Thursday, July 31, 2025

किरण गित्ते कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी यांनी जिल्हास्तरीय योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये पटकवला तिसरा क्रमांक

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- कै.रामभाऊ आणा खाडे सेवाभावी संस्था संचलित पुस येथील किरण गित्ते कनिष्ठ महाविद्याल याचा विद्यार्थी समर्थ धोकटे यांनी बीड जिल्हास्तरीय योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकवल आहे. समर्थ धोकटे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन  करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 
महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि बीड जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्हास्तरीय योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप स्पर्धे मोठ्या उत्साहात घेण्यात आल्या. योगासन स्पर्धेत ग्रामीण, शहरी विद्यार्थी आणि युवकांचा सहभाग वाढावा, खेलो इंडिया, ऑलिम्पिक साठी खेळाडू तयार व्हावेत, तसेच सर्वत्र मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीसाठी योगाचा प्रचार व्हावा यासाठी या स्पर्धा घेतल्या जातात. नुकत्याच पार पडलेल्या बीड जिल्हास्तरीय योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप स्पर्धे मध्ये कै. रामभाऊ आणा खाडे सेवाभावी संस्था संचलित पुस येथील किरण गित्ते कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी समर्थ धोकटे यांनी बीड जिल्हास्तरीय योगासन स्पोर्ट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकवल आहे. त्यांच्या यशाबद्दल कै. रामभाऊ आणा खाडे सेवाभावी संस्था अध्यक्ष तथा नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे व किरण गित्ते कनिष्ठ महाविद्यालयातील सर्वानी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

परळी तालुक्याला ३ नवीन नायब तहसील दारांची नियुक्ती.महसूल व निवडणूक काम काजाला गती येणार.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी तालुक्याला तीन नवे नायब तहसीलदार मिळाले असून, महसूल व निवडणूक विभागाच्या कामकाजात आता गती येणार आहे. माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, राज्य शासनाने अधिकृत आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार परळी तहसील कार्यालयात महसूल विभागासाठी नायब तहसीलदार पंडित सुरवसे, निवडणूक विभागासाठी अशोक भोजने यांची तर परळी उपविभागीय अधिकारी कार्यालयात महेश वाकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बऱ्याच काळापासून परळी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार पदे रिक्त होती. परिणामी, नागरिकांच्या महसूल व निवडणूक संबंधित कामांमध्ये अडथळे निर्माण होत होते. ही रिक्त पदे भरल्यामुळे आता कामकाज अधिक कार्यक्षमतेने पार पाडले जाणार आहे. या नियुक्त्यांमुळे तालुक्यातील प्रशासकीय कामांना चालना मिळणार असून, या निर्णयाबद्दल माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले आहेत.

युवा नेते आदित्य पाटील यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी निवड.

केज (प्रतिनिधी) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या महाराष्ट्र प्रदेश समितीच्या सरचिटणीस पदावर आदित्य पाटील यांची नुकतीच नियुक्ती झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. ही निवड पक्षाच्या भविष्यासाठी एक सकारात्मक पाऊल असून तरुण नेतृत्वाला संधी देण्याच्या काँग्रेस पक्षाच्या धोरणाची ही ठळक निशाणी आहे.

 आदित्य पाटील यांची राजकीय कारकीर्द

आदित्य पाटील हे अत्यंत अभ्यासू, दूरदृष्टी असलेले आणि समाजाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जातात. स्थानिक स्तरावरून सुरू झालेला हा प्रवास आता राज्यस्तरावर पोहोचलेला आहे.

त्यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेस, आणि जिल्हा कार्यकारिणीमध्ये विशेष कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील समस्या, शेतकऱ्यांचे हक्क, शिक्षण आणि रोजगार यांसारख्या मुद्द्यांवर त्यांचा ठाम आणि स्पष्टवक्ता दृष्टिकोन पक्षासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरलेला आहे.

 काँग्रेस पक्षाची विश्वासू निवड

महाराष्ट्रातील राजकारणात सध्या अस्थिरतेचे वारे आहेत. अशा परिस्थितीत आदित्य पाटील यांच्यासारख्या तरुण, ऊर्जावान आणि ध्येयवेड्या नेत्याला सरचिटणीसपदाची जबाबदारी देणे ही पक्षाच्या नवविचारांची आणि नवसंजीवनीची साक्ष आहे.

 भविष्यासाठी दिशा

सरचिटणीस या पदावर काम करताना पक्ष संघटन बळकट करणे, युवकांना जोडणे,  आगामी काळातील निवडणुकांसाठी रणनीती आखणे या मुख्य जबाबदाऱ्या आदित्य पाटील यांच्या खांद्यावर असतील. त्यांचा अनुभव, विचारशैली आणि लोकांशी असलेला थेट संवाद निश्चितच काँग्रेस पक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी उपयुक्त ठरेल.
निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे

वैद्यनाथ मंदिरातील वंशपरंपरागत पुजाऱ्या शी जबरदस्तीने पैसे हिसकावले विश्वस्त सह तिघांविरोधात तक्रार दाखल.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - परळीतील प्रसिद्ध वैद्यनाथ मंदिरातील वंशपरंपरागत पुजारी विवेक शंकर पुजारी यांनी गंभीर आरोप करत परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दिनांक 28 जुलै 2025 रोजी रात्री 9 ते 10 वाजण्याच्या दरम्यान शयन आरतीच्या वेळेस ओम नागनाथ अप्पा वाघमारे, विजय नारायणअप्पा घोंगडे आणि जगन्नाथ बाबुराव वाघमारे या तिघांनी वैजनाथ देवल कमिटीचे विश्वस्त राजेश देशमुख यांच्या सांगण्यावरून त्यांच्या हातातील भक्तांनी स्वेच्छेने दिलेली दक्षिणा जबरदस्तीने हिसकावून घेतली.
विशेष म्हणजे, हे कृत्य त्यांनी जयवंत उर्फ राजेश विठ्ठलराव देशमुख यांच्या सांगण्यावरून केल्याचे स्पष्टपणे बोलून दाखवले, असे पुजारी विवेक शंकर पुजारी यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. तक्रारदाराच्या मते, राजेश देशमुख हे देवस्थानचे विश्वस्त असून सूडबुद्धीने सातत्याने मानसिक व शारीरिक त्रास देत आहेत, तसेच जातीवाचक शब्द वापरत अपमान करत आहेत.
या घटनेमुळे विवेक पुजारी यांना अत्यंत मानसिक त्रास झाल्याचे ते म्हणाले. त्यांनी हायपरटेन्शनचा झटका आल्याने शुद्ध हरपली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 जुलै रोजी त्यांना रुग्णालयातून सुटका देण्यात आली.
पुजारी यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, जयवंत देशमुख हे सतत त्रास देत असून भविष्यात त्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबीयांच्या जिवीताला धोका निर्माण झाला, तर त्याला जबाबदार जयवंत उर्फ राजेश देशमुख असतील.
या प्रकरणी परळी शहर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी संबंधित घटनेची चौकशी सुरू केली आहे. विवेक पुजारी यांनी या गंभीर प्रकारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

बोगस शालार्थ आयडी.बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात दोन शिक्षणाधिकारी अटक !


बीड (प्रतिनिधी) नागपूर येथील बोगस शालार्थ आयडी आणि शिक्षक भरती घोटाळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे. प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांना एस आय टी ने अटक केली आहे. या दोघांनी मिळून तीनशे पेक्षा जास्त बोगस शालार्थ आयडी तयार करून शंभर कोटींपेक्षा अधिक रकमेचा अपहार केल्याचे समोर आले आहे.

राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी कथित घोटाळा प्रकरणी जिल्हा परिषद नागपूर येथील शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे (प्राथमिक) व रोहिणी कुंभार (माध्यमिक) यांना अटक झालीय. या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांना सायबर पोलिसांनी अटक केली असली तरी मात्र, या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांची न्यायालयाने पोलीस कोठडी नाकारत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

एकाचवेळी दोन शिक्षणाधिकाऱ्यांना अटक झाल्यानं शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील अपात्र शिक्षक भरती व बनावट शालर्थ आयडी कथित घोटाळा प्रकरणी सदर पोलीस स्टेशन येथे विविध कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे व रोहिणी कुंभार या दोघांना अटक करण्यात आली.

शालार्थ आयडी कथित घोटाळा प्राथमिक शिक्षण विभागातील असून, सिद्धेश्वर काळुसे यांच्या कार्यकाळात एकूण १५४ न्याय प्रविष्ठ शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मूळ शालार्थ आयडी आदेश निर्गमित झाले नसताना सुद्धा त्यांनी स्वतः चे आर्थिक फायद्यासाठी त्यांचे वेतन काढण्याची पुढील प्रक्रिया राबवली. रोहिणी कुंभार या पूर्वी येथे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या येथील २१ मार्च २०२२ ते १५ मार्च २०२४ दरम्यानच्या कार्यकाळात एकूण २४४  शिक्षक/ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मूळ शालार्थ आदेश निर्गमित झाले नसताना त्यांनी स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी वेतन काढण्याची प्रक्रिया राबवली. यामुळं त्यांचे वेतन काढण्यात येऊन,शासनाची अंदाजे १०० करोड पेक्षा जास्त रुपयांची आर्थिक फसवणूक झाली, असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आलाय. यावरून काळुसे व कुंभार यांना या गुन्ह्यात गुरुवारी अटक करण्यात आली.

ज्याप्रमाणे नागपूर, जळगाव, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यात बोगस शिक्षक भरती झाली तशीच भरती बीड जिल्ह्यात देखील झाली आहे. बीडच्या दोन्ही शिक्षणाधिकारी यांची चौकशी सुरु झाली आहे. अनेक संस्थाचालक हे मुंबई ला जाऊन मॅनेजमेंट लागते का यासाठी प्रयत्न करत आहेत. काही संस्थाचालकांनी किमान पाच तर कमाल दहा कोटी रुपये मागील थकीत वेतन देखील उचलून घेतले आहे. यामध्ये त्यांना पे युनिट च्या अधिकाऱ्यांनी लक्ष्मीदर्शन घेत मदत केली आहे. ज्या ज्या संस्थाचालकांनी कोट्यावधी रुपये थकीत वेतन उचलले आहे त्यांची देखील चौकशी सुरु झाली आहे.

शालार्थ आयडी तयार करण्याचे सर्व अधिकार शिक्षण उपसंचालक कार्यालयास आहेत. शिक्षक नियुक्ती नंतर मान्यतेसह आवश्यक कागदपत्राची पुर्तता केल्यानंतर मुख्याध्यापकांच्या सहीने दोन प्रस्ताव सादर केले जातात. पैकीच एक प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालय आणि दुसरा शिक्षण उपसंचालक यांना सादर केला जाणे आवश्यक आहे. मात्र, नागपूर जिल्ह्यातील ६३३ शिक्षकांचे प्रस्ताव हे शिक्षणाधिकारी कार्यालयात सादरच करण्यात आले नाही. थेट शिक्षण उपसंचालक कार्यालयात सादर करुन, शालार्थ आयडी तयार करण्यात आला. वेतन प्रक्रियेसाठी आलेल्या फाईलवर प्रक्रियेचा भाग म्हणून रोहिणी कुंभार यांनी काऊन्टर सही केली. यावरून पोलिसांनी त्यांचा या गुन्ह्यात सहभाग दाखवला.आम्ही सगळी मॅनेजमेंट लावली आहे, त्यामुळे आम्हाला काहीच त्रास होणार नाही अशा पद्धतीने सध्या हे संस्थाचालक वागत आहेत. मात्र मराठवाड्यातील उपसंचालक, शिक्षणाधिकारी हे देखील चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याने बीड जिल्ह्यातील संस्थाचालकांची झोप उडाली आहे. या संस्थाचालकांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी धावपळ सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Wednesday, July 30, 2025

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून,मराठवाड्यात 3 हजार रुग्णांना 25 कोटींची मदत - मा. रामेश्वर नाईक


आरोग्य शिबिरातून 12 हजार  नागरिकांना दिलासा. 

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) ाज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा मोठा आधार बनला आहे. विशेषतः मराठवाडा विभागात जानेवारी ते जून 2025 या अवघ्या सहा महिन्यांत तब्बल 3 हजार 39 रुग्णांना 25 कोटी 58 लाख 31 हजार रुपयांची वैद्यकीय मदत करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून नागरिकांचा विचार करून जिल्हा कक्ष स्थापन करण्यात आले. त्यातून लाभार्थी नागरिकांची संख्या वाढली. त्यासोबतच आरोग्य शिबिर व रक्तसंकलन आदी उपक्रम प्रभावीपणे राबविणे सहज शक्य होत आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष प्रमुखरामेश्वर नाईक यांनी सांगितले.

जिल्हानिहाय मदत :- मागील सहा महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 633 रुग्णांना 5 कोटी 33 लाख 38 हजारांची मदत करण्यात आली. बीड -610 रुग्णांना 4 कोटी 89 लाख 6 हजार, परभणी 533 रूग्णांना 4 कोटी 67 लाख 82 हजार, लातूर- 385 रूग्णांना 3 कोटी  29 लाख 55 हजार, जालना-367 रूग्णांना 3 कोटी 11 लाख 45 हजार, नांदेड- 323 रूग्णांना 2 कोटी 80 लाख 20 हजार, धाराशिव-257 रूग्णांना 2 कोटी 21 लाख आणि हिंगोली- 132 रूग्णांना 1 कोटी 16 लाख रूपये प्रमाणे वैद्यकीय मदत करण्यात आली आहे.
आरोग्य शिबिरे आणि रक्तदान
  1 मे ते 25 जुलै दरम्यान जिल्हा कक्षाच्या मदतीने घेण्यात आलेल्या आरोग्य व रक्तदान शिबिरांमध्ये 12,409 नागरिकांची आरोग्य तपासणी तर 2,353 नागरिकांनी रक्तदान केले.
जिल्हा लाभार्थी नागरिक रक्तदाते
छत्रपती संभाजीनगर 3,058 161
बीड 1,100 75
परभणी 763 467
लातूर 2,522 852
जालना 373 64
नांदेड 226 639
धाराशिव 742 38
हिंगोली 3,625 57

 20 गंभीर आजारांकरिता मदत-

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून 20 गंभीर आजारांवर मदत केली जाते: त्यात, कॉक्लियर इम्प्लांट, हृदयविकार, किडनी/लिव्हर/बोन मॅरो प्रत्यारोपण, कर्करोग, अपघात, नवजात बालकांचे आजार, मेंदू विकार, डायालिसिस, भाजलेले रुग्ण, विद्युत अपघात आदींचा समावेश आहे.
 जिल्हा कक्षाच्या माध्यमातून मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली तसेच जिल्हा कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. ज्यामुळे रुग्णांना मंत्रालयात येण्याची गरज भासत नाही.
रुग्णांनी प्रथम महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, किंवा धर्मादाय रुग्णालयांच्या योजनांचा लाभ घ्यावा. जर या योजनांद्वारे उपचार शक्य नसतील, तर, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडे संलग्न असणाऱ्या रुग्णालयातून अर्ज करता येतो. यामुळे शासकीय योजनांचा सुयोग्य वापर होतो आणि निधीचा उपयोग खऱ्या गरजू रुग्णांपर्यंत पोहोचतो.
 आवश्यक कागदपत्रे :-
• आधार कार्ड
• रेशन कार्ड
• उत्पन्नाचे प्रमाणपत्र (१.६० लाखांपेक्षा कमी)
• वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र
• रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असावी
• अपघात असल्यास एफआयआर किंवा एमएलसी
• अवयव प्रत्यारोपण असल्यास झेडटीसीसी नोंदणी पावती
सर्व कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात aao.cmrf-mh@gov.in या ईमेल वर पाठवावीत. अधिक माहिती करिता टोल फ्री क्र. १८०० १२३ २२११ या क्रमांकावर कॉल करावा.

साहित्यरत्न आण्णाभाऊं साठेंच्या लेखणी ने मृत्यप्राय समाजाला जागृत केले- सौ. जयश्री विधाते

बीड (प्रतिनिधी) बीड येथे साहित्यरत्न डाॅ. आण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीड ने आयोजीत केलेल्या गौरव महोत्सवात दि. 28-7-025 रोजी सायंकाळी आण्णाभाऊ साठे सभागृह मैदान चांदणे वाडा पेठ बीड येथे श्रीमती प्रेमलताताई चांदणे ज्येष्ठ मा. सभापती तथा नगरसेविका, नगर परिषद बीड. यांच्या माध्यमातून परिसरातील महीलांना कल्पतरूच्या सचिव डाॅ. सारीकाताई क्षीरसागर यांच्या शुभहस्ते तर मा. सभापती तथा नगरसेविका सौ. जयश्रीताई विलास विधाते यांच्य प्रमुख उपस्थितीत साडी वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यारत्न आण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त मा. आशोक बप्पा सोनवणे, जयंती उत्सव समिती सचिव पोपटजी मिसाळ, सचिव सुनिलजी पाटोळे, सुधाकरजी धुरंधरे, केशवजी लोंढे, प्रविण थोरात यांची उपस्थिती लाभली होती कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा प्रेमलताताई चांदणे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटक,  प्रमुख पाहुणे आणि उपस्थितीतांचे स्वागत करत कार्यक्रमाची रुपरेषा मांडली. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डाॅ. सारीकाताई  क्षीरसागर यांनी उपस्थित महिला भगीनींना संबोधित करत असताना  दुखः  दारिद्र्याशी  झुंजत संसाराचा गाढा हाकत असताना जपलेला करारी बाण्या बद्दल महिला भगिनींच्या पाठीवर शब्बाशकीची थाप दिली. तर आपल्या शुभेच्छापर भाषणात जयश्रीताई विधाते यांनी स्मृतीशेष आत्मारामजी चांदणे यांनी दाखवून  दिलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील अतुलनीय योगदानाबद्दल डिपीआयचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य भैय्या चांदणे आणि प्रेमलताताई चांदणे यांचे अभिनंदन करत समाजीक परिवर्तनाच्या लढ्यात आपणही त्यांच्या सोबत असल्याचे नमुद केले. महापुरुषांच्या विचारांची  गावकुसा बाहेरील उपेक्षित वंचित दीन दुबळ्या भगीनींना जेव्हढी गरज आहे, कदाचित त्यापेक्षा जास्त पांढरपेशा समाज व्यवस्थेतील गगनचुंबी झमारतीत. बंगल्यात,  वाड्यात आणि राजवाड्यात राहाणाऱ्या भगीनींना जास्त आहे. कारण कालही स्त्रीची गणना शुद्रादी शुद्र म्हणून केली जायची आणि आजही पाहिजे तेव्हढा बदल झाला नाही या बद्दल खंत व्यक्त केली.
 अजिंक्य भैय्या चांदणे यांनी आपल्या उपेक्षित वंचीत दीन दुबळ्या समाज बांधवांचे दुःख आणि दारिद्र्य मांडत त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणायचे असेल तर महापुरुषांच्या विचारांची गरज असल्याचे नमुद केले.
या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन लोणके सर यांनी केले. या कार्यक्रमात पाचशे भगींनींना मान्यवरांच्या हस्ते साडी चोळी देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमात परिसरातील भगीनीं मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

Sunday, July 27, 2025

बीड जिल्हा ओबीसीसाठी राखीव असल्या चे दिसते.इथे बहुजन समाजाला स्थान नाही अशी पक्षाची भूमिका असावी - आ.प्रकाश सोळंके

अजित पवारांनी शुक्रवारी पुण्यात बोलताना धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद देण्याविषयी भाष्य केले होते. त्यांच्यावरील आरोप बाजूला झाले की त्यांना संधी देऊ, असे पवार म्हणाले. यावर बीडच्या माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. एका स्थानिक वृत्त वाहिनीशी संवाद साधताना प्रकाश सोळंके म्हणाले, "मला मंत्रीपद मिळत नाही, कारण माझी जात आडवी येते. बीड जिल्हा ओबीसीसाठी राखीव असल्याचे दिसते आहे. इथे बहुजन समाजाला स्थान द्यायचे नाही, अशी पक्षाची भूमिका असावी.'  प'क्षाचा इतिहास मला माहिती आहे. बीड जिल्ह्यामध्ये सातत्याने मराठा समाज राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठीराखा राहिला आहे. गेल्या अनेक निवडणुकीचे दाखले देता येतील. केवळ आणि केवळ मराठा समाजाने राष्ट्रवादीला खंबीर पाठींबा दिला. मात्र, मंत्रिपद देताना शरद पवारांपासून ते आता अजित पवारांपर्यंत...प्रत्येकाने ओबीसीला संधी दिली. मराठा समाजाकडे ढुंकूनही बघितले नाही. ही वस्तूस्थिती आहे. मी पाच टर्म आमदार राहिलो आहो, 35 वर्षांपासून राजकारण अनुभवतोय, त्या अनुभवातूनच बोलतोय. कदाचित पक्षाच्या दृष्टीने बीड जिल्हा ओबीसीसाठी राखीव असावा, असे मला वाटते,' अशा शब्दात त्यांनी स्वपक्षावर ताशेरे ओढले.

तसेच, यावेळी धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या संकेतांबाबत सोळंके म्हणाले, 'अजित पवारांनी काय संकेत दिले आहेत, हे मला माहिती नाही. धनंजय मुंडे आमच्याच पक्षाचे आमदार आहेत, माझ्या शेजारीच त्यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे मी त्यांना शुभेच्छा देतो. धनंजय मुंडेंना क्लिनचीट मिळाली, त्याबाबतीत माझे जे काही मत आहे, ते मी पक्षश्रेष्ठींना कळवणार आहे,' असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांच्या या सर्व विधानांवरुन सोळंके पक्षावर नाराज असल्याचे दिसून येत आहे. यावर अद्याप पक्षाकडून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.  

स्मशानभूमी नसल्याने संतप्त लिंगायत समाजाच्या नागरिकांनी मृतदेह नगरपरिषद कार्यालयासमोर ठेवला.


अंबाजोगाई (प्रतिनिधी) : गावात स्मशानभूमी नसल्याने मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या सर्वांमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी मृतदेह हा नगरपरिषद कार्यालयासमोर आणून ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील ही घटना आहे. धक्कादायक म्हणजे सत्ताधारी भाजपच्या आमदाराच्या गावात हा प्रकार घडला आहे.
भारतीय जनता पार्टीच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या गावात (अंबाजोगाई) लिंगायत समाजाला स्मशानभूमी नसल्याने मृतदेह नगर परिषद कार्यालयासमोर ठेवल्याची गंभीर घटना घडली आहे. अंबाजोगाई शहरातील ही गंभीर घटना आहे. अंबाजोगाई शहरात लिंगायत समाजाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे, मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी गैरसोय झाली. यामुळे संतप्त नातेवाईकांनी अंबाजोगाई येथील नगर परिषद कार्यालयाच्या बाहेर मृतदेह ठेवून आपला निषेध व्यक्त केला.
अंबाजोगाई येथील लिंगायत समाजाची स्मशानभुमि बाराखांबी परिसरात आहे. तेथील जागा पुरातत्व खात्याने अतिक्रमित केली आहे. त्यामुळे स्थानिक लिंगायत नागरिकांच्या अंत्यविधी साठी जागा राहिली नाही. तेथे अंत्यविधी करण्यासाठी विरोध केला जातो.
नगरपालिकेचे निवृत्त कार्यालयीन अधिक्षक कै . गणपत अप्पा वाघमारे (रा रविवारपेठ) यांचे पार्थिव रविवारी नगर परिषद कार्यालयासमोर आणून ठेवले. हे पार्थिव नगरपरिषदेच्या समोर आणत लिंगायत बांधवांनी ठिय्या अंदोलन केले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना किती त्रास सहन करावा लागतो, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढून लिंगायत समाजाला स्मशानभूमीसाठी योग्य जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी लिंगयत समाजाकडून करण्यात आली 

माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा; मारहाण आणि मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेत केली आत्महत्या.


अंबाजोगाई (प्रतिनिधी ): पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची घटना ताजी असतानाच आता बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पैशांसाठी सासरच्यांकडून होणारी मारहाण आणि छळ या सर्वांना कंटाळून विवाहितेने टोकाचं पाऊल उचललं आहे. 20 वर्षीय महिलेने गळफास घेत आत्महत्या केली आहे.
घरखर्चासाठी माहेरहून पैसे आणावेत म्हणून सतत मारहाण आणि मानसिक छळ केल्यामुळे अंबाजोगाईतील 20 वर्षीय विवाहिता अनम शेख हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी बीडच्या अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पतीसह तिघांवर गुन्हा

मृतक अनमचा भाऊ मुजफ्फर सिकंदर शेख याच्या फिर्यादीनुसार, अनम शेख हिचा विवाह 2023 मध्ये गांधीनगर येथील सोहेल अफसर शेख याच्याशी झाला. विवाहावेळी मानपान, संसारोपयोगी वस्तू, अंगावर सोन्याचे दागिने देण्यात आले होते. सध्या तिला पाच महिन्यांचा एक मुलगाही आहे.

लग्नानंतर काही महिन्यांतच पती सोहेल शेख याला दारूचे व्यसन लागले. त्यानंतर त्याने आणि त्याच्या घरच्यांनी अनम हिचे दागिने मोडून घरखर्चासाठी वापरले. दागिने संपल्यावर माहेरून पैसे आणावेत म्हणून अनमचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. तिचे पती सोहेल, दिर मझहर शेख आणि जाऊ तन्नो शेख यांनी तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

अनमच्या आई-वडिलांनी मध्यस्थी करत काही वेळा पतीला पैसेही दिले. मात्र तरीही छळ सुरूच राहिला. 26 जुलै रोजी सोहेल शेख याने तिच्या आईकडे 30,000 रुपये वेल्डिंगच्या दुकानासाठी मागितले. पैसे न मिळाल्यामुळे तो संतप्त झाला होता. त्यानंतर 27 जुलैच्या मध्यरात्री अनमच्या सासऱ्यांनी फोन करून सांगितले की, अनमने विषारी औषध घेतले आहे. मात्र जेव्हा कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
सदर फिर्यादीवरून पती सोहेल शेख, दिर मझहर शेख आणि जाऊ तन्नो शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सोहेल शेखला ताब्यात घेतले असून पुढील तपास पीएसआय रवीकुमार पवार करत आहेत.

Friday, July 25, 2025

लिखीत स्वरूपात मागण्या मान्य झाल्या मुळे परिचारिकांचा संप स्थगीत.रुग्णसेवा सुरळीत.


लातूर (प्रतिनिधी) मागील आठवडाभरा पासून सुरू असलेल्या परिचारिकांच्या मागण्याबाबत राज्याचे वैद्यकिय मंत्री हसन मुश्रीफ यांनी सदर मागण्या मान्य केल्याचे इतिवृंत लिखीत स्वरूपात मिळाल्यामुळे वार 18 जुलैपासून सुरू असलेला संप शुक्रवार २५ पासून स्थगित करण्यात आला आहे.

परिचारिकाऎवजी शुश्रुषा अधिकारी पदनाम बदल मंजूर

सातव्या वेतन आयोगातील वेतनत्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या, पदनाम बदल, निषेधार्थ महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन केले असून राज्य शासनाने यांची दखल न घेतल्यामुळे दिनांक १८ जुलैपासून महाराष्ट्र राज्य परिचारिका संघाच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आले,संप काळात राज्यस्तरीय पदाधिका-यांनी परिचारिकांच्या मागण्या ठाम पणे लावून धरल्यामुळे शासनस्तरावर मागण्याचे मान्य करण्याचे शासनाने मंजुर केले.

या संपात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा लातूर येथे राज्यखजिनदार राम सुर्यवंशी, राज्यसंघटक पांडुरंग गव्हाणे, कोर कमिटी सदस्य योगेश वाघ,शिला कांबळे, सुरेखा लहाणे,लातुर शाखेच्या अध्यक्षा छाया चव्हाण , उपाध्यक्ष संजीव लहाणे, रेणुका पाटील, सचिव भाग्येश्री जोगदंड, सहसचिव भगवान केंद्रे, खजिनदार बालीका सावंत, सहखजिनदार दिपक शिंदे नर्सिग महाविद्यालयाच्या प्राचार्या अश्विनी बेले,अंजना गिरी,सुनिता गिरी, विजय जाधव ,स्त्री रुग्णालयातील आशा कुरुळेकर, शिला गोचडे, बाभळगाव नर्सिग काॅलेजचे सर्व कर्मचारी तसेच संघटना सदस्य शोभा जाधव, किरण निकम, मिना दैवज्ञ, निर्मला गाडेकर, भागवत मुंडे, धनश्री गोसावी, सतिश करे, आनंद पवार आदी उपस्थित होते.

खळबळजनक घटना! HIV बाधित मुलीवर अत्याचार.गर्भपातामुळे प्रकरण उघड.


औसा (प्रतिनिधी) : धाराशिव मधील धक्कादायक घटना समोर आली आहे. एचआयव्हीबाधित अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा भयावह प्रकार समोर आला आहे. तसेच बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या मुलीचा केला गर्भपात देखील करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. 

औसा तालुक्यातील  एका नामवंत एचआयव्ही बाधित संगोपन संस्था आहे. या संस्थेत एचआयव्ही बाधित अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. तसेच बलात्कारनंतर सदर मुलीचा गर्भपातदेखील केला. या गर्भपातामुळे सदर धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. पीडित मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित मुलीच्या तक्रारीवरून ढोकी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

नेमकं काय घडलं?

औसा तालुक्यातील  एका नामवंत एचआयव्हीबाधित संगोपन संस्थेतील घटना घडली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून ढोकी पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. या संस्थेतील आणखी काही मुलींवर अत्याचार झाला असल्याची मुलीची तक्रारीत माहिती आहे. ढोकी पोलिसातील गुन्हा औसा पोलिसांमध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केली असून अद्यापपर्यंत कोणालाही अटक नाही. औसा तालुक्यातील या नामवंत संस्थेला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामुळे या घटनेने शिक्षण क्षेत्रात उडाली खळबळ उडाली आहे. 

शिक्षण आयुक्तांचा आदेश. बोगस शिक्षक उघडे पडणार.कागदपत्र अपलोड करा अन्यथा कारवाई!


बीड (प्रतिनिधी) बोगस शिक्षक भरती प्रकरणात दोषी असलेल्या शिक्षक आणि संस्थाचालकांना धडकी भरवणारा आदेश शिक्षण आयुक्त यांनी काढला आहे. 2012 ते 2025 या काळात भरती झालेल्या सर्व शिक्षक, कर्मचारी यांची कागदपत्र अपलोड करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. कागदपत्र अपलोड न केल्यास कारवाई केली जाईल असा ईशारा सचिन्द्र प्रताप सिंग यांनी दिला आहे.

बोगस भरतीला आळा घालण्यासाठी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे. आदेशानुसार ७ जुलै २०२५ नंतर नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे दस्तऐवज विभागीय शिक्षण उपसंचालक वा मंडळाच्या अध्यक्षांमार्फत पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे. तसेच, सन २०१२ ते २०२५ या कालावधीत ज्यांना शालार्थ आयडी देण्यात आली आहे, अशा सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचेही कागदपत्रे ३० ऑगस्ट २०२५ पूर्वी पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या शाळा व्यवस्थापनांवर तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा या आदेशात देण्यात आला आहे. ‘शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णायक टप्पा आहे. शाळांनी ३० ऑगस्टपूर्वी ही कार्यवाही पूर्ण करावी, अन्यथा शिक्षण विभाग गंभीर दखल घेईल,’ असा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर, माजी आमदार नागो गाणार यांनीदेखील सर्व शाळांना त्वरित आणि पारदर्शक पद्धतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याबाबत पत्र पाठविले आहे.
त्या शिक्षकांनाही कागदपत्रे अपलोड करावी लागणार

शालार्थ आयडी घोटाळ्यात नागपूर जिल्ह्यातील ६२० शिक्षकांची बोगस नियुक्ती करण्यात आल्याचे पुढे आले होते. या शिक्षकांनाही शालार्थ आयडीचे कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी लागणार आहेत. या शिक्षकांच्या कागदपत्र पडताळणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिक्षण आयुक्त यांच्या या आदेशाने बीड जिल्ह्यातील संस्थाचालक आणि शिक्षक यांना धक्का बसला आहे. जिल्ह्यात प्राथमिक आणि माध्यमिक विभागात मिळून किमान दोन हजार बोगस शिक्षक आणि कर्मचारी यांची भरती करण्यात आली आहे. यामध्ये नाना या टोपणनावाने ओळखला जाणारा एक व्यक्ती केंद्रस्थानी असल्याची चर्चा आहे. 2012 ते 2025 या काळात असलेल्या आणि निवृत्त झालेल्या किंवा बदली झालेल्या शिक्षणाधिकारी यांच्या मागील तारखेत सह्या घेऊन बोगस शिक्षक भरती करण्यात आली आहे. या प्रकरणात स्थापन झालेल्या स्पेशल एस आय टी नंतर आता शिक्षण आयुक्त यांनी काढलेल्या या आदेशाने सगळ्यांचे पितळ उघडे पडणार आहे.

विद्यापीठाचा दणका!तीन सदस्यीय समिती ची तपासणी.अनेक महाविद्यालयात बोगस पणा ११३ महाविद्यालयांतील पदव्युत्तरचे प्रवेश रोखले.


छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यापरिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार अधिष्ठाता मंडळाने भौतिक सुविधा नसलेल्या चार जिल्ह्यांतील नामांकित ११३ महाविद्यालयांतील पदव्युत्तरचे प्रवेश थांबविण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. प्रवेश थांबविलेल्या महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्री, आमदार, माजी मंत्र्यांच्या संबंधित शिक्षण संस्थांचा समावेश आहे.

