गेवराई (प्रतिनिधी) अवैध गर्भपात प्रकरणातील जालन्याच्या आरोपी डॉक्टर सह बडतर्फ अंगणवाडी सेविकेने जामिनावर बाहेर येताच गर्भपात केंद्र उघडून धंदा सुरू केला.दरम्यान याची माहिती मिळताच जिल्हा शल्य चिकित्सक व पोलिसांनी गुरुवारी सकाळी सहाच्या सूमारास गेवराईतील संजय नगर भागातील केंद्रावर छापा मारला. या कारवाईत गर्भपातासाठी लागणाऱ्या मशीन सह मनीषा सानप घर मालक चंद्रकांत पांडुरंग चंदनशिव यांना पकडले मात्र आरोपी डॉ.गवारे फरार झाला.
मनीषा शिवाजी सानप वय 40 वर्ष,रा. अर्धमसला,ता.गेवराई व जालन्याचा डॉ.सतिष गवारे यांनी अवैध गर्भपात प्रकरणातून जामीन मिळताच गेवराईतील संजय नगर भागात चंद्रकांत पांडुरंग चंदनशिव यांच्या घरात पुन्हा गर्भपात केंद्र स्थापन केले. गेवराईत अवैध गर्भलिंग निदान केले जात असल्याची तक्रार राज्याच्या आरोग्य विभागाकडे आली होती. त्याप्रमाणे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अशोक बडे यांनी पाेलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेऊन सापळा लावण्याचे निश्चित केले. गुरुवारी सकाळी डमी रुग्ण तपासणीसाठी पाठविण्यात आले. गेवराईतील एका घरात नेऊन तिची तपासणी सुरू केली. याच दरम्यान, अंगणवाडी सेविका मनीषा सानप हिला पकडले. सोबतच बाहेर उभा असलेला घरमालक चंदनशिव यालाही दबा धरून बसलेल्या पथकाने पकडले. परंतु, डॉ. गवारे हा तेथून पळून गेला. दरम्यान या ठिकाणी छापा मारल्यानंतर सोनोग्राफी मशीन व गर्भपातासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. या तिघांविरोधातही गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment