Wednesday, January 12, 2022

महाज्योतीचा महाउपदव्यापः साडेतीन कोटीच्या निधीची गैरशैक्षणिक कामावर उधळपट्टी.



* महाज्योतीच्या संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या योजना वार्‍यावर!
ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्य अंधारात लोटण्याचा प्रताप.

गोंदिया  (प्रतिनिधी) - ‘जर कुंपणच शेत खात असेल, तर मग दाद मागायची करी कुणाकडे’ या म्हणीप्रमाणे ज्यांच्या हातात इतर मागासवर्ग विद्यार्थ्यांच्या भविष्य सोपविले आणि तेच त्या विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या निधीची वाट लावत असतील तर ओबीसींनी त्यांचेवर विश्वास ठेवायचा तरी कसा? असा प्रश्न राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांना पडला आहे. इतर मागास वर्गिय विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्टय् सक्षम करण्यासाठी मिळालेला साडेतीन कोटीचा निधी खुद्द महाज्योतीचे अध्यक्ष आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या मतदार संघासह इतर 16 हजार शेतकऱ्यांना वाटण्याचे नियोजन केले आहे.परिणामी, महाज्योतीच्या संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या योजनांसह ओबीसी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारगर्तेत लोटले गेल्याची भावना राज्यात सर्वत्र व्यक्त केली जात आहे.याबाबत महाज्योती संस्थेला शैक्षणिक,प्रशिक्षणासह इतर कार्यासाठी दिला गेलेला निधी गैरशैक्षणिक (कार्यालयीन व्यवस्था वगळून)कार्यासाठी खर्च करण्यावर बंदी घालण्याची मागणी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष छगण भुजबळ यांच्याकडे ओबीसी अधिकार मंचचे सयोंजक खेमेंद्र कटरे,सेल्प रिस्पेक्ट मुव्हमेंटचे सयोंजक बळीराज धोटे यांनी निवेदनातून केली आहे.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ‘महाज्योती’ ही संस्था ओबीसी विजेएनटी व एसबीसी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांना पूर्व प्रशिक्षण देण्यासाठी स्थापन झालेली संस्था आहे. या संस्थेच्याकडून  अनेक वर्षापासून वंचित राहिलेल्या ओबीसी विद्यार्थ्यांना, सर्व शैक्षणिक व संशोधनासाठी विविध सवलती पुरविण्यात याव्यात, त्यांना शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करावे अशी अपेक्षा होती. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, महाज्योतीचे नागपूर येथील मुख्य कार्यालयासह सर्व महसुली विभागीय ठिकाणी महाज्योतीचे कार्यालये निर्माण करण्यात यावीत, ही संकल्पना आहे.
पण महाज्योतीचे अध्यक्ष आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी या सर्व संकल्पना बाजूला सारून, विद्यार्थ्यांच्या हिताचा पैसा आता आपल्या मतदारसंघातील शेतकर्‍यांना करडई बियांसाठी अनुदान म्हणून तब्बल सोळा हजार शेतकर्‍यांना साडेतीन कोटी रूपये वाटण्याची योजना आखल्याची माहिती समोर आली आहे. शासनाचा शेतकर्‍यांसाठी स्वतंत्र कृषि विभाग असताना व त्यासाठी शासनाच्या विविध सवलतीच्या योजना असताना, महाज्योतीने आपले विद्यार्थी, शिक्षण आणि संशोधन हे महत्वाचे कार्य सोडून केवळ विशिष्ठ मतदार विभागातील शेतकरी मतदारांना खूष करण्यासाठी सरसकट त्यांच्या खात्यावर २ हजार २०० रूपये सबसिडी जमा करणे योग्य नाही. शेतकर्‍यांना महाज्योतीच्या माध्यमातून सबसिडी देणे नियमात बसते काय, हा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे.
ना.वडेट्टीवार यांनी ओबीसी मंत्री म्हणून मोठ्या हट्टाने महाज्योतीचे मुख्य कार्यालय नागपूरला आणले. पण ते उभारण्यासाठी कुठलीही कार्यवाही केलेली नाही. कार्यालयासाठी नागपुरात शासकीय जमीन मिळविण्याचे नियोजन सुद्धा केल्याचे दिसून आले नाही. विभागीय व जिल्हा कार्यालये तर दूरच राहिलीत.
महाज्योतीला शासनाने सुमारे २५ पदे मंजूर केल्याचे कळते. पण गेल्या वर्षभरापासून ही पदे भरण्यास टाळाटाळ होत आहे. महाज्योतीकडे सध्या फक्त व्यवस्थापकीय संचालक व मुख्य लेखा व वित्त अधिकारी हे दोनच शासकीय पदे असून केवळ तीन प्रकल्प अधिकारी यांची कंत्राटी पध्दतीवर पदे आहेत. त्याचा लाभ विद्यार्थी योजनांना देण्याऐवजी शिक्षणबाह्य अशा आपल्याच मतदारसंघातील शेतकरी योजनांसाठी कामाला लावल्याचे बोलले जात आहे.
कोट्यवधी रूपये खर्चून महाज्योती सिंदेवाही येथे करडईचे तेल काढण्याचा स्वतःचा कारखाना काढणार आहेत. त्यासाठी स्वारस्य निविदा काढणार असल्याचे कळते. म्हणजे विद्यार्थ्यासाठी महाज्योती स्वतःच कार्यालय, प्रशिक्षण केंद्रे, विभागीय केंद्रे करण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करून, केवळ विशिष्ठ मतदारसंघामध्ये महाज्योतीचा निधी शिक्षणबाह्य योजनांसाठी खर्च करीत आहेत. बार्टी सारथीच्या धरतीवर सुरू झालेली ही महाज्योती, अशा कुठल्याही शिक्षणबाह्य योजना राबवित नसताना, अध्यक्ष व मंत्री,व्यवस्थापकीय संचालक यांनी मात्र महाज्योतीच्या मूळ ध्येयापासून फारकत घेतली आहे.यापुढेही चंद्रपूर जिल्ह्यातील आपल्या मतदारसंघात गारमेंट प्रकल्प तसेच पैठणी प्रकल्प महाज्योतीच्या कोट्यवधी रूपयातून राबविणार असल्याचे वृत्त आहे. पण नागपुर मुख्यालयात मात्र विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने एकही प्रशिक्षण केंद्र निर्माण करण्यासाठी कुठलाही पुढाकार घेतला गेला नाही,या सर्व बाबींना महाज्योतीचे अध्यक्ष,व्यवस्थापक व संचालक जबाबदार असून महाज्योतीच्या निधीचा गैरवापर थांबवून आधी मुख्यालय,कार्यालयाचे बळकटीकरण करुन विद्यार्थ्यांचे विद्यावेतन आणि इतर सुविंधाना प्राधान्य देण्याची मागणी निवेदनातून केली आहे.सोबतच विद्यमान व्यवस्थपकांना हटवून त्याठिकाणी सकारात्मक विचाराचा अधिकारी त्वरीत नेमावा सोबतच महाज्योती संस्थेला पुर्णवेळ अध्यक्ष देण्यात यावे अशी मागणी निवेदनातून ओबीसी अधिकार मंचच्यावतीने करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment