता, भक्तिमय वातावरणात भव्य महाआरती होईल.  सवाद्य मिरवणूक - त्यानंतर वाघाची काठी व कावडीची भव्य मिरवणूक सनई-ताशांच्या गजरात निघेल.
यंदा 21 फूट उंच वाघाची काठी परंपरेनुसार तळहातावर खेळवत, भक्तिभावाने नगरपरिक्रमा करेल. सायंकाळी 5 वाजता ही भव्य मिरवणूक   जंगम गल्ली येथून निघेल. नांदूर वेस, आंबेवेस, पेठ गल्ली, देशमुख पार मार्गे   माजी आमदार कै. लक्ष्मणराव देशमुख यांच्या गढीच्या वाड्यात पोहोचेल. तेथे काठी व कावडी अकरा दिवसांसाठी विराजमान होईल, आणि या काळात भाविकांना दर्शन व पूजनाचा लाभ घेता येईल.
या धार्मीक कार्यक्रमाचा परळी शहर व पंचक्रोशीतील भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन समस्त मठपती परिवार यांनी केले आहे.

संत रानबा महाराज मंदिर येथे गुढीपाडवा उत्सवाचे आयोजन.नववर्षा निमित्त पूजा, आरती व प्रसादाचे होणार वितरण.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी वैजनाथ येथील संत श्री रानवा महाराज मंदिर येथे आज रविवार दिनांक 30 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता हिंदू धर्मियातील नववर्ष गुढीपाडवा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त संत श्री रानबा महाराज यांची विधिवत पूजा व आरती होणार असून सकाळी दहा वाजता भाविक भक्तांना खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास परळी शहर व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संत श्री रानबा महाराज मंदिर ट्रस्टचे श्री ज्ञानेश्वर खर्डे व श्री रामेश्वर खर्डे यांनी  केले आहे.
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी परळी वैजनाथ येथील पंचायत समिती समोर असलेले संत श्री रानबा महाराज यांचे मंदिर आहे. गुढीपाडवा नववर्षानिमित्त संत श्री रामभाऊ महाराज मंदिर फुलांनी सजविण्यात आले आहे. या ठिकाणी संत श्री रानबा महाराज यांची विशेष महापूजा व आरती सकाळी नऊ वाजता होणार आहे. त्यानंतर खिचडी प्रसाद भाविकांना वाटप केला जाणार आहे. या कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री ज्ञानेश्वर खर्डे ,रामेश्वर खर्डे, पांडुरंग खर्डे, ओम खर्डे यांनी केले आहे.

Friday, March 28, 2025

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे यश राज्य शासनाच्या सुधारित पेन्शन योजना विकल्पसाठी एक वर्षाची मुदतवाढ.

मुंबई  (प्रतिनिधी)   राज्य शासनाच्या सुधारित पेन्शन योजनेसाठी विकल्प देण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देत विकल्प देण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवण्यात आली. याबाबत दि. १९ मार्च २०२५ रोजी वित्त विभागाच्या प्रधान सचिव डॉ. रिचा बागला (IAS) यांची महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शनसंघटनेकडून मुंबई मंत्रालय येथे भेट घेवून निवेदन देण्यात आले होते.

याावेळी राज्य शासनाच्या सुधारित पेन्शन योजनेचा विकल्प देण्यासाठी ३१ मार्च २०२५ ची अंतिम तारीख देण्यात आल्यामुळे राज्यभरात निर्माण झालेल्या संभ्रम व गोंधळाच्या स्थितीची माहिती देण्यात आली. सदर योजनेची कार्यपद्धती निर्गमित होईपर्यंत विकल्पास पुढे ६ महिने मुदतवाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. यावर मा. वित्त प्रधान सचिव यांनी विकल्प निवडीच्या तारखेस मुदतवाढ देण्याबाबत सहमती दर्शवून मुदतवाढ पत्र /शासन निर्णय शुद्धीपत्रक निर्गमित होण्याबाबत आश्वस्त केले. त्याप्रमाणे आज विकल्प देण्यास १ वर्षाची मुदतवाढ दिल्याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध झाला.

शिक्षक आमदार माननीय श्री. सुधाकर जी आडबाले सर, आरमोरी विधानसभेचे आमदार मा. श्री. रामदासमसराम सर, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष श्री. वितेश खांडेकर, राज्यसचिव श्री. गोविंद उगले, राज्य कोषाध्यक्ष श्री. मिलिंद सोळंकी, राज्य सोशल मीडिया प्रमुख श्री. विनायक चौथे यांनी यासाठी प्रयत्न केले होते. अशी माहिती राज्य सहसचिव अरविंद पुलगुर्ले यांनी दिली

२० सप्टेंबर २०२४ रोजी राज्यातील कर्मचाऱ्यांच्या साठी शासनाने सुधारित पेन्शन योजना आणली. परंतु अद्याप या योजनेची सविस्तर कार्यपद्धती प्रसिद्ध झाली नाही. त्यापूर्वी विकल्प भरून देणे अडचणीचे होते. शासनाने विकल्प देण्यास मदत वाढ दिली आहे. आता लवकरात लवकर राज्य शासनाच्या पेन्शन योजनेची कार्यपद्धती निर्गमित करण्यात यावी. तसेच सर्वच कर्मचाऱ्यांना १९८२ च्या जुनी पेन्शन योजना स्वीकारण्याचा विकल्प द्यावा. जुनी पेन्शन मिळवण्यासाठी जुनी पेन्शन संघटना पुन्हा ताकतीने आंदोलन उभा करेल.

श्री. अरविंद पुलगुर्ले
राज्य सहसचिव,
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना सांगली

कामे होत नसल्याने पाटोदा पंचायत समितीच्या बीडीओसमोर ५० लाखांच्या खोट्या नोटा उधळून आंदोलन.


पाटोदा (प्रतिनिधी) : पंचायत समितीचे कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीत. त्यामुळे त्यांना पन्नास लाखांच्या खोट्या नोटा देऊन आंदोलन करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाटोदा पंचायत समितीमध्ये गाय गोठा, विहिरी मंजुरी करण्यासाठी सामान्य जनतेला पैसे द्यावे लागतात. पैसे दिल्याशिवाय कामे होत नाहीत, मस्टरसाठी पैसे, घरकुल मंजुरीसाठी पैसे द्यावे लागतात तसेच चुंबळी ग्रामपंचायतमध्ये सरपंच, ग्रामसेवक मनमानी कारभार करत लोकांची अडवणूक करतात. त्यांच्यावर कारवाई करावी तसेच कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी पैसे लागतात त्यासाठी पाटोदा पंचायत समिती येथे २७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सामाजिक कार्यकर्ते गोरख झेंड यांच्या नेतृत्वाखाली ५० लाख रुपयांचे खोट्या नोटांचे बंडल पाटोदा पंचायत समिती गटविकास अधिकारी वानखेडे यांच्या दालनात देण्यात आले. तसेच जे कर्मचारी अडवणूक करतात त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गोरख झेंड, भरत नागरगोजे, सतीश पवळ, सतीश उबाळे, सुनील जावळे, आदी उपस्थित होते.

Thursday, March 27, 2025

चाकरवाडी येथे ह भ प प्रकाश महाराज फड यांचे कीर्तन.भाविक भक्तांनी आवश्य लाभ घ्यावा.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)विसाव्या शतकातील महान संत विभुती सद्गुरू संत श्री ह भ प ज्ञानेश्वर माऊली महाराज  चाकरवाडीकर श्रीक्षेत्र चाकरवाडी यांच्या पवित्र पावन दरबारा मध्ये शनिवार दिनांक 29 मार्च 2025 रोजी संध्याकाळी सात ते नऊ या वेळे मध्ये आयोजित करण्यात आले आहे.
फाल्गुन अमावस्या निमित्त वारकरी संप्रदाय कीर्तन परंपरेतील युवा कीर्तनकार श्री ह भ प प्रकाश महाराज फड श्री क्षेत्र  आळंदी देवाची यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी हरिनाम श्रवणाचा अवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन माऊली संस्थानचे प्रमुख मार्गदर्शक शांती ब्रह्म श्री हरी भक्त परायण महादेव महाराज तात्या श्रीक्षेत्र चाकरवाडी यांनी केले आहे.

आणखी एक मल्टीस्टेट कडून ग्राहकांची फसवणूक. ग्राहकांनी घेतली बीड आणि गेवराई च्या न्यायालयात धाव.


बीड (प्रतिनिधी)  दहा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या आणि राज्याच्या कानकोपऱ्यात शाखांचे जाळे उभारून कोट्यावधी रुपयांच्या ठेवी गोळा केलेल्या छत्रपती मल्टीस्टेट कडून ग्राहकांची फसवणूक झाली आहे. याबाबत अनेक ग्राहकांनी बीड आणि गेवराई च्या न्यायालयात धाव घेतली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

बीड जिल्ह्यात गेल्या वर्ष दीड वर्षांपासून जिजाऊ मा साहेब, ज्ञानराधा, साईराम सारख्या अनेक मल्टीस्टेट, पतसंस्था बंद पडल्या. लाखो ठेवीदारा चे कोट्यावधी रुपये अडकून पडल्याने अनेकांनी आत्महत्या देखील केल्या.दरम्यान गेल्या वर्ष दीड वर्षांपासून ठेवीदारांना त्यांचे पैसे वेळेवर मिळतं नसल्यामुळे अडचणीत आलेल्या गेवराई च्या छत्रपती मल्टीस्टेट मध्ये देखील गडबड सुरु झाली आहे.

गेवराई आणि बीड न्यायालयात अनेक ठेवीदारानी आपले पैसे वेळेवर मिळतं नसल्याने गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे.याबाबत मल्टीस्टेट च्या संचालक अथवा अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. परंतु अनेक ठेवीदारांनी वर्षभरापासून पैसे मिळण्यास अडचणी येतं असल्याचे सांगितलं आहे.

निराधारांची 'KYC'साठी धडपड भर उन्हात वृद्धेचा तहसीलमध्ये भोवळ येऊन मृत्यू. प्रशासकीय यंत्रणेच्या निष्काळजी पणाचाा बळी .


धारूर (प्रतिनिधी) : संजय गांधी निराधार योजनेचे शासकीय अनूदान बंद होऊ नये म्हणून केवायसीसाठी आलेल्या निराधारांची ससेहोलपट काही केल्या थांबण्याची चिन्ह नाहीत. यातच तीव्र उन्हात धारूर तहसील कार्यालयामध्ये केवायसीसाठी आलेल्या ७० वर्षीय कमलबाई बाबूराव कसबे यांचा भोवळ आल्यानंतर मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज दुपारी १२ वाजेदरम्यान घडली. प्रशासकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणाचा हा बळी असल्याच्या संतप्त भावना निराधारांनी व्यक्त केल्या. 

