Saturday, July 18, 2020

पेठ बीडमध्ये जुगार अड्ड्यावर धाडपंधरा आरोपीसह 1 लाखाचा मुद्देमाल जप्त.एलसीबीच्या विशेष पथकाची कारवाई.

बीड (प्रतिनीधी ):- लॉकडाऊनमध्येही जिल्ह्यात मटका, गुटखासह अवैध धंदे सुरू आहेत. हे अवैध धंदे रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने धाडसत्र सुरू केले आहे. काल रात्री पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यात आली. यावेळी पंधरा आरोपीसह १  लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीवर पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई एलसीबीचे पथक प्रमुख आनंद कांगुणे यांनी केली. 
एलसीबीच्या विशेष पथकाला पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत  जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळताच पथक प्रमुख आनंद कांगुणे यांनी त्यांच्या टीमसह रात्री १०.३० वाजता स्वप्निल धोंडीराम हातागळे यांच्या बलभीम नगर इदगाह रोड पेठ बीड येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी स्वप्निल धोंडीराम हातागळे याच्यासह पंधरा जणाला पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून नगदी ४२ हजार १६० रूपये तर ५८ हजार रूपयाचे ११ मोबाईल असे एकूण  १  लाखाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी स्वप्निल धोंडीराम हातागळे याच्यासह जुगार खेळणार्‍या पंधरा जणांवर गु.र.नं.१८९/२०२० कलम ४,५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा सह कलम १८८, २६९, २७० भादंविसह कलम ५१ नुसार रात्री ३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे, पोलीस उप अधिक्षक भास्कर सावंत, एलसीबीचे पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख एपीआय आनंद कांगुणे यांच्यासह पोलीस नाईक झुंबर गर्जे, संतोष हंगे, पो.शि.गोविंद काळे, अन्वर शेख, चालक गहिनीनाथ गर्जे यांनी केली. 
पेठ बीड पोलीसांचे अर्थपुर्ण दुर्लक्ष
पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्याला उत आला आहे. हे अवैध धंदे वरिष्ठांपासून कॉन्स्टेबलपर्यंत सर्वांनाच माहित आहे. मात्र याकडे अर्थपुर्ण दुर्लक्ष होत असल्याने अशा अवैध धंद्यावर विशेष पथकाला धाड टाकून कारवाई करावी लागते. सुतावरून स्वर्ग गाठणार्‍या पोलीसांना आपल्या ठाण्याच्या हद्दीत एवढे क्लब सुरू असल्याचे माहित नसावे हे आश्‍चर्यच. अशा अनेक अवैध धंद्याकडे पेठ बीड पोलीस अर्थपुर्ण दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे. याकडे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी विशेष लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment