Saturday, December 13, 2025

माझ्या आठवणीतले माजी केंद्रीय गृहमंत्री कै.शिवराज पाटील चाकूरकर - चेतन सौंदळे

श्रावण मास… भक्ती,श्रद्धा,तपश्चर्या,साधना आणि अध्यात्माने बहरलेला काळ याच पवित्र महिन्यातील 11 ऑगस्ट 2018 पासून सुरू झालेल्या वसुंधरारत्न राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या ८२ व्या श्रावण मास तपोनुष्ठान सोहळ्याने परळी वैजनाथ नगरीला आध्यात्मिक ऊर्जा प्रदान केली होती. सोहळ्याचा प्रत्येक दिवस भक्तिभावाने,शिस्तबद्धतेने आणि अद्वितीय उत्साहात साजरा झाला या पवित्र सोहळ्याच्या मौनमुक्ति सांगता प्रसंगी एक राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व उपस्थित होते—भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री,लोकनेते शिवराज पाटील चाकूरकर.

आज त्यांचे दुःखद निधन झाले आहे… पण त्यांच्या भेटीच्या आठवणी काळाच्या कप्प्यात आजही ताज्याच आहेत. त्या आठवणींची ओल माझ्या स्मरणात आहे.
सोहळ्याची सांगता होती… परिसरात भक्तिरसाचा मधुर वातावरण होते अशा वेळी शिवराज पाटील चाकूरकर साहेब परळी वैजनाथ येथे आले.त्यांची साधी,सोज्वळ व प्रसन्न चाल… मनाला भिडणारा प्रत्येकाशी सहज संवाद हा त्यांचा स्वभाव.या सोहळ्याबद्दल त्यांनी “हा न भूतो न भविष्यति असा डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराजांचे आध्यात्मिक पर्व आहे” असे उद्गार काढले. आमच्या नियोजनाचे,शिस्तीचे,भक्तांच्या गर्दीचे आणि संपूर्ण व्यवस्थापनाचे त्यांनी केलेले तोंडभरून कौतुक हे माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी आशीर्वादासारखेच होते.
त्या क्षणी एका थोर नेत्याकडून मिळालेल्या शब्दांनी आम्हाला नवी ऊर्जा दिली.
परळीच्या पावन नगरीत येऊन त्यांनी प्रथम ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैजनाथ यांचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा समाधानाचा उजळ भाव आजही डोळ्यांसमोर आहे त्यानंतर त्यांनी राष्ट्रसंत वसुंधरारत्न डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतला.
एका महापुरुषाने महान तपस्वीस मानाने नमन केलेला तो क्षण आजही मनात पवित्रतेची शिदोरी बनून आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री… मोठी जबाबदारी,मोठा दर्जा परंतु व्यक्ती म्हणून शिवराज पाटील चाकूरकर साहेब अत्यंत साधे आणि स्नेहपूर्ण होते.त्यांच्यात अहंकाराचा लवलेश नव्हता.
भेटणाऱ्या प्रत्येकाशी ते आदराने बोलत, विचारपूस करत.सोहळ्याच्या व्यवस्थापनातील आमच्या प्रत्येक सहकाऱ्यांचे त्यांनी नावानिशी कौतुक केले. “भक्ती आणि शिस्त या दोन गोष्टी एका मोठ्या सोहळ्याला महान बनवतात आणि तुम्ही त्या दोन्ही उत्तमरीत्या पाळल्या आहेत” असे ते म्हणाले होते.हे शब्द आजही माझ्या मनात दीपस्तंभासारखे उजळून राहिले आहेत त्यांच्या जाण्याने पडलेली पोकळी
आज,शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर या दिवशी त्यांच्या निधनाची मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली. एका थोर,सुसंस्कृत, लोकनेतृत्वाचा आदर्श असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे हे अपरंपार नुकसान आहे. त्यांच्या सहवासातून, त्यांच्या शब्दातून आणि त्यांच्या मोठ्या दृष्टीकोनातून मला मार्गदर्शन मिळाले, प्रेरणा मिळाली.
आज ते आपल्यात नाहीत… परंतु त्यांची आठवण, त्यांचा साधेपणा, त्यांची प्रशस्त विचारसरणी आणि त्यांनी दिलेली प्रेरणा कायम माझ्या हृदयात राहील.
स्व. शिवराज पाटील चाकूरकर यांचे आमच्या सोहळ्यातील आगमन हा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अध्याय आहे. त्यांना मन:पूर्वक श्रद्धांजली! प्रभु वैद्यनाथ ईश्वर त्यांच्या पुण्यात्म्यास चिरशांती देवो. ॐ शांती.

*श्री. चेतन सौंदळे*
*अध्यक्ष – राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज श्रावण मास तपोनुष्ठान सोहळा, परळी वैजनाथ*

No comments:

Post a Comment