Thursday, April 30, 2026

परळीत सोमवारी मांस विक्री बंदीचा ऐतिहासिक निर्णय सर्वानुमते ठराव मंजूर भक्तांचा व जन भावनांचा आदर.


परळी वैजनाथ (वार्ताहर)  परळी नगरपरिषदेच्या दि. 30 एप्रिल 2026 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत “प्रत्येक सोमवारी मांस विक्री बंदी” या महत्त्वपूर्ण विषयास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. परळी हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र तीर्थक्षेत्र असल्यामुळे नागरिक व भाविकांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला.
यापूर्वी दि. 20 एप्रिल 2026 रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय समाविष्ट करण्यात आला होता. त्यानंतर आजच्या सर्वसाधारण सभेत हा विषय मांडून अंतिम मंजुरी देण्यात आली.
परळी नगरपरिषदेच्या थेट लोकनिर्वाचित नगराध्यक्षा *सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी* यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला असून, त्यांच्या “विकास पर्व 2.0” या संकल्पनेतून जनभावना, धार्मिक संवेदनशीलता आणि स्थानिक गरजा यांचा समतोल साधणारे प्रशासन दिसून आले. शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच परळीच्या पवित्रतेचा सन्मान राखण्याचा त्यांचा दृष्टीकोन या निर्णयातून अधोरेखित झाला आहे.
या निर्णयासाठी मा. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे (पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री, महाराष्ट्र राज्य) व मा. आमदार धनंजय मुंडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच उपनगराध्यक्षा *सौ. खैसर राजा खान पठाण*, गटनेते तसेच सर्व नगरसेवक-नगरसेविका यांच्या एकमताने हा ठराव मंजूर करण्यात आला.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते *श्री. शिवकुमार केदारी (हिंद नगर, परळी वैजनाथ)* यांनी या निर्णयाचे स्वागत करत सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच या विषयाला व्यापक प्रसिद्धी देणाऱ्या सर्व पत्रकार, ऑनलाइन न्यूज चॅनल व टीव्ही प्रतिनिधी यांचेही त्यांनी विशेष आभार व्यक्त केले.

No comments:

Post a Comment