बीड (प्रतिनिधी) : नाशिकमधील मालेगाव आणि बीड तालुक्यातील शिरूरच्या घटना ताज्या असतानाच, बीडमध्येही सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीवर अत्याचार झाला होता. या प्रकरणाने मुलगी असुरक्षित असल्याची भावना मनात ठेवून पालकांनी तिचे शिक्षणच बंद केले होते. हा प्रकार ‘लोकमत’ने निदर्शनास आणून देताच विधी सेवा प्राधिकरण आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत पालकांचे समुपदेशन केले. पालकांच्या मनातील भीती दूर होताच पीडितेचा मंगळवारी शाळेत पुन्हा प्रवेश निश्चित करण्यात आला. ती पाठीवर दप्तर घेऊन शाळेत जाताच तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
खटला लढवण्यासाठी मोफत वकील.
अत्याचार पीडित मुलीचे शिक्षण बंद झाल्याचे समजताच या विषयावर प्रकाश टाकत १२ डिसेंबर रोजी याची विधी सेवा प्राधिकरण, बालहक्क कार्यकर्ते आणि बालकल्याण समिती यांनी गंभीर दखल घेतली. पालकांना बोलावून त्यांचे समुपदेशन करत त्यांना आधार दिला. त्यांना कायदेशीर बाबींची सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानंतर पालकांचे मन स्थिर झाले. आता प्राधिकरणाकडून पीडितेचा खटला लढवण्यासाठी एक मोफत वकीलही देण्यात आला आहे. तसेच ‘मनोधैर्य’सह इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पालक घाबरलेले असल्याने त्यांनी मुलीचे शिक्षण बंद केले होते. आम्ही त्यांचे समुपदेशन करून त्यांना आधार दिला. आता पुन्हा तिचा त्याच शाळेत प्रवेश घेतला आहे. शाळेत पोहोचताच मुलगी खूप आनंदी झाली.- तत्त्वशील कांबळे, बालहक्क कार्यकर्ते, बीड
No comments:
Post a Comment