Monday, July 6, 2020

कामगार कल्याण मंडळकडून २०७० विद्यार्थ्यांना ६३ लाखांचे अर्थसहाय्य.


* कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत गरीब कामगार पाल्यांना मोठा दिलासा.

*बीड, लातूर व  उस्मानाबाद जिल्ह्यातील लाभार्थींमध्ये उत्साह.

परळी वैजनाथ ;-(प्रतिनिधी) महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील २०७० कामगार व कामगार कुटुंबियांना विविध योजनांच्या माध्यमातून ६३ लाख २६ हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले.
कामगार कल्याण मंडळाने कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत तीन जिल्ह्यातील कामगार व कामगार सदस्यांना ८ कामगार कल्याण केंद्राच्या कार्यालयातून अर्थसहाय्य केल्याने कामगार वर्गातून समाधान व्यक्त केले जात असून त्यांना दिलासा मिळाला आहे.
कामगार कल्याण मंडळाने बीड, लातूर व  उस्मानाबाद या जिल्ह्यात मंडळाच्या विविध योजना प्रभावीपणे कामगारांपर्यंत पोहोचवून एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना लाभ मिळवून दिला आहे. 
यात कामगार पाल्यांना शिष्यवृत्ती योजनेतून वर्ग दहावीच्या २५५ विद्यार्थ्यांना पाच लाख १० हजार रुपये, अकरावीच्या ३९५ विद्यार्थ्यांना आठ लाख ५३ हजार रुपये, बारावीच्या २३४ विद्यार्थ्यांना चार  लाख ६८ हजार रुपये, पदवीच्या ( बी. ए., बी. एस्सी., बी. कॉम.) ३२६ विद्यार्थ्यांना आठ लाख १५ हजार रुपये, पदव्युत्तरच्या ६१ विद्यार्थ्यांना एक लाख ८३ हजार रुपये, पाॅलीटेक्नीकच्या १३४ विद्यार्थ्यांना तीन लाख ३५ हजार रुपये, अभियांत्रिकीच्या २३८ विद्यार्थ्यांना अकरा लाख ९० हजार रुपये तर वैद्यकीयच्या ६९ विद्यार्थ्यांना तीन लाख ४५ हजार रुपये,  
अपंग व दिव्यांग ८ पाल्यांना १८ हजार रुपये, परदेशी उच्चशिक्षण घेणाऱ्या २ विद्यार्थ्यांना एक लाख रुपये तर  कामगार पाल्यांना  वर्ग अकरावी पासून पुढील शिक्षणासाठी क्रमिक पुस्तके खरेदीसाठी १३८ विद्यार्थ्यांना  एक लाख ९१ हजार २०० रुपयांचा लाभ देण्यात आला.
शासनाचे एमएससी-आयटी कोर्स पूर्ण करणाऱ्या १४९ पाल्यांना दोन लाख ७९ हजार ८०० रुपये तर एमपीएससी व  युपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या ७ पाल्यांना ३५ हजार  रुपये,  क्रिडा शिष्यवृत्ती २ पाल्यांना आठ हजार  रुपये देण्यात आले.
दहावी-बारावीत ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या ६ पाल्यांना ३० हजार रुपयांचा लाभ देण्यात आला.
हृदयरोग, कर्करोग, मूत्रपिंड, ब्रेन ट्यूमर, कोमा, गॅंगरीन व क्षय रोगासाठी, गंभीर आजार योजनेअंतर्गत ४६ कामगार व कामगार कुटुंबीय रुग्णांसाठी ९ लाख ६५ हजारांचे अर्थसाहाय्य करण्यात आले. सन २०१९-२० मध्ये हे लाभ कामगार व कामगार सदस्यांना देण्यात आले.
मंजूर रक्कम लाभार्थ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. साखर कारखाने, विविध कंपन्या, एसटी महामंडळ, वीज कंपन्या, बँका, ऑइल मिल, दूध डेरी, कापड दुकाने,  खाजगी रुग्णालय,  वखार मंडळ, पणन मंडळ तसेच कामगार कल्याण निधी अधिनियमांतर्गत नोंदीत आस्थापनेतील कामगार व  कुटुंबीयांना ही मदत केली आहे. 

  .....कामगार पाल्य  प्रतिक्रीया..... 
मी वैद्यकीय शिक्षण घेत आहे. कामगार कल्याण  केंद्राकडून मला  पाच  हजार रुपये शिष्यवृत्ती व पुस्तके  खरेदीसाठी २५०० रूपये मिळाले. माझ्या लहान भावालाही  संगणक शिक्षणासाठी  लाभ मिळाला. यामुळे शैक्षणिक खर्चासाठी मदत झाली. 

श्रुती चंद्रशेखर चौधरी
कामगार पाल्य, परळी. 


        *योजनांचा लाभ घ्यावा*

कामगारांसाठी स्पर्धा परीक्षा वर्ग,  इंग्रजी संभाषण वर्ग, रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण, नाटय, भजन, लोकनृत्य स्पर्धा  यांसह विविध योजना व उपक्रम राबविले जाते.
याचाही लाभ घ्यावा असे आवाहन कामगार कल्याण अधिकारी भालचंद्र जगदाळे व परळीचे केंद्र संचालक आरेफ यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment