* वधू-वर, वधू पित्यासह ५० पेक्षा अधिक जणांवर गुन्हे दाखल.
नेकनूर (प्रतिनीधी ): बीड तालुक्यातल्या सोनपेठवाडी येथे ७ जुलै रोजी झालेल्या विवाह समारंभात उपस्थित असलेला एक पाहुणा ८ तारखेला कोरोना बाधीत आढळल्याने त्या विवाह समारंभात उपस्थित असलेल्या ५७ जणांना तात्काळ क्वारंटाईन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून दिल्या गेल्या. सदरची माहिती उघडकीस आल्यानंतर नेकनूर पोलिसात ग्रामसेवकाच्या तक्रारीवरून वधु वरासह वधु पिते आणि उपस्थित ५० पेक्षा जास्त लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सोनपेठवाडी येथे ७ जुलै रोजी मालु कारभारी तोंडे यांच्या मुलीचा विवाह वंजारवाडी येथील आकाश तांदळे यांच्याशी झाला. या लग्न समारंभाला दोन्ही कुटुंबातील ५० पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती होती. यात वंजारवाडी येथील १ पाहुणाही उपस्थित होता. लग्न ७ जुलैला दुपारी झाल्यानंतर वर्हाडी वंजारवाडी येथे गेल्यानंतर त्यातील एका पाहुणा आजारी पडला. त्याला त्याच दिवशी रूग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा स्वॅब ७ जुलैलाच पाठविण्यात आला. त्यानंतर ८ जुलै रोजी तो कोरोना पॉझिटीव्ह आला. त्यानंतर ग्रामसेवक अनंत शिंदे यांनी पॉझिटीव्ह रूग्णाची माहिती काढत सोनपेठवाडी गाव गाठत वधु पित्याची चौकशी केली. त्यावेळी त्यांनी लग्नाला केवळ दोन-चार लोकच असल्याचे सांगितले मात्र त्यांनी तेथील जेवणाच्या पत्रावळ्या आणि इतर साहित्य पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की ७० ते ८० लोक येथे उपस्थित होते. त्यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता त्यांना ७० ते ८० लोक लग्नाला उपस्थित असल्याचे सांगितले. यानंतर रातोरात आरोग्य विभाग आणि ग्रामसेवक शिंदे यांनी ५८ जणांना होम क्वारंटाईन करत केले. त्यानंतर नेकनूर पोलिस ठाण्यात ग्रामसेव अनंत शिंदे यांच्या फिर्यादीवरून नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वधु पिता मालु कारभारी तोंडेसह अन्य लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास एपीआय लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.शिंदे, युनुस बागवान करत आहेत.
No comments:
Post a Comment