प्राध्यापकांची नियुक्ती न करणे, कागदोपत्री नियुक्ती केल्यानंतर संबंधितांना वेतन न देणे, बायोमेट्रिक हजेरीसह भौतिक सुविधा नसताना पदव्युत्तर अभ्यासक्रम संबंधित महाविद्यालये चालवित होती. त्याची तीन सदस्यीय समितीने तपासणी केल्यानंतर बोगसपणा उघडकीस आला.

विद्यापीठाच्या विद्यापरिषदेसह व्यवस्थापन परिषदेने ‘नॅक’ मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांतील पदव्युत्तरचे प्रवेश थांबविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राजकीय क्षेत्रातील कार्यरत शिक्षण संस्थाचालकांनी ‘नॅक’चे कामकाज बंद असल्याचे कारण देत शासनाकडे मुदतवाढ मागितली. त्यानुसार शासनाने ‘नॅक’ नसलेल्या महाविद्यालयांना सहा महिने मुदतवाढ दिली. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने संलग्न महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या भौतिक सुविधांची पाहणी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार विद्यापीठ कार्यक्षेत्राच्या बाहेरील एक सदस्य आणि कार्यक्षेत्रातील दोन अशा तीन सदस्यांची समिती पाठविण्यात आली. या समितीच्या अहवालानुसार १८७ पैकी तब्बल ११३ महाविद्यालयांत पूर्णवेळ प्राध्यापकांची नियुक्ती, नियुक्ती असेल तर त्यांना वेतन दिलेले नाही, बायोमेट्रिक व इतर सुविधा नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या महाविद्यालयांतील १०० टक्के प्रवेश थांबविण्याचा ठराव विद्यापरिषदेच्या बैठकीत मंजूर केला. त्यानुसार अधिष्ठाता मंडळाने प्रवेश थांबविलेल्यांसह प्रवेश देण्यात येणाऱ्या महाविद्यालयांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केली.

उच्च शिक्षणमंत्र्यांसह राजकीय नेत्याचा समावेश.

प्रवेश थांबविलेल्या महाविद्यालयांच्या संबंधित संस्थेशी संबंधित नामांकित राजकीय नेत्यांचा समावेश आहे. त्यामध्ये राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) च्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण, आमदार प्रकाश सोळंके, माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे, माजी मंत्री राजेश टोपे, जयदत्त क्षीरसागर, बसवराज पाटील, मधुकरराव चव्हाण, माजी खासदार उत्तमसिंह पवार, माजी आमदार भीमराव धोंडे यांच्यासह रमेश आडसकर, प्रभाकर पालोदकर, उद्योजक मानसिंग पवार, रंगनाथ काळे, डॉ. योगेश क्षीरसागर, रमेश पोकळे, सुभाष सारडा, राजाभाऊ देशमुख, कपिल आकात, सुधीर पाटील, प्रा. सुनील मगरे, सिद्धांत गाडे, तुषार शिसोदे यांच्यासह इतर राजकीय पक्षांशी संबंधित पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

आर्थिक गणित कोलमडणार.

बहुतांश महाविद्यालयांना पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शुल्कातून मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. आता प्रवेश थांबविण्यात आल्यामुळे विविध शिक्षण संस्थांचे आर्थिक गणित कोलमडणार असल्याचे यातून स्पष्ट झाले.

जिल्हा....................पदव्युत्तरची महाविद्यालये...............प्रवेश थांबविलेली संख्या.

छ. संभाजीनगर ७९. ५० जालना. ४०.२२बीड  ४४  ३१ धाराशिव.२४..१०एकूण.१८७...११३

पाच दिवसांची मुदत.

पदव्युत्तर अभ्यासक्रमांना भौतिक सुविधा नसलेल्या ११३ महाविद्यालयांतील प्रवेश थांबवले आहेत. या महाविद्यालयांना भौतिक सुविधांची प्रतिपूर्ती करण्यासाठी पाच दिवसांची मुदत दिली आहे. या पाच दिवसांत पूर्तता न केल्यास संबंधित महाविद्यालयांतील पहिल्या सत्राचे प्रवेश पूर्णपणे बंद होतील.-डॉ. वाल्मीक सरवदे, प्र-कुलगुरु

Thursday, July 24, 2025

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांच्या जयंती निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन.

परळी वैजनाथ  (प्रतिनिधी) दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लोकमान्य टिळक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या दिवसाचे औचित्य साधून शाळेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी विशेष परिपाठ घेऊन त्यांच्या जीवन व कार्यावर प्रकाशझोत टाकला.तसेच विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व कौशल्याचा विकास व्हावा, या उद्देशाने इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी'शाळांतर्गत वक्तृत्व स्पर्धेचे'आयोजन करण्यात आले होते. 
याप्रसंगी सर्वप्रथम  'भारतीय असंतषाचे जनक' म्हणून सर्व परिचित असलेल्या लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे प्राचार्य मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास,वक्तृत्व कौशल्याचा विकास व्हावा या उद्देशाने लोकमान्य टिळक यांच्या जीवन व कार्यावर शाळांतर्गत वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.ही स्पर्धा  पाचवी व सहावी आणि सातवी व आठवी या दोन गटांमध्ये घेण्यात आली होती.या स्पर्धेमध्ये 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी इंग्रजी, हिंदी व मराठी या तीनही भाषेतून लोकमान्य टिळक यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला. सदरील शाळांतर्गत वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्राचार्य मा.श्री.श्रीकांत पाटील सर व शाळेचे वरिष्ठ समन्वयक श्री.सुनील येवले सर यांची उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे प्राचार्य मा.श्री. श्रीकांत पाटील सर यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवन व कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले .यामध्ये त्यांनी समाजामध्ये एकोपा निर्माण व्हावा,यासाठी लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या 'सार्वजनिक शिवजयंती व गणेशोत्सव 'याबद्दल माहिती दिली. तसेच भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदानही सांगितले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थिनी कु.कुंजल शिंदे व कु. प्रसिद्धी बिंगोले यांनी तर आभार प्रदर्शन कु.पायल सोळंके हिने केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. 
सदरील कार्यक्रमास स्वामी विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा सौ.उषा किरण गित्ते मॅडम ,शाळेचे मार्गदर्शक व प्रेरणास्त्रोत मा.श्री.किरण गित्ते सर (सचिव,त्रिपुरा सरकार) व शाळेचे प्राचार्य मा.श्री.श्रीकांत पाटील सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकी चे वारे ; मराठवाडा विभागात जि. प.चे सहा गट तर पं. स.चे १२ गण वाढले. इच्छुक लागले कामाला.


छत्रपती संभाजीनगर (कांतीकारी साथी): मराठवाड्यात जि. प. गट व पं. स.ची प्रभाग रचना झाली. त्यावर आक्षेप नोंदविण्याची मुदतही सोमवारी संपली. विभागात जि. प.चे सहा गट तर पं. स.चे १२ गण वाढले आहेत. त्यानुसार प्रभाग रचना करण्यात आली आहे.

२०२० पासून आजवर विभागातील ८ जि. प.च्या व ७६ पं. स. निवडणुकांचा कार्यकाळ टप्प्याटप्प्याने संपला. त्यावर प्रशासक होते. मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा केल्यानंतर निवडणूक आयोग सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार विभागाची लोकसंख्या १ कोटी ८७ लाख ३७ हजार ७३२ आहे. त्याआधारे प्रारूप गट व गण रचना केलेली आहे. विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात १ कोटी ५६ लाख ३६ हजार ४६४ मतदार होते. २०११ची लोकसंख्या आणि डिसेंबर २०२४ पर्यंतची मतदारसंख्या यात ३१ लाख १ हजार २६८ इतका फरक आहे.

छत्रपती संभाजीनगर - जि. प. गट : ६३पंचायत समिती गण : १२६वाढ : गट-१, गण-२

परभणी - जि. प. गट : ५४पं. स. गण : १०८वाढ : नाही

जालना - जि. प. गट : ५७पं. स. गण : ११४वाढ : गट-१, गण-२

हिंगोली - जि. प. गट : ५२पं. स. गण : १०४वाढ : नाही

नांदेड- जि. प. गट : ६५पं. स. गण : १३०वाढ : गट-२, गण-४

बीड- जि. प. गट : ६१पं. स. गण : १२२वाढ : गट-१, गण-२

लातूर- जि. प. गट : ५९पं. स. गण : ११८वाढ : गट-१, गण-२

धाराशिव- जि. प. गट : ५५पं. स. गण : ११०वाढ : नाही

मराठवाड्यात १ कोटी ५६ लाख मतदार.

विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात १ कोटी ५६ लाख ३६ हजार ४६४ मतदार होते. विभागात २ लाख ४२ हजार ३५२ मतदार वाढले होते. आगामी जि. प., पं. स. निवडणुकीपर्यंत हा आकडा बदललेला असेल. १६,८२६ मतदान केंद्र विधानसभा निवडणुकीत होते.

मतदार संख्येत राजधानी आघाडीवर.

छत्रपती संभाजीनगर : ३१ लाख ७६ हजार ८३०जालना : १६ लाख २३ हजार ९४३परभणी : १५ लाख ३२ हजार ३०७हिंगोली : ९ लाख ७४ हजार ५४१नांदेड : २७ लाख ५१ हजार ६३८लातूर : २० लाख १६ हजार ९९०धाराशिव : १३ लाख ९४ हजार १२बीड : २१ लाख ९७ हजार ८३०(डिसेंबर २०२४ पर्यंत)

नशेच्या गोळ्या विक्री मेडिकल चालकासह दोघांना अटक बीड शहर डी बी पोलिसांची कामगिरी.

बीड (प्रतिनिधी) : नशेसाठी गोळ्या व औषधांची विक्री करणाऱ्या दोन जणांना बीड शहर पोलिसांनी तपसात अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मेडिकल चालक व त्याला पुरवठा करणारा तरुण यांचा समावेश आहे. पोलिस अधीक्षक श्री नवनीत काँवत यांनी नशाखोरी आणि त्यापाठीमागील गुन्हेगार यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. बीड शहर पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला हाेता. या प्रकरणात चार जणांना तेव्हा अटक केली होती. त्यांच्याकडून अल्फ्राझोलम गोळ्या आणि कोडीन सायरपसह एकूण सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंद केला होता. सध्या हे चारही आरोपी कारागृहात आहेत. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना शेख फारुक शेख आरेफ (रा. इस्मालमपूरा, बीड) या मेडिकल चालकाने या गोळ्यांची विक्री केल्याचे समोर आले होते. त्याला पोलिसांनी अटक केली त्याच्या चौकशीत त्याला इनामदार मोहम्मद तारीखोद्दीन मोहम्मद नुरुद्दीन (रा. शहेंशाहर नगर) या गोळ्या पुरवठा केल्याचे समोर आले. त्यालाही पोलिसांनी अटक केली. त्यामुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या ६ झाली आहे. सदरील कामगिरी पोलिस अधीक्षक श्री नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक श्री सचिन पांडकर, यांचे मार्गदर्शन प्रमाणे पोलिस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ,सपोनी बाबा राठोड, पोलिस अंमलदार सचिन अलगट, संजय राठोड, गहिनीनाथ बावनकर, राम पवार, यांनी केली आहे. या प्रकरणी बीड शहर पोलिस अधिक तपास करत आहेत.

Wednesday, July 23, 2025

परभणी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर : ढगफुटी, अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, पालमला रिमझीम.


