मुंबई (प्रतिनीधी ) संपूर्ण जग पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात अडकत चालले असून अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी, तिसरी लाट आली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काही देशांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे. मात्र कोरोनाची लस घेण्यापूर्वीचे 24 तास महत्वाचे असून काही गोष्टींचे आवर्जुन पालन करा असे आवाहन तज्ञांकडून करण्यात आले आहे.

पेन किलर घेऊ नका -

आज-काल थोडे काही दुखले की गोळ्या घेतल्या जातात. तसेच वेदनाशामक गोळ्याही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अनेकजण घेताना दिसतात. मात्र तुम्हाला कोरोनाची लस घ्यायची असल्यास तत्पूर्वी 24 तासआधी पेन किलर घेऊ नका. यामुळे लसीची प्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता कमी होऊ शकते, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.


दारू पिऊ नका -

लस घेण्याआधी दारूचे सेवन चुकूनही करू नका. यामुळे तुम्हाला डिहायड्रेशन आणि हँगओव्हर होऊ शकतो. यामुळे लसीचा प्रभाव कमी होऊ शकतो.


जागरण करू नका -

लस घेण्याआधी रात्री जागरण करू नका. चांगली आणि पुरेशी झोप घेतल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर लसीला उत्तम प्रतिसाद देते, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. तसेच लस घेण्यापूर्वी नाही तर घेतल्यानंतर आराम करणे आवश्यक आहे.


अन्य आजारांवरील लस घेऊ नका -

कोरोना विषाणूवरील लस घेण्यापूर्वी एक आठवडा अन्य आजारांवरील कोणतीही लस घेऊ नका. जर तुम्ही अशी कोणती लस घेतली असेल तर अशी लस घेतल्यापासून 14 दिवसांनी कोरोनाची लस घ्या.


स्ट्रेस घेऊ नका -

कोरोना लस घेण्यापूर्वी अनेक जण त्यामुळे होणाऱ्या साईड इफेक्ट्सची चिंता करतात आणि स्ट्रेस घेतात. यामुळे तुमचा बीपी वाढू शकतो. तसेच यामुळे तुमच्या प्रतिकारशक्तीवर वाईट प्रभाव पडू शकतो. त्यामुळे लस घेण्यापूर्वी खाण्या-पिण्यावर लक्ष केंद्रीत करता आणि रिलॅक्स रहा.


अॅलर्जी असणाऱ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या -

ज्या लोकांना गोळ्या, औषधं घेतल्यानंतर अॅलर्जी होते त्यांनी कोरोनाची लस घेण्यापूर्वी याबाबत डॉक्टरांशी सल्लामसलत करा. कारण बऱ्याच केसेसमध्ये कोरोनाची लस घेतल्यानंतर लस घेणाऱ्या व्यक्तीस अॅलर्जीचा त्रास झाल्याचे निदर्शनास आले आहे