Tuesday, February 2, 2021

पोलिओ डोस पाजताना बॉटलचे नोजल पडले बाळाच्या तोंडात !


पंढरपूर (प्रतिनीधी) – पोलिओ लसीकरण करताना सॅनिटायझर पाजल्याची घटना यवतमाळ मध्ये घडली असताना लस देताना बॉटलचे नोजल बाळाच्या तोंडात पडल्याची घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे .

यवतमाळमध्ये बाळाला पोलिओ डोसऐवजी सॅनिटायझर पाजल्याची घटना ताजी असताना पंढरपुरात पोलिओ डोस पाजत असताना आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. इथल्या एका बाळाला पोलिओचा डोस दिला जात असताना लसीच्या कुपीचे प्लॅस्टीकचे बोंडूक (Nozzle) बाळाच्या तोंडात गेले. पोलिओच्या लसीसोबत बाळाने ते बोंडूकही गिळून टाकले. पंढरपूर जिल्ह्यातील भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात हा प्रकार घडला आहे.

प्राथमिक माहितीनुसार हा सगळा प्रकार पोलिओचा डोस देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे झाला असल्याचं कळालं आहे. एक महिला तिच्या बाळाला पोलिओची लस देण्यासाठी रविवारी भाळवणीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेली होती.

बाळाला लस देत असताना आरोग्य कर्मचाऱ्याच्या हातातून कुपीचे बोंडूक निसटलं आणि बाळाच्या तोंडात पडलं. बाळाने ते लसीसोबत गिळून टाकलं. हा प्रकार पाहिल्यामुळे बाळाच्या आईने तिथल्या लोकांना सावध केलं. बाळाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

रुग्णालयात बाळाची तपासणी करण्यात आल्यानंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. या प्रकाराबद्दल वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित रेपाळ यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की भाळवणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील तीन आरोग्य कर्मचाऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाणार असून त्यात ते दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

No comments:

Post a Comment