बीड (प्रतिनिधी) "एक प्रामाणिक अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून जीव देतो, आठवडा उलटूनही पोलीस केवळ 'चौकशी'चे तुणतुणे वाजवून गुन्हेगारांना पाठीशी घालतात. पोलीस अधीक्षकांचे नाव सांगून दिशाभूल करणे थांबवा. जोपर्यंत एफआयआर हातात पडत नाही, तोपर्यंत आम्ही पोलीस ठाण्याच्या दारातून हलणार नाही", असा आक्रमक पवित्रा घेत मयत जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांच्या कुटुंबीयांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सायंकाळी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या आंदोलनानंतर आता बीड ग्रामीण पोलीस खरोखरच दोषी वरिष्ठ अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करणार की पुन्हा 'तारीख पे तारीख' देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
'शुक्रवारी सायंकाळी जाधवर यांचे नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते आणि कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धडक दिली. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांच्या कक्षात पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. "आमचा जीव गेला तरी चालेल, पण न्याय मिळाल्याशिवाय उठणार नाही", या भूमिकेवर आंदोलक ठाम होते. सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांची लोकांचा वाढता संताप पाहून अक्षरशः धावपळ उडाली. तसेच अधिकाऱ्यांनाही घाम फुटला होता.
पोलिसांची नमती भूमिका.
पोलीस ठाण्याच्या दारातच नातेवाईकांनी ठिय्या मांडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अखेर पोलिसांनी नमती भूमिका घेतली आणि गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. मात्र, "पोलिसांच्या आश्वासनावर आमचा विश्वास नाही, जोपर्यंत एफआयआरची प्रत मिळत नाही तोपर्यंत ठाण मांडूनच बसणार", असे म्हणत रात्री ८ वाजेपर्यंत नातेवाईक ठाण्यातच बसून होते.
सुसाईड नोटमध्ये स्पष्ट नाव असूनही आठवडाभर पोलीस कशाची वाट पाहत होते? एकीकडे कुटुंब उघड्यावर पडले असताना पोलीस मात्र तांत्रिक चौकशीच्या नावाखाली वेळकाढूपणा करून आरोपींना पळून जाण्यासाठी किंवा पुरावे नष्ट करण्यासाठी वेळ देत आहेत का? असा गंभीर आराेप वडवणीचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ मुंडे यांनी केला.
फोनाफोनी अन् धावपळ.
पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांच्या कक्षात माजी आ. केशवराव आंधळे यांच्यासह इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. गुन्हा दाखलची मागणी केली. यावेळी तपास अधिकारी सपोनि बाळराजे दराडे हे देखील उपस्थित होते. परंतु सुरुवातीला टाळाटाळ करण्यात आली. वारंवार कक्षातून बाहेर जात मुदिराज फोनाफोनी करत होते. जवळपास तासभर हा खेळ चालला. लोकांचा वाढता रोष पाहून गुन्हा दाखलचे आश्वासन देण्यात आले. तोपर्यंत बाहेर लोकांनी ठिय्या मांडला होता.
आम्हाला न्याय द्यावा.
आमची तक्रार घेतली जात नाही. सुसाईड नोट दाखवली जात नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे. आम्हाला न्याय द्यावा, एवढीच आमची मागणी आहे.मयुरी जाधवर, मयताची पत्नी
केवळ गवगवा होताे.
सचिन जाधवर यांच्या कुटुंबाला न्याय द्यायला हवा. पोलीस चांगले आहेत, असा केवळ गवगवा होताे. पण प्रत्यक्षात वेगळेच आहे. गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही उठणार नाहीत.संजय आंधळे, अध्यक्ष, युवा मोर्चा भाजप
No comments:
Post a Comment