परभणी (प्रतिनिधी) जिल्ह्यात दि.21 व 22 जुलैच्या रात्रीपासून मुसळधार पावसाने थैमान घातले, अनेक ठिकाणी ढगफुटी व अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील 23 महसूल मंडळांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे, तर चार मंडळांमध्ये ढगफुटी, आणि चार ठिकाणी अतिवृष्टीची स्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे, पालम तालुक्याला मात्र समाधानकारक पावसापासून यंदाही हुलकावणी मिळाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

हवामान विभागाने दिलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार, पाथरी तालुक्यातील कासापुरी मंडळात सर्वाधिक 215 मिमी पावसाची नोंद झाली आहे, जी ढगफुटी मानली जाते. याशिवाय हादगाव मंडळात 106 मिमी, सोनपेठ मंडळात 136 मिमी, जिंतूर तालुक्यातील बोरी मंडळात 106 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अतिवृष्टी झालेली मंडळात बाभळगाव (ता.पाथरी) - 98 मिमी, मोरेगाव (ता.सेलू) - 79.3 मिमी, चिकलठाणा मंडळ (ता.सेलू) - 87.8 मिमी, केकरजवळा (ता.मानवत) - 98 मिमी यांचा समावेश आहे. यासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत मुसळधार पावसाचा जोर राहिला.

यात परभणी तालुक्यातील परभणी, जांब, झरी, शिंगणापूर, टाकळी कुंभकर्ण, पाथरी तालुका: पाथरी, जिंतूर तालुका: बामणी, चारठाणा, वाघी धानोरा, दुधगाव, पूर्णा तालुका: ताडकळस, लिमला, चुडावा, सेलू तालुका: सेलू, देऊळगाव, वालूर, मोरेगाव, सोनपेठ तालुका: आवलगाव, शेळगाव, वडगाव, मानवत तालुका: मानवत, रामपुरी या मंडळाला मुसळधार पावसाने जोरदार झोडपले. या भागांत काही ठिकाणी शेतजमिनींमध्ये पाणी साचले असून, रस्तेही काही ठिकाणी बंद झाले आहेत.

पालम तालुका पावसाच्या प्रतीक्षेतच

दरवर्षीप्रमाणे यंदाही पालम तालुक्याला पावसाने दुजाभाव देत रिमझीम हजेरी लावली. जिल्ह्यातील इतर भाग झोडपले जात असताना, पालममधील सर्वच महसूल मंडळांमध्ये 10 मिमीपेक्षाही कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, जमिनी वाळलेलीच आहेत. खरीप पेरणीसाठी आवश्यक असलेली ओल नसल्याने पिके संकटात सापडली आहेत.

अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे निर्माण झालेल्या संकटांची पाहणी करण्यासाठी महसूल व कृषी विभागाच्या पथकाला तातडीने पाठवावे, अशी मागणी होत आहे. तर दुसरीकडे, पालम तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी कृत्रिम पावसाचा विचार किंवा सौर ऊर्जा पंप, पाणी टंचाई योजना लागू कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Tuesday, July 22, 2025

मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट बीडसह राज्यभर आंदोलना चा दिला इशारा.


बीड (प्रतिनिधी)- महादेव दत्तात्रय मुंडे यांच्या खुनाच्या घटनेस 19 महिने झाले तरी अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेले नाही. आरोपींना तात्काळ अटक करावी व या प्रकरणाची विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या माहेर कन्हेरवाडी व सासर भोपळा येथील ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीसाठी २५ जुलै रोजी परळी-अंबाजोगाई रस्त्यावर कन्हेरवाडी येथे तीव्र रस्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी सोमवारी पोलिस प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

 मनोज जरांगेंनी घेतली मुंडे कुटुंबाची भेट.

दरम्यान, आज मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी महादेव मुंडे खून प्रकरणाची सविस्तर माहिती पत्नी ज्ञानेश्वरी व सतीश फड यांनी जरांगे पाटलांना दिली. यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना महादेव मुंडे कुटुंबीयांना तात्काळ वेळ द्यावी आणि या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी मान्य केली. तसेच, आरोपींना अटक करावे, अन्यथा केवळ बीड जिल्हाच नव्हे, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही दिला. जरांगे पाटील पुढे म्हणाले, या कुटुंबावर संकट कोसळले आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. न्याय कसा मिळत नाही, हेच आता पाहतो. यावेळी “दादा, आता न्याय तुम्हीच द्या,” अशी कळकळीची विनंती ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली. तसेच यावेळी उपस्थित असलेल्या मीरा महादेव गीते यांनी, “माझे पती महादेव गीते यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले आहे. आमच्या कुटुंबालाही न्याय मिळावा,” अशी भावनिक मागणी जरांगे पाटलांकडे केली. दरम्यान, मनोज जरांगे पाटील परळीत आल्यामुळे प्रिया नगर भागातील महादेव मुंडे यांच्या घराजवळ पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. 

बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिराय ला गेला, पोहायला धरणात उतरला पाण्या चा अंदाज न आल्याने तो बुडाला.


पुणे (प्रतिनिधी) : रविवार असल्याने मित्राचा फिरायला जाण्याचा प्लॅन ठरला. पावसाळा असल्याने त्यांनी कासारवाई धरण परिसरात जायचं ठरवले. धरण परिसरात गेल्यानंतर ते पोहायला उतरले आणि १९ वर्षीय संतोषचा बुडून मृत्यू झाला. २४ तासानंतर त्याचा मृतदेह सापडला. 

रविवारी (२० जुलै) संतोष हा त्याच्या चार मित्रांसोबत कासारवाई धरण परिसरात फिरायला गेला होता. सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते धरणात पोहण्यासाठी उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्यानंतर मित्रांनी आजूबाजूला मदत मागितली. 

रविवार सकाळपासून त्याचा मावळमधील वन्यजीव रक्षक संस्था, लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू यांच्या मदतीने पोलिसांनी शोध सुरू केला. पण, रात्रीपर्यंत त्याचा मृतदेह मिळाला नाही. 

त्यानंतर सोमवारी (२१ जुलै) सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. सोमवारी सकाळी ११ वाजता त्याचा मृतदेह मिळाला. मृत तरुणाचे नाव संतोष शहाजीराव असे आहे. मयत तरुण बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या मालेगावचा रहिवासी आहे. 

लघुशंकेला गेला आणि तलावात पडला

ओतूरमध्येही फिरण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा धरणात बुडून मृत्यू झाला. रविवारी २१ वर्षीय तरुण धुरनळी जवळच्या तलाव परिसरात मित्रांसोबत फिरायला आला होता. जहीर अली सराजू अन्सारी असे मयत तरुणाचे नाव असून, तो सध्या नारायणगाव येथे राहत होता. तो मूळचा उत्तर प्रदेशातील कुसीनगर जिल्ह्यात असलेल्या पडरौणा गावाचा आहे. 

जहीर अली हा चार मित्रांसोबत धरण परिसरात फिरत होता. दुपारी ४ वाजता तो धरणजवळच लघुशंकेला गेला. त्यावेळी पाय घसरून तो धरणात पडला. त्याला मदत मिळेपर्यंत त्याचा बुडून मृत्यू झाला. 

Monday, July 21, 2025

मुलीसोबत प्रेमसंबंध वडिलांनी आणि नातेवाईकांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या तरुणाला मारले की त्याचा मृत्यू झाला.



बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात आणखी एक भयंकर घटना घाडली आहे. एका मुलीसोबत प्रेमसंबंध असलेल्या तरुणाची तिच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी मिळून हत्या केली. १५ जुलै रोजी तरुणीने त्याला घरी कुणीच नसल्याने भेटायला बोलावले होते. तो गेला, तेव्हा तिथे तरुणीचे नातेवाईक आले आणि त्यांनी त्याला पकडले. त्यादिवशी इतरांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला. पण, त्यानंतर तिसऱ्याच दिवशी मुलीचे वडील आणि नातेवाईकांनी त्याला रस्त्यात गाठलं आणि बेदम मारलं. छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असलेल्या शिवमने जीव सोडला. 

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथे ही घटना घडली. २१ वर्षीय शिवम चिकणे या तरुणाला प्रेमसंबंधाच्या कारणावरून पाच जणांनी बेदम मारहाण केली. ही घटना १८ जुलै रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गंगावाडी ते तळवाडा रस्त्यावर घडली. 

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिवमवर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात तलवाडा पोलिस ठाण्यात आधी जिवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. आता यात खुनाचे कलम वाढविले जाणार आहे.

घरी कुणी नसल्याने तरुणीने शिवमला भेटायला बोलावले अन्... 

शिवमचे वडील काशीनाम चिकणे यांच्या तक्रारीनुसार, मुलगा शिवम हा माजलगाव येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. शिवमचे गावातीलच एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. 

१५ जुलै रोजी प्रेयसी एकटी असताना तिने शिवमला घरी बोलावले होते. त्यावेळी तिचे दोन नातेवाईक शिवम गणेश यादव आणि सत्यम मांगले हे तिथे आले व त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता. गावकऱ्यांनी तो सोडवलाही होता. 

शिवमची गाडी अडवली अन् काठ्यांनी मारहाण

१८ जुलै रोजी दुपारी १२:३० वाजता काशीनाम चिकणे शेतात असताना त्यांना मुलाला मारहाण झाल्याची माहिती मिळाली. ते तत्काळ गेवराई येथील खासगी रुग्णालयात पोहोचले असता, शिवम बेशुद्धावस्थेत आढळला. 

ज्ञानदेव चिकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी २ वाजता शिवम दुचाकीवरून जात असताना, शिवम गणेश यादव याने त्याची गाडी अडवून शिवीगाळ केली. त्यावेळी गणेश सुखदेव यादव, राजाभाऊ उत्तम यादव आणि ईश्वर गोवर्धन यादव हेही तिथे आले. 

उपचारादरम्यान शिवमचा मृत्यू 

शिवम यादव, सत्यम मांगले आणि राजाभाऊ यादव यांनी लाठ्या-काठ्यांनी, तर गणेश सुखदेव यादव आणि ईश्वर गोवर्धन यादव यांनी हाता-बुक्क्यांनी मारहाण केली होती. जखमी शिवमवर रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु शनिवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला.

मुलीच्या वडिलाला अटक

मुलीच्या वडिलाला तलवाडा पोलिसांनी अटक केली आहे, तसेच घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामाही केला.

या प्रकरणात अगोदरच जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कलमांखाली गुन्हा नोंद आहे. मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता यात खुनाचे कलम वाढवणार असल्याचे उपनिरीक्षक स्वप्निल कोळी यांनी सांगितले.

Sunday, July 20, 2025

माजलगावात सुखसागर हॉटेलवर पोलिसां चा छापा.जुगार खेळताना बड्यांची ६ मुले पकडल.८लाख ३५ हजार रुपयांचा मुद्दे माल जप्त.

शहरातील अनेक लॉजेसवर राजरोसपणे अवैध धंदे बिनधास्तपणे सुरू आहेत. त्यातच शहरात संभाजी चौकात असलेल्या आलिशान  सुखसागर या हॉटेलमध्ये जुगार खेळला जात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्याने शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास पोलिसांनी तेथे छापा टाकला, त्यावेळी तेथील रूम नंबर २०१ मध्ये परिक्षीत सिद्धेश्वर जाधव, स्वप्निल अमरनाथ खुरपे,श्रीधर अशोक रांजवण,विश्वजीत प्रताप रांजवण,पृथ्वीराज रघुनाथ शेजुळ,मनोज विठ्ठल सोळंके हे बड्या घरचे सहा तरुण तिरट नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. यावेळी पोलिसांनी जुगाराच्या साहित्यासह ८ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या जुगाऱ्यांना शहर पोलीस ठाण्यात आणून त्यांचे विरुद्ध जुगार कायद्यान्वये कारवाई केली. छाप्याची ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक के.बी.माकणे, हवालदार शेख अस्लम,महेश चव्हाण,अंगद घोडके,सुनील गवळी यांनी केली.

दरम्यान या हॉटेलमध्ये राजरोसपणे जुगार व इतर अवैध धंदे सुरू असल्याची चर्चा आहे. दररोज हॉटेलच्या रूममध्ये जुगार खेळण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येतात, यामध्ये काही राजकीय मंडळी देखील येत असतात.मात्र हॉटेल व्यवस्थापक सुरेश पुजारी यांनी आम्ही एका व्यक्तीच्या नावावर आधार कार्ड घेऊन रूम देतो,आता काय चालले माहिती नाही असे म्हणून हात झटकत असल्याने हॉटेल चालकावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

मोठा व्यवहार झाल्याची चर्चा 

पोलिसांनी छापा टाकून पकडलेली मुले ही अतिशय श्रीमंताची होती.  पोलिसांनी घेऊन जात त्यांच्यावर कारवाई केली असली तरी यात मोठा व्यवहार झाल्याची चर्चा शहर पोलीस ठाण्या समोर ऐकावयास मिळाली.

जुगार खेळण्यासाठी येतात दुरून लोक 

शहरातील बायपास रोड असलेल्या या हॉटेलमध्ये परभणी , बीड , पाथरी ,मानवत आदि ठिकाणाहून दररोज दुपारी लोक जुगार खेळण्यासाठी येतात. त्याचबरोबर या ठिकाणी अल्पवयीन विद्यार्थीनींना या ठिकाणी बिनधास्तपणे आणले जात असल्याची चर्चा देखील या भागात दिसुन आली.

Saturday, July 19, 2025

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न

परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या निमित्ताने वार शनिवार दिनांक 19/7/2025/ रोजी आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले होते.
दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल येथे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धे च्या निमित्ताने आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत1) पी टी उषा हाऊस 2) कर्मन मल्लेश्वरी 3) मिल्खा सिंग 4 ) मेजर ध्यानचंद हाऊस या सर्व हाऊस मधील मुलांनी उस्फुर्त सहभाग घेतला यात इयत्ता  पहिली ते दहावीच्या मुलांनी सहभाग घेतला. सदर स्पर्धेचे उद्घाटन प्रशालेचे प्राचार्य डॉ. श्रीकांत पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी क्रीडा शिक्षक कुमारी संघमित्रा हुमने मॅडम ,राजु कलावत, भरत हएलओर सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या स्पर्धा आयोजित करण्यासाठी प्रशालेचे मार्गदर्शक मा. श्री किरण गित्ते साहेब IAS सचिव :त्रिपुरा सरकार, विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा सौ उषाताई किरण गित्ते ,प्राचार्य डॉ. श्रीकांत पाटील सर आदीचे मार्गदर्शन लाभले

भरधाव वेगात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारच्या चार पलट्या, झाडं उन्मळली दोघां चा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी.


पारगाव (प्रतिनिधी) : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पारगावनजीक मध्यरात्री झालेल्या एका भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले असून, अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. जखमींवर बीड येथे उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली.

बीडहून सोलापूरकडे निघालेली भरधाव कार (क्र. एमएच. २०-एचबी. ९७७६) पारगावच्या उत्तरेकडे सुमारे २ किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावरील एका वळणावर आली. मात्र, चालकाला समाेरील वळणाचा अंदाज न आल्याने नियंत्रण सुटले असता, कारने चार ते पाच पलट्या खाल्ल्या. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीने रस्त्यालगतच्या झाडांना जोरदार धडक दिली. यात अनेक झाडे उन्मळून पडली, तर काही तुटली. गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या दुर्दैवी अपघातात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हर्सूल येथील रहिवासी असलेले ऋषिकेश सुदाम औताडे (२५) आणि अजिंक्य अंबादास लेंबे या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. 

गाडीतील अन्य प्रवासी रोहन कडुबा जाधव आणि मयूर माधव गावंडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ बीड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांचे शवविच्छेदन पारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच वाशी पोलीस स्टेशनमधील पारगाव बिटचे हेड कॉन्स्टेबल राजू लाटे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

बीड जिल्ह्यातील सर्व बेपत्ता महिला आणि मुलांचा शोध घेण्यासाठी उच्च न्यायालया कडून गंभीर दखल. विशेष पथक नेमून तपास करण्याचे पोलिस अधीक्षकांना आदेश.


छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील सर्व बेपत्ता महिला व मुलांचा शोध लागत नसल्याबाबत उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. संजय देशमुख यांनी पोलिसांच्या तपासावर तीव्र नाराजी व्यक्त करून बीडचे पोलिस अधीक्षक यांना ‘विशेष पथक’ नेमून याचिकाकर्त्यांसह सर्वच बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याचे ११ जुलै २०२५ रोजी आदेशित केले आहे.

बेपत्ता असलेल्या ओमकार सुधाकर कांबळे (१४ वर्षे) आणि एक महिला व तिच्या २ बालकांचा शोध घेण्याबाबत दाखल स्वतंत्र फौजदारी याचिकांच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात बेपत्ता महिला आणि मुलांचे प्रमाण जादा असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तसेच वरीलप्रमाणे आदेश दिले आहेत. या याचिकेवर ८ ऑगस्ट २०२५ रोजी पुढील सुनावणी होणार आहे. ‘बेपत्ता मुले व महिलांचा शोध घेऊन त्यांना संरक्षण देणे. आवश्यकता असल्यास सुरक्षित स्थळी आसरा देणे’ हे पोलिसांचे मूलभूत कर्तव्य असल्याचे शहाजी जगताप विरुद्ध महाराष्ट्र राज्य या जनहित याचिकेतील आदेशात म्हटल्याचा संदर्भ देत खंडपीठाने बीड पोलिसांना नेमका ‘या कर्तव्याचा’च विसर पडल्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे.

काय आहे याचिका ?

बीड जिल्ह्यातील पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ढेकणमोह येथील ओमकार सुधाकर कांबळे (१४ वर्षे) हा बेपत्ता झाल्याबद्दल त्याच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. मात्र, पोलिस व्यवस्थित तपास करत नसल्यामुळे त्यांनी ॲड. महेंद्र गंडले यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याचिकेवरील सुनावणीदरम्यान तपास अधिकाऱ्यांनी ओमकारचा शोध घेतला, परंतु तो सापडला नाही, असा अहवाल खंडपीठात सादर केला. या अहवालावरून पोलिसांनी ओमकारचा शोध घेण्याचा अजिबात प्रयत्न केला नसल्याचे दिसते, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.

असे नेमावे पथक.

पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक, हेडकॉन्स्टेबल आणि काॅन्स्टेबल अशा विविध पदांच्या किमान ५ जणांचे विशेष पथक नेमून वरील २ याचिकेतील बेपत्ता व्यक्तींसह बीड जिल्ह्यातील सर्वच बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी हे पथक तज्ज्ञांचीही मदत घेऊ शकेल, असे स्पष्ट करून ‘अशा कामाबद्दल ज्यांना आस्था नाही, अशांकडे हे काम सोपवू इच्छित नसल्याचे’ म्हणत खंडपीठाने बीड पोलिसांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Friday, July 18, 2025

आरोग्य विभागाने केले १०७ सोनोग्राफी केंद्रांचे 'स्टिंग ऑपरेशन.१३ केंद्र दोषी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमध्ये मुलींच्या जन्मदरात वाढ.


छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यात १४ महिन्यांत १०७ सोनोग्राफी केंद्रांचे स्टिंग ऑपरेशन केले. यामध्ये १३ सोनोग्राफी केंद्रांवर ‘गडबड’ हाेत असल्याचे आढळल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या केंद्रात गर्भलिंग चाचणी होऊन मुलींचे भ्रूण गर्भातच खुडले जातात, असे आरोप सतत होत मुलींच्या जन्मदाराविषयी नेहमी चिंता व्यक्त होते. परंतु गेल्या ३ वर्षांत छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे, ही बाब दिलासादायक आहे.

उपरोक्त ३ जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी मुलींचा जन्मदर ९०० च्या खाली गेला होता. त्यामुळे गर्भलिंग निदान आणि मुलींच्या भ्रूणांचा गर्भपात होत असल्याची शक्यता व्यक्त झाली. त्यामुळे आरोग्य विभागाने स्टिंग ऑपरेशन करून गर्भलिंग निदानाचा ‘उद्योग’ बंद करण्यासाठी पाऊल टाकले. याचा दृश्य परिणाम या तीन जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढण्यात झाला आहे.

दर ३ महिन्याला तपासणी.

गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निदान तंत्र प्रतिबंध कायदा १९९४ सुधारित अधिनियम २००३ अंतर्गत प्रत्येक सोनोग्राफी व गर्भपात केंद्राची तीन महिन्यांतून एकदा तपासणी केली जाते. तपासणीत काही त्रुटी आढळल्यास केंद्रास कारणे दाखवा नोटीस काढली जाते. नोटीसचा खुलासा जिल्हा सल्लागार समितीसमोर ठेवून संबंधित केंद्रावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येते, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्नावर दिली.

कसे केले स्टिंग?

गर्भलिंगनिदानाचा संशय असलेल्या सोनोग्राफी केंद्रावर गर्भवती (डिकाॅय) महिलेच्या मदतीने स्टिंग ऑपरेशन केले जाते. अशाप्रकारे राज्यात २०२४-२५ या आर्थिक वर्षात ९४ आणि एप्रिल व मे महिन्यात १३ असे १४ महिन्यांत १०७ सोनोग्राफी केंद्रांचे स्टिंग करण्यात आले. यात १३ केंद्रे दोषी आढळली. त्यांच्या कायदेशीर कारवाई करण्यात आली.

कुठे किती गुन्हे दाखल?

२०२४-२५ मध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये गर्भलिंग निदानाबाबत पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला. जालना जिल्ह्यात भोकरदन पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल केला असून, सोनोग्राफी मशीन विक्रीबाबत जालना पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला. तर बीड जिल्ह्यात गर्भलिंग निदान प्रकरणी २ आरोपींना अटक झाली.

जिल्हानिहाय मुलींचा जन्मदर.

जिल्हा - २०२२ - २०२३ -२०२४बीड -८८८ - ८८३ -९६६जालना -८५४- ८५७ - ९१९छत्रपती संभाजीनगर - ८८६ - ८८० - ९२७

कोरोनाकाळातील घोटाळा, बीड जिल्हा शल्यचिकित्सक निलंबीत.पण ११ जणांचे काय?आरोग्यमंत्र्यांचे आश्वासन.तीन महिने उलटूनही विभागीय चौकशी अपूर्णच.


बीड (प्रतिनिधी) २०२० ते २०२४ या काेरोनाकाळात घाेटाळा केल्याचा ठपका १२ अधिकाऱ्यांवर होता. त्यातील तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांचे २५ मार्च २०२५ रोजी निलंबन करून संपूर्ण प्रकरणांची तीन महिन्यांत विभागीय चौकशी पूर्ण करू, असे आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी दिले होते. परंतु ते हवेत विरले असून, साडेतीन महिन्यांनंतर या चौकशीला गुरुवारी मुहूर्त लागला आहे. त्यामुळे आरोपातील ११ जण अजूनही बिनधास्त असल्याचे दिसत आहे.

कोरोना काळात भरतीसह खरेदीतील घोटाळ्याची लातूर उपसंचालक कार्यालयाकडून चौकशी झाली. यांच्या अहवालावरून विभागीय चौकशी प्रस्तावित केली गेली. यामध्ये १२ जणांचा समावेश होता. दोन वर्षांनंतरही निर्णय न झाल्याने अर्थसंकल्पीय अधिवेशनात २५ मार्च २०२५ रोजी केजच्या भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी डॉ. थोरात यांच्याविरोधात प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर मंत्री आबिटकर यांनी डॉ. थोरांतांच्या निलंबनाची घोषणा केली. तसेच प्रकरणाची विभागीय चौकशी तीन महिन्यांत पूर्ण करून दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन सभागृहात दिले होते. परंतु ते हवेतच विरल्याचे दिसत आहे.

यांच्यावर चौकशीत ठपका.

तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, डॉ. सूर्यकांत गित्ते, डॉ. सूर्यकांत साबळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, डॉ. बाबासाहेब ढाकणे, डॉ. महेशकुमार माने, डॉ. एच. अशोक, राजदीप कुलकर्णी, फार्मासिस्ट आदिनाथ मुंडे, एजाज अली, शेख रियाज, तानाजी ठाकर यांच्याविरोधात चौकशीत ठपका ठेवण्यात आलेला आहे. यातील कुलकर्णी हे मृत असून, डॉ. गित्ते हे निवृत्त झाले आहेत.

थोरातांचे सचिवांना चार पत्र.

निलंबणानंतर डॉ. अशोक थोरात यांनी अन्याय झाला म्हणत स्वतंत्र चौकशीसाठी सचिवांना चार पत्र दिल्याची माहिती आहे. आरोप आणि कारवाई चुकीच्या पद्धतीने झाल्याने त्यांनी न्यायालयातही धाव घेतली. डॉ. थोरात हे अजूनही निलंबीत आहेत. तसेच बीडचे सीएस पदही रिक्तच आहे.

तीन महिने, २४ दिवसांनंतर चौकशी.

मंत्री आबीटकर यांनी तीन महिन्यांत चौकशी पूर्ण करू, असे अश्वासन दिले होते, प्रत्यक्षात मात्र ३ महिने २४ दिवसानंतर पहिल्यांदाच चौकशीला सुरुवात झाली आहे. १७ जुलै रोजी मयत वगळता सर्वच ११ जणांना छत्रपती संभाजीनगरला बोलावले होते. यातील दहाजण हजर, तर एकजण गैरहजर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दीपा मुधोल-मुंडे यांनी स्वीकारला समाज कल्याण आयुक्त पुणे पदाचा पदभार.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  भारतीय प्रशासन सेवेतील सौ.दीपा मुधोळ-मुंडे यांची  समाजकल्याण आयुक्त पुणे या ठिकाणी करण्यात आली आहे. याबाबत गुरुवार दि 17 रोजी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने आदेश निर्गमित केले आहेत. आज वार शुक्रवार दि 18/7/2025 रोजी आयुक्त समाजकल्याण पुणे पदाचा पदभार स्वीकारला.
व्यवस्थापकीय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित, पुणे. या पदावर कार्यरत असलेल्या सौ.दीपा मुधोळ-मुंडे यांची रोजी दिनांक 17/7/2025आयुक्त समाजकल्याण, पुणे या रिक्त पदावर ते पद निवड श्रेणीत अवनत करून केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार प्रधान सचिव (२), नगर विकास विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिका-याकडे सोपवून, नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारावा याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत काढण्यात आलेल्या अ.शा.प.क्र. एईओ- ११२५/५/२०२५/भाप्रसे-१, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई च्या आदेशानुसार ही बदली करण्यात आलेली आहे. याबाबत  सौ.दीपा मुधोळ -मुंडे IAS यांनी आपल्या नवीन आयुक्त समाजकल्याण पुणे पदाचा पदभार त्यांनी स्वीकारला पदभार स्वीकारल्या बद्दल त्यांचे समाज कल्याणचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांच्यावतीने स्वागत करण्यात आले

Thursday, July 17, 2025

राज्यातील शिक्षकांसाठी मोठी बातमी…. राज्य शिक्षक पुरस्कारासाठी आता नवे निकष!


पुणे (प्रतिनिधी) समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी शिक्षण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठीचे निकष बदलण्यात आले आहेत. या पुरस्कारासाठी पूर्वी १७ निकष निश्चित करण्यात आले होते. पूर्वीच्या निकषांतील काही निकष कायम ठेवून आता काही नव्या निकषांचा समावेश करण्यात आला आहे.

शालेय शिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. २८ जून २०२२ च्या शासन निर्णयाद्वारे राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे नाव बदलून क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार असे करण्यात आले. तसेच पुरस्कारांसाठीचे निकषही बदलण्यात आले होते. आता तीन वर्षांनी पुन्हा या निकषांत बदल करण्यात आले आहेत.

नव्या निकषांमध्ये शैक्षणिक अर्हता, शैक्षणिक संशोधनपर प्रबंधास पुरस्कार, शिक्षकाच्या विविध क्षेत्रातील योगदानासाठी शासकीय किंवा शासन पुरस्कृत संस्थेकडून पुरस्कार, शाळेच्या उन्नतीसाठी समाजाकडून गेल्या पाच वर्षांत मिळवलेले योगदान, ग्रंथलेखन, प्रशिक्षणात तज्ज्ञ मार्गदर्शक, सुलभक म्हणून काम, शासकीय स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण, राज्याच्या शैक्षणिक क्षेत्राला स्वत:च्या नवप्रकल्पाद्वारे दिशा देणारे कार्य, मागील पाच वर्षांत गावातील, परिसरातील मुलांच्या शिक्षणासाठी स्थानिक डीएड, बीएड. धारक उमेदवारांना प्रेरक म्हणून तयार करणे, शाळेत आनंददायी वातावरण निर्मिती, शासनाच्या ऑनलाइन संकेतस्थळ, ॲपवर आपल्या विषयाच्या अनुषंगाने शैक्षणिक साहित्य निर्मितीमध्ये सहभाग, विद्यार्थ्यांची चाचणी, शैक्षणिक स्पर्धांतील विद्यार्थ्यांचा सहभाग, मागील पाच वर्षांत शाळेच्या पटसंख्येत झालेली वाढ, उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रम, आयडॉल शिक्षक व शैक्षणिक संस्था, शाळा बँक तयार करण्यासाठी निवड, राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अंमलबजावणीत योगदान, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे गेल्या पाच वर्षांत आयोजित ऑनलाइन अभ्यासक्रम निर्मिती, प्रशिक्षणे, उपक्रम, सर्वेक्षण, प्रकल्पात सहभाग, मागील पाच वर्षांचे गोपनीय अहवाल असे नवे निकष निश्चित करण्यात आले आहेत.

या निकषांवर १०० गुणांसाठी शिक्षकांचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. प्राथमिक स्तरावर ३८, माध्यमिक स्तरावर ३९, आदिवासी क्षेत्रासाठी १९, थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी ८, कला-क्रीडा विशेष शिक्षक पुरस्कारासाठी २, दिव्यांग शिक्षक १, स्काऊट-गाईड २ या प्रमाणे एकूण १०९ पुरस्कारांसाठी शिक्षकांची शिफारस करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. पुरस्कारासाठी राज्य आणि जिल्हास्तरावर पूर्वीप्रमाणे निवड समिती असणार आहे. तसेच मे महिन्यात ऑनलाइन नामांकन नोंदणी सुरू करून जूनमध्ये जिल्हा समितीद्वारे नामांकनाची पडताळणी, जुलैमध्ये राज्यस्तर पडताळणी, ऑगस्टमध्ये नामांकन अंतिम करून राज्य शासनाला सादर करणे, सप्टेंबरमध्ये पुरस्कार वितरण समारंभ होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.


जगात सर्वत्र पक्षीधाम निर्माण करावेत गरुड पक्षाला केले मुक्त - काशी जगद्गुरू डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी.

लुधियाना (पंजाब): प्राणी, पक्षांना मुक्त जगण्याची संधी दिली पाहिजे. भगवंताने निसर्गामध्ये सर्व जीवजंतूंना जगण्याची संधी दिली आहे. काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी प्राणी, पक्षांना मारतात. आहार म्हणून सेवन करतात. हे अत्यंत चुकीचे आहे. प्रत्येक मनुष्याने प्राणी पक्षांना जगण्यासाठी संधी दिली पाहिजे. सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. पक्षीधामची निर्मिती जगात सर्वत्र झाली पाहिजे असे विचार श्रीकाशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपल्या आशीर्वचनात सांगितले.
       लुधियाना येथील पक्षीधाममध्ये सकाळच्या सत्रात आहारदान वितरण समारंभ प्रसंगी महास्वामीजींनी उपदेश केला. पंजाब मधील लुधियाना येथे २० एकर परिसरात पक्षीधाम निर्माण केले आहे. लाखो पक्षी या ठिकाणी मुक्त संचार आणि वास्तव्य करीत आहेत. लुधियाना येथील पक्षी सेवा सोसायटीने हे कार्य उभे केले आहे. दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत पक्षांसाठी एक क्विंटल धान्याचे वाटप हे सदस्य करतात. ब्रेड, पनीर, बिस्कीट यांसह विविध अन्नपदार्थ पक्षांना देतात. या स्थळावर महास्वामीजींनी भेट दिली. सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक करून आशीर्वाद दिले. 
आजारी पडलेल्या पक्षांसाठी पशुवैद्यकीय चिकित्सकांमार्फत वैद्यकीय सुविधा देतात. त्यांची सेवा सुश्रुषा करतात. पक्ष्यांची प्रकृती ठीक झाल्यानंतर आकाशात सोडतात. अशा सोयी सुविधांमुळे संपूर्ण भारत आणि भारताबाहेरील अनेक देशातून विविध पक्षी वेगवेगळ्या ऋतूत आपापल्या सोयीने येतात. मुक्त संचार करतात. वास्तव्य करतात आणि पुन्हा निघून जातात. सोसायटीचे चेअरमन अशोक थापर, संचालक संजय थापर, सिद्धू गुड्डू या मान्यवरांचे पक्षीधामसाठी विशेष योगदान आहे. हा आदर्श उपक्रम पाहून महास्वामीजींनी असा उपक्रम जगात सर्वत्र करण्याचे आवाहन केले. पक्षीधाम सोसायटीच्या सर्व सभासदांना रुद्राक्ष माळ, श्रीकाशीपीठाची शाल, श्रीफळ देऊन आशीर्वाद दिला.

चौकट 

एक महिन्यापासून आजारी असलेल्या गरुडाला औषधोपचार करून बरे केले. महास्वामीजींच्या शुभहस्ते आकाशात सोडण्यात आले.

नारायणगडाचे महंत शिवाजी महाराजांचे दोन ट्रस्टींवर गंभीर आरोप वाद पेटला.


