Wednesday, March 11, 2026

वाळू तस्करीला अभय देण्यासाठी दरमहा लाच मागणारे चकलांबा पोलीस ठाण्याचे ठाणेदार अन् कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात.


बीड (प्रतिनिधी) वाळू तस्करीला अभय देण्यासाठी दरमहा ६० हजार रुपयांची लाच मागणारे चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि कर्मचारी विनोद सुरवसे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी रात्री 10 वाजता रंगेहाथ पकडले. या कारवाईने बीड पोलीस दलात खळबळ उडाली आहे. कारवाईनंतर रात्री 11 वाजता जन संपर्क अधिकारी असलेले सहायक पोलिस निरीक्षक सचिन इंगळे यांच्याकडे चकलांबा पोलिस ठाण्याचा पदभार सोपविला असून रात्री 1 वाजेपर्यंत ते पदभार घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वाळूचे वाहन बिनदिक्कत चालू देण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्याने ६० हजारांची मागणी केली होती. अखेर तडजोडीअंती ५० हजार रुपये देण्याचे ठरले. हे पैसे घेण्यासाठी कर्मचारी विनोद सुरवसे उमापूर पोलीस चौकीत उपस्थित होता. एसीबीच्या पथकाने सापळा रचून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सुरवसेला ताब्यात घेतले.

ठाणेदाराला पळताना पाठलाग करून पकडले!

एकीकडे कर्मचारी ताब्यात असताना, दुसरीकडे मुख्य सूत्रधार असलेले प्रभारी अधिकारी संदीप पाटील चकलांबा पोलीस ठाण्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. संशय येताच एसीबीच्या पथकाने त्यांचा फिल्मी स्टाईल पाठलाग केला. पाटील यांनी पळ काढला असला तरी, एसीबीच्या धाडसी पथकाने त्यांना शिताफीने पकडले.

पोलीस दलाची लक्तरे.

यापूर्वी पाटोदा, माजलगाव आणि गेवराई पोलीस ठाण्यांतील कर्मचारी वाळूच्या हप्त्यांच्या प्रकरणात अडकले होते. मात्र, आता चक्क पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारीच लाच घेताना अडकल्याने पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस उप अधीक्षक सोपान चितमपल्ली यांच्या नेतृत्वाखालील एसीबीच्या पथकाने ही अत्यंत गोपनीय आणि धाडसी कारवाई केली आहे.

पाटील आणि सुरवसे या दोघांनाही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. वाळू माफियांना साथ देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळल्याने जिल्ह्यातील लाचखोर पोलिसांमध्ये प्रचंड धाकधूक वाढली आहे. आता या प्रकरणाचा तपास किती खोलवर जातो आणि यात आणखी कोणाकोणाची नावे समोर येतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 'साहेबांचा' इशारा, पण वसुलीचा सोस कायम!

एकीकडे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी सोमवारीच वार्षिक तपासणीदरम्यान भ्रष्टाचाराविरुद्ध कडक कारवाईचा इशारा दिला होता, तर दुसरीकडे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनीही सुरुवातीपासूनच 'नो करप्शन'चे धोरण स्पष्ट केले होते. वरिष्ठांच्या या कडक ताकीदीची शाई वाळत नाही तोच, चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप पाटील आणि त्यांच्या कर्मचाऱ्याने पुन्हा वसुलीचा मार्ग निवडल्याचे समोर आले आहे. वरिष्ठांच्या इशाऱ्याला न जुमानता, थेट पोलीस चौकीत हप्ता वसुलीचे धाडस करणे, हे पोलीस दलातील शिस्त मोडणाऱ्यांसाठी एक मोठे आव्हानच ठरले आहे. या घटनेने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांना जिल्ह्यातील ठाणेदार किती गांभीर्याने घेतात, यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

No comments:

Post a Comment