Thursday, August 31, 2023
राष्ट्रीय क्रिडा दिना निमित्त धनराज पिल्ले यांच्या हस्ते कु.सानवी व चि.सूर्या सौंदळे या बहीण - भावाचा सन्मान.
Tuesday, August 29, 2023
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी-भीमाशंकर नावंदे.
राजस्थानीज पोदार लर्न स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा.खेळ हा प्रत्येकच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे :- सहसचिव धीरज बाहेती
Saturday, August 26, 2023
गंगावाडी येथील जागृत देवस्थान श्री.पंचलिंगेश्वर महादेव मंदिर संस्थान.
शेतकरी आर्थिक संकटात, अजित पवारां ची सभेसाठी लाखोंची उधळपट्टी बीड मधील सभेवरून ठाकरे गटाचा गंभीर आरोप.
अजित पवारांच्या होर्डिंगसाठी 18 कोटी रुपयांच्या मशीनने पाडले होल
बीडमध्ये आज अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटाची राज्यातील पहिली सभा होत आहे. यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्वच मंत्रिमंडळ येत आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या स्वागताचे होर्डिंग लावण्यासाठी थेट 18 कोटी रुपयांच्या मुख्य महामार्गालाचं मशीनच्या माध्यमातून मोठमोठे होल पाडण्यात आले आहेत.
या कामामुळे या रस्त्याची लवकरच वाट लागण्याची शक्यता आहे. भविष्यात आज लहान दिसणारे हे होल रस्त्याला तडे जाण्याला देखील कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. यामुळे बीडकारांमधून संतापाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
Friday, August 25, 2023
७० हजाराची लाच घेताना लाचखोर एसीबीच्या जाळ्यात!
गेवराई (प्रतिनिधी) बीड शहरातील शिवाजी नगर ठाण्यातील लाचेचे प्रकरण ताजे असताना, गेवराईत परत ७०,००० हजाराची लाच घेताना एका लिपिकास ताब्यात घेतले. जिल्ह्यात लाचेच्या घटना वाढल्याने, जिल्ह्यातील किती अनागोंदी कारभार सुरुय हे लक्षात येते.
संभाजी ब्रिगेड व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला यश.न.प. प्रशासनाने डास निर्मूलनासाठी फॉगिंग मशीनद्वारे सुरु केली औषध फवारणी.
Thursday, August 24, 2023
आजारी आईला तपासा म्हणत मुलाने डॉक्टरला फेकून मारली वीट.
बीडच्या शेतकरी पुत्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना सभेआधी 6 प्रश्न, अख्ख्या बीडमध्ये बॅनरची चर्चा.
बीड(प्रतिनिधी)राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 27 ऑगस्ट रोजी बीडमध्ये सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी पुत्राने अजित पवारांसमोर 6 प्रश्न उपस्थित केलेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅनरच्या माध्यमातून हे 6 प्रश्न विचारले आहेत. सध्या हे बॅनर चर्चेचा विषय बनले आहे.
शेतकरी पुत्राने काय प्रश्न विचारले?
बारामतीप्रमाणे बीड जिल्हा जलसमृद्ध कधी होणार?
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2020 चा पिक विमा मिळाला, आमच्या शेतकऱ्यांना कधी ?
गेल्या वर्षीचे अनुदान वाटप कधी?
जिल्ह्यांच्या शैक्षणिक विकासासाठी एखादे विद्यापीठ कधी ?
कामगारांना प्रमाणपत्र आणि पाल्यांना शिष्यवृत्ती कधी ?
बारामतीचे रस्ते चकाचक झाले बीडचे खड्डे भरणार कधी ?
अजित पवारांचा लोकप्रतिनिधींशी चर्चा
बीड जिल्ह्यातील विकासकामे, दुष्काळी परिस्थिती, विविध प्रस्तावित जलप्रकल्प, वीजपुरवठा व महावितरण कडील अन्य समस्यांचे निराकरण आदी विषयी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडेंसह लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. बीड जिल्ह्यात येत्या रविवारी होत असलेल्या जाहीर सभेमध्ये कोणत्याही घटकांवर टीका न करता बीड जिल्ह्यातील विकास कामांचा लेखाजोखा मांडण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी याआधीही सांगितले होते. त्याला अनुसरून मंत्रालयात बीड जिल्ह्यातील विकास कामांच्या संदर्भात विविध बैठकांचे सत्र सुरू आहे.
मौजे जवळगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास उत्साहात प्रारंभ. गुरू-शिष्य परंपरेतूनच विश्वात्मककल्याण साध्य होत_ ह.भ.प श्री.नारायण महाराज बारटक्के.
Wednesday, August 23, 2023
चाेर नव्हे तर चक्क पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्याने लाचेची रक्कम घेऊन ठोकली धूम.
बीड (प्रतिनिधी) अपहरणाच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व जप्त केलेले वाहन सोडण्यासाठी १५ हजार रूपयांची लाच मागितली. पैकी दहा हजार रूपये घेताना पोलिस उपनिरीक्षकासह पोलिस कर्मचाऱ्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांनी धूम ठोकली. त्यानंतर एसीबीच्या टीमने पाठलाग करत दोघांनाही ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाणे परिसरात करण्यात आली.
लक्ष्मण कनलाल कीर्तने (वय ३४) हे पीएसआय असून रणजीत भगवान पवार (वय ४२) हे हवालदार आहेत. दोघेही शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. कीर्तने हे साधारण तीन महिन्यांपूर्वीच बीड जिल्ह्यात बदलून आले आहेत. मागील आठ दिवसांपूर्वी एका अपहरणाच्या गुन्ह्याचा तपास कीर्तने यांच्याकडे होता. यात तीन आरोपी होते. या सर्वांना अटक न करण्यासाठी त्यांनी लाचेची मागणी केली. कारवाई आधीच म्हणजे मंगळवारी सकाळीच त्यांनी १० हजार रूपये घेतले होते. त्यानंतर आणखी ८ हजार रूपये घेतले. पुन्हा पैशांची मागणी केल्याने एसीबीकडे तक्रार करण्यात आली. त्याप्रमाणे एसीबीने सापळा रचत या दोघांनाही पकडण्याचा प्रयत्न केला. कीर्तने व पवार हे दोघे दुचाकीवरून आले. त्यांनी १० हजार रूपये घेत लगेच धुम ठोकली. त्यानंतर एसीबीच्या टीमने त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांच्याकडून लाचेची रोख १० रूपयांची रक्कमही जप्त केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पेालिस निरीक्षक गुलाब बाचेवाड, युनूस शेख, सुरेश सांगळे, श्रीराम गिराम, अविनाश गवळी, संतोष राठोड, भारत गारदे, अमोल खरमाडे आदींनी केली.
