*मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून परिवर्तनाची चाहूल*
*भ्रष्टाचार मुक्त परळी आणि दहशतमुक्त परळी खासदार बजरंग बप्पा यांचे परळीकरांना वचन*
परळी (प्रतिनिधी)परळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)च्या उमेदवार सौ. संध्याताई दीपक देशमुख यांच्या प्रचार कार्यालयापासून करण्यात आला. खासदार बजरंग सोनवणे यांच्या हस्ते या प्रचार मोहिमेची सुरुवात झाली. राज्याचे प्रदेश सरचिटणीस राजेभाऊ फड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे नेते दीपक रंगनाथ देशमुख, पक्षाचे प्रभारी डॉ.नरेंद्र काळे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
प्रचार शुभारंभ कार्यक्रमात सर्वप्रथम मोंढा येथील हनुमान मंदिरात विकसित परळीच्या संकल्पपत्राचे प्रकाशन करण्यात आले. श्रीफळ फोडून आणि आझाद नगर येथील दर्ग्यावर चादर अर्पण करून प्रचाराची औपचारिक सुरुवात झाली. संकल्पपत्रात सुंदर परळी – स्वच्छ परळी, दहशत-मुक्त शहर, महिला सुरक्षा या मुद्द्यांना विशेष प्राधान्य देण्यात आल्याचे दिसून आले. गणेश पार येथून रॅलीची सुरुवात झाली. पुढे ही रॅली राणी लक्ष्मीबाई टॉवर, मोंढा मार्केट, एकमिनार चौक, स्टेशन रोड मार्गे पुढे सरकत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य कार्यालयात रॅलीचा समारोप झाला.
भव्यदिव्य प्रचार रॅलीने शहरवासीयांचे मोठे लक्ष वेधले. नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून ‘परिवर्तन अटळ’ असल्याची भावना शहरात उमटल्याचे चित्र पाहायला मिळाले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, शहराध्यक्ष, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उत्तम माने, शंकर शेजुळ, बाबा शिंदे, अॅड. जीवनराव देशमुख, सय्यद फिरोज, वर्षा रायभोळे, कल्पना देशमुख, प्रकाश देशमुख यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली.
*प्रचार कार्यालयाचे उद्घाटन*
परळी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ. संध्या दीपक देशमुख यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन खा.बजरंग सोनवणे यांच्या हस्ते झाले. यावेळी, पक्षाचे निरीक्षक नरेंद्र काळे ,प्रदेश सरचिटणीस राजेभाऊ फड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते दीपक रंगनाथ देशमुख, तालुकाध्यक्ष बाबा शिंदे, नेते उत्तम माने यांच्या प्रमुख उपस्थितीत लाल फिती कापून,श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आले.यावेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment