परळी वैजनाथ (प्रतिनिधी) वारकरी परंपरेच्या अखंड भक्तिरसात न्हालेल्या लाडेवडगाव ग्रामस्थांनी ज्ञानेश भक्त अर्जुन महाराज लाड गुरुजी यांच्या ६१व्या महोत्सवानिमित्त भव्य “राम कृष्ण हरी” सप्हाचे आयोजन मोठ्या भक्तिभावाने केले. या प्रसंगी अख्खे लाडेवडगाव “राम कृष्ण हरी” च्या गजराने दुमदुमले.
सप्हाच्या कार्यक्रमात अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळाच्या वतीने अर्जुन महाराज लाड गुरुजी यांचा सत्कार रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच कन्हैया वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गोविंद महाराज मुंडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि फेटा बांधून मानाचा सत्कार करण्यात आला.
या वेळी आपले विचार व्यक्त करताना रामेश्वर महाराज कोकाटे म्हणाले की, अर्जुन महाराज लाड गुरुजी हे वारकरी परंपरेचे खरे सेवक आहेत. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य ‘ज्ञानेश्वर माऊली’ आणि ‘नामस्मरण’ यासाठी वाहिले आहे. त्यांच्या ६१व्या महोत्सवानिमित्त संपूर्ण परिसरात जो भक्तिरस निर्माण झाला, तो वारकरी चळवळीच्या तेजाला अधिक बळ देणारा आहे. अशा गुरुजनांच्या आशीर्वादानेच समाजात आध्यात्मिकता आणि सद्भावना टिकून राहते असे ते म्हणाले.
या प्रसंगी दत्ता महाराज पुरी, करण महाराज मुंडे यांच्यासह अनेक संत-महंत, वारकरी, भाविक भक्त तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमात नामस्मरण, भजन, कीर्तन आणि वारकरी परंपरेचा उत्साह यांचा सुंदर संगम झाला. संतांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाने वातावरण भारावून गेले. शेवटी उपस्थितांनी गुरुजींना पुढील वाटचालीसाठी आरोग्य, समाधान व दीर्घायुष्य लाभावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली आणि शुभेच्छा अर्पण केल्या.
No comments:
Post a Comment