Wednesday, December 31, 2025

रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्या साठी. पूर्णेत रेल्वे प्रशासनाची बुलडोझर कारवाई!


पूर्णा (प्रतिनिधी) पूर्णा शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील अकोला लोहमार्गालगत असलेले रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने बुधवारी (३१ डिसेंबर) मोठी कारवाई केली. रेल्वे इंजिनिअरिंग विभागाने पोकलेन आणि बुलडोझरच्या साहाय्याने सुमारे २० पक्क्या घरांचा अतिक्रमित भाग पाडून टाकला. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.

नेमकी कारवाई काय?

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातर्फे पूर्णा स्थानक परिसराची अधिकृत मोजणी करण्यात आली होती. या मोजणीनुसार, अकोला लोहमार्गाच्या दक्षिण दिशेकडे २२ मीटरपर्यंतची जागा रेल्वेच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले. या जागेत अनेक नागरिकांनी विनापरवाना पक्की घरे बांधली होती. रेल्वेने यापूर्वीच पिवळ्या रंगाने खुणा करून संबंधित नागरिकांना स्वतःहून अतिक्रमण काढण्याच्या दोन वेळा नोटिसा दिल्या होत्या. मात्र, मुदतीत अतिक्रमण न काढल्याने अखेर प्रशासनाने बळाचा वापर करून ही कारवाई केली.

नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान

या कारवाईत गणेश भिसे, विनय चंडालिया, विनोद सहजराव, फिरोज पठाण, शेख अखिल, अजिज बेकरीवाले, कलीम सय्यद यांसह सुमारे २० ते २५ जणांच्या घरांचा काही भाग पाडण्यात आला. तसेच येथील आक्सा मशिदीचा काही भागही जमीनदोस्त करण्यात आला. भर थंडीत घरांवर बुलडोझर चालल्यामुळे नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे.

अतिक्रमण हटवण्याचे काय आहे कारण

अकोला लोहमार्गावर वाढलेली रेल्वे वाहतूक आणि होणारी कोंडी लक्षात घेता, या ठिकाणी नवीन रेल्वे ट्रॅक उभारण्यात येणार आहे. या नवीन ट्रॅकसाठी जागा मोकळी करणे आवश्यक असल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती रेल्वे इंजिनिअरिंग विभागाचे कर्मचारी सुबोधकुमार यांनी दिली. हैदराबाद आणि नांदेड विभागाच्या संयुक्त नियोजनातून ही मोहीम राबवण्यात आली.

परळीत राजकीय घडामोडींना वेग ६ पैकी ३ अपक्ष नगरसेवकांचा राष्ट्रवादी (अजित पवार) धनंजय मुंडे गटात प्रवेश.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत एकहाती महायुतीची सत्ता असतानाही शहरात ६ अपक्ष उमेदवार निवडून आले होते. या निकालानंतरच्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, या ६ पैकी ३ अपक्ष नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार – धनंजय मुंडे गटात अधिकृत प्रवेश केला आहे.

धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या प्रवेश सोहळ्यात अपक्ष नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला १) प्रभाग क्रमांक ०८ मधील अपक्ष नगरसेवक इस्माईल मौला शेख उर्फ पटेल २) प्रभाग क्रमांक ०८ मधील अपक्ष नगरसेविका अर्चना महेंद्र रोडे ३) प्रभाग क्रमांक १० मधील अपक्ष नगरसेवक लक्ष्मण मुरकुटे


या प्रवेशामुळे परळी नगर परिषदेतील राजकीय समीकरणात महत्त्वपूर्ण बदल होण्याची शक्यता आहे. महायुतीला बळकटी मिळत असून, आगामी काळात नगर परिषदेतील सत्तासंतुलनावर याचा परिणाम होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

शहराच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे नव्याने प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी यावेळी सांगितले. नागरिकांच्या मूलभूत सुविधा, पायाभूत विकासकामे आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून सक्रियपणे काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रवेशामुळे परळीतील राजकारणात नवे वळण लागले असून, उर्वरित अपक्ष नगरसेवकांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

विविध ठिकाणी चोरी करणारे सराईत गुन्हेगारांच्या दोन टोळ्या पकडण्यात एलसीबीला यश.


बीड (प्रतिनिधी) वासनवाडी शिवारातून ॲल्युमिनियम तार चोरणारी सराईत गुन्हेगारांची टोळी पोलिसांनी पावर हाऊस माऊली नगर बीड येथून जेरबंद केली. तर वडवणी येथून कॉपर केबल, पाणबुडी व बोरच्या मोटारीसह शेळ्या चोरणारी दुसरी टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेने यश मिळवले.


बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीड मधील माऊली नगर, पावर हाऊस जवळून भीमा लक्ष्मण मस्के व 39 वर्ष, विजय वसंत तायड वय 25 वर्ष रा. माऊली नगर बीड तसेच हुसेन बशीर शेख वय 45 वर्ष रा. पावर हाऊस जवळ माऊली नगर बीड या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला सापळा रचून पकडले. त्यांच्याकडून 500 किलो एल्युमिनियम तार जप्त करण्यात आली. या टोळीने बीड ग्रामीण व माजलगाव ग्रामीण परिसरात गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. ही कारवाई 27 डिसेंबर रोजी करण्यात आली.
त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वडवणी येथून वीरसिंग शेरसिंग गोके वय 24 वर्ष रा. पोलीस कॉलनी शेजारी अंबाजोगाई, मोहनसिंग मोहब्बतसिंग टाक वय 21 वर्ष रा. बस स्थानक मागे वडवणी याबरोबरच जिगरसिंग मोहब्बतसिंग टाक वय 19 वर्ष रा. बस स्थानक मागे वडवणी यांना पकडण्यात यश मिळवले. त्यांनी केलेल्या चार घरपोडीच्या व चोरीच्या दोन गुन्ह्यांची कबुली दिली. या तीन जणांच्या टोळीने नेकनूर अंबाजोगाई ग्रामीण व शहर तसेच धारूर सह परळी संभाजीनगर ठाणे परिसरात गुन्हे केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. पकडलेल्या या आरोपीकडून ॲल्युमिनियम तार, पाणबुडी मोटारी, कॉपर केबल तीन बंडल सहा बोरच्या मोटारी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही टोळ्यांकडून पोलिसांनी तीन लाख 21 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, रामचंद्र केकान ,मारुती कांबळे ,सोमनाथ गायकवाड, विष्णू सानप, गोविंद भताने, सचिन आंधळे, विकी सुरवसे, अतुल हराळ यांनी पार पाडली

Tuesday, December 30, 2025

बुलढाणा अर्बन बँकेची शाखा बंद होण्याच्या अफवांमुळे धारूर शाखेत ग्राहकांची मोठी गर्दी.


धारूर (प्रतिनिधी) बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीची धारूर येथील शाखा बंद होणार असल्याच्या अफवांमुळे मंगळवारी (दि. ३०) बँकेत ग्राहकांची मोठी गर्दी झाली. वडवणी येथील शाखेमध्ये २९ डिसेंबर रोजी बँक बंद होण्याची चर्चा पसरल्याने धारूर परिसरातील खातेदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या भीतीपोटी अनेक ग्राहकांनी एकाच वेळी बँकेत धाव घेत आपले व्यवहार पूर्ण करण्यासाठी गर्दी केली.

सकाळपासूनच शाखेत बचत खाते, मुदत ठेव, सोने कर्ज खाते तसेच इतर व्यवहारांसाठी ग्राहकांची रांग लागली होती. काही ग्राहकांनी आपले ठेव खाते बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली, तर काहींनी रोख रक्कम काढण्यासाठी गर्दी केली. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे बँक कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला असला तरी सर्व व्यवहार सुरळीतपणे पार पाडण्यासाठी कर्मचारी प्रयत्नशील होते.

या परिस्थितीत शाखा व्यवस्थापकांनी ग्राहकांना दिलासा देत स्पष्ट केले की बुलढाणा अर्बन बँक बंद होणार नाही. ग्राहकांच्या सोयीसाठी बँक रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असून, सर्वांनी शांतता व शिस्त राखून आपले व्यवहार करावेत, असे आवाहन त्यांनी केले. बँकेचे व्यवहार नियमितपणे सुरू राहणार असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अफवांमुळे बँकिंग व्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेता प्रशासनानेही ग्राहकांना योग्य माहिती देण्याची गरज असल्याचे मत ग्राहकांनी व्यक्त केले आहे.

खातेदारांनी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा आणि अफवांमुळे घाईगडबड करू नये. बुलढाणा अर्बन बँकेच्या धारूर शाखेत सर्व व्यवहार सुरळीत सुरू असून ग्राहकांनी निर्धास्तपणे बँकिंग सेवा घ्याव्यात
बप्पासाहेब लांडे, व्यवस्थापक धारूर शाखा

मांजरसुंबा रोडवरील टोल नाक्यावर तिघांना बेदम मारहाण.आरोपींना अटक करण्यासाठी कुटुंबीयांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा.


*आरोपींना राजकीय वरदहस्त असल्याने पाटोदा पोलिसांनी तक्रार घेण्यास विलंब केल्याचा आरोप. 

*टोल नाक्यावर यापूर्वी अनेकांना मारहाण. यापूर्वी झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ आला समोर. 

बीड (प्रतिनिधी)  बीडच्या पाटोदा ते मांजरसुंबा रोडवर असलेल्या वैद्यकीय टोल नाक्यावर भावा बहिणीसह भाच्याला रोड आणि लाकडी दांड्यांनी मारहाण केल्याची घटना रात्री घडली. वीस ते पंचवीस जणांच्या टोक्याने ही मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या टोल नाक्यावर यापूर्वी देखील मारहाणीच्या घटना घडलेल्या आहेत.

महाराणीच्या घटनेनंतर सदर कुटुंबीयांनी पाटोदा पोलिसांना संपर्क साधला असता त्यांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचा देखील आरोप करण्यात येत आहे. आता या मारहाणीतील जखमींवर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मारहाण करणारे खून प्रकरणातील आरोपी असून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी नातेवाईकांनी बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यावर मोर्चा काढत निवेदन दिले.. आरोपींना अटक न झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू, असा देखील इशारा या नातेवाईकांनी दिला आहे. पाटोदा पोलिसांनी कोणाच्यातरी सांगण्यावरून तरी तक्रार घेतली नाही, या आरोपींना राजकीय वरदहस्त आहे, असा देखील आरोप या नातेवाईकांनी केला आहे.

तत्पूर्वी, टोल नाक्यावर यापूर्वी देखील मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. शहरात मोठ्या प्रमाणात तरुणांना एकत्रित करत मारहाण केली जात असल्याचा यापूर्वीचा व्हिडिओ देखील आता समोर आला आहे.. त्याच पद्धतीने रात्री देखील मारहाण केल्याचा आरोप या नातेवाईकांनी केला आहे.

३० हजारांची लाच मागणाऱ्या भूमापकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.


केज (प्रतिनिधी): शेतकऱ्याच्या जमिनी ची मोजणी झाल्यानंतर क्षेत्र दुरुस्ती करून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या भूमापकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. केज तहसील कार्यालयासमोरून जाणाऱ्या महामार्गावरील एका हॉटेलमध्ये १० हजार रुपये लाच स्वीकारताना भूमापक माणिक वाघमारे याला एसीबी पथकाने जेरबंद केले.

या प्रकरणाची माहिती अशी की, केज तालुक्यातील बोरगाव येथील एका शेतकऱ्याने दि. १८ डिसेंबर रोजी भूमिअभिलेख कार्यालयामार्फत अधिकृतपणे आपल्या जमिनीची मोजणी करून घेतली होती. मात्र जमिनीच्या जुन्या निजामकालीन अभिलेखांमध्ये क्षेत्र कमी असल्याचे कारण सांगत भूमापक माणिक वाघमारे याने दुरुस्ती करून देण्यासाठी सुरुवातीला ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. नंतर दोघांमध्ये तडजोड होऊन ३० हजार रुपयांवर व्यवहार ठरला.

यातील ५ हजार रुपये तक्रारदार शेतकऱ्याने त्याच दिवशी दिले होते, तर उर्वरित रक्कम नंतर देण्याचे ठरले. मात्र उर्वरित पैसे देण्याची इच्छा नसल्याने शेतकऱ्याने जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. एसीबी अधिकाऱ्यांनी तक्रारीची चौकशी करून सत्यता पडताळल्यानंतर सापळा रचला. तक्रारदाराकडे देण्यासाठी अँथ्रासीन पावडर लावलेल्या नोटा देण्यात आल्या तसेच व्हॉईस रेकॉर्डर लावून सापळ्याची संपूर्ण माहिती देण्यात आली.

दि. २९ डिसेंबर रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता तक्रारदार शेतकरी भूमिअभिलेख कार्यालयात गेला आणि भूमापक वाघमारे याला १० हजार रुपये लाच देण्यासाठी आणल्याचे सांगितले. त्यानंतर दोघे तहसील कार्यालयासमोरील केज–माजलगाव रोडवरील पोलिस स्टेशन शेजारी असलेल्या चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी गेले. तेथे वाघमारे याने तक्रारदाराकडून १० हजार रुपये स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने तात्काळ कारवाई करत त्याला रंगेहात पकडले.

सरकारी पंचांसमक्ष झडती घेऊन लाचपोटी घेतलेली रक्कम जप्त करण्यात आली. ही कारवाई जालना विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वी केली. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

चहाच्या बहाण्याने अडकला जाळ्यात

तक्रारदार शेतकऱ्याने “साहेब, बाहेर चहा घेऊ, तिथे पैसे देतो,” असे सांगून भूमापक वाघमारे याला कार्यालयाबाहेर बोलावले. याच ठिकाणी आधीच दबा धरून बसलेल्या एसीबी अधिकाऱ्यांसमोर वाघमारे याने बिनधास्तपणे लाच स्वीकारली आणि अलगद एसीबीच्या जाळ्यात अडकला.

वडवणी शाखा बुलढाणा अर्बन बँक बंद होणार अफवेने मोठी खळबळ बँकेसमोर नागरिकांची मोठी गर्दी. व्यवहार पूर्णपणे सुरक्षित असल्याचे बँकेचे स्पष्टीकरण.


वडवणी (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यातील वडवणी येथे बुलढाणा अर्बन बँक बंद होणार असल्याच्या अफवेने मोठी खळबळ उडाली. या अफवेच्या पार्श्वभूमीवर बचत खात्यातील रक्कम काढण्यासाठी तसेच तारण ठेवलेले सोने सोडवून घेण्यासाठी खातेदारांनी बँक शाखेत पहाटेपर्यंत गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

गेल्या काही वर्षांत ज्ञानराधा पतसंस्थेसह काही मल्टीस्टेट बँका आणि पतसंस्थांनी खातेदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी बुडवून गाशा गुंडाळल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण आहे. त्यातच बुलढाणा अर्बन बँकेची वडवणी शाखा बंद होणार असल्याची अफवा शहरात पसरली आणि अनेक खातेदारांनी आपली रक्कम सुरक्षित काढून घेण्यासाठी बँकेकडे धाव घेतली.

बँकेबाहेर पहाटेपर्यंत नागरिकांच्या रांगा

आज पहाटेपर्यंत बँक शाखेबाहेर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची रांग लागली होती. काही खातेदारांनी खात्यातील संपूर्ण रक्कम काढण्याचा आग्रह धरला, तर काहींनी सोन्याचे कर्ज फेडून तारणातील दागिने परत घेण्यास प्राधान्य दिले. या अचानक वाढलेल्या व्यवहारांमुळे बँक कर्मचाऱ्यांवरही अतिरिक्त ताण आला होता.

व्यवहार पूर्णपणे सुरक्षित असल्याचे बँकेचे स्पष्टीकरण . 

दरम्यान, बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडची स्थापना सन 1986 मध्ये राधेश्याम देवकिसन चांडक यांनी सहकार चळवळीवरील जनतेचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने केली. त्या काळात सहकार क्षेत्राकडे साशंकतेने पाहिले जात असताना, बुलढाणा अर्बन ही एक अग्रगण्य संस्था ठरली. सूक्ष्म वित्तपुरवठा (मायक्रोफायनान्स), नाविन्यपूर्ण बँकिंग उपाययोजना आणि सामाजिक-आर्थिक उपक्रमांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना सक्षम करण्याचे कार्य या संस्थेने केले आहे. बीड जिल्ह्यात बुलढाणा अर्बन बँकेच्या एकूण 13 शाखा असून उर्वरित सर्व शाखांमध्ये कामकाज सुरळीत सुरू आहे. केवळ वडवणी शाखेबाबतच अफवा पसरवण्यात आली होती. मात्र, बँकेच्या माध्यमातून बँकेचे व्यवहार पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. बँक प्रशासनाने खातेदारांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीसाठी थेट बँकेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. 

Monday, December 29, 2025

नववीत शिकणाऱ्या मुलीने गळफास घेत संपवले जीवन. कारण अद्याप अस्पष्ट पुढील तपास पोलीस करत आहेत.


केज (प्रतिनिधी)   तालुक्यातील तांबवा येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. केज येथील विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, तनुजा गोविंद चाटे (वय १४ वर्ष) ही रविवारी (दि. २८ डिसेंबर) घरीच होती. दुपारी तिने आपल्या दोन मजली घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेतला. त्यानंतर खोलीतील सीलिंग फॅनला साडीच्या सहाय्याने गळफास लावून जीवन संपवले.

पोलिसांची कार्यवाही

घटनेची माहिती मिळताच रविवारी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास केज पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, उमेश निकम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचनामा केला. पोलिसांनी तात्काळ मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला.

जीवन का संपवले...कारण अस्पष्ट

तनुजा ही अवघ्या १४ वर्षांची होती आणि नुकतीच नववीत शिकत होती. इतक्या लहान वयात तिने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेमुळे तांबवा परिसरात शोककळा पसरली आहे.

Saturday, December 27, 2025

जिल्हा परिषद निवडूका नव्या वर्षात, २ टप्प्यात होणार.संभाव्य निवडणूक कार्यक्रम वेळापत्रक.


मुंबई (प्रतिनिधी) : मिनी मंत्रालयात अर्थात जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा नव्या वर्षात उडणार आहे. राज्यातील प्रलंबित ३२ जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होणार आहे. आरक्षणाच्या तिढ्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता आयोगातील आधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. १२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पैकी १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका २१ दिवसात होणार आहेत. त्याबाबतची आयोगाची तयारी पूर्ण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारीत १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांचं बिगुल वाजणार आहे. ८ जानेवारीच्या आधी जिल्हा परिषदेसाठी आचारसंहिता लागू शकते, असे आयोगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलेय.

दोन टप्प्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका? 

सर्वोच्च न्यायालयान राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ३१ जानेवारी २०२६ पर्यंतची वेळ दिलेली आहे. पण या कालावधीत जिल्हा परिषदेच्या निवडणुका होण्याची शक्यता कमीच दिसतेय. २० जिल्हा परिषदेत आणि २११ पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणाच्या निवडणुकांना आयोगाकडून स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता उर्वरित १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक जानेवारीत होऊ शकते. त्याबाबतची आयोगाची तयारी पूर्ण झाली आहे.

कोणत्या जिल्हा परिषदेची निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार ? 

३२ पैकी १२ जिल्हा परिषदेत ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादेचे पालन करण्यात आलेय. त्या झेडपीची निवडणूक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. २१ दिवसांत निवडणूक कार्यक्रम पूर्ण कऱण्याचा आयोगाचा प्लान आहे. सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या जिल्हा परिषदेच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होतील,असे आयोगाकडून सांगण्यात आलेय. ६ ते ८ जानेवारीच्या दरम्यान आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. २० जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका ३१ जानेवारीनंतरच होतील, असे समोर आलेय.

१२ जिल्हा परिषदेचा संभाव्य कार्यक्रम

निवडणुकीची घोषणा - ६ ते ८ जानेवारी

उमेदवारी अर्ज भरणे - १० ते १७ जानेवारी

अर्जांची छाननी अन्‌ माघार - १८ ते २० जानेवारी

चिन्ह वाटप - २१ जानेवारी

मतदान - ३० जानेवारी

मतमोजणी - ३१ जानेवारी

बस स्टॅन्ड व सिव्हिल हॉस्पिटल परिसरात मोबाईल चोरी, जबरी चोरी, नागरिकांना अडवून लुटणारा आरोपी पकडला.


बीड (प्रतिनिधी) शहरातील बस स्टॅन्ड व सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सातत्याने मोबाईल चोरी, जबरी चोरी, नागरिकांना अडवून बळजबरी पैसे काढून घेणे, खिशातून पैसे लंपास करणे, मारहाण तसेच खून प्रयत्नासारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपीस बीड शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने शिताफीने अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव दीपक संतोष भोरे, रा. खडकपुरा पेठ, बीड,असे आहे.या आरोपीवर यापूर्वीही खून, मारामारी, जबरी चोरी व चोरी अशा विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.आरोपी हा विशेषतः मोबाईल चोरी करण्याच्या सवयीचा सराईत गुन्हेगार असून तो बस स्टॅन्ड व सिव्हिल हॉस्पिटलसारख्या गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी पाहून गुन्हे करत असल्याचे उघड झाले आहे.गुन्हे करून हा आरोपी नाशिक येथे पळून जाऊन तेथे वास्तव्य करत होता. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे बीड शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने त्याचा माग काढून अटक केली आहे.या कारवाईमुळे बस स्टॅन्ड व सिव्हिल हॉस्पिटल परिसरात होणाऱ्या चोरी व जबरी चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होणार आहे.वारंवार गुन्हे करणाऱ्या अशा सराईत आरोपींवर तडीपारीसारखी कडक कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत.ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर ,उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ,पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव, पो हेकॉ संदीप आघाव, मनोज जायभाय, गहिनीनाथ बावनकर, इलियास शेख, राम पवार व मंगेश शिंदे यांनी पार पाडली.

Friday, December 26, 2025

सहा जानेवारी 2026 पासून आर टि ओ कार्यालय अंबाजोगाईमध्ये “एम एच ४४ ए जे” हि मोटरसायकल मालिका सुरू.


अंबाजोगाई  (प्रतिनिधी) उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अंबाजोगाई यामध्ये मोटरसायकल नवीन नोंदणी साठीची नवीन नोंदणी मालिका एम एच 44 एजे ही मालिका चालू होत आहे.
आता चालू असलेली एम एच ४४ ए एच ही मालिका संपत असल्याने आता नवीन मालिका उपलब्ध करून देण्यात येत आहे दिनांक सहा जानेवारी 2026 रोजी पासून संवर्ग वाहन 4.0 संगणक प्रणालीवर ही नवीन वाहन नोंदणी मालिका सुरू करण्यात येत आहे नवीन मोटरसायकल नोंदणीसाठी आकर्षक नोंदणी क्रमांक आता एम एच 44 ए जे या मालिकेतून दिले जाणार आहेत यामध्ये आकर्षक क्रमांक शुल्क 5000 पेक्षा जास्त असल्यास वाहन धारकाला वाहन नोंदणी क्रमांक घेण्यासाठी राष्ट्रीयकृत बँक स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एचडीएफसी आयसी आयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा चे धनादेश मतदान कार्ड बँक पासबुक लाईट बिल एलआयसी पॉलिसी जोडावे लागणार आहे हे अर्ज दिनांक एक जानेवारी 2026 तसेच 2 जानेवारी 2026 रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत स्वीकारण्यात येतील त्यानंतर आलेले अर्ज घेतले जाणार नाहीत दिनांक पाच जानेवारी 2026 रोजी सकाळी बारा वाजेपर्यंत एकाच क्रमांकासाठी जास्त अर्ज आल्यास त्या क्रमांकाचा लिलाव करण्यात येईल आणि आणि त्याच दिवशी आकर्षक क्रमांक शुल्क दुपारी अडीच वाजेपर्यंत भरणा करावा लागेल त्यानंतर आलेले अर्ज बाद करण्यात येते यासाठी संबंधित क्रमांक शुल्काशिवाय बंद लिफाफ्यामध्ये धनादेश आणि बंधनकारक आहे असे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अंबाजोगाई यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

बीड नगरपरिषदेतील नगरसेवक गटाच्या भाजपच्या गटनेतेपदी डॉ.सारिकाताई क्षीरसागर.

बीड (प्रतिनिधी) : बीड नगरपरिषदेतील भाजपच्या नगरसेवक गटाच्या गटनेतेपदी डॉ.सारिकाताई योगेश क्षीरसागर यांची निवड शुक्रवारी (दि.२६) करण्यात आली आहे. भाजपच्या नगरसेवकांच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. या निवडीच्या ठरावाची पत्र जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे देण्यात आली. 

नगरपरिषदेत भाजपचे १५ नगरसेवक विजयी झाले असून भाजपने प्रभावी कामगिरी करत मजबूत उपस्थिती निर्माण केली आहे. आता गटनेते पदाची जबाबदारी डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, डॉ.योगेश क्षीरसागर, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ शिराळे, जिल्हा सचिव शांतिनाथ डोरले, जिल्हा सरचिटणीस गणेश लांडे यांच्यासह भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, गटनेतेपदी निवड झाल्यानंतर डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह नेते, पदाधिकारी, सहकारी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचे आभार मानत, बीड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

ज्ञानाचा उ:षकाल घडविणा-या : आदरणीय सौ.उषाताई किरण गित्ते.


      ( मा.सौ.उषाताई किरण गित्ते मॅडमचा 27 डिसेंबर 2025 रोजी वाढदिवस.त्या निमित्ताने त्यांच्या जीवन चरित्राचा घेतलेला हा थोडक्यात आढावा.)
     मानवी जीवनात काळाचा महिमा अगाध आहे.तीन प्रकारचे काळ सांगितले गेले आहेत.भुतकाळ,भविष्यकाळ व वर्तमानकाळ.या काळात ही दिवस रात्र येते.दिवस म्हणजेच कार्यप्रवणता प्रकाशाचे आगमन बारा तास सहवास तर रात्र म्हणजे विश्रांती व अंधाराचे साम्राज्य.अंधाराला भेदुन प्रकाशाचे स्वागत प्रारंभी ज्या अवस्थेत होते त्यालाच उषकाल म्हटले गेले आहे.हा उषकाल अंधाराचे साम्राज्य संपले असून प्रकाशाचे,मांगल्याचे आगमन होत आहे.याची सूचना देते.म्हणुन उषा या  स्थितीला अत्यंत महत्वाचे स्थान आहे.त्याच उषा या नावाप्रमाणे अज्ञान,अविवेक,अविकास या अंधाराला नाहीसे करून ज्ञानाचा ,विवेकाचा,विकासाची उषा म्हणजेच उषाताई गित्ते मॅडम होत.त्यात जर ज्ञान किरण साथीला असल्यास  माऊली म्हणतात तसे
अविवेकाची काजळी l फेडूनी विवेक दिप उजळी l योगिया पाहे दिवाळी l निरंतर ll ही स्थिती निर्माण होते.उषाताईंच्या सोबतीला किरण हे पती लाभले आणि दुग्ध शर्करा योग जुळुन आला आहे.यामुळे विकास घडताना दिसतो.विकास घडवणारे मग ती स्त्री असो की पुरुष. केवळ दृष्टी असून चालत नाही तर दूरदृष्टी असणे गरजेचे असते.माणसाचा सर्वांगीण विकास हा केवळ शिक्षणामुळेच होऊ शकतो हे अनेक महापुरुषांनी सांगितले यात प्रामुख्याने महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.याचा अनुभव आपण मागील काही वर्षांपासून समाजात पाहतो आहोत व घेतो आहोत.हाच वसा आणि वारसा डोळ्यासमोर ठेवून अज्ञान,अंधकार दूर करून ज्ञानाचा उषकालीन किरणाचे प्रकटीकरण करण्याचे  काम जे काही मोजके लोक करतात त्यात आवर्जून मा. उषाताई किरण गित्ते ताई साहेबांचा व किरण गित्ते साहेबांचा आवर्जून  उल्लेख करावा लागेल.
      सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी शैक्षणिक कार्यरंभ केला.त्यांच्या घरातच मुळात वडील शिक्षक असल्यामुळे शैक्षणिक वातावरण आधीपासूनच होते. त्या शिक्षकाच्या कन्या होत.त्यांचे वडील म्हणजे लोकनेते स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे अत्यंत जवळचे विश्वासू असे दिनकररावजी मुंडे गुरुजी हे होत.दिनकरराव गुरुजींच्या संस्कारात व पती किरण गित्ते साहेब यांच्या सहवासात असल्यामुळे त्यांनी सर्वाधिक महत्त्व शिक्षणाला दिले आहे.अलीकडे आपण पाहतो की माणसे भौतिक सुविधांच्या मागे लागले आहेत. विशेषता अधिकाऱ्यांच्या पत्नी तर   भौतिक सुविधा जोडण्यातच अग्रेसर दिसतात.घरात  सोफासेट, डिनर सेट,टी सेट असते पण माईंड मात्र अपसेट आसते असे चित्र सर्रास आज आपण पाहतो आहोत. खऱ्या अर्थाने हे अपसेट माईंड सेट करावयाचे असेल तर शिक्षणाशिवाय ते होऊ शकत नाही. त्यासाठी त्यांना चांगले शिक्षण व संस्कार देणे महत्त्वाचे आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा मुलमंत्र 'शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे व जो कोणी प्राशन करील तो वाघा सारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही हे लक्षात घेऊनच ताईंनी परळी शहरात विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीची स्थापना केली आहे. या माध्यमातून काळाची पावले ओळखून त्यांनी किरण गित्ते IAS अकॅडमी , दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल परळी वैजनाथ, पोद्दार जंबो किड्स , दिल्ली वर्ड पब्लिक स्कूल वंडरलैंड स्कूल परळी वैजनाथ सुरू केली इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली आहे.इंग्रजी भाषा हे जगाचे ज्ञान करून घेणारे प्रवेशद्वार आहे.जगाला जाणून घेण्याची महत्त्वाची खिडकी आहे.ती बंद असून चालणार नाही किंवा यापासून अनभिज्ञ राहूनही चालणार नाही.ही बाब लक्षात घेऊन ती उघडण्याचे काम या माध्यमातून त्यांनी केले आहे.खरे तर दिनकरराव गुरुजी व  किरण गित्ते साहेबांसारखे सर्वज्ञ त्यांच्या पाठीमागे मार्गदर्शक म्हणून असल्यामुळे ताईंना हे काम करणे सोपे गेले.एका आय.ए.एस.च्या पत्नीने भौतिक सुविधांच्या मागे न लागता समाजातील उपेक्षितांच्या शिक्षणासाठी धडपड करणे हे लाखो लोकांतील एक असामान्य असे उदाहरण आहे.परळी या शहराची ओळख राजकीय दृष्टीने अधिक आहे. त्यानंतर तीर्थक्षेत्र, औष्णिक विद्युत केंद्र, रेल्वे स्थानक म्हणून व  भागात असलेले कीर्तनकार यामुळे ही परळी चर्चेत असते.शैक्षणिक ओळख परळीला म्हणावी तशी लाभलेली नाही. ही शैक्षणिक ओळख या कार्यातून देण्याचे काम ताईसाहेब करताना दिसतात.आपले पती किती अडचणीतून शिकून अथक प्रयत्न व सातत्यपूर्ण अभ्यास करून जीवनात यशस्वी झाले हे त्यांनी याची देही याची डोळा पाहिले आहे.शिक्षणामुळे एखादं पद प्राप्त केल्यावर माणसाला कशी सर्वार्थाने प्रतिष्ठा मिळते याचा अनुभवही त्यांनी घेतला असल्यामुळे बहुजनांच्या मुलांच्या जीवनात  बदल घडवायचा असेल तर त्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणे गरजेचे हे लक्षात घेऊन त्यांनी परळीला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. अलीकडच्या काळात 'मी आणि माझे' अशी प्रवृत्ती बळावत असताना तसेच  आपल्यापेक्षा मोठा कोणी होऊ नये जर कोणी झाला तर अस्वस्थ वाटणाच्या या काळात समाजातील अनेक मुले उच्च पदावर जावेत व ती आपल्यापेक्षा मोठी व्हावीत ही भावना ज्या स्त्रीच्या ठिकाणी आहे तिला  दुरदृष्टी लाभलेली स्त्रीच म्हणावे लागेल.या स्पर्धा मार्गदर्शन केंद्राचा फायदा घेवुन अनेक जण  एम.पी.एस.सी. च्या माध्यमातून यशस्वी होताना दिसत आहेत. आतापर्यंत दोनशेहुन अधिक जणांनी यश प्राप्त केले आहे.त्यांनी स्वतः या स्पर्धा परीक्षा देऊन त्याचा अनुभव घेतला आहे.त्यांनी ठरवले असते तर त्या एखाद्या अधिकारी  पदावर जाऊ शकल्या असत्या पण पतीच्या कार्याला खंबीर साथ देणे,अनेक विद्यार्थी घडवणे. हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्या कार्य करताना दिसताहेत.त्यांनी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलची स्थापना करून एक शैक्षणिक क्रांती घडविली आहे.आज इथे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.अवघ्या काही वर्षातच या शाळेने नावलौकिक प्राप्त केला आहे. त्याला कुशल नेतृत्व देण्याचे काम ताईसाहेब करताहेत. या शाळेचे उद्घाटनच मुळात त्यांनी  शिक्षण क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे कार्य करणाऱ्या डी.वाय.पाटील यांच्या हस्ते करून एका अर्थाने यशाकडे जाण्याचे पहिले पाऊल उचलले गेले होते.या शाळेतील नियोजन,अभ्यासू शिक्षक, त्यापेक्षा त्यांच्याकडे असलेली नम्रता, विविध नीतीमुल्य रुजवण्यासाठी शाळेत घेण्यात येणारे अनेक उपक्रम. हे वाखणण्याजोगे आहे.
   केवळ शैक्षणिक कार्यापुरत्याच त्या मर्यादित नाहीत तर विविध धार्मिक कार्यात ही त्या अग्रेसर असतात.विविध कीर्तनकारांची कीर्तन आयोजित करणे,कीर्तन श्रवण करणे,महाप्रसांदांचे आयोजन करणे.त्रिपुरा राज्याचे आराध्य दैवत असलेल्या देवीची भक्ति त्या करतात.तीच्या भक्तांच्या सूख सूविधा व भौतिक विकासात पती बरोबर कार्य असी विविध धार्मिक कार्य ही त्या करतात.
  सामाजिक कार्यात रंजल्या गांजल्यांना मदत करणे,संकटकाळी धावुन जाणे,सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणे हे ही वाखणण्याजोगे आहे.
   खरे तर ताईसाहेबांचे काम समाजाला विशेषत: स्त्री वर्गाला प्रेरणा देणारे आहे.अस्या व्यक्तिमत्वाची दखल राज्यपालांनी विधानपरिषदेवर आमदार म्हणुन निवडूण करायला हवी.त्यांना विविध क्षेत्रातुन जे बारा आमदार घ्यायचे असतात त्यात अस्या व्यक्तिमत्वाला संधी दिली तर त्याचे सोने होवु शकते.मला खात्री आहे की भविष्यात असा विचार होईल.
      कुठल्याही यशस्वी पुरुषाच्या यशात एका स्त्रीचे महत्त्वाचे योगदान असते.मग ती स्त्री पत्नी,आई अथवा बहीण या अन्य कोणत्याही नात्याची असो.खरे तर माणसाच्या जीवनाला आकार देण्यात आई इतकेच महत्त्वाचे स्थान पत्नीचे असते. किरण गित्ते साहेब त्रिपुरा राज्याचे   नगरविकास,   महिला बालकल्याण,आरोग्य,वाणिज्य, माहिती तंत्रज्ञान,पर्यटन विभाग  सचिव म्हणून आज काम करताहेत या पुर्वी ही त्यांनी   वेळोवेळी अन्य जिल्हाधिकारी अमरावती,पुणे महानगर आयुक्त पदावर उत्कृष्टपणे कार्य केले आहे. त्यात ताईंचा सिंहाचा वाटा आहे.अशा शिक्षणावरती अफाट प्रेम करणाऱ्या,आपल्या पतीला यशस्वीतेकडे  घेऊन जाणाऱ्या, आपल्या पित्याचा नावलौकिक वाढवणाऱ्या,परळीत  शैक्षणिक क्रांती करू पाहणाऱ्या अनेकांच्या जीवनात ज्ञानाचा उषकाल घडविणा-या उषाताईंचा आज वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो.ईश्वर त्यांचे आयू आरोग्य अबाधित राखो व त्यांच्या कडून भविष्यात ही  असेच कार्य घडत राहो.असी ईश्वरचरणी प्रार्थना करून माझा शब्द प्रपंच थांबवतो.
           प्रा.डॉ. रामकृष्ण बदने ग्रामीण                     महाविद्यालय,वसंतनगर    
                 ता.मुखेड जि.नांदेड
         भ्रमणध्वनी -९४२३४३७२१५

धर्म, सेवा व अध्यात्मिक कार्याबद्दल सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) सामाजिक, धार्मिक व सेवाभावी क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या ज्येष्ठ संत व विचारवंत वेदांताचार्य शिवाचार्यरत्न सिद्धलिंग शिवाचार्य महाराज (साखरखेर्डा) यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. बुलढाणाचे जिल्हाधिकारी श्री किरण पाटील यांच्या हस्ते महाराजांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सिंदखेडराजा येथील डॉ. अल्हाज असद बाबा मेमोरियल ट्रस्ट यांच्या वतीने २५ डिसेंबर रोजी आयोजित एका भव्य समारंभात हा सन्मान प्रदान करण्यात आला.
श्री पलसिद्ध महास्वामी मठाचे मठाधिपती असलेल्या सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांनी अध्यात्म, समाजसेवा आणि धार्मिक प्रबोधनाच्या माध्यमातून समाजमनावर अमीट छाप सोडली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत, ट्रस्टतर्फे विशेष सन्मानाने त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात देशभरातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.   सदर पुरस्कार सोहळा हजरत गौस-ए-आझम दस्तगीर बाबा दर्गा परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, बुलढाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुकेश झवर, डॉ. अमजदखान पठाण, अयाज खान पठाण यांची उपस्थिती लाभली. डॉ. अल्हाज असद बाबा मेमोरियल ट्रस्ट ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. यंदा कॅन्सर निदान शिबिरासह विविध उपक्रम राबवत, समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करून समाजसेवेस नवे बळ देण्याचे कार्य या ट्रस्टने केले आहे.
सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या या सन्मानामुळे साखरखेर्डा ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून, मठाच्या माध्यमातून सुरु असलेले अध्यात्मिक कार्य अधिक व्यापक होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

बीड नगरपरिषद निवडणुकीत वडिलांना विजय मिळवून दिला.अन् गळफास घेऊन आयुष्य संपवलं शरद पवार गटाच्या नेत्याच्या मुलाचा टोकाचा निर्णय.


बीड  (प्रतिनिधी) बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत विजयी झालेल्या  नवनिर्वाचित नगरसेवकाच्या ३२ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पवन अशोक काळे असे आत्महत्या (Beed Crime News) केलेल्या तरुणाचे नाव आहे. पवनचे वडील अशोक काळे प्रभाग क्रमांक एक मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून नुकतेच नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. वडिलांच्या प्रचारार्थ स्वतः पवन काळे यांचा सक्रिय सहभाग होता. पवनने वडिलांचा प्रचार करून युवकांचे संघटन उभे केले होते, पवनचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. तर अद्याप या आत्महत्येमागील कारण समजू शकलेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील जालना रोड परिसरातील काझीनगर भागात ही घटना घडली आहे. बीड नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार अशोक काळे विजयाचा आनंद उत्सव साजरा करत असतानाच त्यांच्या ३२ वर्षीय मुलांने घरात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली.  पवन अशोक काळे असं (वय 32) गळफास घेतलेल्या तरुणाचं नाव आहे. 

पवन काळे यांनी बीड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. मात्र, पवन काळे यांनी इतक्या टोकाचं पाऊल का उचचलं, आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

वडिलांच्या विजयाचा आनंद साजरा केला अन्..

बीड नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मध्ये पवन यांचे वडील अशोक काळे हे 21 डिसेंबरला लागलेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये विजयी झाले होते. प्रचारादरम्यान पवन हा वडिलांच्या विजयासाठी निवडणूक प्रचारात सक्रिय होता. निकालानंतर अशोक काळे विजयी झाल्यानंतर सगळ्यांनी एकच जल्लोष केला होता. यावेळी विजयी मिरवणुकीत पवन सुद्धा सामील होता. नगर परिषदेत विजयामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं, पण अचानक पवनने टोकाचे पाऊल का उचललं असा सवाल उपस्थित होत आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Thursday, December 25, 2025

सत्तेसाठी नात्यांची गणिते जुळवण्याची संधी.बीडमध्ये क्षीरसागर' ब्रँड एकत्र येणार. का?


बीड (प्रतिनिधी) राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४६ नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर झाले. या निकालांनी राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी दिली आहे. एका बाजुला नगरपालिकांमध्ये बहुमतासाठी जुळवाजुळव सुरू असताना, दुसऱ्या बाजुला आगामी महापालिका निवडणुकांसाठी मोठ्या राजकीय परिवारांमधील जवळीक चर्चेचा विषय ठरत आहे. राज्याच्या राजकारणात परळीतील मुंडे परिवार आधीच एकत्र आला असून, आता ठाकरे आणि पवार परिवारानंतर बीडच्या क्षीरसागर परिवारातही मनोमिलन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्याच्या राजकारणात सध्या ठाकरे आणि पवार या दोन दिग्गज कुटुंबांमधील जवळीक वाढताना दिसत आहे. उध्दवसेना आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात आगामी महापालिका निवडणुकांसाठी युती झाली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतरही ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे काका - पुतण्या महापालिका निवडणुकांसाठी एकत्र येण्याची चिन्हे आहेत. कौटुंबीक जवळीक आणि राजकीय निकड यामुळे ही दोन कुटुंब पुन्हा एकदा राजकीय व्यासपीठावर एकत्र दिसू शकतात. राजकारणातील कट्टर शत्रुत्व बाजूला ठेवून आता 'नात्यांच्या गणितांनी' सत्तेची समीकरणे जुळवली जात आहेत.

बीडमध्ये 'क्षीरसागर' ब्रँड एकत्र येणार?

बीड जिल्ह्याच्या राजकारणात क्षीरसागर परिवाराचे मोठे वलय आहे. मात्र, गेल्या १० वर्षांपासून हा परिवार राजकीयदृष्ट्या विभागलेला आहे. परळीत ज्याप्रमाणे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी 'महायुती'च्या माध्यमातून एकत्र येऊन सत्ता काबीज केली, तोच फॉर्म्युला बीडमध्ये राबवण्याची संधी आता चालून आली आहे.

बहुमतासाठी क्षीरसागर बंधूंना हवे एकमेकांचे सहकार्य.

बीड नगरपालिकेत कोणत्याच एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. राष्ट्रवादी (अजित पवार - विजयसिंह पंडित गट), भाजप (योगेश क्षीरसागर गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार - संदीप क्षीरसागर गट) यांच्या जागांची गोळाबेरीज पाहता, बहुमतासाठी एकमेकांचे सहकार्य घेणे अनिवार्य झाले आहे. अशा परिस्थितीत, सत्तेसाठी आणि शहराच्या विकासासाठी दोन्ही क्षीरसागर बंधूंना (संदीप आणि योगेश क्षीरसागर) एकत्र येण्याची ऐतिहासिक संधी आहे. हे मनोमिलन झाले, तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांमध्ये बीडमध्ये पुन्हा एकदा 'क्षीरसागर' ब्रँडचे वर्चस्व पाहायला मिळू शकते.

गेवराईचा पंडित परिवार विभागलेलाच.

गेवराईत उद्धवसेनेतून भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री बदामराव पंडित आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट)चे आ. विजयसिंह पंडित व माजी आ. अमरसिंह पंडित यांच्यात अद्याप मनोमिलन झालेले नाही. गेवराई नगरपालिका भाजपच्या ताब्यात गेली असून, येथे पंडित गटाचा दारूण पराभव झाला आहे. बदामराव पंडित हे अमरसिंह आणि विजयसिंह यांचे नात्याने काका आहेत. मात्र, सध्याची राजकीय स्थिती पाहता येथे या कुटुंबाचे मनोमिलन होणे कठीण असल्याचे दिसते.

अत्याचार पीडिता मुलीच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य आणी पाठीवर दप्तर समुपदेशामुळे पालकांच्या मनातील भीती दूर.


बीड (प्रतिनिधी) : नाशिकमधील मालेगाव आणि बीड तालुक्यातील शिरूरच्या घटना ताज्या असतानाच, बीडमध्येही सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीवर अत्याचार झाला होता. या प्रकरणाने मुलगी असुरक्षित असल्याची भावना मनात ठेवून पालकांनी तिचे शिक्षणच बंद केले होते. हा प्रकार ‘लोकमत’ने निदर्शनास आणून देताच विधी सेवा प्राधिकरण आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत पालकांचे समुपदेशन केले. पालकांच्या मनातील भीती दूर होताच पीडितेचा मंगळवारी शाळेत पुन्हा प्रवेश निश्चित करण्यात आला. ती पाठीवर दप्तर घेऊन शाळेत जाताच तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.

५ नोव्हेंबर रोजी पीडिता बेपत्ता झाली होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता; परंतु नंतर पीडितेने यातील सत्य परिस्थिती सांगितल्यावर सूरजकुमार धोंडीराम खांडे (वय २२, रा. म्हाळसजवळा, ता. बीड) याच्याविरोधात पोक्सो आणि ॲट्रॉसिटीची कलमे वाढवण्यात आली. पोलिसांनी तातडीने खांडेला बेड्या ठोकल्या होत्या. परंतु मुलीच्या काळजीपोटी आणि ती असुरक्षित असल्याची भावना मनात निर्माण झाल्याने पालकांनी तिचे शिक्षण बंद केले होते. विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. वहाब सय्यद, तत्त्वशील कांबळे, बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनी याबाबत पालकांचे समुपदेशन करून त्यांना आधार दिला. त्यांचे मनपरिवर्तन झाल्याने पीडिता आता पुन्हा शाळेत जाऊ लागली आहे.

खटला लढवण्यासाठी मोफत वकील.

अत्याचार पीडित मुलीचे शिक्षण बंद झाल्याचे समजताच या विषयावर प्रकाश टाकत १२ डिसेंबर रोजी  याची विधी सेवा प्राधिकरण, बालहक्क कार्यकर्ते आणि बालकल्याण समिती यांनी गंभीर दखल घेतली. पालकांना बोलावून त्यांचे समुपदेशन करत त्यांना आधार दिला. त्यांना कायदेशीर बाबींची सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानंतर पालकांचे मन स्थिर झाले. आता प्राधिकरणाकडून पीडितेचा खटला लढवण्यासाठी एक मोफत वकीलही देण्यात आला आहे. तसेच ‘मनोधैर्य’सह इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

समुपदेशन करून आधार

पालक घाबरलेले असल्याने त्यांनी मुलीचे शिक्षण बंद केले होते. आम्ही त्यांचे समुपदेशन करून त्यांना आधार दिला. आता पुन्हा तिचा त्याच शाळेत प्रवेश घेतला आहे. शाळेत पोहोचताच मुलगी खूप आनंदी झाली.- तत्त्वशील कांबळे, बालहक्क कार्यकर्ते, बीड

वृद्ध महीलेस लुटणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांन कडून अटक.

केज (प्रतिनिधी)केज तालुक्यातील लाडेवडगाव येथील वृद्ध महिला पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेली असताना तिच्या अंगावरील दागिने चोरून नेल्याची घटना 18 जून 2025 रोजी घडली होती. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
मालनबाई तुकाराम लाड, वय 80. रा लाडेवडगांव ता. केज या पत्राचे शेडमध्ये रात्री एकट्याच झोपलेल्या असताना अनोळखी चार चोरट्यांनी त्याच्या पत्र्याच्या शेडमध्ये प्रवेश केला. त्याच्या अंगावरील सोन्याचे दागीने कानातील फुले चोरुन घेवुन गेले होते. याप्रकरणी युसुफ वडगांव पोलीस ठाण्यात कलम 309 (6) भा.न्या. संहीताप्रमाणे दिनांक 18 जून 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.याप्रकरणी गुन्ह्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि महेश विघ्ने यांचे पथक सदरील गुन्हयाचा समांतर तपास करीत होते. सदरील गुन्हा हा श्याम अजिनाथ शिंदे रा मांडवा ता वाशी जि.धाराशिव याने त्याचे साथीदाराचे मदतीने केल्याचे गुप्तबातमीदार व तांत्रिक विश्लेषण व्दारे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपीचे मागावर होते. दरम्यान 20 डिसेंबर रोजी गुप्त बातमीदारमार्फत माहीती मिळाली की, आरोपी श्याम अजिनाथ शिंदे हा केज येथील बसस्टॅन्ड वर येणार आहे. माहीती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ केज येथे जावुन बसस्थानक परीसरात सापळा लावला. आरोपी श्याम अजिनाथ शिंदे हा बसमधुन खाली उतरत असताना पथकाने गराडा घालुन त्याला पकडले, त्यास गुन्हयासंदर्भाने विचारपुस करता त्याने सदरील गुन्हा त्याचे साथीदार विशाल अजिनाथ शिंदे, रा मांडवा ता. वाशी, अमोल नाना शिंदे, रमेश नाना काळे दोन्ही रा कन्हेरवाडी, पारधी वस्ती वाशी, जि. धाराशिव यांनी मिळून केल्याचे सांगीतले. त्याच्या ताब्यातुन चोरीस गेलेले 09 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीणे हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले असुन आरोपी सध्या कोठडीत आहे.हि कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय शिवाजी बंटेवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे सपोनि मच्छिद्र शेंडगे पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलीस हवालदार जफर पठाण, महेश जोगदंड, दिपक खांडेकर, भागवत शेलार, पोलीस अंमलदार बप्पासाहेब घोडके, चालक पोलीस हवालदार गणेश मराडे यांनी 

गोदावरी पात्रात अवैध वाळू उपसा पोलिसांचा छापा; चार ट्रॅक्टर सह 14 लाखाचा माल जप्त.

गेवराई (प्रतिनिधी) गोदावरी पात्रात म्हाळस पिंपळगाव येथे अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी मारलेल्या छाप्यात चार ट्रॅक्टर सह 14 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात आहे. म्हाळस पिंपळगांव येथे वाळू उपसा केला जात असल्याची माहिती गेवराई पोलिसांना मिळाली. गेवराई पोलिसांनी या ठिकाणी छापा मारताच चार ते पाच ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टरला पाठीमागील बाजूस केन्या लावून अवैध वाळू उपसा केला जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांची गाडी येत असल्याचे पाहताच तीन ट्रॅक्टर चालक यावेळी फरार झाले.तर आकाश भास्कर भिताडे वय 23 वर्षे, रा. गंगावाडी, ता. गेवराई जि. बीड या ट्रॅक्टर चालकास पकडण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी मारलेल्या या छाप्यात स्वराज कंपनीच्या चार ट्रॅक्टर केन्यासह असा 14 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक नवीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उप विभागीय पोलीस अधीकारी अनिल कटके पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शना खाली सपोनि, सतीष कोटकर, पोउपनि प्रदीप आढाव, ग्रेडपोउपनि श्रीमंत उबाळे, जितेंद्र ओव्हाळ, गोरक्ष डोके यांनी केली.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि प्रदिप सांळुके हे करीत आहेत.

ठाकरे बंधू अखेर एकत्र. शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संयुक्तपणे राजकीय युतीची घोषणा.


मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घकाळ चर्चेत असलेली शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती अखेर प्रत्यक्षात उतरली असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज संयुक्तपणे या राजकीय युतीची अधिकृत घोषणा केली.
महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट पाहत होता, तो क्षण आज आला आहे,” असे स्पष्ट शब्दांत राज ठाकरे यांनी यावेळी सांगत, मराठी माणसाच्या हितासाठी दोन्ही ठाकरे एकत्र आल्याचे जाहीर केले.

या ऐतिहासिक निर्णयामागील भूमिका स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले की, कोणतेही मतभेद, वाद किंवा भांडण यापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. याच विचारातून एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली. “जे काही उरले आहे, ते सर्व जाहीर सभेत मांडू. सध्या निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना उमेदवारी दिली जाईल. उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ लवकरच कळवली जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर उपरोधिक टीकाही केली. राज्यात लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळ्यांची चर्चा सुरू असताना, त्यात आणखी दोन टोळ्या वाढल्या असून त्या राजकीय पक्षांतील असल्याचा टोला त्यांनी नाव न घेता लगावला. सत्तेच्या राजकारणात फूट पाडणाऱ्या प्रवृत्तींवर त्यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली.

दरम्यान, ठाकरे बंधूंच्या या घोषणेनंतर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. मुंबईसह राज्यभरात फटाके, ढोल-ताशे आणि घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला जात असून, अनेक ठिकाणी एकत्र येऊन कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

परळी नगरपरिषद उपनगराध्यक्षपदसाठी लिंगायत समाजाच्या योगेश मेनकुदळे यांनाच संधी द्यावी - शिवकुमार केदारी

परळी वैजनाथ  (प्रतिनिधी)  परळी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदावर लिंगायत समाजाला थेट आणि ठोस न्याय देत समाजातील अनुभवी, संघटनात्मक व सर्वसमावेशक नेतृत्व असलेले श्री. योगेश विजयकुमार मेनकुदळे यांचीच नियुक्ती करावी, अशी ठाम, स्पष्ट व अपेक्षापूर्ण मागणी मी शिवकुमार केदारी (उपाध्यक्ष, वीरशैव विकास प्रतिष्ठान, परळी वैजनाथ) माझ्या वतीने करीत आहे.
परळी शहरात लिंगायत समाजाची लोकसंख्या सुमारे २० ते २५ हजार मतदारांची आहे. हा समाज गेली अनेक दशके मा. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे व मा. धनंजय मुंडे साहेब यांच्या पाठीशी कोणतीही अट न ठेवता, कोणताही लाभ न पाहता निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि ठामपणे उभा राहिला आहे. नगरपरिषद, विधानसभा, लोकसभा तसेच विविध संस्थात्मक निवडणुकांमध्ये लिंगायत समाजाने नेहमीच मुंडे घराण्याच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली आहे.
असे असताना नुकत्याच पार पडलेल्या परळी नगरपरिषद निवडणुकीत लिंगायत समाजाला केवळ तीन उमेदवारांची संधी देण्यात आली, त्यापैकी दोन नगरसेवक निवडून आले. ही बाब समाजाच्या ताकदीचे व विश्वासार्हतेचे स्पष्ट द्योतक आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष पदावर लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व न देणे हे अन्यायकारक, दुर्लक्ष करणारे आणि असंतुलित ठरेल, हे स्पष्टपणे सांगावे लागेल.
योगेश मेनकुदळे हे केवळ उमेदवार नाहीत, तर परळीच्या राजकारणात खोल मुळे असलेले नेतृत्व आहेत. त्यांचे आजोबा स्व. श्री. गुरुलिंग आप्पा मेनकुदळे यांनी १३ वर्षे परळी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष म्हणून भरीव विकासाचा ठसा उमटवला. त्यांच्या कार्यकाळातील रस्ते व नागरी सुविधा आजही परळीकरांच्या आठवणीत आहेत. तसेच त्यांचे वडील श्री. विजयकुमार गुरुलिंग आप्पा मेनकुदळे यांनी १० वर्षे नगरसेवक व सभापती म्हणून नगरपरिषदेत प्रभावी व अभ्यासपूर्ण काम केले आहे.
यासोबतच योगेश मेनकुदळे यांचा संघटनात्मक अनुभव अत्यंत भक्कम आहे. त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे परळी शहर अध्यक्षपद तब्बल १५ वर्षे भूषवले. एवढा दीर्घकाळ एखाद्या जबाबदारीवर काम करणे ही त्यांच्या कार्यक्षमता, विश्वासार्हता व नेतृत्वक्षमतेची पावती आहे. युवक संघटन, जनआंदोलन, सामाजिक उपक्रम व पक्षवाढ यामध्ये त्यांचे योगदान सर्वश्रुत आहे.
योगेश मेनकुदळे हे सर्व समाज घटकांशी संपर्कात असलेले, समन्वय साधणारे व सामाजिकदृष्ट्या सक्रिय नेतृत्व आहे. वीरशैव-लिंगायत वधू-वर परिचय मेळावे, सामूहिक विवाह सोहळे, वीरशैव श्मशानभूमी विषयक प्रश्न तसेच विविध सामाजिक कार्यांमध्ये त्यांचा सहभाग सातत्याने राहिला आहे. त्यामुळे ते केवळ लिंगायत समाजाचेच नव्हे, तर संपूर्ण परळी शहराचे प्रतिनिधित्व करू शकतात.
लिंगायत समाजाचा मुंडे घराण्याशी असलेला विश्वास स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या काळापासून अखंड राहिला आहे. हा समाज कधीही दगा देणारा नाही, मात्र सातत्याने दुर्लक्ष झाले तर समाजात तीव्र अस्वस्थता निर्माण होऊ शकते, हे वास्तव नाकारता येणार नाही.
तरी मा. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे व मा. धनंजय मुंडे साहेब यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, लिंगायत समाजाच्या भावना व योगदानाचा सन्मान राखत, परळी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदावर योगेश विजयकुमार मेनकुदळे यांचीच निवड करावी, ही मी माझ्या वतीने अत्यंत ठाम शब्दांत मागणी करीत आहे.

— शिवकुमार केदारी
उपाध्यक्ष, वीरशैव विकास प्रतिष्ठान, परळी वैजनाथ

बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे होरपळली.निसर्गप्रेमींमध्ये हळहळ.


बीड (प्रतिनिधी) बीड शहराच्या जवळ असलेल्या आणि अभिनेता सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'सह्याद्री देवराई' प्रकल्पाला आज बुधवारी सायंकाळी ९ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत डोंगरावरील हजारो छोटी-मोठी झाडे होरपळून निघाली असून, निसर्गप्रेमींमधून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी उशिरा ९ वाजेच्या सुमारास डोंगराच्या एका भागातून आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. काही वेळातच या आगीने रौद्र रूप धारण केले आणि ती संपूर्ण डोंगररांगेत पसरली. आगीची माहिती मिळताच वन विभाग आणि बीड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. डोंगराळ भाग आणि चढ-उतार असल्याने आग विझवताना जवानांना मोठ्या कसरतीचा सामना करावा लागला. वन कर्मचारी आणि स्थानिक तरुण आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते.

Wednesday, December 24, 2025

केज तालुक्यातील सोनी जवळा येथे लोक कला तमाशाच्या कार्यक्रमात लाठ्या काठ्यांनी मारहाण. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

बीडच्या केज तालुक्यातील सोनी जवळा येथे लोककला तमाशाच्या कार्यक्रमात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे, या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
लोककला केंद्रात चक्क ढोलकी हाती घेऊन लाठ्या काठ्यांनी ही मारहाण होताना दिसून येते, याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
येथे लाठ्या काठ्याने एका युवकाला बेदम मारहाण केली गेली. त्यामध्ये, मारहाणीत सुधीर वैराग्य नामक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
सुधीरवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, मात्र या प्रकरणात कुठलाही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे, ही बाब आपापसात मिटवून घेतली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, मारहाणीचे कारणही समजू शकले नाही, पण मारहाणीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून मोठा गोंधळ लोककला केंद्रात झाल्याचं पाहायला मिळत आहे. 
गेल्या काही महिन्यांपासून बीडमधील विविध घटना चर्चेत आहेत, त्याचे व्हिडिओही समोर आले आहेत. तर, काही दिवसांपूर्वीच कला केंद्रातील नर्तिकेच्या नादात दोघांनी जीवन संपवल्याच्याही घटना घडल्या आहेत.

घराणेशाहीला विरोध करणारा भारतीय जनता पार्टी पक्षच घराणेशाही असलेला सर्वात मोठा पक्ष ठरला.

 *नगरपालिका निवडणुकीत घराणेशाहीचे ७० उमेदवार*: त्यातील ४२ टक्के एकट्या भाजपाचे 

२०१९ पासूनच्या सर्व निवडणुकात मी एकूण उमेदवारात घराणेशाहीचे उमेदवार किती असा अभ्यास करतो आहे. २०२४ लोकसभा अभ्यास मांडला होता व विधानसभा निवडणुकीत घराणेशाहीचे उमेदवार २८८ पैकी २३८ होते व ६१ मतदारसंघात एकापेक्षा जास्त घराणेशाही उमेदवार होते.

नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत अभ्यास केला असता एकूण ७० उमेदवार हे घराणेशाहीचे होते..
एकूण उमेदवारांच्या  जवळपास ६७  टक्के उमेदवार महायुतीचे आहेत आणि त्यातही  एकूण उमेदवारांत भाजपचे ४२  टक्के उमेदवार आहे. त्यामुळे घराणेशाही असलेला सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला आहे.
पूर्वी घराणेशाही म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी असे समीकरण होते पण त्यातील बहुसंख्य नेते हे भाजपमध्ये गेल्याने आज भाजप हा घराणेशाही असलेला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. एकूण उमेदवारात ४२ टक्के उमेदवार आज भाजपाचे आहेत...
एकूण घराणेशाही उमेदवार ७०
       त्यातील भाजप ३०
                शिंदेंसेना १४
               अजितदादा ३ 
महायुती एकूण ४७ (६७ टक्के)
महाविकास आघाडी तिघे मिळून १२ ( एकूण १७ टक्के)
                                                                                                 
                                                                  *सविस्तर माहिती* 
             
घराणेशाहीचे विजयी उमेदवार
 नंदुरबार _  रत्ना रघुवंशी(शिंदे सेना) आमदार रघुवंशी यांच्या पत्नी
दोंडाईचा _ नयनकुंवर रावल(भाजप) मंत्री रावल यांची आई
शिरपूर_ चिंतन पटेल(भाजप)  माजी मंत्री अमरीश पटेल यांचा मुलगा व भाऊ
बुलढाणा _ पूजा गायकवाड( शिंदेसेना) आमदार संजय गायकवाड यांची पत्नी
खामगाव _ अपर्णा फुंडकर(भाजप) मंत्री आकाश फुंडकर यांची भावजयी 
यवतमाळ _ प्रियदर्शिनी उईके (भाजप) मंत्री अशोक उईके यांची मुलगी
पुसद _ मोहिनी नाईक (राष्ट्रवादी अजित पवार) मंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी
चंद्रपूर _ अरुण धोटे(काँग्रेस)  माजी आमदार सुभाष धोटे यांचे बंधू 
धामणगाव रेल्वे अर्चना रोठे ( भाजप)_ आमदार प्रताप अडसर यांच्या भगिनी 
चिखलदरा _ अल्हाद कलोती(भाजप) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ
  साकोली देवश्री कापगते (भाजप) माजी आमदार हेमकृष्ण कापगते यांची सून     
दुधनी _प्रथमेश म्हेत्रे (शिंदे सेना )माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांचे पुतणे
पंढरपूर _ प्रणिती भालके (स्थानिक आघाडी) आमदार भगीरथ भालके यांची पत्नी
अनगर _ प्राजक्ता पाटील (भाजप )  माजी आमदार राजन पाटील यांची सून
अक्कलकोट _मिलन कल्याणशेट्टी(भाजप) आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा भाऊ
जामनेर _ साधना महाजन(भाजप)  मंत्री गिरीश महाजन यांची पत्नी 
चाळीसगाव _ प्रतिभा चव्हाण (भाजप) आमदार मंगेश चव्हाण यांची पत्नी
पाचोरा_  सुनिता पाटील (शिंदेसेना) आमदार किशोर पाटील यांची पत्नी 
मुक्ताईनगर _संजना पाटील( ठाकरे सेना) आमदार चंद्रकांत पाटील यांची मुलगी
समीर सत्तार (शिंदे सेना ) अब्दुल सत्तार यांचा मुलगा 
संगमनेर मैथिली तांबे (आघाडी) येथे आमदार सत्यजित तांबे यांची पत्नी 
मुरगूड सुहासिनी परदेशी (शिंदे सेना) येथे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांची पत्नी
जयसिंगपूर येथे संजय पाटील (आघाडी) आमदार राजेंद्र पाटील यड्रवकर यांचा भाऊ
आष्टा येथे विशाल शिंदे(राष्ट्रवादी शरद पवार) माजी आमदार विलासराव शिंदे यांचा मुलगा
कागल सेहरनिदा मुश्रीफ( अजित पवार राष्ट्रवादी) मंत्री हसन मुश्रीफ यांची सून
कुरुंदवाड मनिषा डांगे(आघाडी) माजी नगराध्यक्ष कुटुंबातील  
देवळाली सत्यजित कदम (भाजप) चंद्रशेखर कदम यांचा मुलगा   
श्रीरामपूर करन ससाणे(कॉंग्रेस) माजी आमदार ससाणे यांचा मुलगा
राहाता स्वाधीन गाडेकर (भाजप) वडील नगराध्यक्ष राहिलेले
पाथर्डी अभय आव्हाड (भाजप )वडील बाबूजी आव्हाड माजी आमदार
 गंगाखेड उर्मिला केंद्रे (अजित पवार) माजी मंत्री धनंजय मुंडे यांची बहीण
अंबेजोगाई नंदकिशोर मुंदडा( आघाडी) आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे
हिंगोली रेखा बांगर (शिंदे सेना) आमदार बांगर यांची वहिनी