बीड (प्रतिनिधी) धाकटी पंढरी म्हणून राज्यभरात ओळख असलेल्या श्री क्षेत्र नारायणगडाचा वाद आता पेटला आहे. महंत शिवाजी महाराज यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत विश्वस्त बळीराम गवते आणि सीए बी. बी. जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले. २५ कोटी रुपयांच्या कामासाठी या दोघांनी गडाची बदनामी केली. तसेच पुतळा बसविण्याच्या नावाखाली पैसे जमा केल्याचा आरोप त्यांनी केला, तर हे सर्व आरोप खोटे असल्याचा दावा गवते आणि जाधव यांनी केला असून, दोन दिवसांत सर्व पुरावे देऊ, असे सांगितले. परंतु लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या धाकट्या पंढरीचा वाद पेटल्याने आता वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.

दि. ११ मार्च २०२५ रोजी नगर नारायण महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महंत शिवाजी महाराज यांनी आपले भाचे महंत संभाजी महाराज यांची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर १५ दिवसांपासून त्यावरून धुसफूस सुरू होती. नारायणगडावर या संदर्भात बैठक घेऊन संभाजी महाराज यांच्या नियुक्तीला विरोधही करण्यात आला होता. तेव्हापासून हा गड चर्चेत आला होता. आता याच सर्व वादावर खुद्द महंत शिवाजी महाराज यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. गडाची बदनामी भक्तांनी नव्हे तर आपणच नियुक्त केलेल्या विश्वस्तांनी केली. यात त्यांनी गवते आणि जाधव यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांच्यावर गंभीर आरोप केले. आता हे दोन्ही विश्वस्तही या आरोपांना उत्तर देणार असल्याने हा वाद पेटण्याची दाट शक्यता आहे.

भक्तांनी शिव्या, जोडे मारले तरी गप्प बसेल.

गडाची बदनामी कोणी भक्त करत नसून ट्रस्टी करत आहेत. भक्तांनी शिव्या दिल्या जोडे मारले तरी मी वर पाहणार नाही. पण जे ट्रस्टी नेमले त्यांनीच आरोप, घाणाघात केला. १५ दिवसांपासून जेवलो, झोपलो का हे सुद्धा कोणी विचारले नाही. मी व्यथित झालो. मला हे सहन होत नसल्यानेच माध्यमांसमोर आल्याचे महंत शिवाजी महाराज यांनी सांगितले. महादेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने भक्तांची गर्दी येथे जमली होती.

विश्वस्त माळकरी असावेत.

यापुढे गडाचे विश्वस्त हे माळकरी असावेत. आतापर्यंत दबावामुळे मी गप्प होतो, कारण हे परमार्थाचे क्षेत्र आहे. पण आता शांत बसणार नाही. यापुढे गडाशी जोडलेल्या प्रत्येक गावातून दोन मुले असे १०० मुले गडाचे काम पाहतील. जर कोणी मध्ये बोलले तर हीच मुले कारवाई करतील, असा दावाही महंत शिवाजी महाराजांनी केला.

२५ कोटींच्या कामासाठी धडपड.

स्व.विनायक मेटे यांनी गडासाठी २५ कोटी रुपयांचा निधी आणला होता. परंतु तो आपणच आणला असून हे कामे आम्हालाच मिळावी, असे जाधव, गवते यांना वाटत होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी पैसे जमा केले, परंतु तो अद्यापही बसवला नाही, असा आरोप महंत शिवाजी महाराज यांनी केला. जाधव यांनी ऑडिट केले नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

गवते, जाधव काय म्हणतात?

महंत शिवाजी महाराज यांच्या आरोपानंतर जाधव आणि गवते यांनीही संवाद साधला. हे आरोप तथ्यहीन असून, महाराज कोणाच्या दबावाखाली बोलले, याचा शाेध घ्यायला हवा. ऑडिट, पुतळा, टेंडरचे सर्व पुरावे आहेत. पुढील दोन दिवसांत माध्यमांसमोर सर्व पुरावे देऊ, असा दावा या दोघांनीही केला. आम्ही पिढ्यानपिढ्या गडाची सेवा करतोत. आमच्यावर हे आरोप आजच का केले? का कोणी करायला लावले? यामागे कोण आहे? याचा शोध घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

ऑनलाईन जुगार रॅकेटचा पर्दाफाश. काेट्य वधी रुपयांचा गंडा. धाराशिव, बीड, नांदेड मधील आराेपी.


धाराशिव (प्रतिनिधी) शासनाने प्रतिबंधित केलेल्या ऑनलाईन गेमच्या नावाखाली सुरू असलेल्या ऑनलाईन जुगाराच्या मोठ्या रॅकेटचा सायबर पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. तपासात धाराशिवसह बीड, नांदेडमधील पाच आराेपी निष्पन्न झाले आहेत. यांनी लाेकांना काेट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा पाेलिसांना संशय आहे.

बीड जिल्ह्यातील तिघे, नांदेड व धाराशिवमधील प्रत्येकी एक असे पाचजण शासनाने प्रतिबंधित केलेल्या बीडीजी ऑनलाईन गेम, दमन ऑनलाईन गेम आणि टी. सी. ऑनलाईन गेम यासारख्या जुगाराच्या लिंक्स व्हॉट्सॲपद्वारे लोकांपर्यंत पाेहाेचवित हाेते. कमी पैशांत जास्त परतावा मिळवून देण्याचे खोटे आमिष दाखवून लोकांना या गेममध्ये पैसे गुंतवण्यासाठी प्रवृत्त करत होते. एकदा पैसे गुंतवले की, आरोपी गेममध्ये फेरफार करून किंवा पैसे घेऊन पसार होत होते, ज्यामुळे अनेकांना मोठा आर्थिक फटका बसला. १ जानेवारी ते १५ जुलै २०२५ पर्यंत हा फसवणुकीचा गोरखधंदा सुरू होता. दरम्यान, हा प्रकार समाेर आल्यानंतर सायबर पाेलिस ठाण्याचे पाेलिस निरीक्षक सुरेश कासुळे यांनी मंगळवारी फिर्याद दिली. त्यावरून पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेसह माहिती तंत्रज्ञान अधिनियम आणि महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सायबर पोलिस करत असून, नागरिकांनी अशा ऑनलाईन आमिषांना बळी न पडता सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल.

बीड जिल्ह्यातील साेनेसांगवी येथील उत्तरेश्वर दामोदर इटकर, केज तालुक्यातील सातेफळ येथील सुरज घाडगे, अंबाजाेगाई येथील नामदेव कांबळे, नांदेड येथील एम.डी. पाटील, तर कळंब तालुक्यातील शेळका धानाेरा येथील अस्लम दस्तगीर तांबाेळी या पाच आराेपींनी संगनमताने लोकांना आर्थिक गंडा घातल्याचा आरोप आहे. या सर्वांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नाेंद झाला आहे.

Tuesday, July 15, 2025

रेशन कार्डधारकांनो लक्ष द्या! ई-केवायसी केलं नसेल तर तुमचं नाव ब्लॅकलिस्टमध्ये जाणार!


मुंबई (प्रतिनिधी)   राज्यातील सर्व रेशनकार्डधारकांसाठी सरकारकडून महत्त्वाचा संदेश देण्यात आला आहे. ई-केवायसी (Electronic Know Your Customer) न करणाऱ्यांचे नाव बोगस कार्डधारकांच्या यादीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागाने केले आहे.

पात्र लाभार्थ्यांना हक्काचे धान्य मिळण्यासाठी आवश्यक प्रक्रिया :

सरकारकडून सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे  मोफत किंवा सवलतीच्या दरात तांदूळ, गहू, साखर यासारखे अन्नधान्य रेशनद्वारे दिलं जातं. मात्र याचा योग्य लाभ फक्त पात्र लाभार्थ्यांनाच मिळावा, या उद्देशाने रेशन कार्डसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे.

ई-केवायसी प्रक्रियेमुळे सरकारला हे सुनिश्चित करता येते की, फक्त खरी पात्र कुटुंबेच रेशनचा लाभ घेत आहेत, आणि गैरवापर रोखता येतो. 

 ई-केवायसी का आवश्यक आहे? :

– आधार कार्ड आणि रेशन कार्ड लिंक केल्याने कार्डधारकांची ओळख निश्चित होते.

– पात्रतेची पडताळणी करता येते.

– बोगस कार्डधारक ओळखता येतात.

– गरजू लोकांपर्यंत अनुदानित धान्याचा योग्य वाटप सुनिश्चित करता येतो.

– सरकारी यंत्रणेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढते.

शिधावाटप विभागाने स्पष्ट केलं आहे की, ज्यांनी अद्याप ई-केवायसी केलेलं नाही, त्यांनी तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा त्यांचं नाव बोगस कार्डधारक यादीत जाऊ शकतं आणि ते कायमस्वरूपी लाभातून वंचित राहू शकतात.

व्यापारी महासंघाच्या बैठकीत निर्णय. मानवत रोडला एक्सप्रेस रेल्वेंना थांबा मिळावा, आ. विटेकर घेणार रेल्वे मंत्र्यांची भेट.


मानवत (प्रतिनिधी) : मानवतरोड रेल्वे स्टेशनवर प्रमुख एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी आ. राजेश विटेकर हे लवकरच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार असून यासंदर्भात निवेदनही देणार आहेत. अशी माहिती त्यांनी मानवत शहर व्यापारी महासंघाच्या बैठकीत दिली.

सदरील बैठक शहरातील बांगड यांच्या दुकानात झाली. यावेळी व्यापाऱ्यांनी मानवतरोड-परळी रेल्वेमार्गाच्या अंमलबजा वणीसाठी प्रस्ताव लवकरच केंद्र शासनाकडे पाठवावा, अशी मागणी केली. यावर उत्तर देताना आ. विटेकर यांनी या मार्गाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची परवानगी मिळाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मंजुरी घेण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे असे म्हटले.

मानवतरोड रेल्वे स्टेशनपासून पाथरी शहर १६ किमी अंतरावर असून हेच शिर्डीच्या साईबाबांची जन्मभूमी मानले जाते. यामुळे येथे दक्षिण भारतातून मोठ्या प्रमाणात साईभक्त येतात. माजलगाव (५५ किमी), सोनपेठ (४५ किमी) येथील नागरिकांसाठीही मानवतरोड हे जवळचे स्टेशन ठरते. मानवत शहर हे कापूस खरेदी-विक्रीचे मराठवाड्यातील अग्रगण्य केंद्र असून येथे सुमारे १६ जिनिंग व प्रेसिंग युनिट्स आहेत. त्यामुळे गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा येथील व्यापारी येथे मोठ्या प्रमाणात ये-जा करतात.

यासाठी एक्सप्रेस गाड्यांचे थांबे आवश्यक असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच येथून जनशत ाब्दी एसप्रेस, सुपरफास्ट एक्सप्रेस (नांदेड-पुणे), काजीपेट एक्सप्रेस (सीएसटी-काजीपेट), नगरसोल एक्सप्रेस, नंदिग्राम एक्सप्रेस, पुणे-निजामाबाद, अजिंठा एक्सप्रेस, फिरोजपूर एक्सप्रेस या गाड्या धावतात. बैठकीस युवानेते डॉ. अंकुश लाड, ज्ञानेश्वर मोरे, दत्तप्रसाद बांगड, कचरूलाल वर्मा, कृष्णा बाकळे, संजय नाईक, श्याम झाडगावकर, इरफान बागवान, सुरेश काबरा, सोमनाथ कडतन, प्रफुलकुमार जैन, दिलीप हिवारे, जुगलकिशोर काबरा, लक्ष्मण गुंडाळे, सतीश भावसार, रुपेश काबरा उपस्थित होते.