Thursday, July 9, 2020

सरकारने दाखवून दिली पत्रकारांना त्यांची औकात. आता तरी राजकारण्यांची चोळेगिरी थांबवा.

लोकशाहीचा चौथा स्तंभ अशी प्रसार माध्यमांची ओळख आहे आणि एके काळी या चौथ्या स्तंभाचा प्रचंड दरारा होता कारण कारण समाजातील बऱ्या वाईट घटनांचे वस्तुनिष्ठ प्रतिबिंब आपल्या वृत्तपत्रातून किंवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून दाखवणाऱ्या पत्रकारांची जनतेमध्ये एक विश्वसनीयता होती पण काही विकाऊ पत्रकारांमुळे ही विश्वसनीयता रसातळाला गेल्याने पत्रकारांना कोण जोड्याजवळ सुद्धा उभे करायला तयार नाही इतकी वाईट अवस्था पत्रकारांची झाली आहे आणि याला कारण ते स्वतःच आहेत. कुठल्या तरी राजकारण्यांच्या किंवा माफियांच्या पे रोलवर राहून महिन्याला पाकिटे घेऊन त्यांची चोळेगिरी करायची, त्यांच्या चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालून त्यांच्या विषयी चांगले लिहायचे आणि त्यांची समाजातील मलिन प्रतिमा धुवून काढण्याचा केविलवाणा प्रयत्न करायचा हेच धंदे पत्रकारांनी सुरू केले आहेत त्यामुळे राजकारणी पत्रकारांना का घाबरतील. हजार पाचशे मध्ये विकला जाणारा आजचा पत्रकार आपला बोरू शाई मध्ये नव्हे तर फुकटच्या दारू मध्ये बुडवून राजकारण्यांची चाकरी करतोय म्हणूनच आज संकटाच्या काळात राजकारणी त्याला जवळ करायला तयार नाही. हे सगळ एवढ्या साठी सांगायचे आहे की लॉक डाऊन च्या काळात सगळ्यात वाईट अवस्था पत्रकारांची झालीय .आज मुंबईतला भिकारी आणि चोर चांडाळाला सुद्धा दोन वेळचे अन्न मिळतेय पण पत्रकार म्हणून मिरवणाऱ्या लोकांना  नोकरी तर सोडाच कोण ५०० रुपये उसने सुद्धा द्यायला तयार नाहीत त्यामुळे उपासमारीची खरी पाळी जर कोणावर आली असेल तर ती पत्रकारांवर! कारण या लॉक डाऊनच्या काळात त्यांचा सगळा रुबाब,सगळी मिजास धुळीला मिळाली आहे. मी स्वतः एक पत्रकार असून सुद्धा आपल्या पत्रकार सहकाऱ्यां विषयी अशा खालच्या भाषेत संताप व्यक्त करताना मला निश्चितच वेदना होत आहेत पण वस्तुस्थिती लोकांसमोर ठेवणे हे सच्चा पत्रकाराचे कर्तव्य आहे आणि याच कर्तव्य भावनेतून आजचे पत्रकार आणि आजची पत्रकारिता यांच ऑपरेशन करण्याची पाळी माझ्यावर आली आहे.  लॉक डाऊनच्या काळात सरकारने पत्रकारांना आत्यावश्यक सेवेत समाविष्ट केलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारने अत्यावश्यक सेवेतील सर्व लोकांसाठी लोकल ट्रेनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे पण पत्रकारांना मात्र लोकल ट्रेनच्या प्रवासाला मनाई आहे. जर पत्रकारांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केलेले आहे तर मग त्यांना लोकल ट्रेनची प्रवास सरकार का नाकारत आहे हा पत्रकारांवर अन्याय नाही का? पत्रकारांच्या काही संघटना याबाबत मुख्य सचिवांना भेटल्या त्यांना निवेदन देऊन पत्रकारांनाही लोकल प्रवासाची मुभा द्यावी अशी मागणी केली पण महिना उलटला तरी पत्रकारांच्या या मागणीचा सरकारने विचार केला नाही कारण त्यांना पत्रकारांना ही सुविधाच उपलब्ध करून द्यायची नाही आणि यामागे स्वतः मुख्यमंत्री उध्दव ठाकरे असल्याचे समजते. उध्दव ठाकरेंचे पत्रकारांनी काय घोडे मारलेत ? ते कशासाठी पत्रकारांना रेल्वे प्रवास नाकारत आहेत? एरव्ही त्यांचा उदोउदो करण्यासाठी, त्यांच्या सरकारच्या बातम्या छापण्यासाठी त्यांना पत्रकार हवे असतात मग आज लॉक डाऊनच्या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सरकारने बंद करून ठेवलेली असताना पत्रकारांनी वृत्त संकलन करण्यासाठी विरार वरून चर्चगेटला चालत जायचे का? या अन्यायाच्या विरोधात का नाही पत्रकार सरकार विरूद्ध आंदोलन करीत? का नाही मुख्य सचिवांची कॉलर पकडून त्यांना जाब विचारत? अरे भिकाऱ्या सारखी निवेदने कसली देता तुमच्या लेखणीत दम आहे ना! मग तुमच्यावर अन्याय करणाऱ्या सताधाऱ्यांचे कपडे फाडायला का घाबरता? आज लॉक डाऊनच्या काळात अनेक वृत्तपत्रांच्या मालकांनी कामगार कपात केलीय, चॅनलवाल्यांनी अनेक पत्रकारांना तडकाफडकी कामावरून कडून टाकलंय अशावेळी सरकार असो की सामाजिक संघटना पत्रकारांना कुणीही मदत करायला तयार नाहीत. ज्यांच्या जाहिराती लावल्या ते राजकारणी जाहिरातीचे पैसेही द्यायला तयार नाहीत, फोन घेत नाहीत त्यामुळे या गरीब पत्रकारांनी जगायचे कसे ? आज त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलीय तेंव्हा त्यांना राजकारण्यांचे खरे स्वरूप कळले त्यांच्या पे रोलवर राहून महिन्याची दोन चार हजाराची पाकिटे घेण्यापेक्षा आपल्या लेखणीचा त्यांच्यावर कायम धाक आणि वचक राहील अशी संघटनात्मक ताकद निर्माण केली असती तर आज उध्दव ठाकरेंना पत्रकारांना लोकलचा प्रवास नाकारण्याची हिम्मत झाली नसती . लॉक डाऊन मध्ये बेरोजगार झालेल्या पत्रकारांना त्यांच्या सरकारला मदत करावीच लागली असती म्हणूनच समस्त पत्रकार बांधवांनी लॉक डाऊन मधील या भयंकर अनुभवातून धडा घेऊन राजकारण्यांची चोळेगिरी करण्याची वृत्ती सोडावी आणि आपली संघटनात्मक ताकद मजबूत करून त्या ताकदीच्या जोरावर आपले हक्क मागून नव्हे तर छिनुन घ्यावेत. आज सत्ताधारी असोत की विरोधक त्यांच्या झोल झपाट्यांची अनेक प्रकरणे पत्रकरांकडे आहेत. एकदा ती लोकांसमोर यायला सुरुवात होऊ द्या मग बघा लोकल प्रवासासाठी तुम्हाला मंत्रालयात जाऊन निवेदने द्यावी लागणार नाहीत तर उध्दव ठाकरे स्वतः तुम्हाला लोकल मध्ये बसवायला येतील. तेंव्हा या संकटाच्या काळात तुम्हाला राजकारण्यांनी तुमची औकात दाखवली आता पेनाला तलवार बनवा आणि तुम्ही त्यांना त्यांची औकात दाखवून द्या!

  * सोनू जाधव*
७०२१४७६१५३

No comments:

Post a Comment