       *घराणेशाहीचे* *पराभूत** *उमेदवार*    
  
रत्नागिरी शिवानी सावंत (ठाकरे सेना)माजी आमदार सुरेंद्र माने यांची सून
गडहिंग्लज स्वाती कोरे (जनता दल) माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांची मुलगी
मुरगूड तसनीम जमादार (राष्ट्रवादी शरद पवार)  माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांची पत्नी 
संगमनेर येथे सुवर्णा खताळ( शिंदेसेना ) आमदार अमोल खताळ यांची वहिनी
फलटण येथे अनिकेत निंबाळकर (शरद पवार राष्ट्रवादी) माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे भाऊ
भुसावळ _ रजनी सावकारे (भाजप) मंत्री संजय सावकारे यांची पत्नी
पंढरपूर _. श्यामल शिरसाट (भाजप);माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या पत्नी
  देवळी (वर्धा)  शोभा तडस (भाजप)_माजी खासदार रामदास तडस यांची पत्नी
यवतमाळ _ प्रियंका मोघे (कॉंग्रेस) माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची सून
बार्शी _ निर्मला बारबोले (ठाकरे सेना)माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांची पत्नी
करमाळा _ सुनीता देवी (भाजप) २७वर्ष नगराध्यक्ष राहिलेल्या गिरधर दासदेवी यांची सून 
दर्यापूर _ नलिनी भारसाकळे (भाजप) अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांची पत्नी
पारोळा_अंजली पवार (शिवसेना ठाकरे) माजी नगराध्यक्ष करण पवार यांची पत्नी
पेठ वडगाव प्रणिता सालपे (जनसुराज्य) माजी नगराध्यक्ष कुटुंबातील
आजरा अशोक सराटी(आघाडी) माजी नगराध्यक्ष कुटुंबातील
पाथरी जुनेदखान दुर्गानी (कॉंग्रेस) वडील बाबा दुर्गानी माजी आमदार  
वाशिम नितेश  मलिक (भाजप)माजी आमदार लखन  यांचे पुत्र 
वाशिम सीमा राजगुरू(भाजप ) माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू यांची पत्नी
  मुर्तीजापुर भूपेंद्र पिंपळे(भाजप) आमदार हरीश पिंपळे यांचा भाऊ
   अकोट रजिया खतीब ( आघाडी) माजी आमदार खतीब यांची पत्नी 
बुलढाणा अर्पिता शिंदे(भाजप )माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या पत्नी 
अनुराधा आदिक( काँग्रेस ) वडील गोविंदराव आदिक माजी मंत्री व प्रदेशाध्यक्ष
पद्मजा देशमुख (स्थानिक आघाडी) माजी आमदार राजीव देशमुख यांच्या पत्नी
सुचेता वाघ (भाजप) आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी
अंजनगाव सुर्जी यश लवटे (ठाकरे सेना) आमदार गजानन लवटे यांचा मुलगा    
 भंडारा _डॉ आश्विनी भोंडेकर(शिंदेसेना)आमदार नरेंद्र भोंडेकर यांची पत्नी
तुमसर कल्याणी भुरे (शिंदे सेना) माजी आमदार डायगव्हाणे यांची मुलगी

लोहा गजानन सूर्यवंशी (भाजप ) एकाच कुटुंबात ६ उमेदवार 
बदलापूर वामन म्हात्रे (शिंदे सेना ) एकाच कुटुंबातील ४ उमेदवार 

      * हेरंब कुलकर्णी *

ईव्हीएम मशिनद्वारे घोटाळा झाल्याची गंभीर शंका.८७ मतदान केंद्रांवर कुठेही २७० ते ३०० च्या पुढे मतदानाचा आकडा नाही हे संशयास्पद - दीपक देशमुख यांचा आरोप.

*निवडणूक आयोगाकडे तक्रार; CCTV फुटेज देण्यास नकार. 

*गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते मला आणि माझ्या समर्थकांना धमक्या देत आहेत, 

*प्रशासनाची मनमानी पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह? निर्माण करणारी. 

*शहरात गुटखा, मटका, बनावट दारू यांसारखे बेकायदेशीर धंदे खुलेआम सुरू. 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  बीड जिल्ह्यातील परळी नगर परिषद निवडणुकीत ईव्हीएम मशिनद्वारे घोटाळा झाल्याची गंभीर शंका व्यक्त करत माजी नगराध्यक्ष व उमेदवार दीपक देशमुख यांनी परळीत पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी पक्षावर थेट आरोप केले. आमच्या विरोधातील प्रमुख दोन पक्षांचे उमेदवार निवडून येऊ नयेत, यासाठी हा डाव रचण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

देशमुख म्हणाले की, परळीतील निवडणुकीदरम्यान ८८ मतदान केंद्रे होती. मात्र प्रभाग क्रमांक १० मध्ये केवळ दोनच उमेदवार होते. एका मतदान केंद्रावर योग्य पद्धतीने मतदान झाले असून त्या ठिकाणी ३०७ मते पडली. मात्र उर्वरित ८७ मतदान केंद्रांवर कुठेही २७० ते ३०० च्या पुढे मतदानाचा आकडा गाठला गेला नाही, हे संशयास्पद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाकडे तक्रार; CCTV फुटेज देण्यास नकार या संदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र मतदान केंद्रांवर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज देण्यास प्रशासनाने नकार दिला, ही बाब पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याचे देशमुख म्हणाले.

*हायकोर्टात दाद मागणार*

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी राज्य निवडणूक आयोगासह माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

*धमक्या व गुंडगिरीचे आरोप*

पत्रकार परिषदेत बोलताना दीपक देशमुख यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या काही कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले. “गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते मला आणि माझ्या समर्थकांना धमक्या देत आहेत. खोटे गुन्हे दाखल करून आयुष्य उद्ध्वस्त करू, अशा धमक्या दिल्या जात आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
तसेच परळी नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा यांचे पती बाजीराव धर्माधिकारी यांच्याशी संबंधित व्यक्तींकडूनही जीवाला धोका असल्याचा आरोप देशमुख यांनी केला. “शहरात गुटखा, मटका, बनावट दारू यांसारखे बेकायदेशीर धंदे खुलेआम सुरू असून, या माध्यमातून गुंडगिरी वाढवली जात आहे,” असेही ते म्हणाले.

*पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देणार*

या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची भेट घेऊन तक्रार देणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.

*निवडणूक पुन्हा बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी*

शरद पवार गटाच्या उमेदवारांसह आम्ही संयुक्तपणे मागणी करतो की, परळी नगर परिषद निवडणूक पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर घ्यावी. याचा सर्व खर्च देण्यास आम्ही तयार आहोत, असेही देशमुख यांनी सांगितले.
घटनेने दिलेल्या अधिकारानुसार ही मागणी असून, निवडणूक आयोगाने पारदर्शक पद्धतीने यावर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या खळबळ जनक पत्रकार परिषदेसाठी  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे  Replacement बाबा शिंदे, उत्तम माने, महादेव गंगणे, शेख शरीफ, नितीन चव्हाण, पंडित झिंजुर्डे, संजय जगतकर, अधी उपस्थित होते.

Tuesday, December 23, 2025

पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथांच्या दर्शना साठी पंतप्रधानांच्या पत्नी जशोदाबेन मोदी परळीत. विधीवत केली पूजा आणि आरती


परळी वैजनाथ (प्रतिनिधी): जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी आणि पंतप्रधानांचे बंधू अशोक मोदी यांनी आज तीर्थक्षेत्र परळी येथील पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथांच्या मंदिरात दर्शनासाठी भेट दिली. अतिशय साध्या वेशभूषेत आणि भक्तिमय वातावरणात त्यांनी प्रभू वैद्यनाथांची विधीवत पूजा आणि आरती केली.

सोमवारी सकाळी जशोदाबेन मोदी आणि अशोक मोदी यांचे मंदिर परिसरात आगमन झाले. यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात पुजाऱ्यांनी वैदिक मंत्रोच्चाराच्या जयघोषात पूजा पार पाडली. जशोदाबेन यांनी अत्यंत श्रद्धेने प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेतले आणि पुष्प अर्पण केले.

देशाच्या कल्याणासाठी साकडं

 दर्शनानंतर जशोदाबेन मोदी यांनी प्रभू वैद्यनाथांकडे देशातील सुख-समृद्धी आणि जन-कल्याणासाठी प्रार्थना केली. या प्रसंगी त्यांच्या चेहऱ्यावरील शांतता आणि साधेपणा पाहून मंदिर परिसरात उपस्थित असलेले भाविक भारावून गेले होते. कोणतीही बडेजाव न ठेवता एका सामान्य भाविकाप्रमाणे त्यांनी रांगेत उभे राहून घेतलेले दर्शन परळीत चर्चेचा विषय ठरले.

माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलं स्वागत.

सुरुवातीला माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी जशोदाबेन मोदी यांचे स्वागत केलं. या भेटीदरम्यान मंदिर प्रशासनाचे पदाधिकारी, स्थानिक भाविक आणि पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात होता. जशोदाबेन मोदी यांच्या या आध्यात्मिक भेटीमुळे परळी वैजनाथ मंदिर परिसरात दिवसभर उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण पाहायला मिळाले.

प्रेमासाठी काय पण ! तरूणाच्या घरात घुसून तरुणीचा गोंधळ; येथेच राहणार असल्याची दिली धमकी.


केज : केज तालुक्यातील एका गावात प्रेमसंबंध तुटल्यानंतरही एका तरुणीने माजी मित्राच्या घरात घुसून गैरवर्तन केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी संबंधित तरुणीविरोधात युसुफवडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ढाकेफळ (ता. केज) येथील एक तरुण लातूर येथे शासकीय सेवेत कार्यरत आहे. त्याचे आणि त्याच गावातील एका तरुणीचे पूर्वी मैत्रीपूर्ण संबंध होते. मात्र, नातेवाईकांच्या मध्यस्थीने दोघांमधील संबंध संपुष्टात आल्याचे नोटरीमार्फत शपथपत्र करून घेतले गेले होते.

दि. १४ डिसेंबर रोजी त्या तरुणाच्या लहान भावाच्या लग्नाची सुपारी फोडण्याचा कार्यक्रम सुरू असताना सदर तरुणी अचानक घरात आली व गोंधळ घातला. उपस्थितांनी तिला समजावून सांगितल्यानंतर नातेवाईकांच्या उपस्थितीत दोघांमधील संबंध पूर्णतः संपल्याचे लेखी शपथपत्र तयार करण्यात आले.

मात्र, दि. २२ डिसेंबर रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता ती तरुणी पुन्हा संबंधित तरुणाच्या घरात घुसली व दरवाजावर थुंकल्याचा आरोप आहे. यावेळी तरुणाच्या वडिलांनी जाब विचारला असता तिने शिवीगाळ करत घर सोडणार नसल्याची धमकी दिली. तसेच गंभीर परिणामांची भाषा करत ती घटनास्थळावरून निघून गेली.

या घटनेनंतर तरुणाच्या वडिलांच्या तक्रारीवरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३२१/२०२५ अन्वये भा.न्या.सं. कलम ३५१(२), ३५२, ३३३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल केशव खाडे करीत आहेत.

नोटरी शपथपत्रावर प्रश्नचिन्ह

दोघांमधील मैत्री संपुष्टात आल्याचे शपथपत्र नातेवाईकांच्या दबावातून घेतले गेले असावे, अशी चर्चा आहे. भविष्यात या प्रकरणातून काही अनुचित घटना घडल्यास नोटरी व साक्षीदारांचीही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बीडमध्ये नगराध्यक्षपद घड्याळाकडे उपनगराध्यक्षपद मिळविण्यासाठी भाजप- शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत?


बीड (प्रतिनिधी) बीड नगर परिषदेत भाजपाचा नगराध्यक्ष पदासाठी निसटता पराभव झाला.  राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार प्रेमलता पारवे यांचा साडेतीन हजाराने विजय झाला. मात्र आता उपनगराध्यक्ष पद मिळवण्यासाठी अजित दादांच्या राष्ट्रवादीसह भाजपाची संख्याबळाची जुळवाजुळव सुरू झालीय. अशातच भाजप नेत्या सारिका क्षीरसागर यांनी 'बीड क्षीरसागर मुक्त होत नाही. माझे दीर (संदीप क्षीरसागर) त्यांचे देखील नगरसेवक सोबत आहेत.' असं म्हणत भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत.

तर यावर प्रतिक्रिया देत आमदार विजयसिंह पंडित यांनी ते दोघेही पहिल्यापासून एकत्रच असल्याच सांगितले. विचारधारा आपल्या सोयीने बदलणारी ही लोकं आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने क्षीरसागरांच्या तीन पिढ्यांना ताकद देऊन सत्तेत ठेवले . भूमिका बदलणाऱ्या या लोकांना बीडकर कधीच स्वीकारणार नाहीत. यांना हद्दपार करून बीडमध्ये घड्याळाचा गजर होईल आणि तो क्षीरसागर व्यतिरिक्त असेल असं विजयसिंह पंडित यांनी ठाम सांगितलं.दरम्यान या राजकीय चर्चेबाबत बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

बीडमध्ये दादांचा सगळ्यांनाच धक्क

एकीकडे बीड नगरपालिकेत क्षीरसागर घराण्याची सत्ता संपुष्टात आल्याचं बोललं जात आहे. अजित पवारांचा राष्ट्रवादीने नगराध्यक्षपद दिल्याने बीडच्या मतदारांनी अजित पवारांचा राष्ट्रवादीला कौल दिल्याची चर्चा आहे. बीड नगरपालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असलेल्या क्षीरसागर घराण्याची सत्ता आहे. आमदार संदीप क्षीरसागर हे शरद पवारांसोबत गेले तर योगेश क्षीरसागर ऐनवेळी भाजपमध्ये गेले. त्यांच्या मागे पंकजा मुंडे यांनी पूर्ण ताकद लावली. तर दादांचा राष्ट्रवादीची जबाबदारी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यावर सोपवण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या प्रेमलता पारवे यांनी भाजपच्या ज्योती घुमरे यांचा पराभव केल्यानंतर क्षीरसागर बंधूंना मोठा धक्का बसल्याचे मानलं जात आहे. 

गेवराईमध्ये विजयसिंह पंडितांना धक्का

बीडच्या गेवराईमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार विजयसिंह पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडित यांना मोठा धक्का बसला. माजी आमदार लक्ष्मण पवार यांनी गेवराई नगर परिषदेतील 15 वर्षांची सत्ता कायम राखली. गेवराईत भाजपचा विजय झाला. नगराध्यक्षपदी उमेदवार गीता पवार यांना मतदारांनी निवडून आणलं.

Friday, December 19, 2025

अहिल्यानगर पोलीस दलातील जवान सुदाम पोकळे यांचा अपघातात मृत्यू.बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका हळहळला.


आष्टी (प्रतिनिधी): आष्टी तालुक्यातील चिंचाळा येथील रहिवासी असलेले आणि अहिल्यानगर पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार सुदाम राजकुमार पोकळे (२९) यांचा रस्ते अपघातात जागीच मृत्यू झाला. कर्जत तालुक्यातील राशीन येथे गुरुवारी रात्री गस्तीवर असताना ही दुर्दैवी घटना घडली.

सुदाम पोकळे हे कर्जत पोलीस ठाण्यांतर्गत राशीन पोलीस चौकी येथे कार्यरत होते. गुरुवारी रात्री ते नेहमीप्रमाणे आपल्या सहकाऱ्यांसह गस्तीवर (पेट्रोलिंग) असताना, एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, सुदाम पोकळे यांचा जागीच मृत्यू झाला. कर्तव्य बजावत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने पोलीस दलासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सुदाम पोकळे यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या मूळ गावी चिंचाळा (ता. आष्टी) येथे शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी आणि मुलगा असा मोठा परिवार आहे.

पाण्यासाठी सख्ख्या भावांनी उपसल्या कुऱ्हाडी! दोन गटांत रक्तरंजित संघर्ष, ८ जणांवर गुन्हे.


केज (प्रतिनिधी): विहिरीच्या पाण्यावरून दोन सख्या भावांमध्ये जुंपलेल्या वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाल्याची धक्कादायक घटना केज तालुक्यातील येवता येथे घडली आहे. सख्या भावांनी एकमेकांविरुद्ध कुऱ्हाड, कत्ती आणि काठ्यांचा वापर केल्याने दोन्ही गटातील लोक जखमी झाले आहेत. याप्रकरणी केज पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या एकूण ८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून परिसरात या घटनेची मोठी चर्चा आहे.

येवता येथील मल्हारी लक्ष्मण सक्राते (५३) यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते शेतात असताना त्यांचा सख्खा भाऊ अशोक सक्राते आणि त्याच्या मुलांनी तेथे येऊन वाद घातला. "विहीर आमची आहे, मोटार चालू करू नकोस," असे म्हणत त्यांनी शिवीगाळ केली. "आपण पाळीने (बारीने) पाणी घेऊ" असे मल्हारी यांनी सुचवले असता, रागाच्या भरात अशोकने कुऱ्हाडीने मल्हारी यांच्या डोक्यात वार करून त्यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी अशोक सक्राते, प्रणव, समाधान आणि शिवकन्या या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

दुसरीकडे, दुसऱ्या गटाचे प्रणव अशोक सक्राते यांनीही फिर्याद दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते विहिरीवर मोटार चालू करण्यास गेले असता त्यांचे चुलते मल्हारी सक्राते, दीपक, प्रवीण आणि शारदा सक्राते यांनी त्यांना अडवले. यावेळी झालेल्या वादात चुलते मल्हारी सक्राते यांनी धारदार कत्तीने प्रणवच्या हातावर वार करून त्याला जखमी केले, तर इतरांनी दगडाने मारहाण केली. या तक्रारीवरून मल्हारी सक्राते यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नात्यापेक्षा 'पाणी' ठरले मोठे? 

एकदा विहिरीच्या पाण्यावरून हा वाद विकोपाला गेल्याने दोन सख्खी कुटुंबं आता पोलीस ठाण्याची पायरी चढली आहेत. पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून जमादार हनुमान मुंडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी नाती कशी दुरावत चालली आहेत, याचे विदारक चित्र समोर आले आहे.

परळी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक ; मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज!

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी नगर परिषद सार्वत्रिक  निवडणुकीची मतदान प्रक्रिया दि. ०२   डिसेंबर रोजी पार पडली. तर उर्वरित मतदान दि.२० डिसेंबर रोजी होणार आहे. त्याकरिता शनिवार २१ डिसेंबर  रोजी निकालाची प्रक्रिया सकाळी १०  वाजेपासून सुरू होणार असून निवडणूक विभागाने त्याअनुषंगाने तयारी सुरू केली आहे. दरम्यान, मतमोजणीच्या दिवशी या ठिकाणी सर्व उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांनी सकाळी ७ वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी केले आहे. 
 याबाबत अधिक माहिती अशी की,परळी वैजनाथ नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेला अधिक पारदर्शक आणि सुरळीत बनवण्यासाठी तयार करण्यात येत आहे. निवडणुकीसाठी मतदान झाल्यावर आता मतमोजणी प्रक्रीयेसाठी नगर परिषद निवडणूक प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली आहे. परळी वैजनाथ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता दिनांक ०२.१२.२०२५ रोजी मतदान संपन्न झाले, उर्वरित प्रभाग क्रमांक ३ मधील अ व ब, प्रभाग क्र. ९ अ व प्रभाग क्रमांक १४ ब या जागे करिता दिनांक २०.१२.२०२५ रोजी मतदान होणार आहे. यासाठी मतमोजणी दिनांक २१.१२ .२०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे. या करिता ९ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. एका टेबलासाठी ४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याकरिता मुख्य २ फेऱ्या होणार आहेत. पहिल्या फेरीमध्ये प्रभाग क्रमांक १ ते प्रभाग क्रमांक ९ तर दुसऱ्या फेरी मध्ये प्रभाग क्रमांक १० ते प्रभाग क्रमांक १७ ची मतमोजणी होणार आहे. टपाली मतमोजणी त्याच प्रभागातील त्याच टेबलवर होणार आहे. प्रत्येक टेबलवर त्या प्रभागातील सर्व मतदान केंद्रांची मतमोजणी होणार आहे.  
याकरिता मतमोजणीसाठी उमेदवार किंवा मतमोजणी प्रतिनिधी कोणीही एकच उपस्थित राहू शकणार आहेत. तर नगराध्यक्ष पदासाठी नऊ टेबलाकरिता एक प्रतिनिधी याप्रमाणे उपस्थित राहणार आहेत. मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल आणण्यास बंदी आहे. प्रत्येक उमेदवार व प्रतिनिधींची मेटल डिटेक्टर द्वारे तपासणी करूनच मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी मतमोजणी करिता सोडण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्रावर प्रवेश करतेवेळी आपले ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. ओळखपत्र नसल्यास आपणास मतमोजणी कक्षात प्रवेश मिळणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. मतमोजणी केंद्रावर शांततेचा भंग होऊ नये व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने आवश्‍यक खबरदारी घेतली आहे.  
      परळी वैजनाथ नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. मतदान झाल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन स्ट्रांग रूममध्ये कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. स्ट्रॉग रूमच्या सुरक्षेसाठी पोलिस तैनात आहेत. स्ट्रॉग  रूम सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहेत.  आता २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे उमेदवार आणि मतदारांचे लक्ष लागून आहे. मतदान सुरळीतपणे पार पडल्यानंतर, आता  मतमोजणी सुरळीतपणे पार पडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व नगर परिषद कडून चोख नियोजन केले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी  पोलिस बंदोबस्तासाठी तैनात रहाणार आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी दिली आहे.