Saturday, August 16, 2025

राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यां च्या शालार्थ’ची २०१२ पासूनची कागदपत्रे ऑनलाइन; शिक्षण विभागाच्या निर्णयाचे परिणाम काय?


पुणे (प्रतिनिधी) राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडी, वैयक्तिक मान्यतांची कागदपत्रे आता डिजिटाइज केली जाणार आहेत. त्यानुसार २०१२ ते २०२५ या काळातील कागदपत्रे शालार्थ संकेतस्थळावर ३० ऑगस्टपर्यंत अपलोड करावी लागणार असून, वैयक्तिक मान्यतेमध्ये अनियमितता असल्यास फौजदारी कारवाईचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यामुळे आता शालार्थ आयडीची सत्यासत्यता स्पष्ट होणार आहे.

नुकतेच नागपूर येथे बोगस शालार्थ आयडीचे प्रकरण उघडकीस आले. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीच्या शालार्थ आयडी मान्यतेसंदर्भात सुधारित कार्यपद्धती लागू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार आता शालार्थ आयडी प्रक्रियेत ई-ऑफिस प्रणालीचा वापर करण्याबाबतचे, तसेच २०१२ ते २०२५ या कालावधीतील कागदपत्रे डिजिटाइज करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले आहेत.

दिनांक ७ जुलै २०२५ किंवा त्यानंतरच्या शालार्थ आयडी आदेश प्रकरणात वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी आदेश प्रसिद्ध करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक मान्यता आदेश, शालार्थ आयडी आदेश प्रत, नियुक्ती आदेश, रुजू अहवाल शालार्थ संकेतस्थळावर विभागीय शिक्षण उपसंचालक, विभागीय अध्यक्ष यांच्या स्तरावरून अपलोड करावेत. त्यापूर्वी १८ नोव्हेंबर २०१६ ते ७ जुलै २०२५ या काळातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सक्षम प्राधिकाऱ्याने वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी प्रदान केल्यानंतर संबंधित वैयक्तिक मान्यता आदेश प्रत, शालार्थ आयडी आदेश प्रत, संबंधित खासगी व्यवस्थापनाचा नियुक्ती आदेश, संबंधित कर्मचाऱ्याचा रुजू अहवाल शालार्थ संकेतस्थळावर अपलोड करण्याबाबत डीडीओ १, मुख्याध्यापक-प्राचार्य स्तरावरून कार्यवाही करणे अनिवार्य असेल. तसेच ७ नोव्हेंबर २०१२ ते १८ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत शालार्थ आयडी आदेश प्रसिद्ध केलेले नाहीत. या कालावधीतील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्याचा खासगी व्यवस्थापनाचा नियुक्ती आदेश, रुजू अहवाल आणि वैयक्तिक मान्यता आदेश शालार्थ संकेतस्थळावर अपलोड करण्यात यावेत, असे नमूद करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment