बीड (रिपोर्टर)- कोरोनाच्या अनुषंगाने आदित्य महाविद्यालयात सुरू केलेले जिल्हा रुग्णालय सातत्याने वादाच्या भोवर्यात अडकलेले असून आज महिला कर्मचार्यांची छेड काढत असल्याच्या कारणावरून तेथे राडा झाला. महिला कर्मचार्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील कर्मचार्याला मारहाण केली. दोघांमध्ये चांगलीच मारहाण झाल्यामुळे रुग्णालयातील पेशंटसह नातेवाईक आणि कर्मचार्यात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. महिला कर्मचारी वार्डाच्या बाहेर निघून गेल्या. सदरचा प्रकार आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत अधिक असे की, कोरोनाच्या अनुषंगाने बीडचे जिल्हा रुग्णालय आदित्य महाविद्यालयात हलवले आहे. त्याठिकाणी रुग्णांना सेवा मिळत नसल्याची ओरड होत असतानाच तेथील एक कर्मचारी महिला कर्मचार्यांची छेड काढत असल्याची तक्रार जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी महिला कर्मचार्यांनी दिल्याचे सांगण्यात येते. आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास रुग्णालयामध्ये सदरचा कर्मचारी उपस्थित होता. अचानक महिला कर्मचार्यांचे नातेवाईक त्याठिकाणी आले आणि सदरील कर्मचार्यास मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये बराच वेळ मारामारी झाली. एकमेकांना खाली पाडून मारहाण करण्यात आली. सदरचा प्रकार घडत असताना रुग्णालयामध्ये एकच खळबळ उडाली. उपचार घेत असलेल्या रुग्णांसह नातेवाईक या मारामारीने काही काळ गोंधळून गेले. तर रुग्णालयातील महिला कर्मचारी मारामारी सुरू असताना वार्डाबाहेर निघून गेल्या. याबाबतचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. ज्या महिला कर्मचार्याच्या नातेवाईकांनी सदरील कर्मचार्यास मारहाण केली त्यांनी या अगोदर संबंधित कर्मचार्यावर छेडछाडीचा आरोप केल्याचे सांगण्यात येते.
जिल्हा रूग्णालयाची सुरक्षा खासगी रक्षकावर
लॉकडाऊन झाल्यानंतर दक्षता म्हणून बीड शहरातील सुरू असलेल्या जिल्हा रूग्णालयाला कोविड रूग्णालय घोषित करून जनरल रूग्णालय हे शहरापासून पाच किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या नाळवंडी नाका परिसरात आदित्य आयुर्वेदीक महाविद्यालयात शिफ्ट करण्यात आले. रूग्णांची सोय व्हावी व कोरोना बाधीत रूग्णाच्या संपर्कात इतर रूग्ण येवू नये म्हणून ही घेतलेली दक्षता अत्यंत महत्त्वाची ठरली. म्हणूनच बीड जिल्ह्यातत आत्तापर्यंत एकही रूग्णाला लागण झालेली नाही. याचे सर्व श्रेय जाते आरोग्य विभागाला, परंतू सध्या सुरू असलेल्या जिल्हा रूग्णालयात पोलीस
चौकी नसल्याने व ते परिसर नेहमीच अंधारमय असल्याने रात्रीच्या वेळी रूग्णालयात जातांना व येतांना रूग्णांना व नातेवाईकांना भिती निर्माण होते. सध्या जिल्हा रूग्णालयातील सुरक्षा खासगी रक्षकावर असून सध्या सुरू असलेल्या रूग्णालयात पोलीस चौकी उभारणे अत्यंत गरजेचे आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रूग्णालयातील नेत्र विभाग व जळीत विभाग सोडून इतर सर्व विभाग नाळवंडी परिसरातील आदित्य आयुर्वेदिक महाविद्यालयात हलविण्यात आले आहे. सुरूवातीला रूग्णांची गैरसोय झाली असली तरी त्यानंतर मात्र जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी सर्व काही सुरळीत केले. परंतू सध्या सुरू असलेल्या रूग्णालयात पोलीस चौकी नसल्याने सुुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्या दृष्टीकोनातून पेठ बीड पोलीस ठाण्यातील पोलीसांनी आदित्य आयुर्वेदीक महाविद्यालयात सुरक्षेसाठी लक्ष देणे गरजेचे आहे.
एमएलसी रूग्णांची तारांबळ
पुर्वी जिल्हा रूग्णालयात जखमी रूग्ण आल्यानंतर त्याला उपचार देणे, रूग्णालय पोलीस चौकीतील पोलीसांनी जवाब घेणे व संबंधित पोलीस ठाण्याला कळविणे. परंतू आता एमएलसी झाल्यानंतर ती एमएलसी कोविड रूग्णालयातील पोलीसांपर्यंत पोहचवावी लागते. त्यानंतर संबंधित पोलीस संबंधित ठाण्याला घटनेची माहिती देतात आणि त्या ठाण्यातील पोलीस नाळवंडी परिसरातील रूग्णालयात जावून संंबंधित जखमीचा जवाब घेतात. अशा प्रकारे प्रशासनाचीही तारांबळ होत असून लवकरात लवकर पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment