वाराणसी : शिवज्ञानसंपन्न विद्वानाना शिवस्वरूपी मानून त्यांचा गौरव करणे हे अभ्युदयाचे कारण आहे. असे काशी जगदगुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी आपल्या आशीर्वचनात म्हणाले.
शिवरात्रीच्या पूर्वसंध्येला काशी जंगमवाडी मठामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा विद्वत् सभेचे आयोजन केले होते. या विद्वत सभेमध्ये काशी हिंदू विश्वविद्यालय, संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालय तसेच या दोन्ही विश्वविद्यालयाशी संबंधित अनेक महाविद्यालयाचे विविध शास्त्राचे तीनशेहून अधिक विद्वान सहभागी झाले होते.
या विद्वत सभेमध्ये प्रतिवर्षी श्री जगद्गुरु विश्वाराध्य विश्वभारती पुरस्कार प्रदान केला जातो. पंचवीस हजार रुपये रोख, प्रशस्तीपत्र, शाल व श्रीफळ असे या गौरवाचे स्वरूप आहे. यावर्षी काशीचे ९७ वर्षाचे संस्कृतचे मूर्धन्य विद्वान डॉ. वागीश शास्त्री यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच बरोबर पुढील विद्वानांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्कारांचे स्वरूप रुपये अकरा हजार रोख, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे आहे. डॉ. गिरीश दत पांडे यांना त्यांच्या संस्कृत साहित्याच्या सेवेबद्दल कोडीमठ संस्कृत साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच आगम शास्त्राचे मूर्धन्य विद्वान आचार्य ब्रह्मानंद शुक्ल यांना 'आचार्य व्रजवल्लभ द्विवेदी शैवभारती पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्त्री शक्तींचा सन्मान करण्यासाठी पंढरपूरचे सुभाष म्हमाणे यांनी आपल्या लिं. धर्मपत्नी सिंधू सुभाष म्हमाणे याच्या स्मरणार्य मातृशक्ती पुरस्कारासाठी देणगी दिली आहे. यावर्षी डॉ. चंद्रकांता राय, अध्यक्ष, संस्कृत विभाग, आर्य महिला स्नातकोत्तर महाविद्यालय वाराणसी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हिंदी साहित्य आणि काव्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सुप्रसिद्ध असलेले सुदामा तिवारी यांच्या सांड बनारसी' या काव्यसंग्रहासाठी कविवर्य तिवारी यांना जयदेवश्री हिंदी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पुरस्कारप्राप्त विद्वानानी सत्काराला मनोगतातून उत्तर दिले. काशी पीठाचे उत्तराधिकारी तसेच होटगी बृहन्मठाचे मठाध्यक्ष डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामीजी यांनी संस्कृत भाषेमध्ये धर्मसंदेश दिला.
याप्रसंगी सभेला दिव्य सान्निध्य लाभलेले जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी आपल्या आशीर्वचनात म्हणाले, आत्मजं वर्चयेत् भूतिकामः ज्यांना लौकिक आणि पारलौकिक अभ्युदयाची इच्छा आहे त्यांनी आत्मज्ञानींची पूजा केली पाहिजे असे श्रुती आणि उपनिषदांमध्ये सांगितले आहे. म्हणून वीरशैव धर्मामध्ये गुरुची, इष्टलिंगाची आराधना केली जाते. तसेच आत्मज्ञान संपन्न ज्ञानी जंगमाची सुद्धा आराधना करण्याची परंपरा आहे. म्हणून काशी पीठामध्ये विद्वानांचा सन्मान केला जातो. यामुळे एकप्रकारे समष्टी जंगम आराधना केल्यासारखेच आहे. ज्ञान सर्वात पवित्र मानले जाते. न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते अशी शास्त्रोक्ती आहे. सर्व ज्ञानामध्ये आत्मज्ञान सर्वात श्रेष्ठ असते. ज्या ज्ञानामुळे जीव संसार बंधनातून मुक्त होतो असे जान जगाला देण्यासाठी ज्ञानपीठाची स्थापना सनातन कालापासून काशीमध्ये झाली आहे. या पीठाचे सर्व पूर्वाचार्य ज्ञानी आणि तपस्वी होऊन गेले. जानी लोकांचा गौरव करण्याची परंपरा पूर्वापार आहे. ही परंपरा गेल्या 32 वर्षापासून वर्तमान जगद्गुरु महास्वामीजींनी अखंड सुरू ठेवली आहे. विद्वानांचा सन्मान या पुरस्काराच्या माध्यमातून केला जातो.
या शुभप्रसंगी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी हिंदीमध्ये लिहिलेल्या अष्टावरण विज्ञान या ग्रंथाचा इंग्रजी अनुवाद लोकार्पण करण्यात आला. बंगळुरू विश्वविद्यालयाचे डॉ. एम. शिवकुमार स्वामी यांनी हा इंग्रजी अनुवाद केला आहे.
No comments:
Post a Comment