अंभोरा (प्रतिनिधी) : महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आता देखील बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीये. बीडमध्ये एका विधवा महिलेवर सलग तीन वर्षांपासून अत्याचार सुरू असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, एका विधवा महिलेला आयुष्यभर सांभाळण्याचे प्रलोभन दाखवत तिच्यावर सतत 3 वर्षे अत्याचार करण्यात आलाय. तसेच पीडितेकडून उसने घेतलेले 3 लाख रुपयेही बुडविल्याची माहिती देखील समोर आली आहे.
हा धक्कादायक प्रकार बीडच्या आष्टी तालुक्यातील एका गावात घडला आहे. याप्रकरणी बीडच्या अंभोरा पोलीस ठाण्यामध्ये, आरोपीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला विधवा आहे. तसेच मोठ्या मुलाचाही अपघाती मृत्यू झालाय. याच मुलाचे 7 लाख रूपये या महिलेला मिळाले होते. ही बाब आरोपीला समजताच त्याने पीडित महिलेसोबत जवळीक साधली. तिला शेतात मजुरीचे काम मिळवून दिले.
त्यानंतर तिच्याशी अश्लील चाळे करत अत्याचार केला. तसेच तिच्याकडून 3 लाख रूपयेही उसने घेतले. पैसे मागण्यास गेल्यावर आरोपीसह त्याच्या पत्नी व आईने पीडित महिलेला मारहाण केली असल्याचं फिर्यादीने म्हटलंय. दरम्यान या प्रकरणी आता आरोपीवर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास अंभोरा पोलीस करत आहेत.
No comments:
Post a Comment