पोलिस ठाणे कायमच वादात.
या पोलिस ठाण्यात नेहमीच पोलिस अधिकारी, कर्मचारी लाच घेताना पकडले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच बसस्थानकातील चोर पकडले. नंतर तोडपाणी करून सोडून दिल्याची चर्चा होती. ही चर्चा थांबत नाही तोच पीएसआय आणि कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडले. त्यामुळे हे पोलिस ठाणे कायमच वादात राहत आहे
बीड,लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यावर पाणी संकट.आठवडाभरात धरणातील पाणीसाठा झाला कमी.
दरम्यान गेल्या एक महिन्यांपासून बीड जिल्ह्यात पाऊस नाही. यामुळे जिल्ह्यातील धरणे कोरडे पडत आहेत. तर नद्या आजही ओस पडलेल्या आहेत. यामुळे पुढील काही दिवसात पाऊस पडला नाही; तर मोठं पाणी संकट बीड जिल्ह्यात निर्माण होण्याची शक्यता आहे.
Tuesday, August 22, 2023
जयदत्त (आण्णा) क्षीरसागरांना दुसरा धक्का! दुसरा पुतण्याही साथ सोडणार योगेश क्षीरसागर अजित पवार गटात?
बीड (प्रतिनिधी): माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा एक पुतण्या शरद पवार गटात गेल्यानंतर दुसरा पुतण्या अजित पवार गटाच्या वाटेवर आहे. २३ ऑगस्टला मुंबईत जाऊन किंवा २७ ऑगस्टला बीडमधील सभेत ते प्रवेश करणार असल्याचे समजते. पुतण्या अजित पवार गटात जाणार असला तरी काका जयदत्त क्षीरसागर यांनी राजकीय भूमिकेबाबत मौन कायम ठेवलेले आहे. राज्याप्रमाणेच जिल्ह्यातही राजकीय घडामोडी गतीने होत असल्याचे सध्या पाहावयास मिळत आहे.
राष्ट्रवादीत आगोदर स्व. केशरबाई क्षीरसागर यांचा जिल्ह्यात दबदबा होता. त्यानंतर जयदत्त क्षीरसागर यांनी सूत्रे हाती घेतली. मंत्रिपदही मिळविले. काकूंचा दुसरा मुलगा डॉ. भारतभूषण क्षीरसागर हे नगराध्यक्ष झाले. बीड शहरासह मतदारसंघात केवळ ‘क्षीरसागर राज’ होते. मात्र, मागील काही वर्षांपासून हे घर फुटत चालले आहे. अगोदर जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पुतण्या संदीप क्षीरसागर यांनी त्यांचा विधानसभेत पराभव केला. त्यानंतर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपला दुसरा पुतण्या डॉ. योगेश क्षीरसागर आणि सून डाॅ. सारिका क्षीरसागर यांना पुढे आणत सक्रीय केले. दोघेही मागील पाच वर्षांपासून नागरिकांच्या भेटीगाठी घेत संपर्क वाढवत आहेत.
एकीकडे क्षीरसागरांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असतानाच शिवसेनेतही फूट पडली. जयदत्त क्षीरसागर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बायपास करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रस्ता कामांचे उद्घाटन केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेने त्यांच्याशी नाते तोडले. तेव्हापासून ते कोणत्याही पक्षात नाहीत. असे असतानाच आता त्यांचा पुतण्या डॉ. योगेश यांनी अजित पवार गटाची वाट धरली आहे. त्यांना रोखण्यासाठी सर्व बाजूने प्रयत्न झाले, परंतु यात यश आले नसल्यानेच २३ किंवा २७ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा जयदत्त क्षीरसागरांसाठी माेठा धक्का असणार आहे.
जयदत्त क्षीरसागर भूमिका कधी मांडणार ?
शिवसेनेने नाते तोडल्यानंतर जयदत्त क्षीरसागरांनी अद्यापही माध्यमांसमोर येऊन आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा होती. परंतु माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आम्हाला पाहुण्यांची गरज नाही, असे म्हणत नाव न घेता त्यांच्या प्रवेशाला विरोध केला होता. त्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनीही थेट टीका केली होती. आता या सर्व घडामोडींवर जयदत्त क्षीरसागर कधी बोलणार? आपली राजकीय भूमिका कधी स्पष्ट करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जनतेचा कौल जो असेल तोच माझा निर्णय.
मागील ५० वर्षांत बीड जिल्ह्यातील जनतेने आणि माझ्या जीवलग कार्यकर्त्यांनी माझ्या राजकीय व सार्वजनिक प्रवासात प्रेम आणि पाठबळ दिले आहे. अशा जीवाभावाच्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय मी कोणताही राजकीय निर्णय घेणार नाही. विकासासाठी व जनहितासाठी सतत पाठपुरावा आणि संघर्ष चालू राहील. सध्या सुरू असणाऱ्या चर्चेत किंवा राजकीय निर्णयात माझा कसलाही सहभाग नाही, भविष्यात योग्य वेळी सर्वांना विश्वासात घेऊन योग्य राजकीय निर्णय घेतला जाईल. राजकीय स्वार्थासाठी मी कुठलेही निर्णय कधीही घेतलेले नाहीत. जनतेचा कौल जो असेल तोच माझा निर्णय असेल.- जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री
नेकनूरच्या रूग्णालयात बाळ दगावले डॉक्टरवर कारवाईची टांगती तलवार. चौकशी समितीने दिला अहवाल : जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कारवाईकडे लक्ष.
नेकनूर (प्रतिनिधी) : नेकनूर स्त्री व कुटीर रूग्णालयात एका नवजात बाळाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात समितीने चौकशी करून अहवाल जिल्हा शल्य चिकित्सकांकडे सादर केला आहे. यात अनेक मुद्दे नोंदविण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. यातील डॉक्टरांवर कारवाईची टांगती तलवार असून जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.
