ज्या मातेने हिंदवी स्वराज्याची खूणगाठ मनी बाळगली व ती सत्यात उतरविली अशा स्वराज्य संस्काराच्या जनक,प्रेरणादायी दीपस्तंभ माता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेड राजा जि. बुलढाणा येथे लखुजीराजे आणि म्हाळसाराणी यांच्या पोटी झाला. जिजाऊंच्या आई म्हाळसाराणी या अत्यंत संस्कारशील होत्या. त्यांच्यातील महान संस्कार त्यांनी जिजाऊ मध्ये उतरविले.मुत्सद्दीपणा, स्वाभिमान व धाडस हे व्यक्तिमत्त्वाचे महत्वाचे गुण यशाचा मार्ग सुकर करतात यावर त्यांचा मोठा विश्वास होता. त्या अनुषंगाने त्यांनी बालपणीच जिजाऊंना युद्धशास्त्रातील शिक्षण दिलेले दिसून येते. घोड्यावर स्वार होणे, तलवार चालविणे व प्रतिपक्षावर हल्ला चढविण्याच्या नीतीची तंत्रे जिजाऊंच्या नसानसात भिनवले होते. लखुजी राजे यांची जनतेची गाऱ्हाणी, समस्या, प्रश्न सोडवण्याची हातोटी, तसेच राजवाड्यात येणारे पराक्रमी व मुत्सद्दी लोक ,लढायांच्या डावपेचांचे धडे, यशापयशाची चर्चा याबाबत त्यांचा बालवयातच अभ्यास झाला होता.त्यामुळे त्यांच्या प्रतिभाशक्तीचा पाया बालपणीच भक्कम बनला. राजघराण्यातील प्रथे प्रमाणे मुळाक्षराचे शिक्षण जिजाऊंना आई-वडिलांनी प्राप्त करून दिले. त्याकाळी मुला-मुलींमध्ये भेद केला जात नसे.सर्वांना सारखेच शिक्षण दिले जात असे. जिजाऊ यांनी मराठी,संस्कृत, फारशी या भाषा अवगत केल्या होत्या.त्याकाळी बालविवाहाची पद्धत अस्तित्वात होती. त्यानुसार १६१० सली जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी मोठ्या थाटामाटात,उत्साही वातावरणात देवगिरी येथे संपन्न झाला. शहाजीराजांची सहचारिणी म्हणून त्यांनी आपले कर्तव्य कार्यक्षमपणे बजावले. जिजाऊ माँसाहेबांनी अंगीकृत केलेली विनयशीलता ,जिज्ञासू वृत्ती आणि परखडपणा यामुळे संपूर्ण दरबारामध्ये त्यांना वंदनीय स्थान होते. यशाचे शिखर गाठणाऱ्या प्रत्येक पुरुषाच्या पाठीशी एक स्त्री भक्कमपणे उभी असते असे म्हटले जाते, मग ती स्त्री आईच्या, बहिणीच्या, पत्नी च्या रूपाने असलेली दिसून येते. माता रमाईने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या समाज व देशोपयोगी कार्यातअडथळा निर्माण होऊ नये व त्यांनी अंगीकारलेले कार्य अपूर्ण राहू नये म्हणून अनंत हाल-अपेष्टा सहन केल्या.सावित्रीमाईंनी ज्योतिरावां च्या खांद्याला खांदा लावून सार्वजनिक कार्यात आपला सक्रीय सहभाग घेऊन ज्योतिरावांच्या कार्यास पूर्णत्व प्राप्त करून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले व त्यानुसारच एक आदर्श,प्रेरणादायी माता बणून जिजाऊंनी शिवबांना घडविले. शिवनेरी येथील नगरखाण्यामध्ये जिजाऊंच्या पोटी १९ फेब्रुवारी १६३०साली एक तेजस्वी तारा अवतरला.त्याचेच नाव छत्रपती शिवाजी महाराज होय. हाच दिवस सर्व मानवजातीसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा आहे. शिवरायांवर जिजाऊंनी स्वराज्याचे सुसंस्कार मोठ्या प्रमाणात केले. स्थानिक मावळ्यांनाही त्यांनी स्वराज्य निर्मितीसाठीचे बळ प्राप्त करून दिले.कुशल राज्यव्यवस्थापन निर्माण करण्यासाठीच्या तंत्राची धडे छत्रपती शिवरायांना जिजाऊंनी दिले. स्वराज्याच्या निर्मितीसाठी संघर्ष हा होणारच हे गृहीत धरून होणाऱ्या संघर्षाला ही वेळ प्रसंगानुसार सुसंवादाची कार्यक्षम झळाळी देण्यात यावी, जेणेकरून स्वराज्याची संकल्पना त्यातून साकारली जाईल यावर त्यांचा विश्वास होता. जिजाऊंनी निजामशहाच्या जुलमी राजवटीला विरोध करून मोठे बंड पुकारले होते. त्या काळामध्ये पुणे परिसरामध्ये आदिलशाहीची जुलमी राजवट अस्तित्वात होती. जगदेव मुरारी पंडित या आदिलशाही सरदाराने त्यावेळी पुणे परिसरामध्ये गाढवाचा नांगर चालवून हा परिसर नेस्तनाबूत केला होता. या परिसरामध्ये कोणी शेती करू नये, वास्तव्य करू नये म्हणून हजार पहारी रोवल्या व त्यावर चपलांचे जोडे बांधण्यात आले.या मुरारी पंडिताने पुन्हा दवंडी दिली की, या परिसरात जो कोणी येण्याची हिम्मत करेल, वास्तव्य करेल, शेती करेल त्यांचे घराने निर्वंश करण्यात येईल. मुरारी पंडिताची ही दवंडी म्हणजे एक प्रकारे धमकी आणि धार्मिक दहशतवादाची नांदी होती. त्यावेळी शिवरायांचे वय केवळ पाच वर्षांचे होते. जिजाऊनी मुरारी पंडिताच्या धमकीला न जुमानता छोट्या शिवरायांना सोबत घेऊन सोन्याचे फाळ असलेला व बहुजनांना त्या ठिकाणी वास्तव्य, शेती करण्यासाठी बळ देणारा नांगर शिवबांच्या हाती दिला. शिवरायांच्या हाती सोन्याचा फाळ लावलेला नांगर देताना सुरुवातीला त्या नांगराची पूजा विधवा असलेल्या म्हाळसाराणी यांच्या हस्ते केली. जिजाऊंनी घेतलेला हा निर्णय किती क्रांतिकारी स्वरूपाचा होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे व पुणे परिसरातील ही जमीन नांगर न्यास प्रारंभ झाला. शिवरायांच्या समवेत इतर थोडेफार अठरापगड जातीतील मुलेही होती. आदिलशहाच्या या सरदाराने धमकी दिल्यानंतर आदिलशहाच्या धार्मिक दहशतवादाला जमीनदोस्त करण्याचे कार्य जिजाऊंनी केलेले दिसून येते. स्वराज्य निर्मितीचे स्वप्न साकार करण्यासाठी जिजाऊ शिवरायांना सातत्याने सांगत असत की ,मृत्यु हा भ्याड पणे येण्याऐवजी रणांगनामध्ये लढताना यावा हेच खऱ्या महान, पराक्रमी असणाऱ्या पुरुषांचे लक्षण आहे.आपले ध्येय साध्य करण्यासाठी लढा देणे हे काही गैर करते नाही. आत्मसन्मान, स्वातंत्र्य हे मानवी जीवनाचे महान पैलू आहेत त्यांना गहाण ठेवून कधीच जगायचे नाही. त्या काळामध्ये शिक्षण, स्वातंत्र्याचा अभाव होता. अशा परिस्थितीमध्ये जिजाऊंच्या वेळोवेळी लाभलेल्या मार्गदर्शनाखाली शिवरायांनी अठरापगड जातीतील लोकांमध्ये नवचैतन्याची हिंमत देऊन त्यांच्यात एकजूट घडवून आणण्याचे महान कार्य पार पाडले व जिजाऊंच्या संकल्पनेतील स्वराज्य उभे राहिले. ६जून १६७४ रोजी रायगडावर थाटामाटात शिवाजी राजे यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला व शिवबाराजे रयतेचे छत्रपती झाले. सामाजिक समरसतेचे महान कार्य जिजाऊंनी केले .त्यांचे कार्य शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्याचे महान काम आपण सर्वांनी केले पाहिजे.उद्या येणारा काळ हा जिजाऊंच्या विचारांनी, संस्कारांनी उजळून जाईल व याची सुरुवात आपल्या घरापासून प्रत्येकजण करील अशी अपेक्षा व्यक्त करतो.अशा या धाडसी, पराक्रमी जिजाऊ मॉसाहेबांचे वारसदार म्हणून आपण त्यांच्या जयंतीदिनी हा वारसा जतन करण्यासाठी कटिबद्ध होऊयात.अशा या प्रेरणादायी दीपस्तंभाप्रमाणे असणाऱ्या जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
*प्रा.मकरंद जोगदंड
वसुंधरा महाविद्यालय,घाटनांदुर
९४२१२७१००५*
No comments:
Post a Comment