तालुक्यातील जहागीर मोहा येथील कमलबाई बाबुराव कसबे या धारूर तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेसाठी केवायसी करण्यासाठी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान भर उन्हात आल्या होत्या. कार्यालयात मोठ्या प्रमाणावर वृद्ध केवायसी करण्यासाठी आल्याने रांगा लागल्या होत्या. या रांगेत कमलबाई देखील थांबल्या. परंतु, अचानक त्यांना भोवळ आल्याने त्या कोसळल्या. उष्माघात झाल्याचे लक्षात येताच ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

वृद्धांची ससेहोलपट कधी थांबणार?

तहसील कार्यालयात विविध योजनांच्या केवायसीसाठी वृद्ध भर उन्हात मोठ्याप्रमाणावर येत आहेत. त्यांना येथे कोणत्याही सोयीसुविधा नाहीत. सर्वांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. कमलबाई कसबे या गलथान व्यवस्थेचा बळी ठरल्या आहेत. प्रशासनाने दक्षता घेऊन काम करावे, अशी मागणी पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रकाश दादा कोकाटे यांनी केली आहे. याबाबतीत तहसीलदार श्रीकांत निळे यांना तक्रार करून वृद्ध नागरिकांचा त्रास तात्काळ थांबवावा, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

विजेचा धक्का बसून युवकाचा जागीच मृत्यू दुपारी सुपारीचा कार्यक्रम होता.व लगेच.विवाहाची तारीख काढायची होती.


आष्टी (प्रतिनिधी) : सकाळी आठच्या दरम्यान कपड्याला इस्त्री करत असताना अचानक विजेचा धक्का बसून युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी आष्टी तालुक्यातील म्हसोबावाडी येथे घडली. ओंकार मच्छिंद्र शेकडे असे मृत युवकाचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील म्हसोबावाडी येथील ओंकार शेकडे या तरुणाचे लग्न ठरले होते. आज दुपारी सुपारीचा कार्यक्रम होता. याच कार्यक्रमात विवाहाची तारीख काढायची होती. दरम्यान, आज सकाळी आठ वाजेच्या दरम्यान ओंकार कपड्यांना इस्त्री करत होता. अचानक इस्त्रीमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने धक्काबसून ओंकारचा जागीच मृत्यू झाला. 

एकुलता एक मुलगा गेल्याने शोक अनावरतीन मुलीच्या पाठीवर ओंकार झाला होता. घरातील एकुलता एक मुलगा मृत झाल्याने शेकडे कुटुंबावर  दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई-वडिल, तीन बहिणी असा परिवार आहे.

Tuesday, March 25, 2025

पुण्यात विद्यार्थ्यावर हल्ला करून पळालेले सातजण पोलिसांच्या ताब्यात.


बीड (प्रतिनिधी) : पुणे जिल्ह्यातील कारेगाव (ता. शिरूर घोडनादी) येथील एका तरुणांवर धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला करून तीन दुचाकीवरून पळून आलेल्या सात संशयित आरोपींना मस्साजोग शिवारातील एका पेट्रोल जवळून पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबतची माहिती रांजणगाव पोलिसांनी वायरलेस वरून केज पोलिसांना दिली होती. त्यावरून पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मस्साजोग शिवारात केज पोलिसांनी सापळा लावून सात जणांना जेरबंद केले आहे.

सौरभ श्रीराम राठोड (17) हा गंगाखेड (जि. परभणी) येथील युवक पुणे जिल्ह्यातील कारेगाव ( ता. शिरूर घोडनदी ) परिसरात शिक्षणासाठी वास्तव्यास आहे. 23 मार्च रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास सौरभ राठोड यास, 'तु ओंकार देशमुख यास खुन्नस देऊन का बघितलेस, ओंकार देशमुख कोण आहे? तुला माहित आहे कां? थांब तुला जिवंतच सोडीत नाहीत' अशी धमकी देत गिरीश कराळे, रोहन बोटे, शंकर करंजकर, ओंकार देशमुख, ओम चव्हाण, रोहन गाडे (सर्व रा. कारेगाव ता. शिरूर घोडनदी) व दोन अनोळखी दोघांनी कोयत्याने वार केले. पोटात व पाठीवर वार करीत त्याच्या डोक्यात दगडाने मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी सोडविण्यासाठी गेलेल्या यश राजू धनवटे यास हाताने व लाथाबुक्यांनी मारून दमदाटी केली. सौरभ राठोड याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून यश धनवटे याच्या फिर्यादीवरून वरील सात जणांसह इतर अनोळखी दोघांविरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे हे तपास करीत होते.

आरोपीचे लोकेशन मस्साजोग शिवारात.

या प्रकरणातील सातही आरोपी हे दुचाकीवरून बीड जिल्ह्यातील केज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मस्साजोग  शिवारात पळून गेल्याची तांत्रिक माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना मिळाले. हीं माहिती त्यांनी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांना भ्रमनध्वनी वरून दिली. पाटील यांनी तात्काळ पोलीस उप निरीक्षक उमेश निकम, फौजदार मांजरगे, जमादार उमेश आघाव, बाळासाहेब अहंकारे यांचे पथक या परिसरात रवाना केले. या पथकाने सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान या गुन्ह्यातील सात संशयित आरोपींना मस्साजोग शिवारातील एका पेट्रोल पंपाच्या परिसरातून जेरबंद केले. सातही आरोपींना रांजणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी दिली.

सतिश भोसले मदत प्रकरणी दोन पोलिस निलंबित.


बीड (प्रतिनिधी) आमदार सुरेश धसांचा कार्यकर्ता खोक्या भोसले याला कारागृह परिसरात व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याचे समोर आले होते. खायला बिर्याणी आणि हात धुवायला बंद बाटलीतील पाणी, सोबत डझनभर नातेवाइक असा लवाजमा असलेला एक कथित व्हिडीओ सोमवारी सायंकाळी व्हायरल झाला होता. याचे वृत्त प्रकाशित करताच जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी चकलांबा पोलिस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबीत केले आहे. तसेच ठाणेदारालाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कैलास खटाणे आणि विनोद सुरवसे अशी निलंबीत केेलेल्या पोलिसांची नावे आहेत.

शिरुर कासार तालुक्यातील झापेवाडी येथील सतीश ऊर्फ खोक्या भोसले याने बुलडाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला अर्धनग्न करून बॅटने मारहाण केली होती. तसेच बावी येथील ढाकणे बापलेकाला मारहाण करून दात पाडले होते. याप्रकरणी खोक्याविरोधात तीन गुन्हे दाखल आहेत. सोबतच वनविभागाच्या धाडीतही त्याच्या घरात वाळलेले मांस सापडल्याने वेगळा गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्यांमध्ये तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

दरम्यान, कारागृहात जाण्यापूर्वी खोक्या हा कारागृह परिसरात खाली बसून जेवत होता. त्याच्या बाजूला १० ते १५ नातेवाइक, कार्यकर्ते उभे दिसत होते. सोबतच खोक्याला बोलण्यासाठी मोबाईलही दिला होता. हे सर्व असतानाही पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होते. व त्यामुळे पुन्हा एकदा बीड पोलिस वादात सापडले होते. याचीच गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दोन कर्मचाऱ्यांना निलंबीत केले आहे.

नोटीस बजावली.

अशाप्रकारचे गंभीर प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. चंकलांबा पोलिस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबीत केले आहे. तर प्रभारी अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.- नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक बीड

बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात निलंबीत. आ. नमिता मुंदडा यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांची घोषण.ा


बीड (प्रतिनिधी) कोरोना काळातील औषध खरेदी व भरती प्रक्रियेतील अनियमिततामुळे बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांचे निलंबण करण्यात आले आहे. भाजपच्या केजच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी ही घोषणा आज सकाळी अधिवेशनात केली.

कोरोनाकाळात डॉ.अशोक थोरात यांचे काम चांगले होते. त्यानंतर त्यांची नाशिक येथे बदली झाली. त्यानंतर डॉ.सुरेश साबळे, डॉ.सुर्यकांत गिते आदींनी सीएस म्हणून कारभार घेतला. याच काळात अनियमितता झाली. याची चौकशी करण्यात आली. यामध्ये डॉ.थोरात यांच्यासह डॉ.साबळे, डॉ.गित्ते आणि इतर ९ जणांचा समावेश होता. याच अनुषंगाने आ.मुंदडा यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यानुसार मंत्री आबीटकर यांनी थोरात यांचे निलंबण करत असल्याचे सांगितले. परंतू इतर ११ जणांबाबत त्यांनीही काहीही घोषणा केली नाही. डॉ.थोरात यांच्या निलंबणाची बातमी समजताच हा अतिशय चुकीचा निर्णय आहे, अशा प्रतिक्रिया सामान्यांमध्ये उमटल्या.

रमजान निमित्त 3 हजार गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप...!


छत्रपती संभाजीनगर  (प्रतिनिधी) दरवर्षी प्रमाणे पवित्र रमजान महीन्यात स्लम वस्तीमध्ये गरजू तीन हजार कुटुंबांना तीन टप्प्यांत सफा बैतूल मालच्या वतीने किराणा किटचे वाटप गरजू कुटुंबांचा सर्वे करून वापट करण्यात आले. या किट मध्ये कुटुबाला एक महीना किराणा सामान पुरेल एवढी अन्नधान्यसहीत वस्तू देण्यात आले आहे. आज सायंकाळी मालेगाव येथील मुस्लिम धर्मगुरु मुफ्ती हसनैन महेफुज यांच्या हस्ते विशेष दुवा करण्यात आली. समाजातील प्रत्येक व्यक्तीने गरजूंना मदत करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी सफा बैतूल मालचे अध्यक्ष मुफ्ती अनिसुर्रहमान, हाजी अब्दुल समद, मुफ्ती मोहम्मद, शकीब खुसरो, अयूब सेठ, समीर भाई, नवीज सेठ यांची प्रमुख उपस्थिती होती.

पोलिसांना नवीन 33 वाहनांचा ताफा गुन्हेगारी नियंत्रणासाठी मोठे बळ.पोलीस दल अधिक बळकट करण्यावर भर - पालकमंत्री शिरसाट


छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि पोलिसांना अत्याधुनिक साधन-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने 5 कोटी रुपयांच्या निधीतून 33 नव्या वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. या वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. अत्याधुनिक सुविधा, साधने उपलब्ध करून पोलीस दल अधिक सक्षम व बळकट करण्यावर शासनाचा भर असल्याचे यावेळी पालकमंत्री शिरसाट यांनी जाहीर केले.

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित या सोहळ्याला खासदार डॉ. कल्याण काळे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. वीरेंद्र राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, राजेंद्र जंजाळ, नंदकुमार घोडेले आदी मान्यवर उपस्थित होते. 

पालकमंत्री संजय शिरसाट यांनी यावेळी पोलिसांना सक्षम बनवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. गुन्हेगारीच्या निर्मूलनासाठी आणि शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना आवश्यक ती साधने पुरवली जातील. पोलिसांनी जबाबदारीने काम करावे आणि सामान्य नागरिकांना न्याय मिळवून द्यावा,असे सांगितले.

पोलीस दलाला नवीन 33 वाहने

पोलीस अधीक्षक कार्यालय: 10 वाहने

पोलीस आयुक्त कार्यालय: 15 वाहने

राज्य राखीव पोलीस दल: 8 वाहने (यात एका बसचा समावेश)

यावेळी पोलिसांसाठी अँम्ब्युलन्स देण्याचाही निर्णय जाहीर करण्यात आला. पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी शासन त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहील, असेही मंत्री शिरसाट यांनी सांगितले. "आगामी काळात आणखी 30 वाहने पोलिसांना देण्यात येणार आहेत," असेही त्यांनी जाहीर केले.

पोलीस दलाच्या या आधुनिकीकरणामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होईल, तसेच गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

खा. डॉ. कल्याण काळे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर हिरवी झेंडी दाखवली 

बोगस रेशन कार्ड देणाऱ्या सेतू चालकावर गुन्हा दाखल.नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा


नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड ग्रामीण परिसरात बोगस रेशन कार्ड काढून देणाऱ्या सेतू चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. नागरिकांनी पात्रता नसताना रेशन कार्ड काढण्याचा प्रयत्न करू नये व कोणाच्याही खोट्या दाव्याला बळी पडू नये, असे आवाहन तहसीलदार नांदेड संजय वारकड यांनी केले आहे.
आज तहसील कार्यालय नांदेड येथील पुरवठा विभागामध्ये एक व्यक्ती त्यांच्या रेशन कार्ड ऑनलाइन झाले आहे. परंतु धान्य मिळत नाही म्हणून तक्रार करायला आला होता, कर्मचाऱ्यांनी अधिक तपासणी केली असता असे निदर्शनास आले की त्यांचे रेशन कार्ड हेच फसवे आहे.
संबंधित व्यक्तीला फक्त ऑनलाइन एक पेज देण्यात आले होते. तर रेशन कार्ड हे बोगस असल्याचे निष्पन्न आहे.
या प्रकार लक्षात येता तात्काळ पोलीस निरीक्षक वजीराबाद पोलीस स्टेशन यांना बोलावून त्या व्यक्तीला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.पुरवठा निरीक्षण अधिकारी श्री.रवींद्र राठोड  यांना प्राधिकृत करून संबंधित सेतू चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांनी दिलेले सहा रेशन कार्ड असे बनावट सापडले आहेत. संबंधीत सेतू चालक ऋषिकेश पेदेवाड राहणार सिडको नांदेड यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, तहसील कार्यालयातील कोणत्याही दस्तऐवज काढून देण्यासाठी किंवा सुविधा देण्यासाठी स्थानिक कर्मचाऱ्यांशी चर्चा करावी. एजंट व अनोळखी लोकांच्या तोतयेगिरीला बळी पडू नये, असे आवाहन तहसीलदार संजय वारकड यांनी केले आहे.

Saturday, March 22, 2025

दोन टवाळखोरांनी काढली नर्सिंगच्या मुलीची छेड.छेड काढणारे आरोपी सोडून पीडितांवरच 'रूबाब', बीडमधील घटना.




बीड (प्रतिनिधी) घरभेटी देणाऱ्या विद्यार्थिनीची दोन टवाळखोरांन छेड काढली. त्यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी मुलींसह प्राचार्या बीड शहर पोलिस ठाण्यात गेल्या. परंतू येथील पोलिस उपनिरीक्षकांनी आपण आजचे 'प्रमुख' असल्याचे सांगत पीडितांवरच रूबाब झाडला. एवढेच नव्हे तर त्यांना आधार देण्याएवेजी भिती दाखविण्याचाही प्रयत्न केला. यात दोघांविरोधात गुन्हाही दाखल झाला. परंतू या प्रकाराने ही कसली पोलिसिंग? असा सवाल उपस्थित होत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्याशी बोलताना या अधिकाऱ्यांचा 'तोरा' कायम होता. शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.

बीड शहरात घरभेटी देण्याचे काम नर्सिंगच्या विद्यार्थीनी करत असतात. शनिवारी सकाळीही सहा जणींचा ग्रुप धांडे गल्लीत गेला. तेथे दुचाकीवरून आलेल्या दोन टवाळखोरांनी या मुलींना अडवून चिठ्ठी दिली. त्यात मोबाईल क्रमांक होता. घाबरलेल्या मुलींना पुन्हा दुसऱ्या ठिकाणी अडवले. यात इतर लोकांनी एका पकडले तर दुसरा पळून गेला. या प्रकरणात पीडित मुलीच्या तक्रारीवरून बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मुलींमध्ये भितीचे वातावरण आहे.

अशोक थोरातांची धाव.

पोलिसांकडून मुलींना भिती दाखविण्यासह तक्रार घेण्यास टाळाटाळ होत असल्याचे समजताच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात हे शस्त्रक्रिया गृहातून तातडीने पोलिस ठाण्यात दाखल झाले. १० मिनीटे त्यांनाही स्वत:ला ठाण्याचे 'प्रमुख' समजणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी रूबाब झाडला. आपल्याशीच असे वर्तण म्हणल्यावर सामान्यांशी कसे वागत असतील? असा प्रश्न डॉ.थोरात यांनी उपस्थित केला.

मुलगा त्रास देईल, कोर्टात जावे लागेल

पीडित मुलगी व प्राचार्या पोलिस ठाण्यात गेल्यावर त्यांच्यावरच प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. तो मुलगा खूप डेंजर आहे, नंतर त्रास देईल. गुन्हा दाखल केला तर नंतर कोर्टात जावे लागेल, असे म्हणून पीडितांनाच भीती दाखविल्याचे सूत्रांनी सांगितले. हे समजल्यावरच आपण ठाण्यात धाव घेतली, असे डॉ.थोरात यांनी सांगितले.

निरीक्षकांनी प्रशिक्षण द्यावे.

शहर पाेलिस ठाण्याचे शितलकुमार बल्लाळ अनेकदा तक्रारदार यांना कक्षात बोलावून घेत आधार देतात. त्यांना धीर दिल्यावर तक्रार घ्यायला सांगतात. परंतू त्यांच्याच ठाण्यातील दुययम अधिकारी असे वागत असल्याने संता व्यक्त करण्यात आला. त्यामुळे बल्लाळ यांनी अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांना सामान्यांशी कसे बोलावे? याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

Thursday, March 20, 2025

मारहाण करून सोने लुटले; ते विकून पार्टी करायला जाण्यापूर्वीच दरोडेखोर पकडले एलसीबीची कारवाई, सात पैकी चौघांना बेड्या.


बी (प्रतिनिधी) रात्रीच्यावेळी अचानक घरात प्रवेश करत महिला, पुरुषांना मारहाण करून महिलांच्या अंगावरील दागिने आणि इतर मुद्देमाल घेऊन पळून जायचे, अशी मोडस असणाऱ्या सात पैकी चार दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी बेड्या ठाेकल्या. लुटलेले सोने विक्री करून आलेल्या पैशांची पार्टी करायला जात असतानाच पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले.

निखील बंडू काळे (वय २०), अविनाश बंडू काळे (वय २४), रजाक जनार्धन काळे (वय ५५) आणि बाबासाहेब उर्फ चौऱ्या चंद्रभान चव्हाण (वय ३०, सर्व रा. टाकळी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) अशी पकडलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. हे सर्व दरोडेखोर रात्रीच्यावेळी शेतातील वस्तींवर घरी जातात. हातात काठ्या, तलवारींसह इतर शस्त्रे सोबत घेतात. घराबाहेर झाेपलेले किंवा घरात झोपलेल्या लोकांना दरवाजा वाजवून उठवतात. काही समजण्याच्या आतच मारहाण करायला सुरुवात करतात. अवघ्या काही क्षणात घरातील मौल्यवान वस्तू आणि महिलांच्या अंगावरील दागिने घेऊन दुचाकीवरून पळ काढतात. शिरूर तालुक्यातील बारगजवाडी येथे १९ फेब्रुवारी तर २८ जानेवारी रोजी गेवराई तालुक्यातील बंगाली पिंपळा येथे दरोडे पडले होते. पोलिसांनी शोध लावत सात पैकी चार दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून दुचाकीसह मोबाइल जप्त केले आहेत. सोनेही जप्त केले जाणार आहे.

ही कारवाई पाेलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर अधीक्षक सचिन पांडकर, पोलिस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजयसिंह झोनवाल, उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे, श्रीराम खटावकर, सुशांत सुतळे, तुळशीराम जगताप, हवालदार मनोज वाघ, कैलास ठोंबरे, अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, राहुल शिंदे, दीपक खांडेकर, बाळू सानप, विकास वाघमारे, विकी सुरवसे, आलीम शेख, सुनील राठोड, सिद्धेश्वर मांजरे आदींनी केली.

पार्ट्या केल्या, दारू ढोसली.

चोरी करून आलेले सोने विक्री केले. त्याच पैशांवर या दरोडेखोरांनी पार्टी केली. नंतर दारूही ढोसली. मंगळवारी देखील ते पार्टी करण्यासाठीच शिरूर तालुक्यातील पिंपळनेर फाटा येथे आले होते. त्याचवेळी एलसीबीने सापळा रचून त्यांना बेड्या ठोकल्या.

सर्व दरोडेखोर एकमेकांचे नातेवाईक.

अटक आरोपींमध्ये अविनाश आणि निखील हे दाेघे सख्खे भाऊ आहेत. तर रजाक काळे हा त्यांचा चुलता आहे. तसेच फरार तिघेजणही यांचेच नातेवाईक आहेत.

महिला बनली रणरागिणी.

बारगजवाडी येथे दरोडा टाकत असताना एका महिलेला मारहाण केली. यावेळी त्या महिलेने बाजूलाच असलेला लोखंडी चिमटा उचलून एकाच्या डोक्यात घातला. महिलेचा हा रूद्रावतार पाहून दरोडेखोरांनी धूम ठोकली. या मारहाणीत एक जण रक्तबंबाळ झाला होता, असे अटक दरोडेखोरांनी पोलिसांना सांगितले आहे.

Wednesday, March 19, 2025

जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांचा मनाई आदेश.


बीड (प्रतिनिधी) सध्या विविध पक्षाच्या नेत्याचे, प्रमुख कार्यकर्त्यांच्या हाणामारीचे व्हिडीओ समोर येत आहे. तसेच धनंजय मुंडे यांनी मस्साजोग खून प्रकरणाला अनुसरून मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे वंजारी विरुद्ध मराठा असा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी मनाई आदेश लागू केला आहे.

राजकीय पक्ष संघटनेच्यावतीने न्याय मागण्यासाठी विविध प्रकारचे आंदोलने, उपोषण, मोर्चे आदी होण्याची शक्यता आहे. तसेच इयत्ता १० व १२ वीची परीक्षा सुरु आहे. अचानक घडणाऱ्या घटनावरुन व किरकोळ कारणावरुन तणाव निर्माण होऊ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच आरक्षणाच्या मागणीसाठी सर्व समाज व राजकीय पक्ष आक्रमक आहेत. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने १९ मार्च ते २ एप्रिल या कालावधीसाठी मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

या कृत्यांना केली आहे मनाई.

शस्त्रे, सोटे, काठी, तलवार, बंदुक, जवळ बाळगता येणार नाहीत. काठया, लाठ्या शारीरिक इजा होण्यास कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तू जवळ ठेवता येणार नाहीत. कोणतीही, दाहक पदार्थ किंवा स्फोटके जवळ बाळगता येणार नाहीत. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा फोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधे गोळा करुन ठेवता येणार नाहीत किंवा बाळगता किंवा तयार करता येणार नाहीत. आवेशी भाषणे, अंगविक्षेपण, विडंबनात्मक नकला करता येणार नाहीत. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू जवळ ठेवता येणार नाहीत. जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मुल्यांच्या विरुद्ध असेल किंवा देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहचवणारी असेल तर ते कृत्य करता येणार नाही. सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहचवणारी, जाहीरपणे प्रक्षोभक भाषण व असभ्य वर्तन करता येणार नाही. व्यक्तींच्या किंवा शवांच्या किंवा त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही किंवा मिरवणूक, मोर्चा काढता येणार नाही.

नाेकरी गेली अन् पैशांसाठी इंजिनिअर बनला चाेर.मोबाइल टॉवरच्या महागड्या डिश केल्या लंपास.धाराशिव गुन्हे शाखेच्या पाेलिसांनी अंबाजाेगाईतून केली अटक.


धाराशिव (प्रतिनिधी) एका नामांकित कंपनीत इंजिनिअरची नाेकरी हाेती. अचानक ही नाेकरी गेल्यानंतर पैशांची चणचण निर्माण झाली. पैशांची ही गरज भागविण्यासाठी चक्क टेलिकाॅम कंपन्यांच्या टाॅवरचे साहित्य चाेरीकडे वळलेल्या ‘त्या’ इंजिनिअरला बीड जिल्ह्यातील अंबाजाेगाई येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पाेलिसांनी  अटक केली. त्याच्याकडून १ लाख ६५ हजार रूपये किमतीची इलेक्ट्रिक उपकरणेही हस्तगत करण्यात आली. पुढील तपासासाठी त्यास ग्रामीण पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

येडशी येथील इंडस कंपनीच्या टाॅवरवर लावलेला एअरटेल कंपनीचा आय वेन डिव्हाईस डिश ॲँटेना चाेरीस गेला हाेता. ही घटना समाेर आल्यानंतर धाराशिव ग्रामीण पाेलिस ठाण्यात १७ मार्च राेजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला. यापूर्वीही अशा स्वरूपाच्या चाेरीचे गुन्हे वेगवेगळ्या ठाण्यात नाेंद आहेत. वाढत्या घटना लक्षात घेता, पाेलिस अधीक्षक संजय जाधव यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पाेनि विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपाेनि कासार यांना तांत्रिक विश्लेषणातून गुन्हा करणाऱ्या इसमाची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने बीड जिल्ह्यातील अंबाजाेगाई येथे दाखल हाेत राजेश आचार्य नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने चाैकशी केली असता, धक्कादायक बाब समाेर आली. राजेश हा एका नामांकित कंपनीत इंजिनिअर म्हणून कामास होता. नोकरी गेल्यानंतर पैशांची चणचण निर्माण झाली हाेती. पैशांची ही गरज भागविण्यासाठी त्याने येडशी, सांजा, मार्डी आणि मसला या ठिकाणी असलेल्या टाॅवरवरील इंटरनेटसाठी उपयोगी असलेले इलेक्ट्रॉनिक उपकरण-३०० चाेरी केल्याची कबुली दिली. त्याने एकूण सहा उपकरणे चोरली असल्याचे तपासातून समाेर आले. यानंतर त्याच्याकडून चाेरलेली इलेक्ट्रिक उपकरणे तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली. पुढील तपासासाठी त्यास ग्रामीण पाेलिस ठाण्याच्या ताब्यात दिले.

अभियंत्याविरूद्ध यापूर्वी चार गुन्हे.

अभियंता राजेश आचार्य याच्याविरुद्ध यापूर्वी चाेरीचे चार गुन्हे नाेंद असल्याचे पाेलिसांनी केलेल्या अभिलेख तपासणीतून समाेर आले आहे.

सव्वादाेन लाखांचा मुद्देमाल.

अभियंता आचार्य यास ताब्यात घेतल्यानंतर पाेलिसांनी त्याच्याकडून १ लाख ६५ हजार रूपये किमतीची इलेक्ट्रिक उपकरणे तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण २ लाख ३५ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

सोमेश्वर गोरे यांची नाशिकमधील प्रशिक्षण केंद्रात जीवन संपविल्याची धक्कादायक घटना.अर्धपिंपरी व धोंडराई गावात शोक कळा.


बीड (प्रतिनिधी) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन युवकाने गावाचे आणि आई-वडिलांचे नाव मोठे केले. त्याचा अभिमान बाळगत अख्ख्या गावाने डोक्यावर घेतले. परंतु त्याच युवकाने आता नाशिक येथील प्रशिक्षण केंद्रात सोमवारी (दि. १७) गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. याचे कारण जरी अस्पष्ट असले तरी आज गेवराई तालुक्यातील अर्धपिंपरी व धोंडराई गावातील लोक ढसाढसा रडत आहेत.

सोमेश्वर भानुदास गोरे (३२, रा. अर्धपिंपरी, ता. गेवराई, ह.मु. खोली क्र.- १५५, दक्षिण वसतिगृह, एमपीए) असे आत्महत्या केलेल्या प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. जानेवारी महिन्यापासून महाराष्ट्र पोलिस अकादमीत प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक म्हणून प्रशिक्षण घेत होते. सोमवारी दुपारी ते प्रशिक्षण घेत असलेल्या १५ क्रमांकांच्या स्कॉडसह १३, १४ क्रमांकांच्या स्कॉडमधील प्रशिक्षणार्थींची उंटवाडी येथील बालसुधारगृह भेटीचे आयोजन करण्यात आले होते. पाऊण वाजेच्या सुमारास ही भेट आटोपल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थींना पोलिस नाईक चंद्रकांत पांडुरंग घेर (३२, रा. नेम, कवायत निर्देशक, एमपीए) यांनी वसतिगृहात सोडले. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास स्कॉड फॉलिंग घेण्यात आले. स्कॉड कॉरपरेर भरत नागरे यांनी घेर यांना कळविले की, प्रशिक्षणार्थी गोरे हे फॉलिंगला हजर राहिलेले नाही. त्यानंतर त्यांनी स्कॉड मार्च करून गोरे राहत असलेल्या दक्षिण वसतिगृह खोली क्र.-१५५ गाठली. तेथे खिडकीतून आतमध्ये डोकावून बघितले असता त्यांनी गळफास घेतलेला असल्याचे आढळून आले, अशी खबर घेर यांनी गंगापूर (जि. नाशिक) पोलिसांना कळविली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट.

गोरे यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अस्पष्ट आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी कुठल्याही प्रकारची चिठ्ठी वगैरे काहीही लिहून ठेवलेली नाही. ते वापरत असलेला मोबाइल पोलिसांनी ताब्यात घेतला असून, तपासणीकरिता पाठविल्याचे सांगण्यात आले.

१८ मार्चला निवड अन्..

सोमेश्वर यांचे गाव अर्धपिंपरी असले तरी शिक्षणासाठी ते धोंडराई येथे मामाकडे रहात होते. सोमेश्वर हा उत्तीर्ण झाल्याचा निकाल हा १८ मार्च २०२४ रोजी लागला होता. आता बरोबर एक वर्षांनी म्हणजेच १८ मार्च २०२५ रोजी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. यामुळे या दोन्ही गावातील लोकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सोमेश्वर यांच्या पश्चात आई, वडील दोन भाऊ असा परिवार आहे.

दोन्ही गावात पहिलाच फौजदार.

गेवराई तालुक्यातील धोंडराई आणि अर्धपिंपरी या दोन्ही गावात पहिल्यांदाच सोमेश्वर हे पहिलेच फौजदार होते. त्यांच्या प्रेरणेने अनेक तरूण पोलिस भरतीच्या तयारीला लागले होते. परंतू त्यांंच्या अशा अचानक घेतलेल्या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे.

पायाला जखम झाल्याने उपचार.

प्रशिक्षणादरम्यान सोमेश्वर यांच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे मागील २७ दिवसांपासून ते एमपीएमध्ये असलेल्या रूग्णालयात उपचार घेत होते.

अंबाजोगाईत आत्महत्याग्रस्त शेतकर्‍या ंच्या विधवा पत्नींचा निघाला मुक मोर्चा विविध मागण्यांचे उपजिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन.


अंबाजोगाई (प्रतिनिधी) आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवा पत्नी व त्यांच्या कुटूंबियांना न्याय देण्यात यावा. त्यांच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात, यासाठी बुधवारी विधवा महिलांचा मोठा मोर्चा राजीव गांधी चौकापासून निघाला. उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलक महिलांनी उपजिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले. या मोर्चाचे नेतृत्व आधार माणूसकीचा संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड.संतोष पवार यांनी केले. मोर्चात शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष कालिदास आपेट, किसानपुत्र आंदोलनाचे सुदर्शन रापतवार, अचूत गंगणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

अन्नत्याग आंदोलन शेतकरी सहवेदना दिनानिमित्त आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या विधवा पत्नी व महिलांचा मुक मोर्चा बुधवारी दुपारी १२  वाजता राजीव गांधी चौकातून निघाला. हा मोर्चा मोंढा, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी महिलांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना दिले. या निवेदनात प्रत्येक आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटूंबाला २५ लाख रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात यावे. कुटूंबातील विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर पर्यंतचे शिक्षण मोफत करण्यात यावे. या कुटूंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी विनातारण कर्ज तात्काळ मिळावे. या कुटूंबाला दैनंदिन उपजिविकेसाठी प्रति महा दहा हजार रूपये अनुदान द्यावे., प्रत्येक कुटूंबाला घरकुल व शौचालय योजनेचा लाभ द्यावा. प्रत्येक एकल पालक कुटूंबातील मुलांना सरसकट बालसंगोपन योजनेचा लाभ द्यावा. मुलांच्या शिक्षणासाठी शासकीय वसतीगृहात प्राधान्याने प्रवेश देण्यात यावा. शेती गृह उद्योगासाठी तात्काळ कर्ज पुरवठा केला जावा, संजय गांधी निराधार योजनेचे मानधन वाढविण्यात यावे., शासनाच्या सर्व योजनांचा लाभ या कुटूंबाला मिळावा, अशा मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. या सर्व महिलांनी आज शेतकरी सहवेदना दिनानिमित्त उपवास धरून तळपत्या उन्हात मुक मोर्चा काढला. या मुकमोर्चात महिला व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

वैयक्तीक जलसिंचन विहीरीचे काम करताना कामावर ब्लास्टींग करतांना जिलेटीणचा स्फोट स्फ़ोटात कामगारांचा मृत्यू!


अंबाजोगाई (प्रतिनिधी) तालुक्यातील तळेगांव घाट शिवारात एका शेतकर्‍याच्या शेतामध्ये वैयक्तीक जलसिंचन विहीरीचे काम सुरू होते. या कामावर ब्लास्टींग करतांना जिलेटीणचा स्फोट झाल्याने एक कामगार ५० फुट विहीरीच्या बाहेर येवून परत विहीरीत पडला. याचा जागीच मृत्यु झाला. तर अन्य तीघेजन जखमी झाले. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे, तर एकावर स्वा.रा.ति. रूग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना बुधवारी सकाळी ११.३० वा. घडली.

अंबाजोगाई तालुक्यातील तळेगांव घाट तांडा शिवारात उत्तम पांडुरंग आडे यांना शासनाची वैयक्तीक जलसिंचन विहीर मंजुर झाली होती. या विहीरीचे काम सुरू असताना मंगळवारी या विहीरीमध्ये जिलेटींगचे स्फोट घेण्यात आले. उर्वरीत राहीलेल्या कामाचे कामकाज सुरू असतांना सकाळी ११.३० च्या सुमारास विहीरीतील जिलेटींगचा स्पोट झाल्याने धनराज अनंत दहीफळे रा. खोडवा सावरगांव, ता. परळी या मजुराला विहीरीच्या बाहेर १० फुट उंच उडून परत विहीरीत पडल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. तर पिंटू विठ्ठल दहीफळे, जीवन हरिश्चंद्र दहीफळे हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना स्वा.रा.ती. रूग्णालयात उपचारासाठी आनले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना लातूरच्या खाजगी रूग्णालयात रेफर करण्याची विनंती केली. तर दुसरा भारत तुकाराम पवार रा. तळेगांव हा देखील जखमी झाला असून त्याच्यावर स्वा.रा.ती. रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या स्फोटाची माहिती तालुक्यात वार्‍यासारखी पसरल्यानंतर प्रशासनासह लोकप्रतिनिधी देखील घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

घटना स्थळावर अतिरिक्त पोलीस अधिक्षकांची भेट

या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधिक्षक चेतना तिडके, पोलीस उपअधिक्षक चोरमले, बर्दापूर पोलीस ठाण्याचे ए.पी.आय. राजकुमार ससाने, बिट अमलदार चेवले यांनी घटनास्थळाला भेट घेवून जखमींना तात्काळ रूग्णालयात हलविले.

उत्तम आडे यांच्या वैयक्तीक विहीरीच्या खोदकामाचे काम खोडवा सावरगांव येथील हरिश्चंद्र दहीफळे व गोविंद दहीफळे यांच्या ब्लास्टींगच्या ट्रॅक्टरला काम देण्यात आले होते. हे काम करत असतांना सदरील अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शनिनी सांगीतले.

Tuesday, March 18, 2025

ज्येष्ठ समाजसेवक डॉ संजय तांदळे यांचा पोलीस प्रशासनाच्या वतीने सत्कार पोलीस प्रशासनाकडून झालेला सत्कार प्रेरणा देणारा - डॉ. संजय तांदळे

बीड (प्रतिनिधी)-बीड शहरातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत पोलीस प्रशासनाच्या वतीने मंगळवार दिनांक 18 रोजी वाहतूक शाखेच्या पोलीस स्टेशनमध्ये यथोचित सत्कार करण्यात आला.
बीड शहरातील मित्र नगर भागातील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे हे मागील काही वर्षांपासून सामाजिक कार्य करत आहेत. बीड आणि परिसरात काही अपघात झाल्याची माहिती मिळताच ते संबंधित पोलीस स्टेशनला कळवितात नुसतं कळवून थांबत नाहीत तर पोलिसांच्या व मित्रांच्या मदतीने लागली तातडीने घटनास्थळी भेट देऊन संबंधितांना मदत करण्याचं काम करतात त्यांच्या या कार्यामुळे शेकडो अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळाली आहे. तर अनेक जणांचे प्राण वाचले आहेत. तसेच इतर 
बीड शहरातील गोरगरीब आणि निराधार लोकांना स्वखर्चातून मदत उपलब्ध करून देतात. शहरातील मनोरुग्ण व्यक्तींचं पोलिसांच्या सहकार्याने  पुनर्वसन करून त्यांना चांगले जीवन जगण्यासाठी मोठा आधार दिला आहे. त्याचबरोबर बीड शहरातील विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा हिरीरीने सहभाग असतो.
सामाजिक कार्याबरोबरच ते निरोगी व निरामय जीवन कसे राहावे यासाठी जनतेला तसेच पोलिसांना योगाचे प्रशिक्षण देण्याचे काम करत आहेत. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाची दखल घेऊन पोलीस प्रशासनातील जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुभाष सानप, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख उस्मान यांनी दखल घेऊन मंगळवार दिनांक 18 रोजी सुभाष रोड येथील वाहतूक शाखेच्या पोलीस स्टेशनमध्ये शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी पोलीस हवालदार श्रीकांत पाखरे, शिवदास घोलप, चालक संतोष हारके, जलदूत बाजीराव ढाकणे आदी उपस्थित होते. 

पोलीस प्रशासनाकडून झालेला सत्कार पुढील कार्यास प्रेरणा देणारा -डॉ. संजय तांदळे 

पोलीस प्रशासनाकडून आज माझ्या कामाची दखल घेऊन माझा यथोचित सन्मान केला. हा सन्मान म्हणजे खऱ्याखुऱ्या कामाची आणि प्रामाणिक कार्याची मला पावती मिळाली असल्याची भावना यावेळी डॉ संजय तांदळे  यांनी व्यक्त केली.

जय महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने शिव जयंती उत्साहात साजरी.शिवशाहीर अरविंद घोगरे यांच्या जाज्वल्य पोवाड्याने शिवप्रेमी भारावले.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासापुरते सीमित न राहता प्रत्येक पिढीच्या मनामनांत प्रेरणादायी आदर्श बनले आहेत. त्यांचा शौर्य, धैर्य आणि प्रजाहितदक्ष नेतृत्वाचा वारसा जतन करण्यासाठी जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन  शिवशाहीर अरविंद घोगरे यांनी केले. 

सोमवार, 17 मार्च रोजी संध्याकाळी 6:35 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती, मोंढा मैदान येथे शिवजयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आई तुळजाभवानी, माँसाहेब जिजाऊ , छत्रपती संभाजी महाराज व विश्वहिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन आणि भगव्या ध्वजारोहण भाजपाचे जिल्हा सरचिटणीस दत्ताप्पा ईटके, रा.काँ. तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, रा.काँ.श . प. ज्येष्ठ नेते बाळासाहेब देशमुख, उत्तम माने,शहराध्यक्ष ॲड.जीवन देशमुख, भा.ज.यु.मो प्रदेश उपाध्यक्ष ॲड.अरुण पाठक,शिवसेना (शिंदे) तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे,शहर प्रमुख वैजनाथ माने, विविध व्यापारी संघटनेचे अध्यक्ष माऊली फड , बंडू गरुड, फडकरी आप्पा, जनसंग्रामचे अध्यक्ष तुळशीराम पवार,राष्ट्रीय काँग्रेसचे कार्याध्यक्ष शशिशेखर चौधरी, मनसे तालुकाप्रमुख श्रीकांत पाथरकर, वंचित आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे, कवी प्राचार्य अरुण पवार, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक सुभाष नाणेकर, माजी नगरसेवक राजेंद्र सोनी, संजय सुरवसे शाहीर आनंद मुंडे, प्रा.शंकर कापसे, देवराव कदम यांचा हस्ते करण्यात आले. व त्यानंतर जिजाऊ वंदना आणि प्रेरणा मंत्र घेण्यात आले उपस्थित शिवभक्तांनी जय भवानी, जय शिवाजी तुमचं आमचं नातं काय जय भवानी जय शिवरायच्या गजरात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांच्या चरणी वंदन केले. महाराजांचा ध्वज वारंवार फडकत राहो, अशी भक्तीभावाने प्रार्थना करण्यात आली.
दरम्यान हा सोहळा अनुभवण्यासाठी शिवप्रेमींच्या उत्स्फूर्त उपस्थितीने संपूर्ण मैदान गजबजून गेले होते. भगवे झेंडे फडकवत आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला होता. मोठ्या संख्येने युवक, महिला आणि नागरिक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले.
*तीन मान्यवरांचा विशेष सन्मान*

शिवरायांच्या शिकवणीप्रमाणे सामाजिक योगदान देणार्‍या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करणे, हाच खरा शिवस्मरणाचा सन्मान आहे. त्यानुसार, राकेश चांडक, रघुनाथ फड आणि रमेश चव्हाण या समाजसेवकांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांना सन्मानपत्र ,मानचिन्ह आणि शाल श्रीफळ प्रदान करून त्यांच्या कार्याची कृतज्ञतापूर्वक दखल घेतली गेली.
*वैद्यनाथ भक्ती मंडळास स्वच्छता साहित्य भेट - समाजसेवेचा संदेश*

छत्रपती शिवाजी महाराज फक्त पराक्रमी योद्धेच नव्हे, तर आदर्श शासक आणि सामाजिक भान असलेले नेतृत्व होते. त्यांच्या प्रेरणेतून वैद्यनाथ भक्ती मंडळास स्वच्छता साहित्य भेट देण्यात आले. स्वच्छतेचा संदेश रुजवण्यासाठी समितीने हा उपक्रम राबवला, जो समाजसेवा आणि राष्ट्रीय कर्तव्यभावनेचे प्रतीक ठरला.
*शिवशाहीर अरविंद घोगरे यांच्या पोवाड्याने वातावरण भारावले*

सुप्रसिद्ध शिवशाहीर अरविंद घोगरे यांच्या जाज्वल्य पोवाड्याने संपूर्ण शिवभक्त भारावून गेले. त्यांचा ओजस्वी आवाज, ज्वलंत शब्द, आणि जोशपूर्ण शैलीने उपस्थित प्रत्येकाच्या काळजाचा ठाव घेतला. शिवरायांचे अद्वितीय शौर्य, स्वराज्य स्थापनेमागील त्याग आणि संघर्ष यांचे प्रभावी चित्रण त्यांनी आपल्या पोवाड्यातून सादर केले. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना भरभरून प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमातील सूत्रसंचालन रमेश चौगुले प्रास्ताविक प्रा. अतुल दुबे केले तर आभार मोहन परदेशी यांनी मानले.
या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शिवजयंती उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक अभयकुमार ठक्कर, जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.अतुल दुबे,माजी नगरसेवक रमेश चौंडे, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मोहन परदेशी आणि कार्याध्यक्ष बबन ढेंबरे    शिवाजीनगर विभाग प्रमुख सुरेश परदेशी, छत्रपती शिवाजी महाराज चौक विभाग प्रमुख संजय सोमाणे, तसेच मनिष जोशी, दिनेश लोंढे, बजरंग औटी, अमित कचरे, सचिन लोढा, नरेश मैड, लक्ष्मण मुंडे, योगेश घेवारे, विजय पवार, योगेश जाधव, जगन्नाथ तुपसौंदर, सोमनाथ गायकवाड, पंकज पांचाळ, संस्कार पालीमकर, बालाजी सातपुते,आकाश जाधव,तुकाराम साठे, शेख बाबु ,कृष्णा टेके, गणेश काकडे, रोहित बोले, आर्यन पोरे, कृष्णा बेदरकर, राहुल फुले यांनी अथक परिश्रम घेतले.

अंबाजोगाई येथे लिंगायत कोष्टी समाज महिला संघटनेची स्थापना.महिला दिना निमित्त महिला रणरागिनींचाही सन्मान.

अंबाजोगाई  (प्रतिनिधी) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आणि महाराष्ट्र राज्य लिंगायत कोष्टी समाज संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त अंबाजोगाई येथे भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरवात श्रृती बिरंगे यांनी स्वागत गीत गाईले व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते चौंडेश्वरीदेवीच्या प्रतिमेची पुजा व दिप प्रज्वलन करून  झाली,लिंगायत कोष्टी समाजाच्या महिला संघटनेची स्थापना करण्यात आली असून, नवनिर्वाचित कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
संघटनेच्या महिला अध्यक्षा सौ. सुनंदाताई आष्टगी यांच्या हस्ते कार्यकारिणी सदस्यांना नियुक्ती पत्र प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. नव्याने स्थापन झालेल्या कार्यकारिणीमध्ये पुढील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली:
अध्यक्ष: सौ. सीमा वरवटकर उपाध्यक्ष: सौ. वर्षा चिमणगुंडे सचिव: सौ. अश्विनी नंदिकोले सहसचिव: सौ. किशोरी शेंगुळे कोषाध्यक्ष: सौ. सीमा शेंगुळे संघटक: सौ. श्रद्धा मसनाळे आदींची निवड करण्यात आली.
महिला दिनानिमित्त समाजातील कष्टमय जीवन जगत संघर्षातून आपले स्वतंत्र विश्व निर्माण करणाऱ्या रणरागिणींचा विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी  श्रीमती सुमनकाकू उमराणे श्रीमती लताताई रांजणकर श्रीमती शांताताई होळगे यांचा शाल, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला:
कार्यक्रमाला सौ. शितल वांडरे (उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य लिंगायत हडगार कोष्टी समाज संस्था), सौ. सविताताई द्रुकर (अध्यक्ष, कोष्टी समाज अंबाजोगाई) आणि सौ. ज्योती सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती होती. बालसंगोपन या विषयावर सौ. ज्योती सुरवसे यांनी मार्गदर्शन केले. तसेच, "सासूची जावाई असाच असावा असा अट्टाहास का?" या महत्त्वपूर्ण विषयावर सौ. सुरेखा बालाजी सवने  शिरूर अनंतपाळ यांनी चर्चा करण्यात आली.
यावेळी समाजातील जेष्ठ महिलांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अश्विनी नंदिकोले यांनी केले, तर रूपाली आगलावे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला.

Monday, March 17, 2025

जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीतर्फे आज भव्य सोहळ्याचे आयोजन.सुप्रसिद्ध शिवशाहीर अरविंद घोगरे यांच्या जाज्वल्य पोवाड्याचे होणार सादरीकरण.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जय महाराष्ट्र शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य उत्सवाचे आज सोमवारी आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण, तसेच सुप्रसिद्ध शिवशाहीर अरविंद घोगरे यांच्या जाज्वल्य पोवाड्याचे सादरीकरण होणार आहे.
यावेळी राकेश चांडक, रघुनाथ फड आणि रमेश चव्हाण यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. तसेच, वैद्यनाथ भक्ती मंडळास स्वच्छता साहित्य भेट देऊन समाजसेवेचा आदर्श घालून दिला जाणार आहे.
हा उत्सव कृषी उत्पन्न बाजार समिती, मोंढा मार्केट येथे संध्याकाळी 6:35 वाजता सुरू होणार आहे. सर्व शिवभक्तांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक अभयकुमार ठक्कर, जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. अतुल दुबे, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मोहन परदेशी आणि कार्याध्यक्ष बबन ढेंबरे यांनी केले आहे. संपूर्ण शिवप्रेमी जनता, शिवभक्त व मातृभूमीवर निस्सीम प्रेम करणाऱ्या सर्वांना या ऐतिहासिक सोहळ्यात सामील होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Thursday, March 13, 2025

बीडमध्ये पोलिस अधीक्षकांची यशस्वी संकल्पना. टेबल अन् छातीवरही पहिल्याच नावाची प्लेट.आडनाव वगळले.


बीड :(प्रतिनिधी) आडनावावरून काही लोकांनी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जातीचे आरोप केले. हाच धागा पकडून पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पहिल्या नावाने बोलण्यासह टेबलवर नेमप्लेट देण्याचा निर्णय घेतला. आता टेबलवर तर नेमप्लेट दिलीच परंतु छातीवरही पहिल्या नावाची प्लेट लागली आहे. अशी संकल्पना राज्यात पहिल्यांदाच बीडमध्ये राबविण्यात आली आहे.

जिल्ह्यात सध्या जातीयवाद वाढत चालला आहे. मागील आठवड्यापासून तर सोशल मीडियावर प्रचंड आरोप-प्रत्यारोप, अश्लील भाषा वापरली जात आहे. तसेच एखाद्याने पोलिसांबद्दल पोस्ट टाकली की त्याखाली जातीवाचक कॉमेंट्स केल्या जात आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही असे अनेकदा झाले होते. यावर नूतन पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी हा जातीयवाद संपविण्यासाठी पोलिस दलातील प्रत्येकाने एकमेकांना पहिल्या नावाने बोलण्याचा आदेश काढला. त्यानंतर त्यांना टेबलवर ठेवण्यासाठी पहिल्या नावाची नेमप्लेट दिली. परंतु त्यानंतरही आता एक पाऊल पुढे टाकत खाकी वर्दीवर उजव्या बाजूला छातीवर असलेल्या नेमप्लेटमधूनही आडनाव वगळले आहे. अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आता पहिलेच नाव प्लेटवर ठेवले आहे.

संकल्पनेचे स्वागत.

पोलिस अधीक्षक काँवत यांनी राबविलेल्या या संकल्पनेचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. परंतु काही लोकांनी पोलिस नियमांवरही बोट ठेवले आहे. परंतु आपण हा निर्णय सकारात्मक भावनेतून घेतल्याचा दावा काँवत यांनी केला आहे.

आडनाव काढल्याचा परिणाम.

एखादा गुन्हा दाखल करताना पीएसओ, तपास करताना अधिकारी, कर्मचारी किंवा बंदोबस्ताच्या ठिकाणी आडनाव पाहून काही लोक उगाचच टीका करतात. परंतु पोलिसांना कोणतीही जात नसते. जातीवर आम्ही काम करत नाहीत. जनतेची सुरक्षा करणे हाच आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे हा जातीयवाद थांबवावा, असेही एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

वातावरण नक्कीच सलाेख्याचे दिसेल.

पहिल्या नावाने बोलण्यासह इतर राबविलेल्या संकल्पना यशस्वी होत असल्याचे समाधान आहे. माझे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी याला प्रतिसाद दिला. आगामी काळात जिल्ह्यातील वातावरण नक्कीच सलाेख्याचे दिसेल, असा विश्वास आहे.- नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक बीड

Wednesday, March 12, 2025

परळी बाजारपेठेत होळी आणि रंगपंचमी ची धामधूम.नैसर्गिक रंगांना अधिक पसंती.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - होळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, शहरात उत्साहाचे वातावरण आहे. यानिमित्त परळीतील बाजारपेठ रंगीबेरंगी सजली असून, विशेषतः रंगपंचमीसाठी लहानग्यांची खरेदीची लगबग वाढली आहे.
सध्या बाजारात विविध प्रकारच्या पिचकार्‍यांसह नैसर्गिक रंगांची मागणी वाढली आहे. विशेषतः कार्टून थीमवरील पिचकार्‍यांना लहानग्यांकडून मोठी पसंती मिळत आहे. होळी आणि रंगपंचमीचा आनंद लुटण्यासाठी मुले आधीच पाण्याच्या पिशव्यांचा मारा करताना, तसेच पिचकार्‍यांमधून पाणी उडवत धमाल करताना दिसत आहेत.
यंदा बाजारात रंग आणि पिचकार्‍यांचे दर सुमारे 10 टक्क्यांनी वाढले असल्याचे विक्रेते सचिन पाचनकर यांनी सांगितले. तरीही रंगपंचमीप्रेमींकडून नैसर्गिक रंगांना अधिक मागणी असल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण असून, सणासाठी खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे.

Monday, March 10, 2025

राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कारासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन - बालासाहेब जगतकर.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कारासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र चे संपादक बालासाहेब जगतकर यांनी केले आहे.                  याबाबत सविस्तर माहिती अशी की तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व साप्ताहिक मानपत्र च्या वतीने राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल विशेष कार्य गौरव पुरस्कार 2025 हा राज्यातील सामाजिक शैक्षणिक शिक्षक सांस्कृतिक कृषी सहकार उद्योग वैद्यकीय प्रशासकीय पत्रकारिता वृत्तपत्र इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीडिया युवक महिला कला साहित्य क्रीडा पर्यावरण ग्रामविकास अधिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व मान्यवर व्यक्तींचा विशेष कार्य गौरव सन्मान करून भावी वाटचालीस तसेच उल्लेखनीय कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून हा राष्ट्रीय उत्कृष्ट पुरस्कार आयोजित केला असून या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह सन्मानपत्र फ्रेम आणि पदक असे असून इच्छुकांनी आपले नाव नोंदणी आजच करून घ्या पुरस्कार वितरण नासाठी नाव नोंदणी दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी पर्यंत करण्यात येणार असून सदरील कार्यक्रम हा 11 मे 2025 रोजी राज्यातील वैद्यनाथ पावन भूमी परळी येथे होणार आहे तरी जास्तीत जास्त विशेष कार्य गौरव पुरस्कार साठी नाव नोंदणी करावी यासाठी आपण केलेल्या कार्याची पुरावे व कागदपत्रे फोटोसह 96 89 84 71 11 व 91 12 31 17 77 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावे असेही आव्हान तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा साप्ताहिक मानपत्राचे संपादक बाळासाहेब जगतकर यांनी केले आहे

मारहाणीत तरुण मरण पावला समजून रोडवर फेकले. तरुणाच्या आईलाही मारहाण सहाजणांविरोधात गुन्हा.


बीड (प्रतिनिधी) केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच यांची अपहरण करून हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच, शिरूर तालुक्यातील घाटशीळ पारगावातही अशीच घटना घडली आहे. माय-लेकाला बेदम मारहाण केली. नंतर तरुणाचे जीपमधून अपहरण करून त्याला वायर, रॉडने मारहाण केली. तो मरण पावला म्हणून त्या तरुणाला रस्त्यावर फेकून दिले. ही घटना १ मार्च रोजी घडली होती. या प्रकरणी सहाजणांविरोधात २ मार्च रोजी गुन्हाही दाखल झाला आहे; परंतु या मारहाणीचा व्हिडीओ रविवारी व्हायरल झाला आहे.

कृष्णा दादासाहेब घोडके (वय २५, रा. घाटशीळ पारगाव, ता. शिरूर कासार) व संजीवनी घोडके अशी जखमींची नावे आहेत. कृष्णा यांच्या फिर्यादीनुसार त्यांचा मोठा भाऊ गणेश घोडके हा पत्नी शीतलसोबत खोपोली (जि. पुणे) येथे राहत होता. ७ जानेवारी रोजी गणेश व शीतल यांच्यात वाद झाला आणि शीतलचा मृत्यू झाला. या प्रकरणात गणेश हा सध्या कारागृहात आहे. त्यानंतर १ मार्च रोजी सकाळी १० वाजता कृष्णा हे टरबूज पिकावर फवारणी करत असताना अंकुश तांबारे, मंगेश तांबारे, रावसाहेब तांबारे, भारत तांबारे (सर्व रा. जांब, ता. शिरूर कासार) हे लोक तेथे आले.

त्यावेळी अचानक अंकुश तांबारे याने त्याच्याकडील लोखंडी रॉडने, मंगेश तांबारे याने डीपीच्या वायरने, रावसाहेब तांबारेने, लाकडी काठीने, भारत तांबारेने रबरी नळीने डोक्यात, पाठीवर, तोंडावर, पोटावर मारायला सुरुवात केली. त्यांपैकी अंकुश तांबारे याने 'गणेशला भेटायला कशाला गेला, त्याला वकील का लावला ?' असे म्हणत मारहाण केली. तेवढ्यात दादासाहेब बहीर यांनी तेथे संजीवनी घोडके यांना केस धरून ओढत आणले. त्यांच्यासोबत शिरू तांबारे हादेखील होता. या सर्वांनी संजीवनी यांनाही मारहाण करून शेतातच सोडून दिले; तर मारहाण करत कृष्णाला रोडला उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या गाडीत (एमएच १६ एटी ६६६९) पाठीमागच्या सीटवर टाकून एकनाथ वाडीच्या दिशेने घेऊन गेले. गाडीत आरडाओरड केल्याने रावसाहेब तांबारे व मंगेश तांबारे यांनी पुन्हा मारहाण केली. त्यानंतर चक्कर येऊन कृष्णा हे बेशुद्ध झाले. तो म्हणून या सर्वांनी त्याला सोडून निघून गेले; परंतु शुद्धीवर आल्यावर कृष्णा यांनी मदतीसाठी फोन करून पोलिसांना बोलावून घेतले.

खोक्यामुळे शिरूर चर्चेत.

सध्या आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता कुख्यात आरोपी सतीश ऊर्फ खोक्या भोसले याच्या व्हायरल व्हिडीओने शिरूर तालुका चर्चेत आहे. त्याने बाप-लेकालाही बेदम मारहाण केली होती. ही दोन प्रकरणे ताजी असतानाच आता रविवारी आणखी एक व्हिडीओ समोर आला. यात माय-लेकाला बेदम मारहाण केली आहे..

लिंगायत कोष्टी समाज संस्थेच्या वतीने वधू-वर पालक परिचय मेळावा.वधू-वर परिचय मेळावे विवाह जुळवण्यासाठी उपयुक्त - डॉ. नंदकुमार वसवाडे

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – समाजातील वधू-वरांच्या विवाह जुळवण्यासाठी ओळख व संवाद होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा मेळाव्यांमुळे पालकांना आपल्या मुलांसाठी योग्य जोडीदार निवडण्याची संधी मिळते. त्यामुळे वधू-वर परिचय मेळावे नियमितपणे आयोजित होणे आवश्यक आहे, असे मत महाराष्ट्र राज्य लिंगायत हटगर कोष्टी समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार वसवाडे यांनी व्यक्त केले.
संस्थेच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त दिनांक 9 मार्च 2025 रोजी स्वयंवर मंगल कार्यालय, माळीनगर, अंबाजोगाई येथे वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यभरातून शेकडो वधू-वर पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. वसवाडे म्हणाले, "प्रत्येक पालकांची इच्छा असते की त्यांच्या मुलामुलींना चांगला जीवनसाथी मिळावा. अशा मेळाव्यांमुळे योग्य जोडीदार शोधण्यास मदत होते आणि विवाह जुळवणीसाठी बाहेर फिरण्याचा त्रास वाचतो. त्यामुळे असे मेळावे वारंवार होणे आवश्यक आहे."

 *उत्कृष्ट आयोजन व मान्यवरांची उपस्थिती* 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपअधीक्षक संजय डहाके, तर अध्यक्ष म्हणून डॉ. नंदकुमार वसवाडे हे उपस्थित होते. तसेच बारामती येथील फौजदार बजरंग कोरवले, पुणे येथील फौजदार श्रीमती श्वेता नरखेडकर, महाराष्ट्र राज्य महिला लिंगायत हटगर कोष्टी समाज संस्थेच्या अध्यक्षा सौ. सुनंदा अष्टगी, तसेच सचिन हळदे, परमेश्वर जावळकोटी, शंकर बेले, महादेव निराळे, सचिन ढोपरे, चिंतामण पारीशवाड, अनिल तुळसनकर, श्रीमती शीतल वांढरे, प्रशांत वैंदकर, किरण कोष्टी, दीपक काटे, श्रीशैल मालापुरे, सतिश बिडवे आदी मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
 *शेकडो विवाह इच्छुकांना लाभ* 

या मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील विवाह इच्छुक वधू-वर आणि त्यांच्या पालकांना योग्य जोडीदार निवडण्यासाठी सुवर्णसंधी मिळाली. राज्यभरातून आलेल्या समाजबांधवांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला.

 *नितीन जुजगर व डॉ. अशोक शिनगारे यांचा विशेष सत्कार* 

समाजाच्या सामाजिक व धार्मिक कार्यात सक्रिय योगदान देणारे माजलगाव येथील श्री. नितीन जुजगर आणि "एक हात मदतीचा" या उपक्रमांतर्गत समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मदत करणारे डॉ. अशोक शिनगारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

 *कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजबांधवांचे योगदान* 

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंबाजोगाई येथील लिंगायत हटगर कोष्टी समाजाच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. समाजातील विवाहसंस्थेला बळकटी देणारा आणि समाजातील कुटुंबांना जोडणारा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद ठरला.

Friday, March 7, 2025

नायब तहसीलदारांच्या दालनात महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न !


केज (प्रतिनिधी) नवऱ्या पासून विभक्त राहत असलेल्या महिलेला तिच्या माहेरच्या कडून मिळालेली जमीन तिच्या पतीने परस्पर बनावट दान-पत्रा आधारे दुसऱ्या पत्नीच्या मुलाच्या नावाने केली. तो बनावट फेर रद्द करावा, या मागणीसाठी एक परित्यक्ता महिला अनेक वर्षा पासून तहसील आणि उपविभागीय अधिकारी यांच्याकडे खेटे घालीत आहे. आज त्या प्रकरणी सूनावणी ठेवण्यात आली होती. सुनावणी संपल्या नंतर संतप्त आणि त्रस्त महिलेने नायब तहसीलदार यांच्या दालनात स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र हा प्रकार लक्षात येताच तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला रोखले.

या बाबतची माहिती अशी की, १९९० मध्ये दीपा देशमुख यांचा विवाह वरपगाव ता. केज येथील येथील रविंद्र श्रीहरी भोसले यांच्या सोबत झाला होता. विवाहा नंतर त्यांना कोमल नावाची मुलगी झाली. तसेच दिपा भानासुर देशमुख यांची आई रुक्मीण देशमुख यांनी त्यांच्या नावे असलेली जमीन मुलगी दिपा देशमुख हिच्या नावाने केली होती. परंतु काही दिवसा नंतर रवींद्र भोसले याने पहिली पत्नी असताना दुसऱ्या एका महिलेशी लग्न केले. तिच्या पासुन रवींद्र भोसले यास दोन मुली व एक मुलगा जन्माला आला. त्यामुळे दिपा देशमुख ही तिची मुलगी कोमल देशमुख हिला घेवून नवरा रवींद्र भोसले यांच्या पासून विभक्त राहत आहे.

त्या दरम्यान रवींद्र भोसले याने पहिली पत्नी दिपा हिच्या नावाने असलेली गट नंबर ५६/१ व गट नंबर ५७/१ मधील ८१ आर जमीन ही रवींद्र भोसले यांनी बनावट दान-पत्रा आधारे आणि तलाठी मंडळ अधिकारी यांच्याशी संगनमत करून एका बाँड आधारे दुसऱ्या पत्नी पासून झालेल्या मुलगा उत्तरेश्र्वर भोसले याच्या नावाने महसुली दस्तावेज करून घेतला.

रवींद्र भोसले यांनी तत्कालीन महसुली अधिकारी यांच्याशी संगनमत करून उत्तरेश्र्वर भोसले यांच्या नावे केलेला फेर रद्द करण्याच्या मागणीसाठी दिपा देशमुख या अनेक दिवसा पासून तहसील कार्यालय आणि उपविभागीय कार्यालयात खेटे घालीत आहेत.

आज दि. ६ मार्च रोजी हा फेर रद्द करण्याच्या संदर्भात केज तहसील कार्यालयात सुनावणी झाल्यानंतर दिपा देशमुख यांनी हा फेर रद्द का झाला नाही ? म्हणून नायब तहसीलदार अशोक भंडारे यांच्या दालनामध्ये दुपारी ४:०० वा. च्या सुमारास सोबत एका प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये आणलेले पेट्रोल स्वतःच्या अंगावर ओतून घेवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी तहसील कार्यालयात असलेल्या महिला नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड आणि कर्मचाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्या महिलेला आत्मदहन करण्यापासून रोखले.

त्यानंतर केज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वैभव पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, सहाय्यक महिला पोलीस उपनिरीक्षक सविता निरडे हे घटनास्थळी हजर झाले. त्यांनी दिपा देशमुख या महिलेला आत्मदहन करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.

आत्मदहनाच्या प्रयत्ना नंतर तहसीलदारांनी काढले आदेश

दिपा भानासूर देशमुख यांनी बनावट फेर रद्द करण्याच्या मागणीसाठी अंगावर पेट्रोल ओतून घेतल्यानंतर तहसीलदार राकेश गिड्डे यांनी तातडीने तलाठी व मंडळ अधिकारी यांना मौजे वरपगांव ता. केज येथील जमीन स. नं. ५६/१ आणि मधील क्षेत्र ०.२६ हे आर व स नं ५७/१ मधील क्षेत्र ०१ हे ७४ आर. मध्ये फेरफार क्रमांक ८०५ रदद करण्यात येतो. असा आदेश उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई यांनी दिनांक १७ जानेवारी २०२३ रोजी न्यायनिर्णय पारीत केलेला आहे. या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करावी व स.नं. ५६/१ व ५७/१ ची ७/१२ व फेरफार या कार्यालयास आजच सादर करावा असे आदेश दिले आहेत. तसेच या कामी हयगय अथवा विलंब टाळावा. विलंबाची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घ्यावी. अशी तंबी देखील दिली आहे.

जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाजकल्याण विभागाच्या वतीने दिव्यांगासाठीची मोफत स्कूट.सामाजिक न्याय भवनात निघणार 'लकी ड्रॉ'


बीड (प्रतिनिधी): जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाजकल्याण विभागाच्या वतीने  दिव्यांगाना मोफत तीनचाकी स्कूटर दिली जाणार आहे. सदरील योजनेंतर्गत स्कूटर वाटपाचे उद्दिष्ट ५४ असून १३२८ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे लकी ड्रॉ काढून लाभार्थ्यांना स्कूटरचे वाटप केले जाणार आहे. बीड शहरातील नगर रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे ८ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता हा लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला आहे. 

जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाजकल्याण विभागातर्फे सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ५ टक्के दिव्यांग निधीमधून १०० टक्के अनुदान तत्त्वावर अस्थिव्यंग प्रवर्गासाठी स्कूटर विथ अडॉप्टर वाटप योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित तालुक्यातील पंचायत समितीमधील गटविकास अधिकारी यांच्याकडे दिव्यांग बांधवांनी अर्ज केले होते. त्यानुसार बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील १३२८ अर्ज प्राप्त झाले आहेत; परंतु ५४ दिव्यांग बांधवांना तीनचाकी स्कूटर विथ अडॅप्टरचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. उद्दिष्टापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले असल्याने लकी ड्रॉ काढला जाणार आहे.

अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने निर्धारित उद्दिष्टानुसार पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याच्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे ८ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता हा लक्की ड्रॉ आयोजित करण्यात आला आहे. हा लकी ड्राॅ इन कॅमेरा होणार आहे. सर्व अर्जदारांनी लकी ड्रॉसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी एस. एन. मेश्राम यांनी केले आहे.

शासकीय कामकाजात अक्ष्यम दुर्लक्ष फेरफार प्रलंबित, मंडळ अधिकारी निलंबीत.बीड जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश.



बीड (प्रतिनिधी) फेरफार प्रलंबित ठेवून शासकीय कामकाजाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले, या प्रकरणी बीड तालुक्यातील लिंबागणेशचे मंडळ अधिकारी अशोक गोरख डरफे यांना जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी शासन सेवेतून निलंबीत केले आहे.

५ मार्च रोजी गेवराई येथे प्रलंबित फेरफारबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये प्रलंबित फेरफारबाबत मंडळनिहाय आढावा घेण्यात आला असता बीड तहसील कार्यालयांतर्गत असलेल्या लिंबागणेशचे मंडळ अधिकारी अशोक डरफे यांच्याकडे ५६ फेरफार प्रलंबित असल्याचे दिसून आले. सदरील प्रलंबित फेरफारबाबत डरफे यांना विचारणा केली असता त्यांनी मोघम स्वरुपाचे उत्तर दिले. बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील प्रलंबित फेरफारची संख्या जास्त असल्याने अशोक डरफे यांना बैठकामध्ये वारंवार सूचना देऊनही त्यांनी ५६ फेरफार प्रलंबित ठेवले. 

शासकीय कामकाजात अक्ष्यम दुर्लक्ष, कर्तव्यात सचोटी न ठेवता गंभीर स्वरुपाची बाब आहे. हे वर्तन महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९, चा नियम ३ नुसार गैरवर्तन ठरते. अशोक डरफे यांच्या गैरवर्तनाचे गांभीर्य विचारात घेऊन ५ मार्च रोजी पासून निलंबीत करण्यात आले आहे. या संबंधीचा आदेश जिल्हाधिकारी पाठक यांनी दिला आहे. निलंबन कालावधीत परळी तहसील हे मुख्यालय देण्यात आले असून सक्षम अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगी शिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच अशोक डरफे यांच्या विरुद्ध विभागीय चौकशीचा प्रस्तावित करण्यात आला आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी मुदतवाढ. त्रुटी पूर्ण करून पुन्हा अर्ज करावा !


बीड (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ.बाबा साहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी १५ मार्च पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले अर्ज वेळेत दाखल करणे आवश्यक आहे. hmas.mahait.org या पोर्टलवर अर्ज दाखल करावा लागणार आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरलेल्या, मात्र शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजनेंतर्गत अर्ज दाखल करता येतो. या योजनेचा लाभ गोरगरीब विद्यार्थ्यांना होताे. सदरील योजनेंतर्गत अकरावी व बारावी, तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक, तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध महाविद्यालयांत, शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील मुला-मुलींप्रमाणे भोजन, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी अर्थसाहाय्य दिले जात आहे. दरम्यान, स्वाधार योजनेसाठी १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. विद्यार्थ्यांचे उशिरा सुरू होणारे शैक्षणिक सत्र, ऑनलाइन अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी यांसह इतर कारणांवरून स्वाधार योजनेसाठी मुदतवाढ करण्याची विनंती विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली होती. त्यानुसार, १५ मार्चपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

काय आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना?अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना मागासवर्गीय मुला-मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी अर्थसहाय्य देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना २०१६-१७ पासून सुरू केली आहे.

कागदपत्रे काय लागतात?भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना बँक पासबुक, आधार कार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, प्रवेशित विद्यालयाचे बोनाफाईड, मार्क मेमो, शाळा सोडल्याचा दाखला, हजेरी पत्रक अशी विविध कागदपत्रे द्यावी लागतात.

अर्जाची स्थिती तपासावीभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा, अर्जात काही त्रुटी आढळून आल्यास विद्यार्थ्याच्या लॉगीनला पाठविले जातील. विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगीनमध्ये अर्जाची स्थिती तपासावी. काही त्रुटी असल्यास त्या पूर्ण करुन पुन्हा अर्ज सबमीट करावा. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगीनला जाऊन बँक तपशील भरावा.- प्रदीप भोगले, सहायक आयुक्त, समाजकल्याण, बीड

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,दै समर्थ राजयोग आणि आश्रय सेवा केंद्र बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्रीरत्न पुरस्कार जाहीर.जागतिक महिला दिनी होणार सन्मान.


स्त्री रत्न पुरस्कार 2025 चे सत्कार मुर्ती - सौ. प्राजक्ता सुरेश धस, श्रीमती निर्मला झुंबरलाल खटोड, सौ. चंपावती काकी कृष्णा पानसंबळ, डॉ. मीरा प्रशांत ढाकणे (नागरे), श्रीमती अनिता गौतम वाघमारे, सौ.रूपाली जयंत देशपांडे,सौ जयश्री विलास विधाते, सौ रुक्मिणी नवनाथ शिराळे, सौ प्रतिभा शिनगारे (शिंदे), सौ मेधा गोसावी (कुलकर्णी), सौ अरुणा हांप्रस, सौ दैवशाला सिरसट(भालेराव), श्रीमती द्वारका कांबळे, मसरत सुलताना बेगम, उम्मेहानी शेख, झीनत शेख यंदाच्या पुरस्काराचे मानकरी ठरल्या..!

बीड (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई दैनिक समर्थ राजयोग आणि आश्रय सेवा केंद्र बीड यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय स्त्री रत्न पुरस्कार – 2025 चे वितरण मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख तथा संपादक वैभव स्वामी आणि कार्यक्रमाच्या आयोजक शेख आयेशा अध्यक्ष आश्रय सेवा केंद्र तथा संपादक लोकजगत यांनी केले आहे.

बीड येथील हॉटेल नीलकमलच्या तिसऱ्या मजल्यावरील प्रशस्त हॉलमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिनांक 8 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता राज्यस्तरीय स्त्रीरत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. या शानदार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी निवासी जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी साहेब यांची विशेष उपस्थिती राहणार असून बीड विधान सभेचे आमदार संदीप भैया क्षीरसागर, आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे राज्यभर गाजत असलेले आमदार सुरेश धस यांच्या सुविध्य पत्नी सौ प्राजक्ता सुरेश धस, माजी आमदार अँड उषाताई दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात, उपविभागीय जिल्हाधिकारी सौ कविता जाधव, प्रकल्प संचालक डीआरडीए जिल्हा परिषदच्या संगीतादेवी पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे,प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक पूजा पवार, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन चे प्रभारी कार्यकारी अभियंता कृष्णा पानसंबळ, बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख आणि बीड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी समंदर खान या मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार मूर्तींना गौरवण्यात येणार आहे.सत्कारमूर्तींना शाल,एक झाड, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, आणि फेटा बांधून सन्मानित करण्यात येणार आहे.या दैदिप्यमान सोहळ्यास सत्कारमूर्तींच्या कुटुंबीयांनी, त्यांच्या आप्तेष्ट, मित्र परिवार, नातेवाईक तसेच या कार्यक्रमास तमाम पत्रकार बांधवांनी त्यांच्या कुटुंबियांनी पत्रकार प्रेमी नागरिकांनी उस्फूर्तपणे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख तथा दैनिक समर्थ राजयोगचे संपादक वैभव विवेक स्वामी तसेच आश्रय सेवा केंद्राच्या अध्यक्ष तथा लोकजगतच्या संपादक शेख आयेशा यांनी केले आहे.