नेकनूरच्या रूग्णालयात ५ ऑगस्ट रोजी केज तालुक्यातील एका महिलेची प्रसुती झाली होती. या रूग्णालयात पाच स्त्री रोग तज्ज्ञ असतानाही वेळेवर एकही हजर नव्हते. त्यामुळे परिचारीकेने प्रसुती केली. यात बाळ दगावले. त्यानंतर नातेवाईक आक्रमक झाले आणि रूग्णालयाीच तोडफोड केली होती. या प्रकरणात चौकशीसाठी समिती नियूक्त करण्यात आली होती. १९ ऑगस्ट रोजी समितीने नेकनूरमध्ये जावून स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.सोनम जायभाये, बालरोगतज्ज्ञ डॉ.शंकर काशीद, परिचारीका एस.गायकवाड आणि कक्षसेवक यांचे जबाब घेतले होते. त्यानंतर सोमवारी सायंकाळी या प्रकरणाचा आठ पानी अहवाल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या अहवालात अनेक मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. यावरून डॉक्टरांचा दोष असल्याचे सिद्ध होत असल्याचेही सूत्रांनी सांगितले. आता या प्रकरणात सीएस डॉ.चव्हाण काय कारवाई करतात? याकडे लक्ष लागले आहे.
कारवाई की क्लिनचिट?
नेकनूरच्या प्रकराचा अहवाल आपल्याकडे आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश चव्हाण यांनी दिली आहे. आता या अहवालावरून डॉ.चव्हाण कारवाई करतात की क्लीनचिट देतात, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, आठ पानांचा चौकशी अहवालही हाती लागला असून जर क्लिनचीट दिली तर स्त्री रोग तज्ज्ञांचा बचाव करण्याच्या नादात सीएसच वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या कारवाईकडेही लक्ष लागले आहे.
आई,वडिलाना जिवे मारण्याची धमकी देत चुलत्याचा अल्पवयीन पुतणीवर बलात्कार.
आष्टी (प्रतिनिधी) - तुझ्या आई, बापाला जिवे मारीन, अशी धमकी देत अल्पवयीन पुतणीवर चुलत्याने बलात्कार केल्याची घटना आष्टी तालुक्यातील एका गावात घडल्याचे उघडकीस आली आहे. पोटात दुखत असल्याने उपचारासाठी गेल्यावर या नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेला वाचा फुटली. पिडीत मुलगी सात महिन्याची गर्भवती असून या प्रकरणी अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय तरूणाचे लग्न झाले होते. पण पत्नी नांदत नसल्याने तो मोठ्या भावाकडे राहत होता. जानेवारी महिन्यात चुलत्याची नियत फिरली. घरी कोणी नसल्याची संधी साधून तुझ्या आई,बापाला जिवे मारीन अशी धमकी देत अल्पवयीन पुतणीवर बलात्कार केला. तेव्हापासून मुलगी भयभीत होऊन घाबरुन घरात राहत होती. पण रविवारी तिच्या पोटात दुखू लागल्याने आई,वडिल तिला अहमदनगर येथील रूग्णालयात घेऊन गेले. येथील डाॅक्टरांनी तपासणी केल्यावर मुलगी गर्भवती असून तिला सात वा महिना असल्याचे सांगताच आई, वडिलाच्या पायाखालची वाळू सरकली.
विश्वासात घेऊन विचारणा केली असता मुलीने घडलेल्या घटनेचा उलगडा केला. रविवारी रात्री हा गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात झिरो एफआयआरने दाखल करण्यात आला होता. मंगळवारी अंभोरा पोलिस ठाण्यात पिडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपी चुलत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी चुलता फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर याच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथक प्रभारी प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी ,पोलीस हवालदार मुद्दहर शेख करीत आहेत.
खळबळजनक घटना! साहेब, बायकोला मारून आलोय, अटक करा' चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून.
मंगल गोडीराम भोसले (वय ४५) असे मयताचे नाव असून गोडीराम हरिभाऊ भोसले (वय ५५) असे खून करणाऱ्या पतीचे नाव आहे. मंगळवारी सकाळी मंगल या शेतात गेल्या होत्या. याचवेळी तेथे गोडीराम ही आला. त्यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून कडाक्याचे भांडण झाले. यातूनच गोडीरामने बाजूला पडलेल्या खोऱ्याचा दांडा पत्नी मंगलाच्या डोक्यात मारला.
यात काही क्षणातच त्या गतप्राण झाल्या. यानंतर गोडीराम नेकनूर पोलिस ठाण्यात पोहचला. तेथे उपस्थित अधिकाऱ्यांना त्याने आपण बायकोला मारून आल्याची कबुली दिली. पोलिसांनी खात्री केल्यानंतर त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, मंगल यांच्या पश्चात एक मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे.
ऐकलंत का मायबाप सरकार? १,९०३ मुले झाेपली उसाच्या फडात! बीडमध्ये १९१ गावांमधून १९७९ कुटुंबांचे स्थलांतर.
बीड (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील १९१ गावांतील १९७९ कुटुंब मागील वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील ११ साखर कारखान्यांवर ऊसतोडणीला गेली. त्यांच्यासोबत ० ते १८ वयोगटातील १९०३ मुले होती. आई-वडील पुढे ऊस तोडत असताना ही मुले चक्क उसाच्या फडात झोपलेली असायची. ही आकडेवारी कोल्हापूरच्या अवनी संस्थेने केेलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. राज्यातील इतर जिल्हे आणि राज्यांमधील मुलांचा आकडा आणखी मोठा असण्याची शक्यता आहे. यावर्षी तरी मायबाप सरकारने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे. प्रत्येक वर्षी लाखापेक्षा जास्त मजूर ऊसतोडणीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा आणि इतर जिल्ह्यांसह परराज्यात जात असतात. मागील वर्षीही जिल्ह्यातील १९१ गावांतील मजूर एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील ११ साखर कारखान्यांवर गेली होती. त्यांच्या मुलांची माहिती कोल्हापूरच्या अवनी संस्थेने काढली. त्याची नावा-गावासह यादी जिल्हा प्रशासनाला दिली असून तसेच ० ते ६ वयोगटातील मुलांना डे केअर सेंटर आणि सात वर्षांवरील मुलांना शाळांमध्ये दाखल करण्यात आले. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून भयाण वास्तवही समोर आले आहे.
बीडमध्ये १२ वसतिगृहे
- चालू वर्षात मुलांचे स्थलांतर रोखण्यासाठी समाज कल्याण विभागाच्या वतीने मुलींसाठी सहा आणि मुलांसाठी सहा असे १२ वसतिगृहे सुरू केली आहेत.
- याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. तसेच पहिली ते चौथीपर्यंतची मुले पालकांसोबत जाणार नाहीत, यासाठी आरटीईअंतर्गत त्यांना शाळेत प्रवेश देण्यात यावा, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
यावर्षी मजुरांचा आकडा वाढणारअवनी संस्थेने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वेक्षण केले आहे; परंतु जिल्ह्यातील मजूर हे इतर जिल्हे आणि राज्यात जातात. हा आकडा आणखी वाढू शकतो. ...तरीही मुलांची हजेरी कशी?मुले पालकांसोबत ऊसतोडणीसाठी जात असतात; परंतु इकडे जिल्ह्यातील शाळांमध्ये त्यांची हजेरी दाखवली जाते; तसेच काही लोक हंगामी वसतिगृह चालू करून त्यात मुलांची बोगस नावे दाखवून अपहार करतात. याचीही तपासणी शिक्षण विभागाने करावी, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
Monday, August 21, 2023
सर्व्हर डाऊनमुळे तलाठी परीक्षा खोळंबली, विद्यार्थी संतप्त. १० वाजता सर्व्हर सुरळीत झाल्यावर केंद्रात प्रवेश.
लातूर/ छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) लातूर जिल्ह्यातील सात परीक्षा केंद्रावर तलाठी भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा होत असून, सोमवारी सकाळी ९ वाजता पेपर असल्याने विद्यार्थ्यांना केंद्रावर ७.३० वाजता बोलाविण्यात आले होते. मात्र सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्या. त्यामूळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांना केंद्राबाहेर गोंधळ घातला. तसेच अंबेजोगाई रोडवर काही वेळासाठी रास्ता रोको आंदोलनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तातडीने मध्यस्थी केली. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे देखील अनेक केंद्रांवर परीक्षा उशिरा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
लातूर जिल्ह्यात १७ ऑगस्टपासून सात सेंटरवर तलाठी भरतीची परीक्षा होत आहे. सोमवारी सकाळी परीक्षेसाठी केंद्रावर ७.३० वाजता विद्यार्थ्यांना बोलाविण्यात आले होते. मात्र सर्व्हर डाऊन असल्याने ९ वाजेपर्यंत प्रवेश देण्यात आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केंद्राबाहेर गोंधळ घातला. तसेच अंबेजोगाई रोडवरील एका परीक्षा केंद्रासमोर रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तातडीने धाव घेत विद्यार्थ्यांची समजूत काढली. दरम्यान, सर्व्हर १० वाजता सुरळीत झाल्यावर १०.३० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना केंद्रात प्रवेश देण्यात आले. दरम्यान त्यांना वाढीव वेळ देण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
छत्रपती संभाजीनगरमधेही गोंधळ
सर्व्हर डाऊन असल्याने एक तास परीक्षा उशीरा सुरू झाली. मात्र, वाळूज, चिकलठाणा , दर्गारोड आदी परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी संतत्प झाले होते. आधीच जे परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांनी दिले होते ते देण्यात आले नाही. त्यात आता सर्व्हर डाऊन यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.
तलाठी पदाच्या ऑनलाईन परीक्षेच्यावेळी परीक्षा केंद्रावर गैरप्रकार, तीन संशयितांना पकडले.
मुंबई (प्रतिनिधी) राज्य शासन अतिशय नियोजनबद्धरित्या नामांकित संस्थांच्या माध्यमातून विविध पदभरतीच्या परीक्षा घेत आहे. कुठलाही गैरप्रकार करण्यास वाव नसून परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना सुद्धा दक्ष राहण्याचे निर्देश आहेत, त्यामुळेच काल नाशिक येथे परीक्षा केंद्रावर तलाठी पदाच्या ऑनलाईन परीक्षेच्यावेळी तीन संशयितांना पकडण्यात यश आले. या परीक्षा व्यवस्थित पार पाडण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, याविषयी कुणीही संभ्रम निर्माण करू नये व अफवाही पसरवू नये असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल परीक्षा केंद्रावरून पोलिसांनी तीन संशयितांना पकडले आणि त्यांच्याकडून टॅब, वॉकी टॉकी, मोबाईल फोन, हेडफोन असे साहित्य जप्त केले आहे. त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडीही देण्यात आली असून कोणत्याही परिस्थितीत पारदर्शी आणि शिस्तबद्धरित्या पदभरतीच्या परीक्षा घेण्यात येत आहेत असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पूर्वीच्या काळात अशा स्पर्धा परीक्षांत काही गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले होते. सदोष भरती प्रक्रियेमुळं विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता. आणि म्हणूनच राज्य शासनाने टीसीएस आणिआयबीपीएस या कंपन्यांकडून या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि या संस्था काटेकोरपणे या परीक्षा घेतील. राज्य शासनाचे सर्व प्रक्रियेकडे बारकाईने लक्ष आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
नदीपात्रात बुडालेल्या नातवाचा २४ तासान सापडला मृतदेह, आजोबांनी फोडला हंबरडा.
औराद शहाजानी (प्रतिनिधी) : तेरणा नदीपात्रात पोहोण्याचा प्रयत्न करताना बुडालेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह अखेर २४ तासानंतर सोमवारी दुपारी १ वाजता आपत्ती व्यवस्थापनच्या पथकास सापडला. नातवाचा मृतदेह पाहून आजोबांनी हंबरडाच फोडला.शाम व्यंकटराव जाधव (१८, रा. तळभाेग, ता. बसवकल्याण, हमु. गुंजरगा, ता. निलंगा) असे मयत युवकाचे नाव आहे.
शाम जाधव हा मुळचा रहिवासी कर्नाटकातील तळभोग येथील आहे. त्याचे आई- वडिल पुण्यात नोकरी करतात. त्यामुळे तो मामाकडे शिकण्यासाठी राहत होता. सध्या तो निलंग्यातील एका महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. रविवारी दुपारी तो गुजंरगा येथील मामाच्या शेतात आजाेबा आणि मामाच्या मुलगासाेबत गेला हाेता. आजाेबांनी तेरणा नदी पाञात म्हैस धुतली आणि ते म्हैस चारत पुढे गेले. तेव्हा मामाचा मुलगा गणेश लिंबाजी शिंदे हा नदीपाञातील लाेखंडी कलईत बसून गावाकडे गेला. दरम्यान, शाम जाधव हा नदीच्या किनाऱ्यालगत पोहत होता. तेव्हा पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.
या घटनेची माहिती मिळताच औराद शहाजानी पाेलिस ठाण्याचे पोहेकॉ. विष्णू गित्ते, पाेकॉ. अलि शेख, पाेलिस पाटील माेहन पाटील, ग्रामपंचायत सदस्य धनाजी मुळे आदींनी शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, तो सापडला नाही. सोमवारी आपत्ती व्यवस्थापनच्या पथकाने शाेध माेहीम राबविली. तेव्हा दुपारी १ वाजता त्याचा मृतदेह सापडला. मृतदेह पाहून नातेवाईक आक्रोश करीत होते
बीड, परळीच्या गुंडांवर बीड पोलिस अधीक्षकांची एम.पी.डी.ए अंतर्गत कारवाई हर्सूल कारागृहात रवानगी.
बीड (प्रतिनिधी) : बीड शहरासह तालुक्यात महिलांची छेड काढून पाठलाग करणारा गुंड आणि परळी शहरासह तालुक्यात बनावट दारू तयार करून त्याची विक्री करणाऱ्या गुंडांवर एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही गुंडांना बेड्या ठोकून त्यांची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस ठाण्यांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.
शेख अख्तर शेख रशीद (वय ३०, रा. अचानकनगर, बीड) व पिंटू उर्फ सिद्धार्थ भगवान देवडे (वय ३८, रा. अशोकनगर, परळी) अशी या गुंडांची नावे आहेत. अख्तरविरोधात सात गुन्हे दाखल आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणे, दुखापत करणे, विनयभंग करणे, महिलांचा पाठलाग करणे, फसवणूक करणे, पुरावा नष्ट करणे, घरफोडी, चोरी, दुखापत करणे, रस्ता अडविणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे, शिविगाळ करणे अशा प्रकारे तो गुन्हा करायचा. याच अनुषंगाने पेठबीडचे पाेलिस निरीक्षक अजिनाथ काशीद यांनी त्याच्यावर एमपीडीए कारवाईचा प्रस्ताव पाठविला होता.
दुसऱ्या प्रकरणात पिंटूविरोधात बनावट दारू तयार करून तिची विक्री करणे, ताब्यात बाळगणे, दंगा करणे, जबरी चोरी करणे, दुखापत करणे, शिविगाळ करणे अशा प्रकारचे सहा गुन्हे दाखल होते. त्याचा अहवाल परळी संभाजीनगरचे पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांनी पाठविला होता. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या शिफारशीवरून जिल्हाधिकाऱ्यांना यांच्यावरील एमपीडीए कारवाईस मान्यता दिली. त्याप्रमाणे या दोघांनाही बेड्या ठोकून सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे, उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, संजय तुपे व त्यांच्या पथकाने केली.
कोरडा दुष्काळ जाहीर करा.अन्यथा अजित पवारांची सभा उधळून लावू शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मनसे आक्रमक.
बीड जिल्ह्यात एका महिन्यापासून पाऊस नाही. यामुळे शेतकऱ्यांची उभी पीकं करपू लागले आहेत. मात्र कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना याचं काहीच देणे घेणे नाही. उलट शरद पवारांच्या सभेला उत्तर देण्यासाठी 27 तारखेला अजित पवारांची सभा ठेवली आहे, असे धस म्हणाले.
'अजित पवारांच्या सभेची तयारी आता कृषीमंत्री करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या 27 तारखेपूर्वी बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी एक लाख रुपयाची मदत जाहीर करा अन्यथा सभा उधळून लावू, असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष सुमन धस यांनी दिला आहे.
दरम्यान, एकीकडे शरद पवाराच्या सभेनंतर अजित पवारांची सभा होत आहे. यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या वादात आता मनसेने उडी घेतल्याचे दिसून येत आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील राजकारण अधिकचं तापल्याच दिसत आहे.
प्रभू वैद्यानाथाचा दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी.पहिला श्रावण सोमवार व नागपंचमी एकाच दिवशी आल्यानेभक्तां च्या रांगा.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी): 'हर हर महादेव', 'ओम नमः शिवाय'चा गजर करत पहिल्या श्रावण सोमवारी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो शिवभक्तांनी श्री प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. पहिला श्रावण सोमवार व नागपंचमी एकाच दिवशी आल्याने दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. शिवामूठ तांदूळ व बिल्वपत्र वाहून भक्तांनी दर्शन घेतले. नागपंचमीची मंदिरपरिसरात महिलांनी भूलई खेळली. वैद्यनाथ मंदिरात असलेल्या नागनाथाच्याच्या मंदिरात पूजन करीत भाविकांनी दर्शन घेतले.
निज श्रावणमासास 17 ऑगस्टपासून प्रारंभ झाला आहे. आज 21 ऑगस्ट रोजी पहिला श्रावण सोमवार असल्याने रात्री बारा वाजल्यापासूनच भक्तांची दर्शनासाठी रांग लागली होती. हजारो शिवभक्तांना दर्शन घेणे सुलभ व्हावे यासाठी ट्रस्टच्यावतीने पास व धर्मदर्शनची महिला -पुरुषांची स्वतंत्र रांग आहे. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची ही सोय करण्यात आली.
वैद्यनाथ मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली असून पुष्पमाळाने सजविण्यात आले आहे. पुष्प सजावटीमुळे मंदिर परिसर मनमोहक दिसून येत आहे. सोमवारी पहाटे अडीच वाजेपर्यंत मोठी गर्दी होती. त्यानंतर पहाटे साडेपाचच्या सुमारास पुन्हा गर्दी वाढली.
रात्री बारा वाजल्यापासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी सुरू झाली तर दुपारी बारा वाजेपर्यंत हजारो शिवभक्तांनी श्री प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले असल्याची माहिती श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी प्रा बाबासाहेब देशमुख ,विश्वस्त राजेश देशमुख यांनी दिली.
मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले परळी शहरचे पोलीस निरीक्षक रवी सानप हे ही मंदिरात पोलीस बंदोबस्तासह उपस्थित होते. पंचमुखी महादेव मंदिर, संत जगमित्रनागा मंदिर, सुर्यवेश्वर मंदिर, नगरेश्वर मंदिर व शहरातील व ग्रामीण भागातील मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलले होते. वैद्यनाथ मंदिर रोडवर बिल्व पत्र घेण्यासाठी पहाटेपासुनच भाविकांची गर्दी झाली होती.
Sunday, August 20, 2023
मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघांना अज्ञात वाहनांची धडक; एकाच जागीच मृत्यू.
Saturday, August 19, 2023
बनावट नंबरप्लेटचा वापर.ऑटोचालकावर फसवणुकीचा गुन्हा.ऑटाेसह चालक ताब्यात.वाहतूक नियंत्रण शाखेची कारवाई
लातूर (प्रतिनिधी) : ऑटाेवर बनावट नंबरप्लेटचा वापर करुन फसवणूक केल्याची घटना लातूर शहरात घडली. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात ऑटाेचालकाविराेधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरात एक चालक (एम.एच. २४ ए.टी. २२०९) हा नंबर प्लेट टाकून शहरात फिरत असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पाेलिस निरीक्षक गणेश कदम यांना मिळाली. या माहितीच्या आधारे ताे ऑटाे ताब्यात घेवून, चालक ऑटाे चालक हरी श्रीरंग माळी (वय ५१ रा. स्वराज नगर, पाखरसांगवी ता. लातूर) याला ताब्यात घेत चाैकशी केली. ऑटाेच्या पुढील बाजूस, डाव्या बाजूला ऑटाे (एम.एच. २४ ए.टी. २२०९) असा क्रमांक लिहिलेला आणि पाठीमागील बाजूस ऑटाे (एम.एच. २४ ए.टी. २०९) आणि उजव्या बाजूस ऑटाे (एम.एच. २४ ए.टी. २२०) असा क्रमांक लिहिल्याचे आढळून आले. त्याच्याकडील कागदपत्रांची पडताळणी केली. ताब्यातील चालकाने ई-चलान दंड पडला तरी मूळ ऑटाे (एम.एच. २४ ए.टी. २२०९) वर पडेल. या हेतूने क्रमांक टाकला असल्याचे सांगितले. या माध्यमातून त्यांनी शासनाची आणि ऑटाेमालकाची (एम.एच. २४ ए.टी. २२०९) फसवणूक केली. ऑटाेवर पुढील बाजूस, डाव्या बाजूस (एम.एच. २४ ए.टी. २२०) लिहून फसवणूक केली. मूळ ऑटाे (एम.एच. १२ क्यू.आर. ५३८५) यांचे परमीट पुणे जिल्हा येथील असताना लातुरात ऑटाे चालवून शासनाची फसवणूक केली. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन ऑटाे चालक हरी श्रीरंग माळी याच्याविराेधात गुरनं. ४०५ / २०२३ कलम ४२० भादंविप्रमाणे, माेटार वाहन कायदा कलम ६६ (१) / १९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पाेलिस अधीक्षक साेमय मुंडे, अप्पर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे, डीवायएसपी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियंत्रण शाखेचे पाेलिस निरीक्षक गणेश कदम, सहायक पाेलिस निरीक्षक प्रतिभा ठाकूर, पाेहेकाॅ. सुग्रीव नागरगाेजे, मद्देवाड, घाेगेर, चालक नागरगाेजे, पाेना. बिराजदार, पाेकाॅ. सय्यद यांच्या पथकाने केली.
सत्तेसोबत जा; पण माणुसकी ठेवा! शरद पवारांचा फुटीर नेत्यांना इशारा; बीड सभेला लक्षणीय गर्दी. धनंजय मुंडे यांना प्रतिस्पर्धी मिळाला असल्याची चर्चा.
बीड (प्रतिनिधी): माझ्या वयाचा उल्लेख करून काही जण आमच्या आमदारांना सत्तेच्या बाजूला वळविण्याचा प्रयत्न करत आहेत. माझे वय झाले असेलही; परंतु तुम्ही माझे काय पाहिले? असा सवाल करत, सत्तेच्या बाजूला जा; पण थोडी माणुसकी ठेवा, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आपल्याच पक्षाच्या फुटीर नेत्यांना दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खासदार पवार यांची बीड येथे मराठवाड्यातील ही पहिलीच सभा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतानाच खा. पवार यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, सत्तेत सामील झालेल्या काही आमदारांकडे आम्ही चौकशी केली असता, शरद पवार यांच्याकडे कशाला जाता, त्यांचे वय झाले आहे, असे सांगितले जात असल्याचे समजले. जरूर माझे वय झाले असेल; पण तुम्ही माझे काय पाहिले? सत्तेच्या बाजूला जा; पण ज्यांच्याकडून आयुष्यात काही घेतले असेल, तर त्यांच्याबाबत थोडी माणुसकी ठेवा, नाही तर लोक धडा शिकवतील. २०१९ च्या निवडणुकीत भाजपचा पराभव करून तुम्ही निवडून आलात आणि आज त्यांच्याच दावणीला जाऊन बसलात; पण भविष्यात मतदान केंद्रावर गेल्यावर मतदारच कोणते बटन दाबून तुम्हाला कोठे पाठवायचे हे ठरवतील, असा गर्भित इशाराही खा. पवार यांनी दिला.
मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत, राज्य जळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर चकार शब्द काढायला तयार नाहीत. ठाण्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यूचे तांडव सुरू आहे; पण सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याची टीकाही त्यांनी केली.
त्यांचेही असेच होईल...
स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले ‘मी पुन्हा येईन.’ असाच डायलॉग यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मारला होता. ते पुन्हा आले; पण मुख्यमंत्री न होता उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे मोदींचेही असेच होईल, असा टोला पवार यांनी लगावला.
धनंजय मुंडेंना विरोधक भेटला
बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघातील कार्यकर्ते बबन गिते यांनी आपल्या समर्थकांसह शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला. त्यासाठी त्यांनी जवळपास चार-पाचशे गाड्यांचा ताफा आणला होता. गिते यांच्या माध्यमातून थोरल्या पवारांनी धनंजय मुंडे यांना प्रतिस्पर्धी शोधला असल्याची चर्चा सभास्थळी होती.
शरद पवारांच्या टीकेवर मुंडे यांचे मौन
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी बीडच्या सभेत जिल्ह्यातील नेते आणि अजित पवारांबरोबर गेलेले धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. शरद पवारांनी केलेल्या टीकेबाबत धनंजय मुंडे यांना विचारले असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला, पवारांच्या बोलण्याचा काहीही अर्थ काढा, एवढेच मुंडे या टीकेबाबत विचारले असता म्हणाले.
माझे वय झाले असेल; पण तुम्ही माझे काय पाहिले? सत्तेच्या बाजूला जा; पण ज्यांच्याकडून आयुष्यात काही घेतले असेल, तर त्यांच्याबाबत थोडी माणुसकी ठेवा, नाही तर लोक धडा शिकवतील.
मित्रांनी मिळून चोरली खिल्लारी बैलजोडी; विक्री करण्याआधीच बेड्या, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
बीड (प्रतिनिधी) - पाच मित्रांच्या गप्पा सुरू होत्या. पार्टी, मौजमजा करण्याचे ठरले. परंतु, कोणाकडेच पैसे नाहीत. म्हणून त्यांनी गावातीलच खिल्लारी बैलजोडी चोरून ती विकायची आणि आलेल्या पैशांतून ऐश करायचे ठरवले. ठरल्याप्रमाणे बैलजोडी चोरलीही, परंतु ग्राहक शोधत असतानाच आणि ती विक्री होण्याआधीच या पाचही मित्रांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी बीड तालुक्यातील पेंडगावजवळ केली.
कृष्णा नवनाथ रूपनर (वय २२), संतोष निवृत्त भिसे (वय १९), रोहित कटाळू लांडगे (वय २१), रामा रमेश गोरे (वय २१), सजिम दस्तगिर शेख (वय २२ सर्व रा. हिवरापहाडी, ता. जि. बीड) अशी आरोपींची नावे आहेत. हे पाचही आरोपी मित्र आहेत. यांना ऐश करण्यासाठी पैशांची चणचण जाणवत होती. गावात कोणी पैसे देणार नाही, म्हणून त्यांनी बैल चोरण्याचा प्लॅन आखला. त्याप्रमाणे १५ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास गावातीलच संपती सुळ यांच्या शेतातून पांढऱ्या रंगाची दीड लाख रुपये किमतीची खिल्लारी बैलजोडी पिकअपमध्ये घालून चोरी केली. १६ ऑगस्ट रोजी त्यांनी हे पिकअप बीड शहरालगत फिरवले. दोघेजण बैलांसोबत राहिले, तर दोघांनी ग्राहक शोधण्यास सुरुवात केली. दुसऱ्या बाजुला सुळ यांनी पिंपळनेर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली होती. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडे येताच पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक संजय तुपे यांनी तपास सुरू केला. त्यांना ही बैलजोडी पेंडगावजवळ असल्याचे समजले. त्यांनी सापळा रचून अगोदर बैलजोडी ताब्यात घेतली. शिवाय तिघांना बेड्या ठोेकल्या. त्यांच्याकडून इतर दोघांची माहिती घेतल्यावर त्यांना बीड शहरातून ताब्यात घेण्यात आले. या सर्वांकडून बैलजोडीसह पिकअप वाहन जप्त करण्यात आले. पिंपळनेर पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय तुपे, तुळशीराम जगताप, कैलास ठोंबरे, नसीम शेख, भागवत शेलार, अशोक दुबाले, राहुल शिंदे, सतीश कातखडे, विकी सुरवसे आदींनी केली.
Wednesday, August 16, 2023
जि प प्रा शा संगम येथे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
परचुंडी येथे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. सरपंच सौ.मीना नावंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण.
मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने स्वतंत्रदिन गुणवंतांचा गुणगौरव करून साजरा.
Tuesday, August 15, 2023
माजलगाव तालुक्यातील चोपनवाडीकरांचा रस्त्यासाठी आक्रमक पवित्रा; बीड-परळी महामार्गावर रास्तारोको, वाहतूक २ तास ठप्प.
दिंद्रुड (प्रतिनिधी): माजलगाव तालुक्यातील चोपनवाडी येथील रस्त्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी स्वातंत्र्यदिनी आज सकाळी नऊ वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत बीड-परळी महामार्गावर रास्तारोको करण्यात आला. जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, या भूमिकेत ठाम राहिल्याने प्रशासन हतबल झाले. रास्तारोकोमुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.
माजलगाव तालुक्यातील चोपनवाडी ते बीड-परळी महामार्ग या रस्त्याला मंजुरी मिळून जवळपास चार वर्ष उलटले. मात्र अद्याप या रस्त्याचे काम सुरू झाले नाही. यामुळे ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. ग्रामस्थांना येत आहेत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत बीड-परळी महामार्ग ते चोपनवाडी या पावणे तीन किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या कामास चार वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली आहे. जवळपास एक कोटी तीस लाख रुपये मंजुर झाले. मात्र, गेल्या चार वर्षांपासून रस्त्याचे काम न झाल्याने गावातील विद्यार्थी आणि ग्रामस्थ त्रस्त आहेत. रस्त्या खराब असल्याने तीन किमी साठी जवळपास अर्धा ते पाऊण तास वेळ लागतो.
सातत्याने पाठपुरावा करूनही मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी आज सकाळी बीड-परळी महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनात गावातील विद्यार्थ्यांसह महिला,वृद्ध यांचा मोठ्याप्रमाणात सहभाग होता. जवळपास दोन ते अडीच तास आंदोलन सुरू असल्याने वाहतूक ठप्प होऊन दोन्ही बाजूंनी तीन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर शासकीय बांधकाम विभाग बीडचे कार्यकारी अभियंता फड यांनी रस्त्यासाठी पाठपुरावा करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी दिंद्रुड पोलिसांनी कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी विशेष बंदोबस्त ठेवला होता.
Monday, August 14, 2023
स्वातंत्र्य दिन विशेष: जेणेकरून आपण स्वतंत्र भारतात श्वास घेऊ शकू! श्री आशुतोष महाराज जी. संस्थापक एवं संचालक, दिव्य ज्योति जाग्रति संस्थान.
आघाड्यांच्या राजकारणामुळे बीड जिल्ह्यातील काँग्रेसवर अन्याय झाला:-अमित देशमुख
जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघातही आम्ही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहोत. अशी खंत आणि इच्छा अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे. ते बीडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, की बीड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सहनशीलतेचे कौतुक करावं वाटतंय. आतापर्यंत जिल्ह्यातील काँग्रेसवर अन्याय झालाय. मात्र आता पुढील काळात ते होणार नाही. आज महाराष्ट्राची राजकीय परंपरा राहिलेली आहे. कुठंतरी त्याला छेद झालाय, असं मला आणि सर्वांना वाटतंय.
महाराष्ट्राने देशाला दिशा देण्याचे काम केले. मात्र आज जे महाराष्ट्रात सुरू आहे, तेव्हा दुःख वाटतं. आता वाटाघाटीचे राजकारण आहे. आज पक्ष वाढत नाही, कारण आघाडीच्या राजकारणात संधी मिळाली नाही. अशी खंत देखील यावेळी अमित देशमुख यांनी व्यक्त केली.
दरम्यान, बीडमध्ये होऊ घातलेल्या शरद पवारांच्या सभेला आणि त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्याला अमित देशमुखांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरोड्याच्या तयारीत असलेला कुख्यात दरोडेखोर आटल्या भोसलेच्या आष्टी पोलिसांनी आवळल्या मुसक्या!
आष्टी (प्रतिनिधी) - हद्दीसह इतर जिल्ह्यात चोरी,घरफोडी, खुनासह दरोडा,यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेला आरोपी पोलिसांना अनेक वर्षांपासून गुंगारा देत ताकतीच्या बळावर दहशत निर्माण करत फिरत होता. रविवारी रात्री ११ च्या दरम्यान आष्टी पोलिसांनी कुख्यात दरोडेखोर आटल्या ईश्वर भोसले वय वर्ष ३२ याच्या मुसक्या आवळल्या.
कर्जत तालुक्यातील बेलगांव येथील रहवाशी आटल्या ईश्वर भोसले वय वर्ष ३२ हा सराईत गुन्हेगार असून आष्टीसह अहमदनगर, पुणे,बीड,सोलापुर, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा,यासह अनेक जिल्ह्यात घरफोडी,खुनासह दरोडा,जबरी घरफोडी, यात तो मास्टर माईट होता. मागील चार वर्षापासून तो पोलिसांना हवा होता. अंगाने आडदांड असलेला आटल्या ताकतीच्या जोरावर गंभीर स्वरूपाच्या घरफोड्या करायचा. या अगोदर त्याच्यावर दोन वेळा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.अल्पवयीन असल्याने त्याला पुणे येथील बालसुधारगृहात ठेवले होते.पण तिथून तो पळाला होता.आष्टीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सय्यद शौकतअली यांनी त्याला २०१८ साली श्रीगोंदा तालुक्यातुन जेरबंद केले होते.त्यानंतर काही दिवसांनी तो परत पसार झाला.
मागील चार वर्षापासून तो पोलिसांना सारखा गुंगारा देत असल्याने पोलीस त्याच्या मागावर होते. रविवारी रात्री ११ च्या दरम्यान आटल्या आष्टी तालुक्यातील शिराळ येथील एका ठिकाणी दरोडा टाकण्याच्या तयारीत आसल्याची गोपनीय माहिती आष्टीचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांना मिळताच त्यांनी ठाण्यातील सहकारी सोबत घेऊन सापळा लावून रात्री उशिरा त्याच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, पोलीस उपनिरीक्षक अजित चाटे, पोलिस नाईक प्रवीण क्षीरसागर, पोलीस नाईक हनुमंत बांगर,पोलीस शिपाई मजहर सय्यद, दिपक भोजे, दंगल नियंत्रण पथकातील जवान,याच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.दरोड्याच्या तयारीत आलेला आटल्या पोलिसांनी गटवला. आष्टी तालुक्यातील शिराळ येथील एका ठिकाणी दरोडा टाकण्याच्या तयारी आलेल्या आटल्याला आष्टी पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला गटवल्याने पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
पिस्टलसह घातक शस्त्रासह जेरबंद पोलिसांनी सापळा लावून आटल्याला पकडले त्यावेळी त्याच्या कबरेला पिस्टल, व जवळ घातक शस्त्र आढळून आले.त्याच्यावर १५० गुन्हे विविध ठिकाणी दाखल असुन ६० गुन्ह्यात तो फरार होता. पोलिसांनी जिवाची बाजी लावत त्याला शस्त्रासह अटक केली असल्याचे आष्टीचे पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी सांगितले.
Sunday, August 13, 2023
एमबीबीएस’ अॅडमिशनच्या नादात घातले साडे बारा लाख. खासगी नोकरदाराची फसवणूक.
अहमदनगर (प्रतिनिधी) मुलाचे ‘एमबीबीएस’साठी अॅडमिशन करून देतो, असे सांगून एका ठगाने दोन टप्प्यात ऑनलाईन 12 लाख 49 हजार रूपये घेत खासगी नोकरदाराची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुकुंदराव यशवंतराव शिंदे (वय 48 रा. हनुमान गल्ली, टाकळी खातगाव, ता. नगर) असे फसवणूक झालेल्या नोकरदाराचे नाव आहे.
ही घटना 5 जुलै 2023 ते 9 ऑगस्ट 2023 दरम्यान घडली असून याप्रकरणी शिंदे यांनी 11 ऑगस्ट रोजी येथील सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून कोटक महिंद्रा बँकेच्या अनोळखी अकाऊंट नंबर धारकाविरूध्द फसवणूक सह माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे यांना त्यांच्या मुलाचे ‘एमबीबीएस’साठी अॅडमिशन घ्यायचे होते. ते अॅडमिशनसाठी प्रयत्न करत असताना त्यांना एका अनोळखी व्यक्तीने संपर्क केला. तुमच्या मुलाचे ‘एमबीबीएस’साठी अॅडमिशन करून देतो, असे सांगून एका मेलवरून कॉलेजचे बनावट कागदपत्रे पाठविले. तसेच एका बनावट वेबसाईटवर मुलाचे नीट उत्तीर्ण झाल्याचे कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले. ‘एमबीबीएस’ शिक्षणासाठी आवश्यक असणारी फी कोटक महिंद्रा बँकेत भरण्यास सांगितली.
समोरच्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे शिंदे यांनी कोटक महिंद्रा बँकेत सुरूवातीला पाच लाख 56 हजार व नंतर सहा लाख 93 हजार रूपये, असे दोन टप्प्यात एकुण 12 लाख 49 हजार रूपये भरले. मुलाचे अॅडमिशन न झाल्याचे समजताच शिंदे यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत सदरचा प्रकार सांगितला. शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय सोनवणे करीत आहेत.